गेल्या दोन वर्षांपासून मासिक आणि साप्ताहिकांना लागलेल्या आर्थिक घरघरीचीच चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. बलाढय़ नियतकालिकांना जाहिरातींची टंचाई भेडसावत असून त्याचा परिणाम लेखकांच्या मानधन कपातीत आणि परिणामी सर्जनशील रिपोर्ताजची संख्या आटण्यात झाला आहे. ‘प्लेबॉय’ने आपला अंक महिन्याआड छापायला सुरुवात केली असून ‘न्यू यॉर्कर’, ‘इकॉनॉमिस्ट’, ‘हार्पर्स’ या वृत्त-वैचारिक व्यासपीठांना आपली जगभरातील वाचकसंख्या टिकून राहावी, यासाठी समाजमाध्यमांवरून जाहिरात करावी लागत आहे. या धर्तीवर ‘ग्रॅण्टा’ या ब्रिटनमधून प्रसिद्ध होणाऱ्या शुद्ध साहित्यिक आणि वैचारिक नियतकालिकाच्या चाळिसाव्या वर्षांतील पदार्पणाची घटना महत्त्वाची मानायला हवी. कुठल्याही इतर नियतकालिक, मासिकाशी स्पर्धा न करता जवळपास जाहिरातींशिवाय निघणारा हा अंक गेली चाळीस वर्षे ‘द मॅगझिन ऑफ न्यू रायटिंग’ हे आपले बिरुद यशस्वीपणे पार पाडत आहे. वास्तविक १८८९ साली केंब्रिज विद्यापीठाद्वारे ‘ग्रॅण्टा’ ची निर्मिती करण्यात आली होती. महाविद्यालयीन राजकारण, शहरबात आणि हौशी साहित्यिकांची लेखनकामाठी असे त्याचे स्वरूप होते. स्थानिक पातळीवरच्या या नियतकालिकाचा जीर्णोद्धार १९७९ साली पत्रकार बिल बफर्ड आणि लेखक-कवी जोनाथन लेव्ही यांच्या पुढाकारातून झाला. आज त्याचे रूपांतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहित्यिक नियतकालिकात झाले आहे. पर्यटन, आत्मकथन, कथा, मुलाखती, अनुभवलेखन आणि छायाचित्र-कथांचे पुस्तकाच्या आकाराचे जाडजूड बांधणी असलेले हे नियतकालिक आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे वैचारिक व्यासपीठ आहे.

एखादा विषय घेऊन त्यावर जगाच्या कानाकोपऱ्यातील लेखकांचे दर्जेदार साहित्य मिळविण्यात या नियतकालिकाइतका वकूब कुणाकडेच नाही. भारतावर त्यांनी दोन अंक काढलेत, तर पाकिस्तानवर एक. विविध देशांना वाहिलेल्या अंकांसोबत अमेरिकेतील शहरांवरही विशेष अंक पाहायला मिळतो. ‘मदर्स’, ‘फादर’, ‘फिल्म’, ‘म्युझिक’, ‘न्यू रायटिंग फ्रॉम अमेरिका’, ‘बेस्ट ऑफ यंग ब्रिटिश नॉव्हेलिस्ट’, ‘ब्राझिलियन नॉव्हेलिस्ट’, ‘द फॅक्टरी’ ही काही त्यांच्या विशेषांकांची नावे. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘व्हॉट वी थिंक ऑफ अमेरिका’ हा विशेषांक तर होताच, पण अमेरिकेच्या नजरेतून जग कसे आहे, या विषयावरही ग्रँटाने खास लेखमाला करून घेतली होती. वृत्तखेचक विषयांच्या मागे न लागता लोकांच्या विचारांना उन्नत करणारे घटक कोणते असू शकतील, याकडे लक्ष देणारे ‘ग्रॅण्टा’ हे एकमेव नियतकालिक आहे.

गेल्या चाळीस वर्षांतील जगभरात बुकरपासून नोबेलपर्यंतचे पुरस्कार मिळविणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या लेखकांची या मासिकात उपस्थिती आहे. या नियतकालिकाने चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आपल्या अंकांतील सर्वोत्तम लेखांचे संकलन करणारा नवा अंक काढला आहे. रेमण्ड काव्‍‌र्हर, अमिताव घोष, फिलिप रॉथ, डॉन डिलेलो, जॉन बर्जर, लॉरी मूर, वेद मेहता यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील गाजलेले लेख, कथा या अंकात एकत्रितरीत्या वाचायला मिळणार आहेत. ‘ग्रॅण्टा’चे जुने अंक सहसा कुणीही संग्राहक विकायला काढत नसल्याने आज दुर्मीळ झालेल्या अंकांतील ताजे राहिलेले लिखाण यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे!