18 December 2018

News Flash

शतकी चैतन्य!

डायना अ‍ॅटहिल या आजच्या काळातही आश्चर्यकारक वाटेल

‘आंद्रे डॉइश’ या एके काळच्या नामवंत ब्रिटिश प्रकाशन संस्थेच्या स्थापनेत सहभाग असणाऱ्या आणि वयाच्या सत्तरीनंतर काही चित्तवेधक ‘मेमॉयर्स’ लिहिणाऱ्या डायना अ‍ॅटहिल या २१ डिसेंबर २०१७ रोजी १०० वर्षांच्या झाल्या. ‘स्टेट’ नावाचं त्यांच्या प्रकाशन संस्थेतल्या दिवसांबद्दलचं पुस्तक ग्रांटा बुक्सकडून २००० साली प्रकाशित झालं. तेव्हा त्याच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं की, ‘मी ऐंशीच्या पार गेलेय, आता फार काळ जगेन असं वाटत नाही. म्हणून या आठवणी लिहून काढल्यायत.’ मात्र त्यानंतर १७ वर्षांनीही त्या आपल्यासोबत आहेत. शिवाय मधल्या काळात त्यांनी आणखी चार पुस्तकंही लिहिलियत. त्यांतलं ‘अलाइव्ह, अलाइव्ह ओह्!’ (ग्रांटा बुक्स, २०१६) हे तर त्यांच्या अठ्ठय़ाण्णवदीतलं! यानंतर २०१६ मध्येही ग्रांटाने त्यांचं ‘अ फ्लोरेन्स डायरी’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलंय. पण त्यातलं लेखन १९४७ सालचं आहे. दुसरं महायुद्ध संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी डायना यांच्या मावशीने त्यांना फ्लोरेन्स सहलीची भेट दिली होती. हे पुस्तक त्यांनी त्या प्रवासादरम्यान ठेवलेली खरोखरची रोजनिशी आहे.

डायना अ‍ॅटहिल या आजच्या काळातही आश्चर्यकारक वाटेल अशा तऱ्हेचं मुक्त आणि अनिर्बंध आयुष्य जगल्या आणि या जगण्याकडे हसून पाहत, अतिशय सहज आणि स्वच्छ अशा मोकळेपणाने त्यांनी त्याच्याविषयी लिहिलं. कुठेही आपण वेगळ्या आहोत असं मिरवणं नाही किंवा कुठे अपराधी वाटून घेणं नाही. वर उल्लेख केलेल्या पुस्तकाचं ‘स्टेट’ हे नावही अन्वर्थक आहे. ‘स्टेट’- ‘२३ी३’ ही मुद्रितशोधन / संपादन करताना वापरली जाणारी एक संज्ञा आहे. तपासत असलेल्या लेखनात आधी सुचवलेला बदल नंतर नकोसा वाटला, तर ‘होतं तसंच ठेवा’ हे सांगण्यासाठी ती वापरली जाते. हे ‘होतं तसंच ठेवा’ हे अ‍ॅटहिल यांच्या लेखनात आढळणाऱ्या सच्चेपणामागचं सूत्र आहे. त्यांच्या पुस्तकांना लोकप्रियता लाभली ती हे सूत्र आणि त्यांची प्रसन्न व आनंददायक शैली यांच्यामुळे.

डायना यांचा जन्म नॉरफोक कौंटीमधल्या एके काळी खूप श्रीमंत असणाऱ्या, पण त्यांच्या जन्माच्या वेळेपर्यंत संपत्ती गमावून बसलेल्या कुटुंबात झाला. मुली मोठय़ा झाल्यावर त्यांनी लग्न करून पतीची आणि त्याच्या कुटुंबाची सेवा करत उर्वरित आयुष्य घालवायचं अशा विचारांचा तो काळ होता. डायना वयात आल्यानंतर मात्र ‘तू स्वत: कमव आणि जग’ अशा अर्थाचे वडिलांचे उद्गार त्यांच्या कानावर पडू लागले. त्यांनी लिहिलंय, की त्यांचं लग्न करून देण्यासाठी लागणाऱ्या हुंडय़ाचे पैसे त्यांच्या वडिलांजवळ नव्हते हे याचं कारण होतं. आपल्याला नोकरी करावी लागणार हे त्यांच्या लक्षात आलं, पण म्हणजे नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. त्यांच्या बरोबरीच्या मुलींपैकी कोणीही नोकरी करणारं नव्हतं. मात्र त्यांचं घर त्यांच्या आजोबांच्या पुस्तकांनी भरलेलं होतं आणि त्यांनाही वाचनाची अतिशय आवड होती. यातून पुस्तकाशी संबंधित व्यवसायात काम करण्याची अंधूकशी इच्छा त्यांच्या मनात आकार घेत होती. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना पहिली नोकरी मिळाली ती बीबीसीच्या नुकत्याच स्थापन झालेल्या माहिती विभागात. इथल्या मित्रमैत्रिणींसोबत त्या लंडनला राहू लागल्या. मित्रांच्या या विस्तारत जाणाऱ्या वर्तुळातून त्यांची ज्या हंगेरियन तरुणाशी ओळख व पुढे मैत्री झाली आणि ज्याच्यामुळे प्रकाशन व्यवसायात शिरण्याच्या दिशेने त्यांचं पहिलं पाऊल पडलं, त्याचं नाव होतं- आंद्रे डॉइश.

आंद्रे हंगेरीतून शिकायला म्हणून इंग्लंडमध्ये आला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शत्रुराष्ट्राचा नागरिक म्हणून काही काळ त्याला स्थानबद्धतेत काढावा लागला. त्यातून बाहेर पडल्यावर तो एका ब्रिटिश प्रकाशन संस्थेचा पुस्तक विक्री विभाग सांभाळू लागला. या काळात त्याने प्रकाशन व्यवसायातील इतक्या खाचाखोचा शिकून घेतल्या होत्या, की त्याचा स्वत:ची प्रकाशन संस्था काढण्याचा विचार पक्का झाला होता. अगदी तुटपुंजं, पण चालू शकेल एवढं भांडवल पुरवणारे सहकारी मिळाल्याबरोबर, १९४५ साली, त्याने प्रकाशन व्यवसायात उडी घेतली. महायुद्धाच्या काळात आपलं जर्मन वाटणारं नाव चालणार नाही याची त्याला कल्पना होती, म्हणून त्याने आपल्या संस्थेला ‘अ‍ॅलन विनगेट’ असं नीट इंग्लिश नाव दिलं. डायना बीबीसीतली नोकरी सोडून या संस्थेत ग्रंथसंपादक म्हणून रुजू झाल्या. इथून त्यांची संपादकीय कारकीर्द सुरू झाली. आंद्रे डॉइशच्या कौशल्यामुळे ‘अ‍ॅलन विनगेट’ नावारूपाला येत असतानाच त्याच्या इंग्रज भागीदारांनी संस्थेचा ताबा घेऊन त्याला बाहेर काढलं. मग डॉइशने स्वत:च्याच नावाने वेगळी प्रकाशन संस्था सुरू केली. डायना अ‍ॅटहिल यांना एक भागीदार करून घेत त्याने त्यांना संचालकपदही दिलं. पण अ‍ॅटहिल यांना असल्या पदाचा वगैरे मोह नव्हता. त्यांनी फक्त त्यांच्या आवडीचं ग्रंथसंपादनाचं काम सांभाळलं..थेट वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी राजीनामा देईपर्यंत! संपादनातल्या त्यांच्या या पन्नास वर्षांच्या अनुभवावर त्यांचं ‘स्टेट’ हे पुस्तक आधारलेलं आहे.

दोन्ही संस्थांमधून काम करताना अ‍ॅटहिल यांनी नॉर्मन मेलर, मार्गारेट अ‍ॅटवूड, व्ही. एस. नायपॉल, फिलिप रॉथ, जॅक केरुआ, जॉर्ज मिकेश, सिमोन द बोवा, जॉन अपडाइक अशा अनेक नामवंतांच्या पुस्तकांवर काम केलं. इतरही अनेक वैशिष्टय़पूर्ण पुस्तकं त्यांच्या हाताखालून गेली. या साऱ्याबद्दलच्या कडू-गोड आठवणी ‘स्टेट’मध्ये आल्या आहेत. आपण प्रकाशित केलेलं पुस्तक यशस्वी होण्याचा पहिला अनुभव त्यांना जॉर्ज मिकेशच्या ‘हाऊ टू बी अ‍ॅन एलिअन’ या पुस्तकाने दिला. मिकेशही हंगेरीतून आला होता आणि बुडापेस्टमध्ये राहात असताना तो आणि आंद्रे डॉइशचा भाऊ हे एकाच वर्गात होते. दोघेही तेव्हापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे मिकेशचं हे पहिलं पुस्तक डॉइशच्या अ‍ॅलन विनेगटकडे येणं स्वाभाविक होतं. इंग्रजांच्या स्वभाववैशिष्टय़ांची खिल्ली उडवणारं हे पुस्तक इंग्लंडमध्ये भरपूर गाजलं; त्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत हे आज विशेष वाटेल! मिकेशचं नाव घेतल्यावर त्याच्या चाहत्यांना त्याच्या पुस्तकांच्या शीर्षक पानावर, लेखकाच्या नावाखाली ‘निकोलस बेंटले ड्रय़ू द पिक्चर्स’ असा उल्लेख असणाऱ्या चित्रकार बेंटलेची आणि त्याच्या चित्रांची आठवण येईल. त्याच्या संदर्भातली एक मजेशीर आठवण अ‍ॅटहिल यांनी सांगितलीय. मिकेशच्या पुस्तकातील मजकुराची लांबी कमी असल्याने त्याला चित्रांची जोड द्यायचं ठरलं आणि त्यासाठी बेंटलेला आमंत्रित करण्यात आलं. या चित्रांसाठी बेंटलेने काही टक्के रॉयल्टी घ्यावी असं डॉइशने सुचवलं, पण बेंटलेने त्याऐवजी शंभर पौंडांची मागणी केली. अ‍ॅटहिल यांनी म्हटलंय, की त्याला बहुधा या दोघा ‘परदेशी’ लेखक-प्रकाशकांचा भरवसा वाटला नसावा! पण डॉइशने जबरदस्ती करून बेंटलेला रॉयल्टी स्वीकारायला भाग पाडलं. या पुस्तकाच्या नंतर आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या- माझ्या संग्रहातली १९६६ ची प्रत हे तेहतिसावं पुनर्मुद्रण आहे- म्हणजे ही जबरदस्ती बेंटलेला किती लाभदायक ठरली असेल याची आपण कल्पना करू शकतो! पुढील काळात बेंटलेही आंद्रे डॉइश प्रकाशन संस्थेचा एक भागीदार-संचालक बनला.

डॉइश संस्थेतल्या अशा अनेक घटना अ‍ॅटहिल यांनी इतक्या लोभस शैलीत सांगितल्यायत, की हे पुस्तक ८३ वर्षांच्या स्त्रीने लिहिलंय यावर विश्वास बसू नये. उदाहरणार्थ, नायपॉलवर लिहिलेल्या पुस्तकातल्या एका उत्कृष्ट लेखात, नॉयपॉलने आपल्या पत्नीला दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल सांगताना त्या सहज लिहून जातात- ‘मी आयुष्यातल्या जमेच्या बाजूला असलेल्या गोष्टींची मोजदाद करते, तेव्हा माझ्या मनात येतं की आपलं निदान नायपॉलशी लग्न तरी नाही झालं!’

पाश्चात्त्य प्रकाशन व्यवसायातील ग्रंथ संपादक एखाद्या पुस्तकासाठी किती कष्ट उपसतात त्याची उदाहरणं त्यांच्या आत्मकथनांतून वाचायला मिळतात. अ‍ॅटहिल यांच्या पुस्तकातही अशा हकिकती आहेत. त्यांतली एक जीन ऱ्हीस या लेखिकेच्या ‘वाइड सर्गास्सो सी’ या कादंबरीविषयी आहे. अ‍ॅटहिल यांच्या फ्रान्सिस विण्डहॅम या सहकाऱ्याने जीन ऱ्हीसशी प्रथम संपर्क साधला तेव्हा कादंबरी अर्धी लिहून झाली होती. पण अतिमद्यपान आणि अनुभवलेले अनेक दुर्दैवी आघात यांनी या लेखिकेचं मानसिक संतुलन ढासळलं होतं आणि दैनंदिन जगण्यातली साधी कामं करणंही तिच्या आवाक्याबाहेर गेलं होतं. शिवाय प्रचंड आर्थिक विवंचना होती. अशा परिस्थितीत अ‍ॅटहिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शक्य ती मदत पुरवत अक्षरश: इंचाइंचाने कादंबरी पुढे सरकवत नेली. तब्बल नऊ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर त्यांना ती प्रकाशित करण्यात यश आलं.

‘स्टेट’नंतर, वयाच्या ९१ व्या वर्षी प्रकाशित झालेलं अ‍ॅटहिल यांचं ‘समव्हेअर टोवर्ड्स द एण्ड’ (ग्रांटा बुक्स, २००८) हे पुस्तक बरंच गाजलं. ते न्यू यॉर्क टाइम्सच्या खूपविक्या (बेस्ट सेलर) यादीत आलं. त्याला २००८ चे ‘कोस्टा बायोग्राफी अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘नॅशनल बुक क्रिटिक अ‍ॅवॉर्ड’ असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले. या पुस्तकात जवळ येऊन ठेपलेला मृत्यू आणि वर्तमानातलं वृद्धत्व यांविषयीचं चिंतन आहे. देवावर विश्वास नाही (‘‘मला ‘बायबल’मधली देवाने रात्री सॅम्युअलला साद घातल्याची गोष्ट वाचायला आवडते, पण त्याने अजून तरी मला साद दिलेली नाही..’’) आणि लग्न न केल्यामुळे कुटुंबकबिला नाही, असे दोन पारंपरिक आधार नसलेलं अ‍ॅटहिल यांचं हे वृद्धत्व आहे. शिवाय त्यांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी असणारी आणखी एक गोष्टही आता हरपलीय : सेक्स. अ‍ॅटहिल यांनी लग्न केलं नसलं, तरी अनेक पुरुषांशी संबंध ठेवणं आपल्याला उत्साहवर्धक वाटायचं असं त्या नि:संकोचपणे लिहितात. एक लैंगिक जाणिवेची व्यक्ती- a sexual being-  असणं हा आपल्या व्यक्तित्वाचा प्रधान भाग होता. मात्र सत्तरीनंतर ही ऊर्मी ओसरत चालली तेव्हा दुसरीकडे चित्रकला, बागकाम, वाचन अशा गोष्टींमधला आपला रस वाढू लागला, असं त्यांनी नोंदवलंय. त्यांचे अनेक प्रियकर कृष्णवर्णीय होते, तसंच विवाहितही होते. ‘आयुष्यभर मी ‘दुसऱ्या बाई’ची भूमिका छान निभावली,’ असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. याच काळात आपण पुन्हा एकदा लिहू शकतो याचा लागलेला शोध ही त्यांना एक सुदैवी देणगी वाटते.

मात्र या कबुल्यांच्या सोबतीने त्यांनी या पुस्तकात त्यांच्या ४४ व्या वर्षांतल्या ज्या एका दीर्घकालीन प्रेमसंबंधाविषयी लिहिलंय त्याचा विशेष उल्लेख करायला हवा. बॅरी रेकोर्ड या जमैकन नाटककाराशी जुळलेला संबंध, त्यानंतर या संबंधात सॅली कॅरी नावाच्या तरुण मुलीचं आगमन, नंतर सॅलीचं लग्न, तिचा पती आणि तिची मुलं, त्यानंतरचं बॅरीचं आजारपण या साऱ्या घटनांमधून या सर्वाचे परस्परसंबंध एका अत्यंत मानवी पातळीवर कसे जातात याची या पुस्तकातली हकिकत केवळ अद्भुत आहे.

डायना अ‍ॅटहिल आता स्वत:हून एका वृद्धाश्रमात राहायला गेल्यायत. का आणि कशा याबद्दल त्यांच्या ‘अलाइव्ह, अलाइव्ह ओह्’मध्ये एक लेख आहे. या वृद्धाश्रमात राहणारी इतर मंडळीही नव्वदीतली आहेत आणि त्यांना डायना आपल्यासोबत राहतात याचा अभिमान वाटतो, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. २१ डिसेंबरला तिथे त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा झाला असेल आणि शॅम्पेनचा चषक धरलेले अनेक थरथरते हात उंचावले असतील. या समारंभाचं त्यांनीच केलेलं वर्णन वाचायला मी उत्सुक आहे!

जयप्रकाश सावंत

jsawant48@gmail.com

First Published on December 23, 2017 3:30 am

Web Title: alive alive oh and other things that matter