News Flash

बुकबातमी : पुस्तकाच्या हद्दपारीची कारणे..

आत्मचरित्र आणि स्मृतिचित्रे यांच्यातील मूलभूत फरक काळाचा.

आत्मचरित्र या साहित्यप्रकाराबद्दल विस्टन ह्यू ऑडेन या ब्रिटिश-अमेरिकी कवीने एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे : प्रत्येक आत्मचरित्र ‘मी’ आणि ‘माझा अहंकार’ या दोन  गोष्टींभोवती घुटमळत असतं. (Every autobiography is concerned with two characters, a Don Quixote, the Ego, and a Sancho Panza, the Self…) आणि ते खरंही आहे. कारण आत्मचरित्र म्हणा किंवा स्मृतिचित्रे म्हणा, ते  लिहिणाऱ्या व्यक्तीने अनुभवलेलं  विश्व तिच्या दृष्टिकोनातून जेव्हा मांडलं जातं, तेव्हा ते आत्मचरित्र बनतं. अशा वेळी एखाद्या आत्मचरित्राची सत्यअसत्यता हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. कारण प्रत्येक  घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. किंबहुना तो वेगळा असतोच. म्हणूनच पुस्तकरूपात प्रकाशित झालेली आत्मचरित्रे अनेकदा वादात सापडतात. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याचे ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन आठवडय़ांतच अशा वादात सापडल्याने नवाझुद्दीनला ते मागे घ्यावे लागले आहे.

आत्मचरित्र आणि स्मृतिचित्रे यांच्यातील मूलभूत फरक काळाचा. आत्मचरित्र  हे एकाप्रकारे त्या व्यक्तिच्या जन्मापासून वर्तमानापर्यंतच्या कारकीर्दीचा, त्याच्या जडणघडणीचा, आयुष्यात आलेल्या अनुभवांचा विस्तृत घटनाक्रम असतो तर, स्मृतिचित्रे ही  त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ठरावीक  काळातील आठवणींचे संचित असते. कधी कधी त्या व्यक्तीच्या आयुष्याला आकार देणाऱ्या जन्मापासूनच्या वर्तमानापर्यंत निवडक  आठवणीही स्मृतिचित्रांतून उमटतात. तर नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यभरातल्या आतापर्यंतच्या विविध प्रसंगांची मोट बांधलेली स्मृतिचित्रे म्हणजे ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ’  आहे. नवाझने सांगितलेले अनुभव पत्रकार ऋ तुपर्ण चॅटर्जी यांनी शब्दबद्ध करून त्यांना या पुस्तकात सामावून घेतले आहे. एक ‘स्ट्रगलिंग’ अभिनेता ते कसदार  अभिनयामुळे हॉलिवूडपर्यंत मजल मारलेला कलाकार असा कारकिर्दीचा प्रवास नवाझने या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. या प्रवासाला नवाझच्या जन्मापासून  दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तील अनुभवांची पाश्र्वभूमी आहे. उत्तर प्रदेशमधील बुधाना गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नवाझने जोपासलेले अभिने ता होण्याचे स्वप्न आणि त्यासाठी ‘एनएसडी’ या देशातील प्रथितयश अभिनय संस्थेत घेतलेले प्रशिक्षण इथपर्यंतचा प्रवास वाचकांसमोर एखाद्या ‘रीकॅप’सारखा वाचकांच्या  नजरेसमोरून वेगाने सरकतो आणि नवाझचे सिनेसृष्टीतील ‘स्ट्रगलिंग’चे दिवस सुरू होतात.  तिथून जे वादळ सुरू होते, तेच वादळ नवाझच्या या पुस्तकाला वादाच्या भोवऱ्यात घेऊन गेले आहे.

या पुस्तकातील ‘रिलेशनशिप’ या प्रकरणात नवाझने दोन अभिनेत्रींसोबतच्या (त्यांची नावे पुस्तकात आहेत. त्यामुळेच वाद झालेला असल्याने आपण त्यांना अनुक्रमे ‘अमुक अमुक’ आणि ‘तमुक तमुक’ प्रेमसंबंधावर प्रकाश टाकला आहे. मात्र, या दोन्ही अभिनेत्रींनी नवाझचे पुस्तकातील दावे खोडून काढले आहेत. ‘अमुक अमुक ही माझ्या प्रेमात आकंठ बुडाली होती की, ती जेव्हा जेव्हा माझ्या मीरा रोडच्या घरी यायची, तेव्हा माझ्या घराच्या भिंतींवर माझे नाव कोरत बसायची,’ असे नवाझने म्हटले आहे. मात्र, असे काहीही घडले नसल्याचे सांगत ‘अमुक’ तिच्या फेसबुक वॉलवर नवाझला खोटे पाडणारा एक लेखच प्रसिद्ध केला आहे. आपण त्यावेळी हिंदी चित्रपटांत काम मिळवण्यासाठी झुंजत होतो म्हणूनच ‘अमुक’ आपली साथ सोडल्याचे नवाझचे म्हणणे आहे.या अमुकच्या  ‘रूममेट’ अभिनेत्रीनेच तिला ‘स्ट्रगलरसोबत फिरण्यापेक्षा एखाद्या यशस्वी व्यक्तीशी जवळीक वाढव’ असा सल्ला दिल्याने हे सारे घडल्याचे नवाझचे म्हणणे आहे. अमुकने मात्र, नवाझच्या स्वार्थीपणा आणि क्षुद्र विचारसरणीमुळे त्याची साथ सोडल्याचे म्हटले आहे. ‘आमच्या दोघांतील खासगी बाबी नवाझ अतिशय चवीने आपल्या मित्रांना सांगत असे’ असेही अमुकने म्हटले आहे. दुसरीकडे, ‘तमुक तमुक’ने नवाझसोबत प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले आहे. मात्र, या संबंधांबाबत नवाझने दिलेला तपशील अतिशय खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी आपल्याशी प्रेमसंबंध ठेवताना नवाझने आपले लग्न झाल्याचे लपवून ठेवले, असे सांगत तिने त्याच्यावर टीकाही केली आहे.

या दोन्ही अभिनेत्रींच्या खुलाशानंतर ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ’ वादात सापडले असतानाच दिल्लीतील एका वकिलाने नवाझविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. विवाहीत असताना  तमुक तमुक  हिला अंधारात ठेवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवल्याप्रकरणी नवाझुद्दीनवर कलम ३७६, ४९७  आणि ५०९ अन्वये पोलिसांत गुन्हा नोंदवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी गौतम गुलाठी या वकिलाने केली आहे. तसेच नवाझने आपल्या पुस्तकातून या दोन्ही अभिनेत्रींची नावे उघड करून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही आयोगाकडे करण्यात आली आहे.

पुस्तकावरून इतका गहजब निर्माण होताच, नवाझने ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ’ मागे घेत असल्याचे जाहीर केले. सध्या हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. मात्र, या पुस्तकाबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. त्यासोबतच नवाझच्या महिलाविषयक विचारांचा मुद्दाही जोरात चर्चिला जात आहे. पुस्तकाच्या एका प्रकरणात नवाझने ‘एनएसडी’मधला एक प्रसंग सांगितला आहे. ‘एनएसडी’मध्ये आपल्या एका मित्राने भांगेच्या नशेत एका मुलीच्या शरीराला नको तिथे स्पर्श केला तेव्हा त्या मुलीने या मुलाच्या थोबाडीत मारली. त्या वेळी हा मुलगा नशेत असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार नाही, असे सांगून या मुलीने त्या तरुणाला सोडून दिले. मात्र, त्यानंतर कित्येक दिवस आम्ही मुले ‘आम्हीही प्यायलो आहोत, आम्हीही त्याच्यासारखे करू शकतो का?’ असा सवाल त्या मुलीला करत होतो, असे नवाझने लिहिले आहे. आणखी एका मॉडेल-अभिनेत्रीची ठरावीक अंतराने ‘मित्र’ बदलण्याची सवय पाहून आपणही कसे तिच्या मागे लागलो होतो, असेही नवाझने या प्रकरणात सांगितले आहे.

पुस्तकातील अशा काही निवडक घटना एकत्र करून नवाझ हा ‘स्त्रीलंपट’ असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचेही उद्योग सुरू झाले आहेत. दुसरीकडे, नवाझला आत्मचरित्र लिहिण्याची घाई का झाली होती, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या वादांमुळे  ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ’ हे पुस्तक बाजारातून हद्दपार झाले असले तरी या खमंग चर्चेमुळे ते ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ बनले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:48 am

Web Title: an ordinary life a memoir book by nawazuddin siddiqui and rituparna chatterjee
Next Stories
1 जातीय विषमतांचे अस्सल विश्लेषण
2 ‘निवडी’मागचे शिल्पकार!
3 बुकबातमी : ‘ऑटम’नंतर ‘विन्टर’!
Just Now!
X