बुजुर्ग जर्मन तत्त्वज्ञ युर्गेन हाबरमास यांनी या आठवडय़ात- मंगळवारी वयाची नव्वदी गाठली. आधुनिकता कशी कालबद्ध नाही, सौंदर्यशास्त्र, विवेकवाद, लोकशाही, भाषा ते अगदी धर्माचे तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांची तात्त्विक मांडणी करणारे हाबरमास हे या वयातही आवश्यक राजकीय-सामाजिक मुद्दय़ांवर आवर्जून व्यक्त होत असतात. त्यांनी १९६२ साली जर्मन भाषेत लिहिलेले- सार्वजनिक अवकाशांच्या (पब्लिक स्फीअर) घडणीबद्दलचे सिद्धान्तन करणारे- (त्यांचे पहिले) पुस्तक १९८९ साली इंग्रजीत आले, आणि त्यातील मांडणीने तत्त्वविचाराला नवी दिशाच मिळाली. जर्मनीच्या क्रुद्ध नाझी काळाच्या सावटात बालपण घालवलेल्या हाबरमास यांनी युरोपच्या आणि पाश्चिमात्य जगाच्या लोकशाहीकरणाविषयी आग्रही भूमिका घेणारी पुस्तके लिहिलीच, पण त्यासाठी वेळोवेळी जाहीर भूमिकाही घेतल्या. अलीकडेच झालेल्या युरोपीय महासंघाच्या निवडणुकीतही त्यांनी संकुचित राष्ट्रवादाविरुद्ध केलेला प्रचार, हे तर त्याचे अगदीच ताजे उदाहरण. आताही, त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशीच जाहीर केल्याप्रमाणे, त्यांचे नवे पुस्तक येत आहे! दोन खंडात असणाऱ्या या पुस्तकाचे इंग्रजी शीर्षक ‘ईव्हन अ हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी’ असे असणार असून, ते येत्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. तत्त्वज्ञानाने स्वत:स धर्मापासून विलग करत नेत धर्मनिरपेक्ष रूप कसे प्राप्त केले, याचा ऐतिहासिक आढावा या १७०० पृष्ठांच्या पुस्तकात घेतला आहे. हाबरमास यांच्या नव्वदीतल्या या चिंतनाबरोबरच, त्यांच्याविषयीची पुस्तकेही येत्या काळात प्रसिद्ध होणार आहेत. ३० लेखकांनी एकत्रित लिहिलेले ‘हाबरमास ग्लोबल’ हे संपादित आणि रोमन यॉस यांचे ‘द यंग हाबरमास’ हे हाबरमास यांच्या आरंभीच्या काळातल्या तत्त्वचिंतनाचा वेध घेणारे पुस्तक अशी पुस्तके प्रसिद्ध होतील; शिवाय हाबरमास यांच्या आजवरच्या लिखाणातील महत्त्वाच्या २०० संकल्पनांच्या नोंदींचा कोश ‘केम्ब्रिज’कडून गेल्या महिन्यातच प्रसिद्ध झाला आहे!