26 January 2021

News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : लिहित्या लेखकाची भूमिका

विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून जगभरात प्रचंड राजकीय उलथापालथींचे युग अवतरलेले आहे

जॉर्ज ऑर्वेल

डॉ. मनोज पाथरकर

विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून जगभरात प्रचंड राजकीय उलथापालथींचे युग अवतरलेले आहे. या धामधुमीत सर्जनशील लेखकाची भूमिका काय असावी, याविषयी जॉर्ज ऑर्वेलने ‘रायटर्स अ‍ॅण्ड लेवियादन’ या निबंधात १९४८ साली लिहिले आहे. त्या निबंधाचा सारांशानुवाद..

साहित्य आणि कला यांचे स्वातंत्र्य बऱ्याच अंशी लेखक-कलावंतांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मुळात त्यांची स्वत:ची उदारमतवादी भूमिका जिवंत ठेवण्याची तयारी असायला हवी. सद्हेतूने काम करतानाही त्यांच्यावर राजकीय विचारांचा आणि भूमिका घेण्याच्या आवश्यकतेचा बरा-वाईट परिणाम होत असतो. हे युगच राजकारणाचे असल्याने साहित्याच्या विषयवस्तूवर मर्यादा येतात आणि साहित्यविषयक दृष्टिकोन साहित्यबाह्य़ निष्ठांमुळे प्रभावित होतो. याच कारणामुळे उत्तम समीक्षादेखील बऱ्याचदा फसवेगिरी ठरू शकते. साहित्यिक मूल्य ठरविण्याचे कोणतेही सर्वमान्य मापदंड नसल्यामुळे साहित्यिक मूल्यमापन म्हणजे वैयक्तिक प्राधान्यक्रमाला आधार देण्यासाठी निराधार नियम बनविण्याचा प्रकार ठरतो. आपली भूमिका उचलून धरणाऱ्या साहित्यकृतीत कलागुण शोधणे म्हणजे साहित्यसमीक्षा नव्हे. पक्षीय निष्ठा आपल्याला खोटी मांडणी करायला भाग पाडतात. (सहमत असताना काही गोष्टी मांडून आपण चूक करतो, तर असहमत असताना काही गोष्टी लपवून आपण चूक करीत असतो.) त्यातच अनेक वादग्रस्त पुस्तकांचे मूल्यमापन ती वाचण्यापूर्वीच केले जाते. याचा लेखकाच्या मनातील अद्याप कागदावर न उतरलेल्या पुस्तकावरही प्रभाव पडतो. या पुस्तकाचे स्वागत कसे होणार, याची त्याला आधीच कल्पना येते. म्हणजेच लेखनव्यवहारात केवळ साहित्यिक निकष वापरले जातात हा एक देखावाच ठरतो.

विसाव्या शतकात साहित्यावर राजकारणाचे अतिक्रमण होणे अपरिहार्यच होते. जगातील अन्याय आणि दु:ख यांच्या बोचऱ्या जाणिवेतून सुटका नसल्याने लेखकांना वाटू लागले, की आपण याबद्दल काही तरी करायला हवे. यातून येणाऱ्या अपराधी भावनेमुळेच साहित्याकडे विशुद्ध सौंदर्यवादी दृष्टिकोनातून पाहणे अशक्य होऊ  लागले. अशी परिस्थिती उद्भवल्यावर लेखकाने राजकीय भूमिका घेण्यात वाईट काहीच नाही; परंतु त्याचा अर्थ कर्मठ पक्षभूमिकांना शरण जाणे असा घेतल्यास अप्रामाणिकपणा व भीती लेखकाला ग्रासू लागतात. विचारधारांमधील भेदाभेद सुस्पष्ट असलेल्या या युगात बंडखोर विचार लगेच ओळखू येतात. त्यातूनच साहित्यिक भीतीच्या सावटाखाली लेखन करणारा बुद्धिजीवी होऊ  लागतो. ही भीती सर्वसाधारण जनतेच्या मतांइतकी आपल्याच गटातील मतप्रवाहाचीही असते. समाजात अनेक गट अस्तित्वात असले, तरी विशिष्ट काळात त्यातील एकच सर्वोच्च स्थान पटकावून असतो. या गटाच्या मतप्रवाहाविरुद्ध लिहिण्यासाठी गेंडय़ाची कातडी कमवावी लागते आणि लेखनातून होणाऱ्या बऱ्याचशा प्राप्तीवर पाणी सोडावे लागते.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील तरुणवर्गाला डाव्या विचारसरणीने आकृष्ट केले. ‘पुरोगामी’, ‘लोकशाही’ आणि ‘क्रांतिकारी’ हे त्यांच्यासाठी कळीचे शब्द बनले. लोकशाहीचे समर्थन आणि फॅसिझम, साम्राज्यवाद, वर्गीय भेदाभेद, वर्णद्वेष आदींना विरोध अशी त्यांची भूमिका होती. दांभिक पुराणमतवाद व पावित्र्यवादी कर्मठपणापेक्षा डावी विचारसरणी निश्चितच श्रेष्ठ होती. कारण बहुजनांना प्रत्यक्षात हव्या असलेल्या समाजाची निर्मिती हे निदान त्यांचे गर्भित उद्दिष्ट तरी होते; परंतु या विचारसरणीतही लपवाछपवी होत्याच, ज्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणे अशक्य होऊन गेले.

‘वैज्ञानिक’ (वास्तववादी) आणि ‘युटोपियन’ (आदर्शवादी) अशा दोन्ही डाव्या विचारधारांचे उद्गाते लगेच सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सर्वच व्यवस्थांना विरोध करणारी ही विचारधारा जहाल बनत गेली. भांडवलशाही उलथून टाकली की समाजवाद अपरिहार्य आहे, हे त्यांचे मुख्य तत्त्व झाले. मात्र, आपण दिलेली वचने प्रत्यक्षात येताना एका त्रासदायक संक्रमण अवस्थेतून जावे लागेल याबद्दल डाव्या सरकारांनी मौन बाळगले. दुसरीकडे, इतिहासाच्या नव्या वळणांनी ‘सत्याचा विजय’, ‘छळवादाचा पराभव’, ‘माणसाचा स्वाभाविक चांगुलपणा’ यांसारख्या तत्त्वांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले. रशियन राज्यक्रांतीनंतर समाजवाद तर प्रस्थापित झाला नाहीच, उलट फॅसिझमच्या उदयामुळे शांतिवाद आणि आंतरराष्ट्रीयता या तत्त्वांसमोर आव्हान उभे राहिले. दुर्दैवाने यातून नव्या सैद्धांतिक मांडणीने आकार घेतला नाही.

अर्थात, वैचारिक अप्रामाणिकपणा फक्त समाजवादी आणि डाव्यांची मिरास असतो असे नाही. कोणत्याही राजकीय विचारधारेचा स्वीकार लेखक म्हणून प्रामाणिक राहण्याशी विसंगत ठरतो. अगदी शांतिवाद किंवा व्यक्तिवाद यांसारख्या चळवळींनाही हे लागू आहे. अमुक एक ‘वादा’चा (ism) उच्चारच प्रचाराचा गंध बरोबर घेऊन येतो. समूहाविषयीच्या निष्ठा आवश्यक आहेत हे खरे; परंतु जितपत साहित्य व्यक्तीची निर्मिती असते तितपत या निष्ठा साहित्यासाठी घातक ठरतात. त्यांच्या प्रभावाखाली सर्जनशील लेखनात खोटेपणा येऊ  लागतो आणि नवनिर्मितीची शक्ती आटू लागते. कोणतीही कर्मठ विचारसरणी स्वीकारणे म्हणजे सोडवता न आलेले विरोधाभास वारसाहक्काने मिळविण्यासारखे असते. आधुनिकतेच्या समस्याच अशा आहेत की, उघड निष्कर्षांप्रत पोहोचण्यासाठी अधिकृत विचारसरणीशी असलेली निष्ठा क्षणभर बाजूला ठेवावी लागते. उदा. औद्योगिकीकरणाचे काही परिणाम नकोसे असले, तरी गरिबीशी लढण्यासाठी आणि श्रमिकवर्गाच्या मुक्तीसाठी औद्योगिकीकरण आवश्यक आहे. अशा पेचांतून बाहेर पडण्याचा नेहमी पत्करला जाणारा मार्ग म्हणजे मूळ समस्या नजरेआड करून उघड निष्कर्षांच्या विपरीत घोषणांचा जप करीत राहणे.

अशा परिस्थितीत लेखकाने काय करावे?

राजकारणापासून दूर राहणे हा यावरील उपाय नाही. कारण खऱ्या अर्थाने राजकारणाबाहेर राहणे विचारी माणसाला शक्यच नसते. प्राप्त परिस्थितीत लेखकाला आपल्या राजकीय निष्ठा व साहित्यिक निष्ठा यांच्यात ठळक सीमारेषा आखून घेणे भाग आहे. कलावंत म्हणून अप्रिय वाटणाऱ्या, पण राजकारणात आवश्यक ठरणाऱ्या गोष्टी करण्यासाठी साहित्यिकाने तयार राहावे. मात्र, या कृतींशी निगडित मते त्याने स्वीकारायलाच हवीत असे नाही. राजकीय प्रक्रियेत त्याने ‘नागरिक’ म्हणून सहभागी व्हावे, ‘लेखक’ म्हणून नव्हे. लेखकाने पक्षासाठी लिहिता कामा नये. आपले लेखन ही एक स्वतंत्र गोष्ट आहे, हे त्याने स्पष्ट केले पाहिजे. पक्षाच्या अधिकृत विचारधारेला प्रश्न विचारण्याचे, विरोध करण्याचे स्वातंत्र्य त्याने अबाधित ठेवायला हवे. बंडखोरीकडे झुकणारे विचार त्याने रोखता कामा नयेत. राजकीय कर्तव्यांचे पालन करताना लेखकाने आपले व्यक्तित्व अबाधित ठेवायला हवे. राजकीयदृष्टय़ा अपरिहार्य वाटणाऱ्या युद्धात लढण्याची तयारी लेखक दाखवू शकतो; पण युद्धासाठी प्रचारकी लेखन करण्यास नकार देण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे.

संघर्षांच्या काळात सर्जनशील लेखकाने आपले जीवन दोन कप्प्यांमध्ये विभागून टाकणे वरकरणी आत्मघातकी वा उच्छृंखल वाटेल; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात लेखकासमोर दुसरा पर्याय असल्याचे मला तरी दिसत नाही. स्वत:ला हस्तिदंती मनोऱ्यात बंदिस्त करून घेणे अशक्य आहे. त्याच वेळी पक्षयंत्रणा वा समूहाची विचारधारा यांच्या प्रभावाखाली आपल्या व्यक्तित्वाशी तडजोड करणे लेखक म्हणून स्वत:ला संपविणे आहे. ही द्विधा मन:स्थिती निश्चितच त्रासदायक आहे. एकीकडे राजकारणाशी जोडून घेण्याची आवश्यकता पटलेली असते, तर दुसरीकडे राजकारणात अधोगती आणि अवमूल्यन अटळ आहे हेदेखील जाणवत असते. त्यातच बहुतेक लेखकांच्या मनात असा विश्वास रेंगाळत असतो की- ‘प्रत्येक राजकीय निवड फक्त चांगल्या आणि वाईट पर्यायांमधून होत असते.’ आवश्यक वाटणारी गोष्ट योग्यच असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. हा बालमंदिरात शोभणारा दृष्टिकोन लेखकांना सोडून द्यावा लागेल. दोन वाईट पर्यायांमधील कमी हानीकारक पर्याय निवडण्यापलीकडे काहीही करणे राजकारणात शक्य नसते. आता युद्धाचेच पाहा. कधीकधी आवश्यक असले, तरी ते कधीच ‘योग्य’ वा ‘शहाणा’ पर्याय नसते. अगदी सार्वत्रिक निवडणुकाही आनंददायी किंवा उन्नयन करणारा सोहळा नसतो.

बहुतेकांसमोर हा प्रश्न या स्वरूपात उभाच ठाकत नाही. कारण त्यांचे आयुष्य आधीच दुभंगलेले असते. खऱ्या अर्थाने ते फक्त फावल्या वेळात जिवंत असतात. त्यांचे काम आणि राजकीय कृती यांच्यात कसलाही भावनिक धागा नसतो. राजकीय निष्ठेसाठी आपल्या विशिष्ट कामाशी (उदा. रोगनिदान, यंत्रांची हाताळणी) त्यांना प्रतारणा करावी लागत नाही; परंतु लेखक वा कलाकाराकडून नेमके हेच करण्याची अपेक्षा ठेवली जाते. अशी प्रतारणा करण्यास नकार देणे म्हणजे निष्क्रियतेत खितपत पडणे नव्हे. गरज पडल्यास लेखक इतर कुणाप्रमाणेही ठाम पावले उचलू शकतो; परंतु त्याच्या साहित्यकृतींना मोल तेव्हाच येते जेव्हा त्याच्यात दडलेला सर्जनशील कलावंत हे सगळे त्रयस्थासारखे पाहू शकतो. आपल्या राजकीय कृत्यांची आवश्यकता मान्य करतानाच लेखक कधीही या कृत्यांचे खरे स्वरूप नजरेआड होऊ  देत नाही. हीच त्याची लेखक म्हणून अंतिम बांधिलकी असते.

manojrm074@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 4:03 am

Web Title: article from george orwell writers and leviathan essay
Next Stories
1 अबुजमाडच्या जंगलातून..
2 आंतरराष्ट्रीयीकरणाची कसरत
3 दोन शहरं, दोन दुकानं.. 
Just Now!
X