21 March 2019

News Flash

मुंग्यांचे महाभारत..

भारताच्या स्वातंत्र्यापासून आजवरची आंध्रातील एका कुटुंबाची कहाणी सांगणारं हे पुस्तक आजच्या आंध्र प्रदेशाचा सामाजिक-राजकीय इतिहासही मांडतं..

|| नंदा खरे

भारताच्या स्वातंत्र्यापासून आजवरची आंध्रातील एका कुटुंबाची कहाणी सांगणारं हे पुस्तक आजच्या आंध्र प्रदेशाचा सामाजिक-राजकीय इतिहासही मांडतं..

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला खम्मम (आंध्र प्रदेश) या जिल्ह्य़ातील जंगलांमध्ये एक आदिवासी जमात राहत असे. ती भटकी होती आणि फळे-मुळे तोडणे, जुजबी पारध-शिकार अशांवर पोट भरत असे. तिचे स्वत:चे अहिंदू देव आणि रीतिरिवाज होते. ब्रिटिशांना व त्यांच्या हस्तकांना या क्षेत्रातील जंगले साफ करून सागवानाची लागवड करायचे सुचले. आदिवासींना पर्यायी जागा, मोबदला वगैरे काहीही न देता हाकलून दिले गेले.

ती माणसे मैदानी शेतीक्षेत्रात भूमिहीन आणि म्हणून अतिशूद्र मानली जाऊ  लागली. हे मद्रास इलाख्यातले क्षेत्र होते, पण तिथेही निजामाच्या हैदराबाद-तेलंगणाची सामंती पद्धतच वापरात होती. ‘दोरा’ (म्हणजे ‘धनी’ किंवा ‘मालक’) म्हणवले जाणारे जमीनदार शासक होते. ते अनभिषिक्त राजेच असत; वेठबिगार लादायचे अधिकार गाजवणारे. तर खम्मम आदिवासी अशा गुलामगिरीत लोटले गेले.

एकदा एका वेगळ्या जमातीचा माणूस चोरी करून या आदिवासींच्या आश्रयाला आला. त्याची जमात खासगी मालमत्ता मान्य करत नसे; त्यामुळे चोरीला गुन्हाही मानत नसे आणि हे खम्मम जमातीला माहीत होते, म्हणूनच त्यांनी आश्रय दिला होता. पोलीस आणि स्थानिक ‘दोरा’चे गुंड यांनी सर्व पुरुषांना तुरुंगात टाकले व स्त्रियांवर अनेक अत्याचार केले. काही कॅनडियन मिशनऱ्यांनी मात्र वकील देऊन पुरुषांना सोडवले व मोबदला म्हणून ख्रिस्ती करून घेतले. मुलाबाळांना शिकवायचीही सोय केली; पण तरीही उच्चवर्णीय बाटलेल्यांपेक्षा यांचे स्थान खालचेच राहिले. भारतातली मुळात हिंदूंची असलेली जातिव्यवस्था ख्रिस्ती, मुस्लीम वा शीख होण्याने संपुष्टात येत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले, एवढेच!

तर, ‘खंबम’ असे आडनाव लावणाऱ्या या जमातीत एक प्रसन्न राव नावाचा मुलगा होता. तो इंग्रजी शिकला. त्याचे जातीतल्या एका मुलीशी लग्न झाले, पण तीन मुलांना जन्म देऊन प्रसन्नची पत्नी मरण पावली. तिची विधवा आई मार्थाम्मा मुलांना सांभाळायला सोबत आली. ही तीन मुले म्हणजे सत्यमूर्ती, कॅरे (William Carey या धर्मगुरूवरून) आणि मंजुळा. मंजुळाची मुलगी सुजाता गिड्ला हिने आपला आजा, आई, मामा वगैरेंची कहाणी- भारताच्या स्वातंत्र्यापासून आजवरची- ‘अँट्स अमंग एलेफंट्स’ या पुस्तकात रेखली आहे. पाश्र्वभूमीला आजच्या आंध्र प्रदेशाचा सामाजिक-राजकीय इतिहासही आहे.

प्रसन्न पैसे कमावायला ब्रिटिश सैन्यात गेला, पण घरी पैसे पाठवण्यात सातत्य कधी गाठता आले नाही. मार्थाम्मा जेमतेम हातातोंडाची गाठ घालत मुले सांभाळत असे. प्रसन्न सैन्यातून परतून इंग्रजीच्या शिकवण्या वगैरे करून जरा सुस्थितीत आला व त्याने मुलांना शिकवून गर्तेतून बाहेर काढायचे ठरवले. पहिल्याने महाविद्यालयात पाठवला गेला तो सत्यमूर्ती ऊर्फ सत्यम, ज्याने पुढे अनेक संभाषणांमधून सुजाताला आपला, आपल्या घरच्यांचा इतिहास सांगितला.

सत्यम परगावच्या महाविद्यालयात गेला, पण लवकरच घरून पैसे येणे बंद झाले. आपण हुशार आहोत, दलित असलो तरी ख्रिस्ती आहोत, आपल्याला इंग्रजी येते, तेलुगूत तर आपण ‘भाषाप्रभू’ आहोत, हे सर्व गर्व निर्थक ठरले. उच्चवर्णीय हिंदू व ख्रिस्तींसाठी आपण हत्तींच्या कळपांतील मुंग्यांसारखे नगण्य आहोत, हे सत्यमला तीव्रतेने जाणवले. तो कम्युनिस्ट पक्षात गेला. त्या वेळी कम्युनिस्टांचा व स्थानिक लोकांचा सशस्त्र तेलंगण संघर्ष नुकताच मोडून काढला गेला होता. दमनकारी लोकांत इंग्रजी पोलीसही होते आणि निजामाचे रझाकारही होते. पुढे ‘हैदराबाद पोलीस अ‍ॅक्शन’ने हे रझाकार संपवले. आंध्रात त्या वेळी सबळ कम्युनिस्ट पक्ष होता, पण त्यातही जातिव्यवस्थेची ‘लागण’ झाली होतीच!

दारिद्रय़, उपासमार यामुळे सत्यम महाविद्यालयाचे पहिले वर्षही उत्तीर्ण झाला नाही. उलट, तो इतका दुबळा झाला की, पुढे आयुष्यभर त्याला साध्यासाध्या जीवनावश्यक कृतींसाठीही मदतनीस लागत असे; परंतु साम्यवादी तत्त्वांवरची निष्ठा मात्र जास्त जास्त सबळ होत गेली व सत्यम पक्षाचा ‘शाहीर’ झाला; आपल्याकडील शाहीर अमर शेखांसारखा! शिक्षण सोडून घरी परतला तर उपजीविकेचा प्रश्न पुढय़ात. दलित तरुणाला पक्ष आश्वासक व स्थिर काम देऊ  शकत नव्हता. इतर दलित कलाकारांसोबत क्रांतिकारी गाणी, नाटके करणारे एक कलापथक उभारले; ज्याने पुढे बरीच वर्षे पोटाला आधार दिला. लग्न, कुटुंब वगैरे मात्र ताकदीबाहेरच राहिले.

यानंतरची सत्यमची कहाणी हा आंध्रातील डाव्या चळवळीचा इतिहासही आहे. आजचा आंध्र, आजचे तेलंगण हे दोन्ही तेलुगूभाषक प्रांत आहेत. तेव्हा मात्र आंध्र चेन्नईशी, तर तेलंगण हैदराबादशी जुळलेला होता. दोन्ही भाग एकत्र व्हावेत यासाठी पोट्टी श्रीरामलू आमरण उपोषणाला बसला आणि त्याभोवती आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसारखी चळवळ उभी झाली. उपोषणात श्रीरामलूचा मृत्यू झाल्यानंतरच केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना मान्य केली. या चळवळीत (संयुक्त महाराष्ट्राप्रमाणेच) कम्युनिस्टही होते.

पक्षाची साधे ‘सीपीआय’ व मार्क्‍सवादी ‘सीपीएम’ अशी शकले पडणे याचे केंद्र तर आंध्र-तेलंगण हेच होते आणि सत्यमने त्यात भागही घेतला. पुढे बंगालात चारू मुजुमदार, कनू सन्याल वगैरेंनी नक्षलवादी चळवळ सुरू केली तेव्हाही सत्यम तिच्या आंध्र आवृत्तीत होता. दोन्ही घटनांमध्ये तो ‘जास्त डाव्या’ शकलाचा भाग होता. अखेर आंध्र-महाराष्ट्र-छत्तीसगढ  इथल्या नक्षलवादी ‘पीपल्स वॉर ग्रुप’चा तर सत्यम इतरांसोबत संस्थापकही झाला. आजचा दक्षिणमध्य भारतातला नक्षलवाद ‘पीपल्स वॉर ग्रुप’चाच वारस आहे. अनेक गुप्त भेटींमधून सुजाताने सत्यमचा हा इतिहास समजून नोंदून घेतलेला आहे.

सत्यमनंतरचा कॅरे अभ्यास-शिक्षणात रस नसलेला, भडक माथ्याचा, पण प्रेमळ असा होता. तो अल्पशिक्षितच राहिला. एकदा झोपेतून उठवायला आलेल्या मार्थाम्मा आजीला याने ढकलले आणि तिचे माकडहाड मोडले. मग ती हयात असेपर्यंत याने मनापासून सेवाशुश्रूषा केली!

मंजुळा हुशार, अभ्यासू होती, पण इतर साऱ्या गरजा भागल्यावरच तिच्या शिक्षणाचा खर्च केला जाई. मॅट्रिकनंतर ती विजयवाडय़ाला महाविद्यालयात गेली. तिथे बऱ्याच उच्चवर्णीय ख्रिस्ती मुली असत, पण त्या ‘हत्तीं’नी या ‘मुंगी’ची दखल घेतलीच नाही. दारिद्रय़, एकटेपण यातूनही ती बीए झाली, पण गुण आंध्रात एमएच्या प्रवेशाइतके नव्हते. तिरीमिरीला येऊन प्रसन्नने घरापुढची जमीन सहाशे रुपयांना विकली आणि त्यातले तीनशे रुपये देऊन मंजुळेला नशीब काढायला बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाण्यासाठी आगगाडीत बसवून दिले.

प्रवेश तर मिळाला, पण शुल्क भरायची शेवटची तारीख हुकली होती. कुलगुरूंना भेटूनही प्रश्न सुटेना. मंजुळा हताशपणे फिरत असताना एका मुलाने हटकले. तो विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. त्याने अर्जावर ‘प्रवेश द्या’ असे लिहिले आणि कुलगुरूही नमले! काळ्या दाक्षिणात्य ख्रिस्ती मुलीला बनारस जडच होते. मूठभर दाक्षिणात्य मुलीही फटकून वागत, कारण त्या उच्चवर्णी; उत्तर भारतीयांचे तर विचारूच नये. परंतु मंजुळा बहरली आणि एमएच्या पहिल्या परीक्षेत इतिहास शिकत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

इतिहासाचे विभागप्रमुख होते- आर. एस. त्रिपाठी; हे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ. त्यांनी मंजुळेला शिकवणारे प्रा. पाठक यांना ‘‘तुमच्या त्या हुशार विद्यार्थिनीला भेटायला आणा,’’ असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र दाक्षिणात्य दलित मुलीला पाहताच त्रिपाठींच्या चेहऱ्यावर अपार घृणा उपजली व ते मंजुळेशी बोललेच नाहीत! पुढेही तिला कमी गुण देऊन ‘सेकंड-क्लासा’त लोटले गेले. उत्तीर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीही अडकली. अखेर जयंत नारळीकरांचे वडील, जे बनारसला गणिताचे प्राध्यापक होते, त्यांना मध्ये घालूनच पैसे वसूल झाले.

आंध्रात परतल्यावर स्थिर नोकरी मात्र मिळेना. कधी कोणी रजेवर गेल्यास दोन-चार महिने मिळत. कधी गुणवत्ता पाहून नेमणूकपत्रही दिले जाई, पण प्रत्यक्ष भेटीनंतर स्थानिक उच्चवर्णीय रुजू होऊ  देत नसत. अशा अक्षरश: डझनावारी घटना पुस्तकात नावानिशी नोंदलेल्या आहेत.

याच स्थितीत मंजुळेचे प्रभाकर रावशी लग्न झाले. तो इंग्रजी साहित्यात एमए होत होता. परीक्षेच्या वेळी तो अडखळायचा, पण एरवी तो चांगलाच जाणकार शिक्षक होता. त्याचे पक्के दुमजली घर होते, इतर मात्र काहीच नव्हते. स्वभाव दुभंग होता; कधी अपार प्रेमळ, तर कधी मारहाणीवर उतरणारा पुरुषी अहंकार. दारिद्रय़ काही हटेना, पण निसर्गक्रमाने मुले होत होती. येथे कॅथलिक डॉक्टरांचा संततिनियमनाला असलेला विरोधही दखलपात्र होता. नोकरीनिमित्त पती-पत्नींनी वेगवेगळ्या गावांत राहणेही सवयीचे होत गेले.

जातिव्यवस्था आणि पुरुषसत्ता, त्यातून काहींच्या वाटय़ाला येणारे अपार दारिद्रय़ याच्या अंगावर काटा आणणाऱ्या अनेक कहाण्या मंजुळाच्या आयुष्यात आहेत. वानगीदाखल काही कहाण्या देतो..

मंजुळेचे बाळंतपण सीझेरियन पद्धतीने केले जात होते, पण अर्ध्यातच डॉक्टरांना तातडीने इतर कामावर जावे लागले. ते परतेपर्यंत मंजुळेला दिलेली भूल ओसरली होती. दुसऱ्यांदा भूल देण्याचा खर्च वाचवत डॉक्टरांनी पूर्ण शुद्धीवरच्या मंजुळेवरची शस्त्रक्रिया संपवली.

काही काळ मंजुळा व मुले एका मोठय़ा पण स्वस्त भाडय़ाच्या घरात राहत असत. घर स्वस्त होते, कारण आसपास प्रचंड संख्येने माकडे होती! घरात तर स्वत:ला कोंडून घ्यावे लागेच; पण किराणा वगैरेही रात्रीच आणता येई, कारण नाही तर माकडे हिसकावून घेत. हे मंजुळेच्या वरिष्ठ स्त्रीलाही माहीत होते; पण दोन-चार मिनिटे उशीरही खपवून न घेता ती ‘लेट-मार्क’ देत असे. बरे, मुलांची शाळेची वेळ पाळून नोकरी करणेही तसे जडच असते, तेही जगभर!

याच काळात एकदा सुजाताच्या केसांमध्ये प्रचंड गुंता झाल्याने मंजुळा केस विंचरत होती. शेजारची सवर्ण मुले तिच्या डोक्यावर भोवरे फिरवीत असत. याने केसांचा गुंता तर होतच असे, पण डोक्यावर भोवऱ्यांच्या लोखंडी आरूने जखमाही होत. ती मुले हे करू धजत, कारण सुजाता खालच्या जातीची होती!

पण असे बालपण जाऊनही सुजाता एका चांगल्या स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून भौतिकीची पदवीधर झाली. नंतर तिने आयआयटी, चेन्नई इथे संशोधन साहाय्यक म्हणून काम केले. आज ती न्यू यॉर्क सब-वेत (मेट्रो व्यवस्थेत) ‘कंडक्टर’ म्हणून काम करते.

तिच्या, मंजुळेच्या, मंजुळेच्या भावंडांच्या नेमक्या जन्मतारखा आंतरजालावर सापडत नाहीत. एका ताज्या प्रदीर्घ मुलाखतीतून दिसणारी सुजाता पंचेचाळीस वर्षांच्या जवळची वाटते. ती मामासारखीच (सत्यम) ठामपणे ‘मार्क्‍सिस्ट’ वळणाची आहे. ती जगाकडे विश्लेषक नजरेने आणि हो, प्रचंड आत्मविश्वासाने पाहते!

दीडेक महिन्यांपूर्वी सुजाता गिड्लाच्या ‘अँट्स अमंग एलेफंट्स’चे परीक्षण ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये आले. पुस्तक मिळवून वाचले. मराठीतील दलित आत्मकथने तर पन्नास वर्षांहून जास्त काळ वाचनात येतच आहेत. त्यांची कौतुकेही होतात, पण खासगीत उच्चवर्णीयांत त्यांची टिंगलही होतेच. आजही भारतात ‘कायद्याचे राज्य’ ही कल्पना कागदावरच आहे. आपल्या वर्गाच्या, जातीजमातीच्या, लिंगाच्या व्यक्तींवरचे अन्याय ज्या तीव्रतेने लोकांना भिडतात, त्या तीव्रतेने भिन्न वर्ग-जात-जमात-लिंगाच्या व्यक्तींवरचे अन्याय भिडत नाहीत. उलट आपण जाणूनबुजून त्यांना स्वत:ला भिडू देत नाही, असे मानायला जागा आहे. निवृत्त सनदी अधिकारी हर्ष मँडर यांचे ‘लुकिंग अवे’ हे पुस्तक तर म्हणे या जाणीवपूर्वक उपेक्षेवरच आहे.

दुसरीही एक बाब. स्वत:ची पिढी, आई-मामांची पिढी, आज्याची पिढी- या तिन्हींवरचे अन्याय सहन करत, नोंदत सुजाता टिकून राहिली. नुसतीच लव्हाळ्यासारखी महापूर झेलून वाकत-ताठरत नाही; तर बहरत राहिली. हा टिकाऊपणा माझ्या लेखी माणसांच्या कैक पिढय़ांच्या नैसर्गिक निवडीतून आलेला आहे.

त्यामानाने सुजाताचा डावेपणा; अमेरिकन मुलाखत घेणाऱ्याला ठणकावून ‘मी मार्क्‍सिस्ट आहे’ म्हणणारा डावेपणा मला जास्त मोहवतो; पण नेहमी असेच होते असे नाही. अन्याय सहन करतच त्याला मनापासून केलेला विरोध वाढत जाणे मला आकर्षित करते; पण त्याऐवजी अन्यायकर्त्यांना सामील होण्याची इच्छाही होऊ  शकते! सुजाता मात्र व्यवस्थेशी भांडण्याची भूमिका घेत ‘वर चढणे’ टाळून कम्युनिस्ट-कामगार झाली; आयआयटीतली संशोधन साहाय्यकाची नोकरी सोडून लोकलमध्ये कंडक्टर झाली.

इतर समाजाकडून असल्या प्रकारांना दिले जाणारे प्रतिसादही दखलपात्र आहेत. भारतात जात हेच वास्तव आहे आणि वर्गविचार चुकीचा आहे, असे मानण्याकडे कल दिसतो. उलट, कम्युनिस्ट विश्लेषण नाकारणारी भांडवलवादी अमेरिका जात ‘हलकी’, तर वर्गच खरा मानताना दिसते! कोणी विचारवंत या दोन संकल्पनांचा एकत्र विचार देऊ  शकेल का? उच्च जात, उच्च वर्ग आणि उच्च गुणवत्ता (म्हणजे काय?) एकत्रच जातात, हा मला तरी भ्रम वाटतो. कोणी आकडेवारीने हे व्यवहारांत जाणवणारे व्यर्थपण दाखवून देऊ  शकेल का? जर तसे व्यर्थपण नसलेच तरीही गुणवत्तेच्या वर माणुसकी आहे, बंधुभाव आहे, हे तरी बहुमान्य करवून घेता येईल का?

  • ‘अँट्स अमंग एलेफंट्स’
  • लेखिका : सुजाता गिड्ला
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : ३०४, किंमत : ५९९ रुपये

 

nandakhare46@gmail.com

First Published on May 5, 2018 2:35 am

Web Title: ants among elephants