‘लेखकपणा’शी समकालीन जगण्याचा असणारा संबंध सतत तपासत राहिलेले अमेरिकी कादंबरीकार फिलिप रॉथ यांचं २२ मे रोजी, वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. साठोत्तरी काळानंतर अमेरिकेला भेडसावणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांचा शोध आपल्या कादंबऱ्यांतून घेणारे रॉथ महत्त्वाचे का ठरतात, हे सांगणारा लेख..

आपण अल्पमतात आहोत, हे प्रत्येक लेखकाला स्वीकारावं लागतं, किंबहुना लेखक म्हणून आपण जिवंत असल्याचाच तो पुरावा असतो. कारण बऱ्याच लोकांना वाटतं तेच आपण म्हणत असू, तर ते लिहिण्यात काहीच हशील नाही, हे लेखकाच्या लक्षात आलेलं असतं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकेत ज्यांना हे नीट उमगलं होतं, त्यांच्यात फिलिप रॉथचं नाव अग्रगण्य होतं. ज्यूद्वेष्टा, स्त्रीद्वेष्टा, विकृत, देशद्रोही अशी अनेक अभिधानं त्याला लाभली. १९३३ साली जन्मलेल्या रॉथच्या पहिल्याच कथासंग्रहाला (‘गुडबाय, कोलंबस’, १९५९) ‘नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड’ मिळालं, पण त्यासोबत ज्यूद्वेषाचा डागही मिळाला. ज्यूवंशीय असल्यामुळे तो डाग ‘आपलाच तिरस्कार करणारा ज्यू’ हे लेबल घेऊन आला आणि त्यामुळे कदाचित विशेष वेदनादायक (किंवा अभिमानास्पद!) होता. मध्यमवर्गीय पाश्र्वभूमीच्या ज्यू तरुणाला वरच्या वर्गातल्या (शिवाय सुंदर आणि हुशार) ज्यू मुलीच्या सान्निध्यात आपण कसे तुच्छ आहोत, याची जाणीव होऊ  लागते आणि त्यामुळे त्यांच्या नात्याला असलेलं-नसलेलं भविष्यच धोक्यात येतं, हे ‘गुडबाय, कोलंबस’ या त्यातल्या लघुकादंबरीचं सूत्र पाहिलं आणि त्यातल्या वर्गजाणिवांना रॉथच्या प्रथमपुरुषी निवेदकानं दिलेली विनोदाची धार लक्षात घेतली, तर शनिवार पेठेतून डेक्कनवरच्या उच्चभ्रू कुटुंबाकडे पाहणारा सतीश आळेकरांचा नायक (‘झुलता पूल’) साहजिक आठवतो.

रॉथची तिसरी कादंबरी ‘पोर्टनॉयज् कम्प्लेंट’ (१९६९) प्रचंड गाजली. रॉथचा विनोद त्यात आणखीच तीक्ष्ण होतो. पुन्हा एक ज्यू तरुणच त्या विनोदाचा विषय आहे. आईनं लाडावलेल्या पोर्टनॉयला जगण्यातले ताण झेलता झेलता हस्तमैथुनाचं व्यसन लागतं आणि त्यातून त्याचा मनोगंड आकाराला येतो. हा कादंबरीचा विषय होऊ  शकेल, असं वाटण्यासाठी जी कल्पनाशक्ती लागते ती फ्रांझ काफ्काच्या प्रभावातून आलेली होती. पाश्चात्त्य जगात तेव्हा घडणारी लैंगिक क्रांती ही त्यामागची प्रेरणा होती. नायक मानसोपचारतज्ज्ञाकडे मनोविश्लेषणासाठी गेला आहे, अशी रचना करून रॉथनं कसलाही आडपडदा न ठेवणारी तपशीलवार लैंगिक वर्णनं त्यात दिली. सफरचंद, दुधाची बाटली किंवा आईनं जेवणासाठी फ्रिजमध्ये आणून ठेवलेली कलेजीही नायकाला प्रसंगी हस्तमैथुनासाठी चालत असते. त्यानं ‘वापरलेली’ कलेजी नंतर जेवणाच्या टेबलावरही पोहोचते. कादंबरीतले असे प्रसंग विरूप विनोदनिर्मिती करतात. ‘चांगला ज्यू’ होण्याच्या कौटुंबिक दबावाखाली श्वास घेऊ  न शकणारा नायक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्याच्या मनोगंडाविषयी अनुकंपा बाळगावी, की त्यातल्या हलकट विनोदाला हसावं ते कळेनासं होतं. (इथे पुन्हा सतीश आळेकरांच्या ‘महापूर’ची आठवण होणं शक्य आहे.)

अगदी न्यू यॉर्कच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या सकस साहित्याच्या कल्पनांमध्येही तेव्हा हे बसत नव्हतं. एकीकडे अमेरिकेतल्या मुख्य प्रवाहात सामावू इच्छिणाऱ्या ज्यू कुटुंबात हे सगळं घडतं. त्याच वेळी ज्यूंसाठीची नवी मातृभूमी इस्राएलमध्ये आकाराला येत होती. तिच्याशी ज्यू समुदायाचं नक्की काय नातं आहे, याविषयीही हा समाज एका चाचपडणाऱ्या स्थितीत होता. अशा काळात कादंबरीचं मानसशास्त्रीय विश्लेषण करणाऱ्यांना आई-मुलाच्या नात्यामध्ये वेगळे आयाम दिसणं जितकं साहजिक होतं, तितकाच ज्यू लोकांना त्याचा त्रास होणार हेदेखील. ‘नाझी जर्मनीत राहात असतास, तर तू अशा कथा लिहू शकला असतास का?’ हा प्रश्न पहिल्या कथासंग्रहातल्या काही कथांच्या संदर्भातच रॉथला ज्यू समाजाकडून विचारला गेला होता. ‘पोर्टनॉय..’मुळे तर मोठाच भडका उडाला. काही सुसंस्कृत, उदारमतवादी समीक्षकांनी कादंबरीच्या चिंधडय़ा उडवल्या. मात्र १९६८ नंतरच्या काळात अमेरिकेत एक सांस्कृतिक क्रांती घडत होती, हे त्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या लक्षातच येत नव्हतं. ‘पोर्टनॉय..’ त्या क्रांतीचा अविभाज्य हिस्सा ठरली आणि त्यामुळे बहुखपाऊही झाली. इतकंच नव्हे, तर यानंतर एखाद्याच्या लैंगिक अडचणीचा उल्लेख करण्यासाठी पर्यायोक्ती (यूफिमिझम) म्हणून ‘पोर्टनॉयज् कम्प्लेंट’चा वापर होऊ  लागला. यापुढे काहीही लिहिलं नसतं तरीही रॉथचं अमेरिकी साहित्यातलं स्थान अनन्यसाधारण असणार होतं.

‘पोर्टनॉयज् कम्प्लेंट’मधले काही तपशील आत्मचरित्रात्मक होते, त्यामुळे ती रॉथचीच गोष्ट मानली गेली; पण तसं नसूनही तसं भासवणं ही रॉथची खासियत आहे, हे हळूहळू पुढच्या पुस्तकांमध्ये लक्षात येत गेलं. आपल्या गंडांविषयीचा किंवा वैगुण्यांविषयीचा कबुलीजबाब असल्यासारखं त्याचं लिखाण होतं. उदा. रॉथ काही काळ प्राध्यापक म्हणून काम करत होता. प्राध्यापक असलेल्या ‘डेव्हिड केपेश’ या पात्राभोवती त्यानं काही कादंबऱ्या रचल्या. भावनिकदृष्टय़ा असुरक्षित, लैंगिक उपासमार झालेला आणि न्यूनगंडानं पछाडलेला हा प्राध्यापक एकाच वेळी विनोदी आणि केविलवाणा आहे. पुढे काही कादंबऱ्यांत ‘नेथन झुकरमन’ हा लेखक मध्यवर्ती आहे; तेव्हाही रॉथच्या आयुष्याशी त्याचं साधर्म्य दिसलं. काही कादंबऱ्यांत तर एका पात्राचं नावच ‘फिलिप रॉथ’ आहे!

मात्र, रॉथला आत्मकथा सांगायची नव्हती, तर पिढय़ांमधलं अंतर, वांशिक तणाव, युद्धविरोध अशा राष्ट्रव्यापी आस्थाविषयांचा संदर्भ घेत १९६० पासून ते आतापर्यंत अमेरिकेला भेडसावणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांना त्याला हात घालायचा होता. शिवाय, ‘लेखकपणा’शी समकालीन जगण्याचा कसा संबंध लागतो ते तो सतत तपासत राहिला. त्यामुळे कधी अमेरिकेच्या, कधी पुरुषाच्या, कधी ज्यूंच्या, तर कधी ‘लेखक’ या प्राण्याच्या अंतर्मनात दडलेल्या गोष्टी त्यानं ढवळून वर आणल्या आणि ढवळून वर आलेल्या गोष्टींचं दर्शन कधीच सुखद नसतं. ‘माझ्या आयुष्यातल्या अस्सल नाटय़ातून एक नकली चरित्र, एक खोटा इतिहास किंवा एक निम्न-काल्पनिक अस्तित्व खोदून काढणं हेच माझं आयुष्य आहे,’ असं रॉथ म्हणायचा.

रॉथच्या प्रदीर्घ कारकीर्दीला इतकी वळणं आहेत, की त्याला कोणत्याही एका चौकटीत बसवता येत नाही. मागच्या पिढीतल्या लोकांना रुचिहीन वाटेल असं अतिवास्तव (र्सीअल) शारीर अस्तित्व खोडकरपणे मांडणारा आधीचा रॉथ नंतर सौम्य झाला. ज्यूंच्या ऐतिहासिक प्रवाहापासून स्वत:ला वेगळं काढणाऱ्या, वाडवडिलांचा वारसा नाकारणाऱ्या आणि त्यांच्या ‘ज्यू’पणाला धक्के देणाऱ्या रॉथचं नातं आधुनिकतावादी किंवा अस्तित्ववादी युरोपीय साहित्यिक परंपरांशी लागतं. नंतरच्या काळात तो अमेरिकी आणि युरोपीय साहित्याच्या परंपरा पचवलेला, पण आस्थाविषय मात्र ठामपणे अमेरिकी ठेवून काळाच्या पुढे निघालेला समकालीन लेखक म्हणून दिसतो. ‘जर एखाद्या राष्ट्राच्या फँटसीविश्वात तुम्हाला शिरकाव करता आला किंवा त्या राष्ट्रातल्या एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला चीड येऊ  लागली, तर तुम्हाला राष्ट्र ‘दिसू’ लागतं आणि मगच तुम्ही त्याविषयी अस्सल ‘फिक्शन’ लिहू शकता,’ असं रॉथ जेव्हा म्हणत असे, तेव्हा त्याच्या ‘समकालीन अमेरिकेचा लेखक’ होण्याशी त्याचा थेट संबंध लागतो.

उदाहरणार्थ, १९५०च्या दशकात सिनेटर मॅकार्थीनं जी कम्युनिस्टविरोधी मोहीम राबवली होती, तिच्या ऐन भरात ‘आय मॅरिड अ कम्युनिस्ट’ (१९९८) ही कादंबरी घडते. त्यातील लेखक नेथन झुकरमन हे पात्र डाव्या विचारसरणीकडे आकर्षित होत असते. त्याच्या वडिलांना त्याचा हा कल पसंत नसतो. त्यामुळे दुरावलेल्या वडिलांची पोकळी भरून काढण्यासाठी नेथन डाव्या विचारसरणीच्या एका इसमाकडे ओढला जातो. हळूहळू त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातले आणि विचारसरणीतले अंतर्विरोध झुकरमनला दिसू लागतात आणि त्याचा भ्रमनिरास होतो.

‘द ह्य़ुमन स्टेन’मध्ये (२०००) एका प्राध्यापकावर वर्णद्वेषाचा आरोप होतो, पण हळूहळू कळतं की, गोऱ्या त्वचेखाली आपला कृष्णवंश दडवून तो जगत असतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवरच्या ‘द प्लॉट अगेन्स्ट अमेरिका’मध्ये (२००४) विख्यात वैमानिक आणि ज्यूद्वेष्टा चार्ल्स लिंडबर्ग विद्यमान राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचा पराभव करून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, अशी कल्पना आहे. लिंडबर्ग हिटलरशी शांतीचा करार करतो. त्यामुळे अमेरिका युद्धापासून नामानिराळी राहते. हळूहळू प्रसारमाध्यमं स्व-सेन्सॉरशिप करू लागतात. वातावरण बदलत असल्याचा कादंबरीतल्या सात वर्षीय फिलिप रॉथला साक्षात्कार होऊ  लागतो. कालांतराने लोकांमधला ज्यूद्वेष उफाळून येतो. सरकारतर्फेही ज्यूविरोधी धोरणं राबवली जाऊ  लागतात. लहानग्या रॉथच्या परिसराला त्याचे धक्के बसू लागतात.

अमेरिका म्हणजे काय, अल्पसंख्य समाज म्हणून ज्यू किंवा कृष्णवर्णीयांची त्यातली जागा काय, हा संदर्भ इथे आहे. कथानकाला साधंसं वळण देऊन ती जागा डळमळीत करता येते आणि मग ‘खरी’ अमेरिका दिसू लागते, असा कल्पनाविस्तार या कादंबऱ्यांत आहे. दोन्ही कादंबऱ्यांचं मूळ खऱ्या व्यक्तींमध्ये आणि घटनांमध्ये आहे. ‘कोणत्याही कादंबरीकाराला हेवा वाटेल अशा खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा अमेरिका सतत तुमच्यासमोर आणून आदळत असते,’ असं रॉथचं मत होतं. मग खरी समकालीन कादंबरी कितीही वास्तवदर्शी असली तरी ती वास्तववादी वाटेल का? किंबहुना, ‘वास्तववादी’ या लेबलात बसेल अशी कादंबरी खऱ्या अमेरिकेचं दर्शन घडवू शकेल का? ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेतल्या रोजच्या बातम्या एकाच वेळी इतक्या विनोदी आणि भेसूर आहेत, की या पाश्र्वभूमीवर आज रॉथची आठवण अनेकांना येत आहे.

आधुनिक अस्तित्वाविषयीच्या रॉथच्या संकल्पनेनुसार कोणतीही व्यक्ती, अस्मिता किंवा आदर्शवाद त्यातल्या अंतर्विरोधांमुळे परिपूर्ण होऊ  शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखांना पडलेल्या अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. त्याचं लिखाण ‘समकालीन’ आणि ‘अमेरिकी’ होऊ  शकलं त्यामागचं हे एक प्रमुख कारण आहे. राष्ट्राच्या अस्मितेतले अंतर्विरोध उघड करत राहणं हा जणू काही त्याच्या दृष्टीने राष्ट्रसेवेचा सर्वोत्तम मार्ग होता. त्यामुळेच आजच्या अमेरिकेत त्याची उणीव प्रकर्षांनं जाणवत राहील.

rabhijeet@gmail.com