‘इंटेल’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅण्ड्रय़ू ग्रोव्ह नुकतेच निवर्तले. उद्योजक म्हणून त्यांची स्मृती राहीलच, पण त्यांनी लिहिलेली व्यवस्थापनविषयक व अन्य पुस्तके यापुढेही सोबत असतील..
हंगेरीतील मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात जन्मलेल्या अ‍ॅण्ड्रय़ू ऊर्फ अ‍ॅण्डी ग्रोव्ह यांनी १९५६ मध्ये देश सोडला तो कायमचाच. ते अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे पैसा तर नव्हताच, पण इंग्रजीही येत नव्हते, पण जिथे ‘इच्छा तिथे मार्ग’ याप्रमाणे त्यांनी तेथे गेल्यानंतर पुढचे शिक्षण घेतले. या ग्रोव्ह यांचे २१ मार्च रोजी निधन झाले. उद्योगपती, लेखक, सिलिकॉन व्हॅलीतील अर्धवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर उद्योगाचे सर्वेसर्वा, इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्यांनी एका वेगळय़ाच उद्योगसंस्कृतीचा साक्षीदार या नात्याने मोठे काम केले होते. त्यांचे लेखन हे आजच्या अनेक उद्योजकांना प्रेरणादायी आहे, त्यांची काही वचने तर सुविचारच. आज आपण नवोद्योगांची जी चर्चा करीत आहोत व रोजगाराच्या संधी वाढतील असे सांगत आहोत त्याची चर्चा त्यांनी फार पूर्वीच केलेली आहे. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षात अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे भारतीयांना नोकऱ्या हिसकावून घेऊ देणार नाही असे विधान केले आहे, तशी विधाने अनेकदा ओबामा यांनीही त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत केली आहेत. अ‍ॅण्ड्रय़ू ग्रोव्ह यांची मतेही त्याला अपवाद नव्हती. त्यांच्या मते तुम्ही त्याला व्यापारातील संरक्षणात्मक धोरण म्हणा नाही तर काहीही म्हणा, पण ते काही प्रमाणात आवश्यक असते असे त्यांचे मत होते. नवीन उत्पादने, नवीन उत्पादन प्रक्रिया, नवीन भागीदारी, छोटय़ा कंपन्यांचे सहअस्तित्व, नवीन उत्पादनांसाठी बाजारपेठांचा शोध यावर त्यांचा भर होता. आणखी पाच वर्षांनी माहिती तंत्रज्ञानात लोकांना काय सोयी हव्या आहेत याचा विचार करून निर्णय घ्या, असा त्यांचा सल्ला होता. त्यांनी ओरेगॉन येथे इंटेल आर्किटेक्चर लॅबोरेटरी सुरू केली होती. नवसंकल्पनांना त्यांनी वाव दिला, त्यामुळे आज सिलिकॉन व्हॅलीची एक वेगळी संस्कृती बनली. उद्योगाच्या यशातच त्याच्या विनाशाची बीजे असतात. यशाने आत्मसंतुष्टता वाढते, आत्मसंतुष्टतेने अपयश येते, यात केवळ एका ध्येयवेडाने पछाडलेले लोकच टिकून राहू शकतात. कुठलीही कंपनी ही एक कृत्रिम संस्था नसते ती सजीवासारखीच असते, तिलाही कात टाकावी लागते, पद्धती बदलाव्या लागतात, कशावर भर द्यायचा त्या गोष्टी बदलत असतात. मूल्ये बदलतात व त्यातून स्थित्यंतर होते. सकारात्मक संघर्ष ही संकल्पना त्यांनी रुजवली, त्याआधारे घाबरणारे लोकही बोलू शकतात, मते मांडू शकतात, त्यामुळे बुद्धिमत्तेवर आधारित वेगळेच वातावरण इंटेलमध्ये तयार झाले. ते मोठय़ा कंपनीत काम करीत होते, पण त्यांना गाडय़ा, विमाने यांचे आकर्षण नव्हते. क्युबिकल त्यांना आवडत होते. फार मोठे केबिन वगैरे त्यांना नव्हते, जाता-येता कुणालाही ते काम करताना दिसत. कुणीही त्यांच्याकडे जाऊन नवीन कल्पना सांगू शकत असे. स्टार्ट अप म्हणजे नवोद्योगांच्या बाबत त्यांचे म्हणणे असे होते, की त्यातून जर जास्त वेतन असलेल्याच नोकऱ्या निर्माण झाल्या तर बाकीच्या लोकांची बेरोजगारी कायमच राहणार आहे. नोकऱ्या आशियात जाऊ नयेत म्हणून त्यांनी इंटेल कंपनीचे काम अमेरिकेतच ठेवले होते! त्यांच्या मते अमेरिकेत रोजगारनिर्मिती फारशी झालीच नाही. आयात वस्तूंवर कर लावावा, त्यातून मिळालेले पैसे अमेरिकी कंपन्यांना द्यावेत असे त्यांचे मत होते. याला व्यापार-युद्ध म्हणायचे तर म्हणा, पण ते जिंकावेच लागते असे त्यांनी म्हटले होते. अ‍ॅण्डी ग्रोव्ह यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये विशेष बदल घडवणाऱ्या अर्धवाहक घटकांवर केलेल्या संशोधनाचे पुस्तक १९६७ साली निघाले, त्याचे नाव होते, ‘फिजिक्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइसेस’, स्टीव्ह जॉब्ज यांनी अ‍ॅपलची सुरुवात केली त्याआधी सल्ल्यासाठी पहिला फोन ग्रोव्ह यांना केला होता. बिल गेट्स व स्टीव्ह जॉब्ज यांच्यापेक्षा मोठी पायाभूत अशी कामगिरी त्यांनी फेअरचाइल्ड या कंपनीचे विकास संचालक म्हणून केली. ती कामगिरी अर्धवाहक तंत्रज्ञानातील होती. त्यांचे हे पुस्तक विज्ञान अभ्यासातील क्रमिक पुस्तक आहे. त्यांनी ते पुस्तक लिहिले तेव्हा इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे समाकलित मंडले शोधून दशकही उलटले नव्हते. आयबीएमचा ३६० मेनफ्रेम हा मोठा संगणक येऊन अवघी दोन वर्षे झाली होती. अर्धवाहकाचे रसायनशास्त्र या पुस्तकात समजून सांगितले आहे. पन्नास वर्षांत तंत्रज्ञान फार बदलले, पण त्याची बीजे त्यांच्या या पुस्तकात आहेत. तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातही ते काळाच्या फार पुढे होते.
‘हाय आउटपुट मॅनेजमेंट’ हे त्यांचे दुसरे पुस्तक १९८३ मध्ये प्रसिद्ध झाले. व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान त्यांनी यात मांडले आहे. उद्योगव्यवस्थापक व व्यावसायिक अभियंता असा भेद असता कामा नये, खरे तर ती वेगळी कामे नाहीत, असे त्यांना वाटत होते. आज जी मुख्य कार्यकारी अधिकारी ही संकल्पना आहे, त्यात दोन्ही भूमिका एकच व्यक्ती पार पाडत असते. एलन मस्क हे अभियंता व व्यवस्थापक दोन्ही आहेत म्हटल्यानंतर आपण भुवया उंचावतो, पण ते ग्रोव्ह यांनी आधीच सांगितलेले तत्त्व होते. १९८३ मध्ये पारंपरिक प्रथेनुसार व्यवस्थापक हे निर्णयकर्ते होते व अभियंते हे कुणी तरी वेगळेच म्हणजे तंत्रज्ञानाशी निगडित लोक होते ते व्यवस्थापकाच्या निर्णयाबरहुकूम काम करायचे. उच्च तंत्रज्ञानात अभिनवता महत्त्वाची असते, त्यात अभिनवता ही भूमितीश्रेणीने म्हणजे मूरच्या नियमानुसार वाढते. व्यवस्थापक व अभियंते यांची वेगवेगळी भूमिका असलेल्या प्रारूपावर बेतलेल्या डीईसी, वँग, डेटा जनरल, स्पेरी यांसारख्या कंपन्या आल्या, पण त्यांनी पीसीच्या जमान्यात नांगी टाकली. केवळ आयबीएम कंपनी वाचली, कारण त्यांनी ग्रोव्ह यांचे व्यावसायिक तत्त्वज्ञान अंगीकारून व्यवस्थापक व अभियंते असा भेदच ठेवला नव्हता.
‘वन ऑन वन विथ अ‍ॅण्डी ग्रोव्ह’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात ‘हाऊ टू मॅनेज युवर बॉस, युवरसेल्फ अ‍ॅण्ड युवर कोवर्कर्स’ याचे विवेचन आहे. ग्रोव्ह यांनी त्यांचे व्यवस्थापन तत्त्वज्ञान व्यापक रूपात यात मांडले आहे. त्या वेळी वरिष्ठांना ‘मॅनेज’ करणे किंवा सहकर्मचाऱ्यांना ‘मॅनेज’ करणे हा वेगळा विषय होता. काहींना ते पटतही नव्हते. आज जेव्हा आपण पगारी नोकरी करतो तेव्हा व्यवस्थापक हे तुमचे ग्राहक असतात, त्यांना तुमचे काम हवे असते, पण तुम्ही त्यामुळे मुक्तही असता. तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे परिणाम ग्रोव्ह यांना खूप आधीच माहीत होते.
‘ओन्ली पॅरानॉइड कॅन सव्‍‌र्हाइव्ह’ हे पुस्तक १९९६ मधले. त्यांची पहिली तीन पुस्तके सकारात्मक, उत्साहवर्धक होती, पण या पुस्तकात जरा वेगळा विचार मांडला आहे. एखाद्या कंपनीने आव्हानात्मक स्थितीत पेचप्रसंगाचा फायदा कसा उठवावा याचे विवेचन यात आहे. थोडक्यात, संकटाचे रूपांतर संधीत करण्याचे हे तत्त्वज्ञान आहे. १९९६ मध्ये व्यक्तिगत संगणकाबरोबर उच्च व्यवस्थापन तत्त्वज्ञानाचा उदय होऊनही कामाच्या ठिकाणी काही आदर्श स्थिती निर्माण होऊ शकली नाही. पीसी क्रांतीने (व्यक्तिगत संगणकाने केलेली क्रांती) अनेक कंपन्या कोसळल्या, इंटेलच्या पेंटियम चिपमध्ये दोष राहिल्याने ती कंपनी डबघाईस आली. या पुस्तकात ग्रोव्ह यांनी उद्योगजगतातील गळेकापू स्पर्धेचे विवेचनही केले आहे. ती स्पर्धा इंटरनेट युगातील आहे. जे एखाद्या वेडाने भारून जातात तेच लोक उद्योगात टिकाव धरू शकतात हेच तत्त्व यांनी त्यात मांडले आहे.
‘स्विमिंग अ‍ॅक्रॉस- ए मेमॉयर’ हा त्यांच्या आठवणींचा ग्रंथ २००१ मध्ये प्रसिद्ध झाला. काम व तंत्रज्ञान याचा गाभा त्यात त्यांनी मांडला आहे. जे तंत्रज्ञानाचे जग आपण निर्माण करतो त्यात ‘काय’ व ‘कसे’ हे प्रश्न आहेत, पण त्यामागच्या ‘का’ या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न ते यात करतात. हे पुस्तक लिहीत असतानाच त्यांना पुरस्थ ग्रंथीचा म्हणजे प्रॉस्टेटचा कर्करोग व कंपवात (पार्किन्सन) हे दोन्ही रोग झालेले होते, ते तीन वर्षे इंटेलचे अध्यक्ष होते. नंतर बराच काळ सल्लागार होते. कृतकृत्यतेची भावना त्यांना होती. या पुस्तकात त्यांनी तंत्रज्ञानात केलेले मूलभूत काम, उद्योग व तंत्रज्ञानाच्या जगात घडवलेले बदल सामोरे येतातच, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तंत्रज्ञ-अधिकारी व लेखक म्हणून त्यांची झालेली घडणही डोळय़ांसमोरून तरळत जाते. त्यांची ही पुस्तकांच्या रूपातील ज्ञानाची शिदोरी आपल्याला काळापलीकडे जाऊन शिकवणारी आहे. उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या जीवनकार्यातून बोध घेण्यासारखे बरेच आहे, ते गेले तरी त्यांची अनुभवातून सिद्ध केलेली पुस्तके आपली एखाद्या मित्रासारखी सोबत करणार आहेत.

 

राजेंद्र येवलेकर 
rajendra.yeolekar@expressindia.com