अरविंद अडिगांनी ‘फायनान्शियल टाइम्स’पासून ‘टाइम’पर्यंत आंतरराष्ट्रीय पसारा असलेल्या नियतकालिकांत अर्थपत्रकारिता केली असली, तर २००८ पासून त्यांची ओळख पत्रकार कमी कादंबरीकार म्हणूनच अधिक आहे. बलराम हलवाई नामक पात्राभोवती फिरणारी, कुठलाही साधनविवेक न बाळगता झालेल्या त्याच्या शून्यातून शिखरापर्यंतच्या प्रवासाची कहाणी सांगणारी ‘द व्हाइट टायगर’ ही कादंबरी त्यांनी त्या वर्षी लिहिली. तिला त्या वर्षांचे मॅन बुकरही मिळाले आणि अरविंद अडिगा यांचे नाव भारतीय इंग्रजी लेखकांच्या मांदियाळीत घेतले जाऊ लागले. खरं तर ‘द व्हाइट टायगर’च्या आधीच लिहिलेली, पण त्यानंतर प्रसिद्ध झालेली ‘बीटवीन द असासिनेशन्स’ ही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांदरम्यानच्या काळात घडणारी कादंबरी असो वा ‘लास्ट मॅन इन टॉवर’ ही मुंबईच्या रियल इस्टेट विश्वात कुतरओढ साहणाऱ्या एका तत्त्वनिष्ठ शाळामास्तराची कहाणी सांगणारी कादंबरी असो किंवा तीनच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली- क्रिकेटर बनू पाहणारी मुले आणि त्यासाठी सर्वतो प्रयत्न करणारे त्यांचे वडील, या तिघांची गोष्ट सांगणारी आणि जिचे ‘नेटफ्लिक्स’वर रूपांतरणही आले, ती ‘सीलेक्शन डे’ ही कादंबरी असो; अडिगा यांच्या लिखाणात जागतिकीकरणानंतरच्या भारतीय स्वप्नांचा वेध घेतला गेला आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या घोषणेवरून अडिगा यांनी कथनाचा सांधा बदलला असे दिसते. त्यांची नवी कादंबरी – ‘अ‍ॅम्नेस्टी’ फेब्रुवारीत प्रकाशित होणार असून, तीत अडिगा यांनी श्रीलंकेतून ऑस्ट्रेलियात गेलेल्या तमिळ युवकाची कथा सांगितली आहे. धनंजय नामक हे पात्र शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाते, मात्र विद्यार्थी म्हणून राहण्याचा मिळालेला परवाना त्याच्याकडून हरवतो आणि निर्वासिताचा परवाना मिळवण्यातही तो अपयशी ठरतो. तरीही चार वर्षे तो ऑस्ट्रेलियात गुप्तपणे राहतो. तिथे सोनजा नावाच्या व्हिएतनामी प्रेयसीचा त्याला आधार मिळतो. लोकांच्या घरांची सफाई करून थोडेबहुत पैसेही ते मिळवू लागतो. मात्र दरम्यान अशाच एका घराच्या मालकिणीचा मृत्यू होतो; तो तिच्या प्रियकराने केल्याचेही त्याच्या लक्षात येते. आता हे रहस्य पोलिसांत जाऊन सांगायचे आणि आपली ओळख उघड करायची, की खुन्याची माहिती गुपीतच ठेवून आपले वास्तव्य सुरक्षित ठेवायचे, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकतो. नागरिक म्हणून हक्क नाहीतच, पण कर्तव्याचे काय, असा काहीसा तात्त्विक प्रश्न हाताळणाऱ्या या कादंबरीतला हा धनंजय नेमका काय निर्णय घेतो, हे जाणून घेण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल?