मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com

कथनात्म निवेदनाचे सारे प्रकार अजमावत रूढ सीमा ओलांडण्याचे धाडस करणाऱ्या पोलंडच्या लेखिका ओल्गा टोक्र्झुक यांना २०१८ सालचे  साहित्याचे नोबेल अलीकडेच जाहीर झाले. परंपरेखाली न पिचता नावीन्याचे समंजस स्वागत करणाऱ्या ओल्गा टोक्र्झुक यांच्या लेखनाविषयी..

दर वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वीडिश अकादमीतर्फे नोबेल पुरस्कार जाहीर होतात, तेव्हा विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा होणारा सत्कार मनाला आनंद आणि उभारी देतो. गेल्या वर्षी निवड समितीतील सदस्यांबाबतीत काही नैतिक आक्षेप घेतले गेल्याने नोबेल समितीने साहित्याचे पारितोषिक वर्षभरापुरते पुढे ढकलण्याचा घेतलेला रास्त निर्णय नोबेल पारितोषिकांमागील गांभीर्य अधोरेखित करणाराच होता. या वर्षी २०१८ व २०१९ या दोन्ही वर्षांसाठीची पारितोषिके जाहीर झाली. २०१८ सालची नोबेलविजेती ठरली आहे – पोलिश लेखिका ओल्गा टोक्र्झुक!

ओल्गा म्हणते, ‘‘मी माझ्या नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी जर्मनीच्या दौऱ्यावर होते. सकाळी गाडीत बसताना मी होते पोलंडची एक लोकप्रिय लेखिका ओल्गा टोक्र्झुक. मात्र, काही तासांनी जर्मनीत पोहोचून इष्ट ठिकाणी उतरेपर्यंत माझ्या नावाआधी एक अतिमहत्त्वाचं विशेषण जोडलं गेलं होतं- ‘नोबेल लॉरिएट’! स्वीडिश अकादमीनं मी प्रवासात असतानाच माझ्याशी संपर्क साधत, माझं अभिनंदन करत बातमी दिली होती. मला हा आनंदाचा धक्का होता. मनात पहिला विचार आला, यात माझ्या देशाचा गौरव आहे.’’ मेरी क्युरीपासून सुरू  झालेल्या पोलिश नोबेल विजेत्यांच्या परंपरेतील १९वी मानकरी ओल्गा!

ओल्गाच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष महत्त्वाचे ठरले. तिला त्याच वर्षीचा ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिचे नाव प्रसिद्ध झाले होतेच. २०१९ मध्ये जाहीर झालेले नोबेलही २०१८ साठीच दिले आहे. एकाच वर्षी वाङ्मय क्षेत्रातील असे सुप्रतिष्ठित व सर्वोच्च पुरस्कार अपवादानेच मिळतात. प्रतिभेचे विलक्षण देणे लाभलेली ओल्गा (जन्म- २९ जानेवारी, १९६२) ही ५७ वर्षीय लेखिका अशी अपवादात्मक ठरली.

ओल्गाचे लेखन जागतिक साहित्य क्षेत्रात अलीकडे माहीत झाले असले, तरी तिचे लेखन वयाच्या पंचविशीआधीच चालू झाले होते. तिचे आई-वडील पोलंडच्या एका भागातले- आताच्या युक्रेनमधले- निर्वासित होते. ते दोघेही शिक्षक होते. डाव्या विचारसरणीच्या- पण साम्यवादी नव्हे- बुद्धिवादी लोकांच्या छोटय़ाशा गटाबरोबर ते राहत. घरात छतापर्यंत पुस्तकेच भरलेली असत. अशा घरात त्यांच्या लेकीला लेखनाकडे वळावेसे वाटणे साहजिक होते. आधी जनसेवेच्या उदात्त हेतूने तिने वॉरसॉ विद्यापीठात प्रवेश घेऊन पदवी प्राप्त केली. त्यासाठी मानसशास्त्र विषय निवडला. या कालावधीत कार्ल युंग या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांतांचा तिच्यावर खूपच प्रभाव पडला. काही काळ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केल्यावर तिच्या लक्षात आले की, आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या समस्यांचा त्रास त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त होतो. मग मात्र तिने पूर्ण वेळ लेखनावर लक्ष केंद्रित केले.

महायुद्धांच्या काळापासून रशिया, जर्मनी यांच्या दडपणाने पोलंडच्या भौगोलिक सीमा बदलत गेल्या. पोलंडमधील सत्तासंघर्ष, लोकशाहीच्या आवरणाखालील हुकूमशाही झुगारण्यासाठी होणारे लोकांचे उठाव यामुळे अस्थिरता असते. ओल्गा ही स्त्रीवादी, स्वातंत्र्यवादी, सक्रिय कार्यकर्ती व लेखिका आहे. तिचे लेखन राजकीय नसले, तरी अनेकदा वादविवादांच्या भोवऱ्यात सापडते. मात्र तरी तिची लोकप्रियता अफाट आहे. तिच्याशी देशवासीयांचे आत्मीयतेचे नाते आहे. तिला नोबेल मिळाल्यावर सॅलेसिया या गावातील तिच्या घरापुढे तिची स्वाक्षरी घेण्यासाठी लोकांनी मोठमोठय़ा रांगा लावल्या. तो आठवडा तिचे पुस्तक हाती असलेल्यांना सार्वजनिक वाहनप्रवास मोफत होता.

आजवरच्या तीस वर्षांत कवितासंग्रह (‘द सिटी इन मिर्स’, १९८९), नीतिपर कथांचा संग्रह, निबंधवजा लेखनसंग्रह, आठएक कादंबऱ्या असे तिचे बरेच लेखन प्रसिद्ध झाले तरी ते पोलिश भाषेत होते. केवळ चार कादंबऱ्या- त्याही अलीकडेच- इंग्रजीत अनुवादित झाल्यावर आपल्यापर्यंत पोहोचल्या. (त्यातही ‘हाऊस ऑफ डे, हाऊस ऑफ नाइट’ ही कादंबरी उपलब्ध नाही.) तोवर तिचे सारे दर्जेदार लेखन फक्त पोलंडपर्यंत वा आजूबाजूच्या देशांपर्यंत पोहोचले होते. गेल्या आठ-दहा वर्षांत ते अनुवादित लेखन लोकांपर्यंत झपाटय़ाने पोहोचले. ती म्हणते, ‘‘इंग्रजीचं जागतिक स्थान मी जर आधीच ओळखलं असतं, तर आज माझं आयुष्य किती वेगळं झालं असतं! आपल्याला कितीही आवडलं नाही, तरी इंग्रजीचं जागतिक महत्त्व ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल.’’ त्यामुळे तिच्या लेखनाबद्दल बोलताना ‘फ्लाइट्स’, ‘ड्राइव्ह यूअर प्लो ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ आणि ‘प्रायमीव्हल अ‍ॅण्ड अदर टाइम्स’ या तीन पुस्तकांच्या आधारावर बोलणे शक्य आहे.

ओल्गा टोक्र्झुकच्या लेखनात आधुनिकोत्तर तसेच अस्तित्ववादी वैशिष्टय़े जाणवतातच. शिवाय तिचा भर हा पौराणिक व दंतकथांचे वास्तवाशी नाते जोडणे, त्यांचे रूढ अर्थापेक्षा वेगळे अर्थ जाणवून देणे यावरही असतो. ‘फ्लाइट्स’ (इंग्रजी-२०१८) ही कादंबरी कलंदर वृत्तीने केलेल्या भटकंतीचे तुकडय़ा-तुकडय़ांत केलेले वर्णन आहे. तरीही त्यातील एकात्म नाते लक्षात येते. समकालीन सुसंस्कृत मानवी जीवनात आढळणारी भटकी वृत्ती, विमुक्ततेचा आनंद तिने यात चित्रित केला आहे. ११६ प्रकरणांच्या/ तुकडय़ांच्या या कादंबरीत एखादे प्रकरण केवळ एका वाक्याचे, तर एखादे दीर्घ निबंधवजा दिसते. एका अनामिक नायिकेने विशिष्ट हेतूविरहित केलेला प्रवास, त्यात भेटणाऱ्या विविध व्यक्ती, घडलेले प्रसंग, दिसलेली/पाहिलेली ठिकाणे, वास्तू यांची ही शब्दचित्रे आहेत. त्यात काळ आणि अवकाशाच्या हिंदोळ्यांवरून ती आपल्यालाही फिरवते. संस्कृतीचे लक्षण म्हणजे भटकेपण असे तिला वाटते. आपल्या संस्कृतीनेही ‘चरैवेति, चरैवेति’ हे सूत्र सांगितलेच आहे. रानटी माणसे कुठे प्रवास करत होती? ती केवळ ठरलेल्या ठिकाणी जात आणि धाडी टाकत. तिच्या एका प्रकरणात ती म्हणते, ‘मी कुठेही जायला निघाले की इतरांच्या रडारवरून दिसेनाशी होते. कुणाला सांगतच नाही, मी कुठे आहे, कुठून निघाले, कुठे चालले आहे ते. तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेला जाता तेव्हा तुमच्या आयुष्यातला एक दिवसच नाहीसा होतो ना? किंवा पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करता तेव्हा एकच दिवस तुम्ही दोनदा जगता ना? का मग पुंज भौतिकीमधील एकच कण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो, या सुप्रसिद्ध नियमानुसार हे असते? का आपण अजून याविषयी नीट विचारच केला नाही?’ या प्रकरणात आपले कालसंबद्ध अस्तित्व आणि काळविषयक संकल्पना संस्कृती, व्यवसाय यांच्याशी कशा निगडित आहेत, हे ती सहजपणे आपल्याला सांगत जाते. प्रश्न मांडायचे आणि वाचकांवर सोडून द्यायचे. त्यांनी विचार करावा. पुन्हा हे सारे इतक्या ललितरम्य भाषेत, की आपण त्याच्याशी जोडून घेत, नकळत कधी गुंततो तेच कळत नाही!

जादूगाराच्या पोतडीतून अनपेक्षितपणे निघणाऱ्या अफलातून चिजांप्रमाणे ही प्रकरणे आपल्याला तिची कुतूहलाची ठिकाणे दाखवतात. कधी ती आठवणीत रमते, कधी एअरपोर्ट्स, विकिपीडिया, प्रवासातील टिपणे, हॉटेल्स, बौद्ध भिक्षू, योगदर्शन, फ्रेंच, पोलिश संगीतकार, कुणाची विफल प्रेमकथा, आपली भाषा, इंग्रजीचा वापर, आपले बालपण या साऱ्यांबद्दल ती लिहिते. एखाद्या गोधडीत अनेक तुकडय़ांचे विविध आकार मायेच्या अस्तराने जोडत जावे तसे अतिशय संवेदनशीलतेने, चिंतनाधिष्ठित असे ती लिहीत जाते. कादंबरीचा आरंभ तिच्या लहानपणीच्या हळुवार आठवणीने होतो, तेव्हापासूनच ती आपलीशी वाटते. चिंतनशीलता, संवेदना यांचा उत्तम समतोल या कादंबरीत दिसतो. ‘मी माझ्या कथा, शब्दचित्रे, निबंध वाङ्मयीन अवकाशात सोडते. वाचकांनी आपल्या जाणिवा, आकलन यानुसार त्यांचे नक्षत्रमालांसारखे अर्थपूर्ण आकार करावेत, ते स्वातंत्र्य त्यांना आहे,’ असे म्हणणारी ओल्गा नेहमी खगोलशास्त्राशी संबंधित प्रतिमा वापरते. या कादंबरीला पोलिश भाषेतील सर्वोच्च निके पुरस्कार व इतरही अनेक पुरस्कार मिळाले याचे आश्चर्य वाटत नाही.

‘ड्राइव्ह यूअर प्लो ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ (इंग्रजी- २०१९) ही कादंबरी काहीशी रहस्यप्रधान आहे. विल्यम ब्लेक याच्या कवितांचा प्रभाव सतत आहे. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात आशयाशी अनुरूप अशा ब्लेकच्या काव्यपंक्तींनी होते. एक वयस्क बाई गहन रानात आतल्या भागातील वसाहतीत राहते. आजूबाजूच्या लोकांची घरे सांभाळते. ती बाई काहीशी चक्रम आहे. रानातील जनावरांना व माणसांना तिने विचित्र नावे ठेवली आहेत. तिथे झालेल्या खुनांची खबर मिळाल्यावर ती अस्वस्थ होते आणि अगाथा ख्रिस्तीची डिटेक्टिव्ह मिस् मार्पल तिच्या अंगी संचारते. ती खुन्यांचा माग काढते. मग पैसा, सत्ता आणि पितृप्रधान व्यवस्था यांचे एकत्रीकरण झालेले लक्षात येताच, त्यांच्याशी लढते. शेवट प्रत्यक्ष वाचायला हवा. केवळ खुनी कोण, हा प्रश्न न सोडवता, त्याद्वारे तिच्याकडून आपोआपच आजचे पर्यावरणविषयक प्रश्न, एवढेच नव्हे तर प्राण्यांचे, मानव प्राण्याचेही मानसशास्त्र, याबद्दल ती सांगते. इथेही पूर्णपणे गांभीर्याने, पण खुसखुशीत भाषेत ती निवेदन करीत राहते. आरंभीचे त्या चक्रम जनिना द्युझिकोचे स्वत:बद्दलचे भाष्य अतिशय मिश्कील व उत्कंठावर्धक आहे.

कथनात्म निवेदनाचे सारे प्रकार अजमावत, जीवनाकाराचे शोध घेताना रूढ सीमा, बंधने ओलांडण्याचे धाडस ओल्गा टोक्र्झुक करते, हे नोबेल समितीचे म्हणणे तिच्या कादंबऱ्यांची कथनशैली पाहता पटत जाते. ‘प्रायमीव्हल अ‍ॅण्ड अदर टाइम्स’ (इंग्रजी- २०१०) ही मूळ १९९६ मधील यशस्वी कादंबरी. प्रायमीव्हल हे पोलंडच्या मध्यभागी असणारे काल्पनिक गाव. त्यातील लोक बहुतांशी एककल्ली, जगण्याच्या आदिम कल्पना उराशी बाळगणारे. गावाचे रक्षण करणारे आर्कएन्जल (एक प्रकारचे देवदूत). त्यांच्या परिमाणातून त्या गावाचे, नायबिएस्की या कुटुंबाच्या चार पिढय़ांचे, १९१४ ते १९८० पर्यंतचे (१९८० नंतर पोलंडमध्ये शांतता प्रस्थापित झाली.) जीवन यात चित्रित केले आहे. प्रकरणांच्या शीर्षकात प्रत्येकाचा काळ दर्शवला आहे. मोठमोठय़ा संकटांमध्ये माणसांचे सामूहिक मन कसे कार्य करते, हे तिला यातून दाखवायचे होते. आपल्या अंतर्मनात दडपलेल्या अशा अनेक भावना प्रसंगी कशा कार्यरत होतात, हे ती दाखवते. तिच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणे यातही छोटीछोटी ७८ प्रकरणे आहेत. या लेखनाला लय आहे. गावातील स्मशानाच्या भिंतीवर लिहिलेले असते- ‘देव पाहतो/ काळ निसटतो/ मृत्यू पाठलाग करतो/ अनंतकाळ वाट पाहतो.’ कादंबरीतील बहुतेक घटना या चार वाक्यांभोवतीच फिरतात. ज्यू आणि ख्रिश्चन यांतील संघर्ष याची धार तीक्ष्ण करतो.

‘द बुक्स ऑफ जेकब’ हा तिचा महाकाव्याच्या तोडीचा ग्रंथ मानला जातो. ९०० हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथात १८ व्या शतकातील जॅकब फ्रॅन्क या जन्माने ज्यू असणाऱ्या धार्मिक नेत्याच्या आयुष्यावर आधारित कथानक आहे. त्यात जबरदस्तीने केलेली धर्मातरे, त्यासाठी झालेले संघर्ष यांचे तीन-चार पिढय़ांचे वर्णन आहे. सत्य व कल्पित यांचे मिश्रण असणाऱ्या, मूळ पोलिशमधील या पुस्तकाचे खूपच चांगले स्वागत झाले, तिला विविध पुरस्कार मिळाले. मात्र, कडव्या धर्मनिष्ठांनी तिला धमक्या देत, तिच्याविरुद्ध रान उठवले, तिला देशद्रोही ठरवले. तिने खिन्न होत म्हटले, ‘मला वाटलं होतं, आता तरी पोलिश लोक आपल्या इतिहासाचा पुनर्विचार करतील. पण तसं झालं नाही.’ या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित व्हायला अजून दोन वर्षे लागतील, असे तिच्या प्रकाशकाने जाहीर केले आहे.

नोबेल मिळण्यापूर्वीच ओल्गा टोक्र्झुकच्या काही कथांचा अनुवाद मारिया पुरी यांनी हिंदीत केला होता- ‘कमरें और अन्य कहानियाँ’ (२०१४) या नावाने. अजूनही लेखनातील नवनवीन क्षितिजे धुंडाळण्याची क्षमता असणारी ओल्गा लेखनाबाबतीत प्रयोगशील आहे. मोठय़ा शहरांमध्ये गर्दीत, जीवनाच्या धकाधकीत आपला आवाज हरवून जातो, कुणाशी निवांत संवाद करता येत नाही, नको असणाऱ्या गोष्टी अंगावर येतात, म्हणून छोटय़ा गावात राहणारी ओल्गा आपल्या लेखनातून संस्कृती आणि निसर्ग यांचे द्वंद्व रेखाटते आणि दोन्हीही टिकून राहावेत म्हणून धडपडते. आधुनिक जगातील माणसाची परंपरेखाली न पिचता, नवीन जग निर्माण करण्याची वृत्ती अंगी असणाऱ्या ओल्गाला नोबेल पुरस्कार दिला जाणे म्हणजे नावीन्याचे स्वागतच म्हणावे लागेल!