News Flash

अस्सल धर्मनिरपेक्ष पुस्तकाच्या अनुवादाची बहुस्तरीय प्रक्रिया

या पुस्तकाची अनुवादप्रक्रिया उलगडून दाखवणारा हा लेख..

‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकासाठी २०१६ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिलिंद चंपानेरकर यांना नुकताच जाहीर झाला.  सईद मिर्झा लिखित ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. या पुस्तकाची अनुवादप्रक्रिया उलगडून दाखवणारा हा लेख..

श्री. म. माटे यांनी अनुवादाच्या प्रक्रियेबद्दल असं म्हटलं होतं की, ‘एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत आलं आहे की नाही, तेवढंच अनुवादाच्या कामी पाहावं.’ अर्थात, इंग्रजी किंवा अन्य कुठल्याही भाषेच्या कुपीतील साहित्यद्रव्य मराठी भाषेच्या कुपीत ओतताना त्या प्रक्रियेत त्या द्रव्याचा सूक्ष्म वास, रूप-रंग, त्यातील सूक्ष्म घटकादी गोष्टींतील एकही गोष्ट गमावली जाऊ नये, याचा आटोकाट प्रयत्न करणं, हेच त्यांना अभिप्रेत होतं. सईद मिर्झा लिखित ‘अम्मी : लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतल्यावर हे वाक्य सतत माझ्या कानात गुंजन करत होतं. आज या इंग्रजी पुस्तकाच्या ‘लोकशाहीवादी अम्मीस.. दीर्घपत्र’ या माझ्या मराठी अनुवादास ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार घोषित झाला आहे; त्यानिमित्ताने, त्या अनुवादाच्या प्रक्रियेत वाचकांना सहभागी करून घ्यावं, या उद्देशाने केलेला हा लेख-प्रपंच. मराठी साहित्य-रसिकांना त्यात गम्य वाटेल, अशी अपेक्षा.

सईद मिर्झा यांचे ‘अल्बर्ट पिटो को गुस्सा क्यों आता है’ व अन्य सर्वच प्रयोगशील चित्रपट मला भावले होते आणि त्यांच्या चित्रपट-संहिता व कथनपद्धती विशेषकरून आवडली होती. त्यामुळे, २००८ मध्ये जेव्हा त्यांची उपरोक्त पहिलीच साहित्यकृती प्रकाशित झाली, तेव्हा मी मोठय़ा उत्सुकतेने वाचली. १९८३ मध्ये पुण्याच्या ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ (एफटीआय)मधून ‘फिल्म अ‍ॅप्रीसिएशन’चा कोर्स केल्यापासून आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम.ए. (मराठी) केल्यापासून चित्रपटांचं व साहित्यकृतींचं ‘रचनात्मक विश्लेषण’ करण्याची एक शैली मी विकसित केली होती आणि तेव्हापासून अनेक दर्जेदार व प्रयोगशील चित्रपटांची व साहित्यकृतींची समीक्षा मी त्याच पद्धतीने केली होती.. परंतु आता या साहित्यकृतीचं रचनात्मक विश्लेषण करणं म्हणजे, मोठं आव्हानच वाटलं.. म्हणून पुन्हा मी ते पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकाच्या आकृतिबंधाने व बहुस्तरीय आशयाने पुरता झपाटला गेलो. हे पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, असं मला मनापासून वाटलं. या पुस्तकाचा आकृतिबंध असा होता की, त्यातून अनेक अर्थ ध्वनित होत होते; आणि त्यामुळे, लेखकाला अभिप्रेत असलेल्या गर्भ-आशयाच्या आपण जवळ पोहोचलो आहोत की नाही, याबाबत मी खचित साशंक होतो. या ‘जाचा’तून मुक्त होण्यासाठी मी सईद मिर्झा यांना एक ‘ई-मेल’ पाठवला आणि मी लावलेल्या अन्वयार्थाबाबत त्यांचं मत कळवण्यास सांगितलं आणि तो बरोबर असल्यास या पुस्तकाचा अनुवाद करण्यासाठी संमती द्यावी, अशी विनंतीही केली. मला पूर्णत: अपरिचित असलेल्या सईद मिर्झा यांचा दुसऱ्याच दिवशी दूरध्वनी आला आणि त्यांनी मी त्यांच्या साहित्यकृतीच्या गाभ्याच्या अगदी निकट पोहोचलो असल्याची पावती दिली व अनुवादाची संमतीही दिली.. त्यानंतर ‘रोहन प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय विनाविलंब घेतला.. मग काय, उत्साह द्विगुणित झाला आणि पुढील सात महिने मी अनुवादाच्या प्रक्रियेत आकंठ बुडलो.

अनुवादाची त्रिस्तरीय प्रक्रिया

यापूर्वी मी काही चरित्रपर पुस्तकांचे अनुवाद केले होते आणि बऱ्याच अनुवादित चरित्रपर/ माहितीपर पुस्तकांचं संपादनही केलं होतं. परंतु या आगळाच ‘कोलाज-वजा’ आकृतिबंध असलेल्या सर्जनशील साहित्यकृतीच्या अनुवादासाठी एखादी विशेष शिस्त स्वीकारणं मला आवश्यक वाटलं. म्हणूनच, मी अनुवादाच्या प्रक्रियेची त्रिस्तरीय रूपरेषा आखून घेतली.

एक म्हणजे, साहित्यकृतीतील मानसिक गुंतवणुकीतून पूर्णत: स्वत:ला मुक्त करून घेणं; कारण, बरेच अनुवादक विशेषकरून साहित्य आवडलं म्हणून उत्तेजित होऊन, भारावून जाऊन आपल्याच ‘खिशातील’ एक-दोन गोष्टींची भर टाकून देत असतात, असा माझा अनुभव होता. दुसरं म्हणजे, साहित्यकृतीचा गाभा समजून घेऊन मूळ लेखकाच्या जाणिवेशी स्वत:ला जोडून घेणं – तीन वेळा पुस्तक वाचून आणि मिर्झा यांच्यासोबत संवाद साधून पुस्तकाच्या गाभ्यापाशी जाऊन मी ही प्रक्रिया आधीच बऱ्यापकी साधलेली होती. आणि तिसरं म्हणजे, प्रत्यक्ष अनुवाद सुरू करण्यापूर्वी एक ‘भान-टिपण’ तयार करणं.. मला वाटतं, या ‘भान-टिपणा’तील काही मुद्दे इथे नमूद केल्यास वाचकांना आपोआपच या प्रक्रियेचं, आगळ्या आकृतिबंधाचं आणि आशयाचंही आकलन होईल. तत्पूर्वी, इथे एकच नमूद करावंसं वाटतं की, सर्जनशील साहित्यकृतीच्या अनुवादाच्या दृष्टीने, गौरी देशपांडे यांनी केलेला ‘अरेबियन नाईट्स’च्या खंडांचा अनुवाद आणि भा. रा. भागवत यांनी केलेला ‘रॉबिनहूड’चा अनुवाद हे ‘आशयानुवर्ती अनुवादा’चे वस्तुपाठ म्हणून माझ्या डोळ्यासमोर होते. गौरी देशपांडे यांची अनुवादापूर्वी गाढ अभ्यास करण्याची चिकाटी, पर्यायी प्रतिशब्द वापरण्याची हातोटी आणि भा. रा. भागवत यांची शब्दांची निवड आणि आशयानुरूप वाक्यरचनांद्वारा मराठी भाषेला वाकवण्याची, खेळकर लय प्राप्त करून देण्याची हातोटी मला नेहमीच प्रेरणादायी वाटलेली आहे.

‘भान-टिपणा’तील काही मुद्दे –

आता वर म्हटल्याप्रमाणे, प्रत्यक्ष अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी स्वत:साठीच एक ‘मार्गदर्शिका’ तयार केली; जेणेकरून, अनुवाद करताना विविध टप्प्यांवर आपल्याला कसलं कसलं भान पाळावं लागणार आहे, भाषेत व अभिव्यक्तीत कुठे कुठे सूक्ष्मसा बदल करावा लागणार आहे आदी गोष्टी सतत डोळ्यासमोर राहाव्या आणि स्वत:ला सतत ‘सतर्क’ ठेवता यावं! त्या ‘भान-टिपणा’तील काही मुद्दे असे होते

हे स्वत:च्या वैयक्तिक जीवनाबाबत फारसं काहीच न सांगणारं विरळाच ‘आत्मकथन’पर पुस्तक आहे. एक समकालीन सामाजिक-राजकीय पट त्यातील सर्व अंतर्विरोधांसह उलगडून दर्शवणं आणि त्यातील अनेक पलूंची ऐतिहासिक संदर्भासह चर्चा घडवून आणणं, हाच लेखकाचा या पुस्तकामागील प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच, लेखकाने एका दीर्घपत्राचा आकृतिबंध स्वीकारून त्याच्या पोटातच एक दीर्घकथा, समाजचित्र-वर्णन, पूर्वेकडील बोधकथा, व्यक्ती-रेखाटनं, प्रवासवर्णनं, राजकीय वाद-संवाद.. ते एक पटकथा अशा विविध रूपबंधांची ‘कोलाज-वजा’ योजना केलेली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लेखकाने हे दीर्घपत्र आपल्या ‘अम्मी’ला तिच्या मरणोत्तर लिहिलं आहे आणि ती एक ‘लोकशाहीवादी अम्मी’ आहे. थोडक्यात, हे लेखकाने आपल्या आईला उद्देशून लिहिलेलं ‘भावनिक’ पत्र नसून, त्याने आपल्या रूपकात्मक ‘अम्मी’शी आणि पर्यायाने वाचकाशी संवाद साधण्यासाठी जाणीवपूर्वक एक साहित्यिक ‘प्लॉय’ रचलेला आहे. कारण लेखकाला जो काही संवाद व वाद-संवाद साधायचा आहे, तो मार्दवानेच (जसं एखादा आपल्या आईशी बोलेल) साधायचा आहे. त्यामुळे, अभिव्यक्तीतील मार्दव ही या पुस्तकातील कळीची गोष्ट आहे आणि ती आपल्या अनुवादात उतरलीच पाहिजे.

इतिहासाचं उत्खनन करणं; साम्राज्यवाद्यांनी त्याचं केलेलं विकृतीकरण दर्शवून देणं ही हे पुस्तक लिहिण्यामागची प्रमुख प्रेरणा आहे. तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत एकंदरीतच मध्य-पूर्वेकडे आणि आशियात वैचारिक क्रांती कशी साध्य होत होती, विचारांचं आदान-प्रदान कसं साध्य होत होतं आणि या सर्व पूर्वेकडील विकसनशील ‘आधुनिकते’ला पाश्चात्त्यांच्या साम्राज्यवादामुळे कशी खीळ बसली, त्याची मोठी विचारप्रवर्तक अशी व्यापक चर्चा यातून साध्य होते. इथे एकरेषीय प्रबोधन नाही, तर वाचकाचं मन इतिहासाच्या विविध कालखंडात आणि वर्तमानकाळात सतत िहदोळे घेईल आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊन तो विचारप्रवृत्त होईल, या दृष्टीने जाणीवपूर्वक रचना केलेली आहे. त्यामुळे अभिव्यक्ती युक्तिवादाची, वाद-प्रतिवादाची असली तरी मार्दव कायम राखणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्या आई-वडिलांच्या जीवनाच्या पूर्वार्धाला आपण साक्षी नसल्याने लेखकाने सुरुवातीला एका कल्पनात्म दीर्घकथेची योजना केली आहे आणि त्यातून या पिढीच्या मनावर कसे संस्कार झाले असतील, त्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आधुनिकतेच्या संकल्पनांकडे कसं पाहिलं, मुंबई शहराचं आधुनिकीकरण होत असताना त्याकडे कसं पाहिलं याची विविध प्रसंगांतून चर्चा साधून नंतर लेखकाने पाश्चात्त्य-प्रणीत ‘आधुनिकते’च्या संकल्पनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आपल्या आई-वडिलांनी आणि पर्यायाने बहुविध अल्पसंख्याकांनी स्वातंत्र्योत्तर काळात या धर्मनिरपेक्ष नवस्वतंत्र लोकशाही देशाची संकल्पना कशी मनोभावे स्वीकारली, नेहरू-प्रणीत लोकशाहीवादी धर्मनिरपेक्षतावादी मूल्यं कशी अंगीकारली, त्याचं अत्यंत साध्या साध्या प्रसंगांतून दर्शन घडवलेलं आहे.. आणि अर्थातच, पुढील काळात जेव्हा भीषण सांप्रदायिक घटना घडत राहिल्या, तेव्हा त्यांच्यावर काय आघात झाले त्याचंही विदारक चित्र उभं केलं आहे. जीवनाभिमुख उत्साह आणि त्याचप्रमाणे अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने येणारी खिन्नता हे दोन्ही भाव यातून तीव्रतेने व्यक्त झाले आहेत. अनुवादात ते उतरणं आवश्यक आहे.

या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ हे आहे की, यातून अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकीय चळवळी, राजकीय विचारप्रणाली, सामाजिक-राजकीय घडामोडी, ‘बीटल्स’चं जनाभिमुख संगीत ते सूफी संगीत, मिर्झा गालिब ते नामदेव अशा व्यापक विषयांवर चर्चा साधलेली आहे. त्याचप्रमाणे, बाबरी मशिदीचं उद्ध्वस्तीकरण, ९/११चा अमेरिकेतील हल्ला आणि अमेरिकेचे इराक आणि अफगाणिस्तानवरील हल्ले यांसारखे कटू विषय असूनही (व लेखकाची त्याबाबतची मतं ठाम, सशक्त असूनही) लेखकाने ही सर्व चर्चा मोठय़ा सर्जनशीलतेने साधली आहे. अनुवाद करताना या गोष्टींचं भान सतत पाळावं लागणार आहे. त्यासाठी सुयोग्य अशा वाक्यरचना, साध्या साध्या प्रतिशब्दांची योजना, प्रतिशब्द न सुचल्यास/ सापडल्यास नव्या जोड-शब्दांची योजना करणं आदी प्रयत्न करावे लागणार आहेत.

यात आपल्या देशातील विविध राज्यांतील आणि बलुचिस्तान, अफगाणिस्तान.. ते स्पेन, इटली.. ते अमेरिका अशा विविध भागांतील लोकांची वर्णनं आलेली आहेत. त्याचप्रमाणे, यांतील बहुतांश लोकं ही खालच्या वर्गातील श्रमजीवी, रिक्षावाले, टांगेवाले ते अधोलोकातील गुंड अशा विविध थरांतील सामान्यजन आहेत. अशा जनांच्या अभिव्यक्तीसाठी मराठी प्रमाणभाषा खूपच जड ठरेल आणि अभिव्यक्तीत जिवंतपणा राहणार नाही; काही उर्दू-पश्तूमिश्रित अभिवादन-आभाराच्या शब्दांद्वारे त्या त्या मातीचा गंध देणाऱ्या शब्दांची सूचक पखरण करावी लागेल; शिव्या-शापांचे उद्विग्न आविष्कार व्यक्त करणाऱ्या ग्राम्य शब्दांसाठी आपल्या भाषेतील सुयोग्य शिवराळ शब्दांची योजना करावी लागेल; परंतु अमेरिकेतील जनांच्या तोंडी असलेल्या अभिवादन-आभाराच्या व शिवराळ शब्दांना आहे तसंच राहू द्यावं लागेल – जेणेकरून पाश्र्वभूमीचं भान वाचकालाही सातत्याने राहील.

या पुस्तकातील अनेकविध वास्तव व कल्पनात्म व्यक्तिरेखा परस्परांशी केवळ ‘स्मित-हास्या’ने वा नजरेने संवाद करतात. ही ‘स्मित-हास्यं’ अनेक प्रकारची आहेत; त्यांची सूक्ष्मता पकडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे; कारण त्यातील एकही हास्य ‘हास्यास्पद’ नाहीये!

अस्सल धर्मनिरपेक्ष पुस्तकाचीच किमया

असं आणि बरंच काही. पाच मसुदे आणि तीन प्रूफं.. अशा सर्व प्रक्रियेतून गेल्यावर या अनुवादाचं मोठं समाधान लाभलं होतं. आता वाचक या अनुवादित पुस्तकाकडे कसं पाहतील यावर लक्ष लागलं होतं. २०११ मध्ये प्रकाशित झाल्यावर सुमारे दीड वर्ष सतत वाचकांचे अत्यंत मनस्वी फोन येत राहणं, हा अनुभव केवळ या पुस्तकानेच दिला. राज्य पुरस्कारासह अन्य तीन पुरस्कार आणि आता ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार.. इतकं प्रयोगशील पुस्तक अनेक मराठी वाचकांपर्यंत पोहोचू शकलं, याचा मोठा आनंद आहेच. ही सर्व या मुळातील अस्सल धर्मनिरपेक्ष पुस्तकाचीच किमया आहे! सलाम सईद मिर्झा साब!!

 

मिलिंद चंपानेरकर

champanerkar.milind@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 3:17 am

Web Title: ammi letter to a democratic mother
Next Stories
1 अशाही वाचनप्रेरणा..
2 अस्वस्थ वर्तमानाचा इतिहास
3 अविकारी लेखकाची सुखदुखे..
Just Now!
X