09 April 2020

News Flash

साथीतली पुस्तके..

अ‍ॅमेझॉनआदी विक्रीसंकेतस्थळांवर या नव्या करोनातज्ज्ञांनी प्रसवलेली पुस्तके दिसू लागली.

मानवेंद्र प्रियोळकर

करोना साथीविषयीच्या उलटसुलट माहितीचा पूर समाजमाध्यमांवर ओसंडून वाहतो आहे. तो टाळून त्याविषयीच्या ताज्या पुस्तकांकडे वळावे, तर काय चित्र आहे?

संकटात संधी शोधणारे अनेक असतात. सद्य: करोना साथ त्यास अपवाद ठरली असती, तरच नवल! समाजमाध्यमी गलक्यामुळे करोनाबद्दलच्या गोंधळात दिवसेंदिवस पडत चाललेली भर, आपल्याकडच्या ‘गो करोना, करोना गो’सारख्या बालिश उपद्व्यापांनी गाठलेले हास्यास्पद टोक आणि या साऱ्याने आगाऊ खबरदारीत गुंतलेले सामान्यजन असे वातावरण संकटात अनेकांसाठी संधी निर्माण करणारे असते. ती संधी हेरण्याचे कसब मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर्सच्या नव्या उत्पादकांनी आपल्याकडे आहे, हे दाखवून दिले आहे. अचानक बाजारात अवतरलेल्या या नव्या उत्पादकांप्रमाणेच काही करोनातज्ज्ञही निर्माण झाले असून करोनाविषयीचे प्रबोधन करण्याच्या आयत्या संधीचा त्यांनी पुरेपूर वापर केला आहे. जानेवारीत या नव्या करोना विषाणूची तीव्रता जगजाहीर झाली आणि त्या नव्या करोनाप्रमाणेच त्याचे तज्ज्ञ अभ्यासकही आपली पुस्तके घेऊन पुढे येऊ लागले. अ‍ॅमेझॉनआदी विक्रीसंकेतस्थळांवर या नव्या करोनातज्ज्ञांनी प्रसवलेली पुस्तके दिसू लागली. त्यांचा खपही होऊ लागला. गेल्या आठवडय़ाभरात या पुस्तकांच्या आणि त्यांच्या लेखकांच्या विश्वासार्हतेबद्दल ओरड सुरू झाली, तेव्हा कुठे करोनाप्रमाणेच या पुस्तकसाथीचा प्रसार ध्यानात आला. ‘द गार्डियन’, ‘एनबीसी न्यूज’ या माध्यमसंस्थांनी व ‘अनडार्क’ या विज्ञानविषयक डिजिटल नियतकालिकाने सविस्तर वृत्तान्त लिहून या करोना पुस्तकसाथीचे स्वरूप उघड केले आहे.

अ‍ॅमेझॉनने उपलब्ध करून दिलेले ई-पुस्तकविक्रीचे मुक्त-व्यासपीठ हे अशा नवकरोनातज्ज्ञांना झटपट प्रसारासाठी उपयोगी ठरले. करोनाची साथ पसरते न पसरते, तोवर या नवतज्ज्ञांनी प्रसवलेली करोनाविषयक पुस्तके अ‍ॅमेझॉनवरच्या ई-पुस्तकांच्या भाऊगर्दीत पुढे झेपावली.

रिचर्ड जे. बेली नामक कोणा नवतज्ज्ञाच्या ‘करोनाव्हायरस : एव्हरीथिंग यू नीड टु नो अबाऊट द वुहान करोना व्हायरस अ‍ॅण्ड हाऊ टु प्रेव्हेन्ट इट’ या पुस्तकाने यात आघाडी घेतली होती. करोना विषाणू काय आहे, इथपासून स्वच्छतेच्या सल्ल्यांपर्यंत माहिती देणारे हे पुस्तक वाचकांना उपयुक्त वाटणे स्वाभाविक आहे. पण नवतज्ज्ञाचे हे पुस्तक म्हणजे ‘एनबीसी’, ‘द गार्डियन’च्या वृत्तान्तांची सरळसरळ उचलेगिरी आहे, हे अ‍ॅमेझॉनच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ११ मार्च रोजी ते संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले.

तीच गत ‘कोविड १९ करोनाव्हायरस : ऑल यू नीड टु नो अ‍ॅण्ड हाऊ टु प्रोटेक्ट युवर फॅमिली फ्रॉम इट’ या पुस्तकाची. या ३१ पानी पुस्तकाचा लेखक आहे गेराल्ड लिम वँग नामक नवतज्ज्ञ. हा कोण, कुठला याची कोणतीही माहिती नाही; पण पुस्तकाचा खप होत होता. मात्र, ९ मार्चला हे पुस्तक अ‍ॅमेझॉनने विक्रीयादीतून बाद केले आहे.

अशी शंभराहून अधिक पुस्तके जानेवारीनंतर प्रसिद्ध झाल्याचा दावा ‘अनडार्क’ या डिजिटल नियतकालिकाने केला आहे. त्याविषयीच्या वृत्तान्तात याची काही उदाहरणे तपशीलवार दिलेली आहेत. त्यात ‘करोनाव्हायरस १०१ : एव्हरीथिंग यू शुड नो टु अव्हॉइड इलनेस अ‍ॅण्ड प्रोटेक्ट युवरसेल्फ फ्रॉम द वुहान २०२० आऊटब्रेक’ अशा लांबोडक्या शीर्षकाच्या पुस्तकाबरोबरच ‘करोनाव्हायरस अ‍ॅण्ड फेस मास्क्स : द ट्रथ’ या पुस्तकाचा समावेश आहे. ही दोन्ही पुस्तके डॉ. झोई गॉटलिब हिने लिहिल्याचे नमूद आहे. मात्र तिची तज्ज्ञ म्हणून सांगितलेली ओळख संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही दोन्ही पुस्तके गेल्या आठवडय़ापासून अनुपलब्ध झाली आहेत.

याशिवाय ‘करोनाव्हायरस डिजीज् : अ प्रॅक्टिकल गाइड फॉर प्रीपरेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन’ हे थेट ‘यू.एस. डिपार्टमेंट ऑफ हेल्थ’ या अस्तित्वातच नसलेल्या यंत्रणेच्या नावावर खपवलेले पुस्तक किंवा ‘जीझस व्हर्सेस सेटन : द ओरिजिन्स ऑफ द करोनाव्हायरस’, ‘मिलिटरी व्हायरस अपोकॅलिप्स’ अशीही काही नावे पुस्तक यादीत दिसत होती.

‘बार्न्‍स अ‍ॅण्ड नोबल’ या ग्रंथविक्री साखळीच्या पुस्तक यादीत तर कुत्रा, ससा, घोडा, मासे आदींचे करोनापासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सल्ले देणाऱ्या पुस्तकमालेप्रमाणेच ‘वुहान करोनाव्हायरस : ऑल सीक्रेट्स रिव्हिल्ड’ यांसारख्या रहस्यभेदाचा दावा करणाऱ्या पुस्तकांचाही समावेश आहे.

लहानग्यांसाठी करोनाप्रबोधन करणारी पुस्तकेही लक्ष वेधून घेत आहेत. ‘द लिट्ल करोना किंग’ आणि ‘करोनाव्हायरस झॉम्बीज्, व्हॉल्युम १ : द लिव्हिंग डेड अपोकॅलिप्स’ ही पुस्तके त्यातलीच.

करोनाविषयीच्या या पुस्तकांनी ई-पुस्तक बाजार व्यापलेला असताना तीन जुन्या पुस्तकांची मागणीही वाढली असल्याचे निरीक्षण ‘द गार्डियन’ने एका बातमीत नोंदवले आहे. त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे अल्बेर कामूची १९४७ साली प्रसिद्ध झालेली ‘द प्लेग’ ही कादंबरी. तर इतर दोन पुस्तकांत स्टीव्हन किंगची ‘द स्टॅण्ड’ (१९७८) आणि डीन कून्ट्झ लिखित ‘द आयज् ऑफ डार्कनेस’ (१९८१) या कादंबऱ्यांचा समावेश आहे. किंगची कादंबरी इन्फ्लुएंझा साथीच्या पाश्र्वभूमीवर जैविक युद्धाचा पट मांडणारी आहे, तर कून्ट्झच्या कादंबरीत ‘वुहान ४००’ या विषाणूचा उल्लेख आला होता!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 2:00 am

Web Title: article about information of coronavirus book novel coronavirus zws 70
Next Stories
1 बुकबातमी : घोषणा अन् माघार
2 ‘मुस्लीम’ म्हणून वाढताना..
3 विज्ञान-तंत्रज्ञानातील स्त्री-अवकाश
Just Now!
X