‘आंतरविद्याशाखीय’ हा शब्द अनेकांना जड वाटेल, म्हणून ‘विविधांगी’ हा काहीसा हलका पर्याय शीर्षकात वापरला आहे. डॉ. ताहेरा कुतबुद्दीन यांनी अरबी भाषेतील ‘ख़्ाताबा’ किंवा बोधकथा-कथनांचा केलेला अभ्यास केवळ त्या भाषेपुरता नसून मौखिक परंपरेची जगभरातच आढळू शकणारी वैशिष्ट्ये, ‘साहित्य’ आणि ‘मौखिक साहित्य’ यांचा सैद्धान्तिक अभ्यास,  इस्लामच्या प्रचारात या बोधकथांचा झालेला वापर, अशा कथनांचा सामाजिक- राजकीय प्रभाव, या कथा टिकून राहण्यामागील कारणे, अशा अनेक अंगांनी पुढे गेला. त्यातून ‘अरेबिक ओरेशन : आर्ट अ‍ॅण्ड फंक्शन’ हे पुस्तक सिद्ध झाले. शिकागो विद्यापीठात प्राचीन अरबी साहित्य व मध्यपूर्व संस्कृती हे विषय शिकवणाऱ्या ताहेरा यांनी याआधीही अनेक पुस्तके लिहिली आहेत. संशोधक- ग्रंथलेखिका म्हणून डॉ. ताहेरा विद्यापीठीय वर्तुळांत परिचित आहेतच, पण हे पुस्तक आणखी वेगळे… कारण त्यासाठी अरब जगतातील नोबेल पारितोषिकाच्या तोडीचा मानला जाणारा ‘शेख झायेद पुरस्कार’ यंदा डॉ. ताहेरा यांना जाहीर झाला आहे…

… हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत… आणि त्यातही, त्या जन्माने मुंबईकर आहेत! मुंबई आणि ठाण्यात त्यांची घरे आहेत. थोरले बंधू ठाण्यात राहतात. १९८४ पर्यंत मलबार हिल भागात राहत असताना, सोफिया महाविद्यालयातून त्यांनी पदविका शिक्षण घेतले. पुढे इजिप्तला हे कुटुंबीय राहू लागले, म्हणून कैरो विद्यापीठातून पदवी, तेथून उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत, पण दरवर्षी किमान एक-दोनदा तरी मुंबईत, असा त्यांचा प्रवास झाला.

अरबी भाषेच्या अभ्यासाने त्यांना कैरोमध्येच खुणावले. त्यांचे काका सय्यदना मोहम्मद बुऱ्हाणुद्दीन हे इस्माइली किंवा दाऊदी बोहरा पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू होते. शिया मुस्लिमांशी जवळीक असलेला दाऊदी बोहरा हा पंथ शांतिप्रिय मानला जातो. ताहेरांचे वडील (आणि भावाच्या निधनानंतर सर्वोच्च धर्मगुरूपदावर दावा सांगितल्यामुळे २०१४ पासून कुटुंबकलह ओढवून घेऊन, २०१६ मध्ये दिवंगत झालेले) सय्यदना कुतबुद्दीन हे मुंबईच्या सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत होते. आंतरधर्मीय सलोखा व संशोधन यांसाठी त्यांनी ‘तकरीब’ ही अभ्याससंस्था सुरू केली होती, तिचे तसेच त्यांनी सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना पुढे सुरू ठेवण्याचे काम आता ताहेरा करतात. साहजिकच भारत आणि भारतीय यांच्याबद्दल त्यांना सक्रिय आत्मीयता आहे.

पुरस्कार ज्याला मिळाला, ते पुस्तक मौखिक परंपरेचे इंगित नेमके सांगते. ‘ज्ञानसंचित पिढ्यानपिढ्या  अबाधित ठेवणारे हे मौखिक वाङ्मय, ‘मेमरी सिस्टिम्स’चा – स्मृतीच्या साऱ्याच वाहिन्यांचा वापर खुबीने करते. म्हणून तर विशिष्ट हेल काढून बोलणे, नमन झाल्यावर श्रोत्यांचे लक्ष वेधणे, नंतरही काही शब्दप्रयोग वारंवार करून श्रोत्यांचे अवधान कायम ठेवणे, भावनिक आवाहनासाठी चित्रदर्शी वर्णने करणे अशी वैशिष्ट्ये केवळ अरबी ‘ख़्ाताबां’मध्येच नव्हे, तर साऱ्याच मौखिक कथन-परंपरांत आढळतात,’ असे त्यांचे म्हणणे. या ‘ख़्ाताबां’पासून पुढे अरबी काव्य आणि संस्कृतीला गती कशी मिळाली, लढाऊपणे प्रदेश जिंकून कब्जा करण्यापेक्षा व्यापारी संबंध वाढवण्याकडे अरबांचा कल अगदी १२ व्या शतकापर्यंत राहिला त्याची कारणे या ‘ख़्ाताबां’मधील बोधामध्ये कशी शोधता येतात, याचा अभ्यास डॉ. ताहेरा यांनी ‘अरेबिक ओरेशन : आर्ट अ‍ॅण्ड फंक्शन’मधून मांडला आहे.

शेख झायेद पुरस्काराचे यंदा १५ वे वर्ष. दीड दशकात या पुरस्कारांची व्याप्ती वाढली असून ग्रंथलेखन आणि संशोधन कार्याच्या निरनिराळ्या उपक्षेत्रांतील सात जणांना यंदा हे पुरस्कार देण्यात येतील. त्यापैकी ‘परकीय भाषांतून अरबी अभ्यास’ या विभागातील पुरस्काराच्या डॉ. ताहेरा या मानकरी ठरल्या आहेत.