14 August 2020

News Flash

निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता

रिचर्ड डॉकिन्स म्हणजे निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता

संग्रहित छायाचित्र

ग्रंथमानव

डॉ. शंतनु अभ्यंकर

कवी, लेखक, नास्तिक विचारवंत जावेद अख्म्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. जावेद अख्तर यांची ओळख सर्वाना आहेच; पण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्या हयात व्यक्तीच्या नावानं दिला जातो, ते रिचर्ड डॉकिन्स कोण?

रिचर्ड डॉकिन्स म्हणजे निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता. आपल्या लिखाणातून, व्याख्यानांतून, महाजालावरील ब्लॉग, ट्विटर आदी सर्व माध्यमांतून धर्मावर मर्मभेदी हल्ला हे त्याचं वैशिष्टय़.

जीवसृष्टीतील प्रचंड गुंतागुंतीची रचना पाहता, कोण्या कसबी, बुद्धिमान कर्त्यांचं हे कृत्य आहे याची त्याला खात्री होती, निदान सुरुवातीला. पुढे ऑक्सफर्डच्या ‘बॅलिओल कॉलेज’मध्ये जीवशास्त्र शिकता शिकता तो आरपार बदलला. कोणत्याही कसबी कर्त्यांशिवाय जीवसृष्टी आपोआप, निसर्गत: तयार होऊ शकते हे चार्ल्स डार्विननं सिद्ध केलं होतं. यातूनच रिचर्ड डॉकिन्सचे निरीश्वरवादी विचार पक्के झाले.

लेखक डॉकिन्स

त्याचं पहिलंच पुस्तक, ‘द सेल्फिश जीन’, म्हणजे शुद्ध मराठीत ‘अप्पलपोटी जनुके’ (१९७६).  सजीव मर्त्य आहेत; पण अमर राहतात ती त्यांची जनुकं. एका दृष्टीनं विचार करता सर्व सजीव- आपणसुद्धा- निव्वळ गुणसूत्रे (जीन्स) संक्रमित करणारी यंत्रे आहोत. जनुके ‘अप्पलपोटी’ आहेत म्हणजे त्यांना विचार करता येतो असं नाही, हे तो नि:संदिग्धपणे स्पष्ट करतो. मात्र नैसर्गिक निवडीचे दृश्य परिणाम  मात्र जनुके ‘अप्पलपोटी आहेत असं वाटावं’ असे आहेत, एवढंच त्याचं म्हणणं.

असंच ‘द गॉड डिल्यूजन’ (‘देव’ नावाचा भ्रम. २००६) हेही प्रचंड गाजलं. किंबहुना पुस्तकानं तर कहर केला. यात तो सांगतो, या विश्वाचं अथांग, असीम, अनंत, अनादी रूप पाहून मनुष्याने स्तिमित होणे स्वाभाविक आहे. या इतक्या नेमक्या रचनेला कोणीतरी निर्मिक, कर्ताकरविता असणारच, असं वाटणं त्याहून स्वाभाविक आहे. पण मग तात्काळ, ‘या निर्मात्याचा निर्माता कोण?’ असा प्रश्न उभा राहातो. थोडक्यात, एका प्रश्नाचं उत्तर म्हणून देवकल्पना स्वीकारली तर आणखी एका अनुत्तरित प्रश्नाशी आपण येऊन थांबतो. तो फक्त म्हणतो की देवासहित विश्व आणि देवविरहित विश्व यातील दुसरी कल्पना अधिक संभाव्य आहे.

एकदा देव नाकारला की धर्म नाकारणे आलेच. धर्माचा आणि नीतिमत्तेचा अजिबात संबंध नाही, हे तो ठासून सांगतो. ‘देव नाही अशी खात्री दिली तर तुम्ही खून, बलात्कार, चोरी कराल का हो?’, या प्रश्नाला, ‘हो’ असं उत्तर देणारे विरळा. नीतीकल्पना या शतकानुशतके बदलत आलेल्या आहेत. धर्मग्रंथ हे अतिशय भोंगळ भाषा वापरत असतात त्यामुळे त्यातला कुठला भाग ग्राह्य समजायचा हे सोयीनुसार आणि त्या त्या काळातल्या नीतीकल्पनेनुसार ठरत जातं. धर्म भवताप-ग्रस्तांना आधार देणारा आहे, दु:खात सांत्वन करणारा आहे, हाही युक्तिवाद तो खोडून काढतो. उलट वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून येणारा जगाबद्दलचा आत्मीयभाव हा धर्मदृष्टीपेक्षा कितीतरी सरस असल्याचं तो दाखवून देतो.

लेखक डॉकिन्स हा मर्मज्ञ रसिक आहे. यामुळे भाषा विलक्षण शैलीदार आहे. यमक, अनुप्रास, वक्रोक्ती, अतिशयोक्ती, चपखल शब्द आणि शब्दांच्या पलीकडलं असं बरंच काही डॉकिन्स यांची पुस्तकं वाचताना गवसतं. रसिकतेने  एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना विज्ञानाचा ताप वाटतो की मदतीचा हात जाणवतो? या प्रश्नावर तो म्हणतो, मी दिवसरात्र विज्ञानानंदात डुंबत असतो. हे जग, ही सृष्टी, तिची निर्मिती, या साऱ्याची नवलाई आणि ‘ही नवलाई मला जाणवते आहे’- या जाणिवेची नवलाई मला असीम आनंद देते. अर्थात माझ्या सामाजिक, भावनिक, मानसिक, आयुष्याला डार्विनवादाशी काही थेट घेणंदेणं नाही.

याचबरोबर एक पक्का ब्रिटिश खवचटपणा डॉकिन्सच्या लिखाणात ओतप्रोत भरला आहे. भाषणात, लिखाणात, ट्विटरवरच्या ट्विप्पणीत, असा खोडसाळपणा डॉकिन्ससाठी नित्याचाच. ‘जगातल्या सगळ्या मुसलमानांपेक्षा केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजला जास्त नोबेल पारितोषिकं मिळाली आहेत.’ हे त्याचं एक खळबळजनक ट्वीट.

न्यू स्टेटसमनच्या एमाद अहमद यांनी मुलाखतीदरम्यान आपण स्वत: पैगंबर हे उडत्या घोडय़ावरून स्वर्गाला गेल्याचं मानत असल्याचं डॉकिन्सला सांगितलं. डॉकिन्सनी तडक मुलाखतच सोडून दिली. वर ट्वीट केलं, ‘तुम्ही स्वत:ला नेपोलियन किंवा हॅम्लेट समजत असाल तर थेट वेडय़ाच्या इस्पितळात जाल, पण तुमचा उडत्या घोडय़ावर विश्वास असेल तर तुम्हाला थेट न्यू स्टेटमनमध्ये पत्रकार म्हणून संधी मिळेल’

‘मीम’कार डॉकिन्स

समाजमाध्यमांमुळे ‘मीम’चित्रं आपल्याला माहीत असतात. पण धर्म, देव यांविषयीच्या चर्चाविश्वातली ‘मीम’ कल्पना हीदेखील डॉकिन्सची एक मनाला भुरळ घालणारी कल्पना. मीम हा मायमीमा या ग्रीक शब्दाचा बटुअवतार. मायमीमा म्हणजे नकला करणे. यच्चयावत् कल्पना, विनोद, कथा, अफवा यांना ‘मीम’ असा शब्द डॉकिन्स योजतो. डार्विनची तत्त्वं मीमनाही लागू पडतात. जीन्स हे जसे स्वत:च्या कॉप्या काढून अमर राहतात, तसंच हे मीम्स.

धर्मकल्पनांना आणि संस्कृतीलाही हे मीम्सचे गुणधर्म लागू होतात. संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जाते ती अशा अनेकानेक घटकांच्या कॉप्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत्या केल्या जातात म्हणून. कुळधर्म, कुळाचार, कर्मकांडं हे पुढच्या पिढीकडून घोटून घेतलं जातं. त्यामुळे या सर्व कल्पनांना जीन्सप्रमाणेच ‘नकलाकार कल्पना’ म्हणता येईल. जीन्सप्रमाणेच यांच्याही नकला अगदी मुळाबरहुकूम असत नाहीत. यातून नवनवे मीम्स उत्पन्न होतात. आपल्याकडेही  वाढदिवस साजरा करण्याच्या, लग्नातल्या सोहळ्याच्या कल्पना दशकभरापूर्वीही किती वेगळ्या होत्या हे काय वेगळं सांगायला पाहिजे? हे सारं जैविक उत्क्रांतीशी नातं सांगणारं आहे असं डॉकिन्सचं म्हणणं.

पण डॉकिन्सची खरी प्रसिद्धी आहे ती निरीश्वरवादाचा कट्टर पुरस्कर्ता म्हणून. अगदी ‘तुम्ही अतिरेकी निरीश्वरवादी आहात,’ असा आरोप होऊनही आपल्या विरोधाची धार डॉकिन्सनं जराही कमी केलेली नाही. २००२ साली डॉकिन्सच्या टेड टॉक्समधील भाषणाचं नावंच मुळी ‘मिलिटन्ट एथिइझम’ (अतिरेकी निरीश्वरवाद) असं होतं. ‘जगभरातल्या निरीश्वरवाद्यांनो, गुळमुळीत भूमिका सोडा, सडेतोडपणे आपली मतं मांडा, धर्माला वेळोवेळी खुलेआमपणे आव्हान द्या, अटकाव करा, बदनाम करा, राजकारणात आणि विज्ञानात होणारी धर्माची ढवळाढवळ थांबवा.’ असं आवाहन त्या भाषणात केलं होतं.

विचारव्यूहाचे विरोधक

स्टीफन जे गोल्ड यांनी असं ठासून मांडलं की धर्मशास्त्राला त्याची त्याची अशी एक जागा आहे. ती त्याला राखू द्यावी. गोल्ड यांच्या मते, ‘विज्ञान जगाचं यथार्थ ज्ञान सादर करू शकेल, पण नीतिशास्त्र हे तर धर्माचं क्षेत्र!’ डॉकिन्स हे म्हणणं हिरिरीनं खोडून काढतो. धर्म हा काही फक्त आपल्या क्षेत्रापुरता मर्यादित राहात नाही, समाजाची नीती, देवाची भीती, निसर्गाची रीती, अशा प्रत्येक क्षेत्रात धर्माची चलती असते. धर्म सर्वज्ञपणाचा आव आणून ज्यात त्यात नाक खुपसत असतो. चमत्काराचे, देवाच्या अस्तित्वाचे दावे हे अन्य कोणत्याही शास्त्रीय दाव्याइतकेच तपासाला, चाचणीला, चिकित्सेला उपलब्ध असायला हवेत, असं डॉकिन्सचं म्हणणं.

देवावरच्या विश्वासाचाही डॉकिन्स शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करतो. या विश्वासाच्याही परी आहेत. इथे संपूर्ण स्वीकार ते संपूर्ण नकार अशा सात पायऱ्या आहेत.

(१) देव आहेच. नुसता विश्वास नाही तशी खात्रीच आहे.

(२) असेल हीच शक्यता जास्त. पण आहेच असं मानून मी चालतो.

(३) निम्मी-निम्मी शक्यता. पण असेलकडे कल.

(४) बरोब्बर निम्मीच शक्यता. ना घर का ना घाट का.

(५) थोडेसे देववादी पण बरेचसे निरीश्वरवादी.

(६) देव नसावाच असं वाटतं, आणि तो नाहीच अशा भावनेने वागतो.

(७) देव नाहीच ही खात्री.

डॉकिन्स म्हणतो :  बरेच जण ‘क्रमांक एक’ निवडतात ते नाइलाजानं. कारण देवाबद्दलची थोडीही शंका ही धर्मानं ‘कुशंका’ ठरवली आहे. असलं काही मान्य केलं तर ते धर्माच्या मुळावरच उठेल. ‘लढाईआधीच संपूर्ण शरणागती’ ही धर्माची पूर्वअट आहे.

‘या सात पायऱ्यांपैकी तुम्ही कितव्या पायरीवर आहात?’ असं विचारल्यावर डॉकिन्स सांगतो,

‘६.९ वर’

‘कारण?’

‘कारण, असण्याचा पुरावा नसणं म्हणजे नसण्याचा पुरावा असणं असं होत नाही! (अ‍ॅब्सेन्स ऑफ प्रूफ इज नॉट प्रूफ ऑफ अ‍ॅब्सेन्स)’ इति डॉकिन्स.

डॉकिन्सचा धर्माला विरोध हा मुख्यत्वे दोन कारणांनी आहे. धर्म हे हिंसेचं मुख्य कारण आहे आणि धर्म हा मानवी मनाला कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला शिकवतो. हे जगातलं सगळ्यात मोठं वैचारिक न्यून आहे. यातून फोफावणारी अंधश्रद्धा ही जगातली सर्वात निकृष्ट अशी दुष्ट शक्ती आहे, असं तो सांगतो.

डॉकिन्स म्हणतो, निरीश्वरवादी विचार बाळगणं हे सुदृढ, स्वतंत्र आणि विचारी मनाचं दिव्य लक्षण आहे. आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक असे विचार बाळगून असतात. आपली मतं जाहीर करणं मात्र कित्येकांना गैरसोईचं वाटतं. उघडपणे निरीश्वरवादी भूमिका घेण्याआधी बरीच वैचारिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, भावनिक लढाई लढावी लागते. आपापल्या बळावर यात काही थोडेच पार पडतात. बरेचसे गुळमुळीत भूमिका घेतात. अशा काठावरच्या लोकांना मदतीची, आधाराची गरज असते. आपल्या वेबसाइट, ब्लॉग वगैरेद्वारे डॉकिन्स असा आधार देऊ करतो.

विज्ञानवादी, म्हणूनच बदलास तयार!

इतक्या क्रांतिकारी कल्पना मांडणाऱ्या डॉकिन्सला शत्रू काही कमी नाहीत. ‘धर्माचा सोयीस्कर अर्थ लावून तो कसा अर्थहीन आहे हे डॉकिन्सनं दाखवून दिलं आहे. यात काय शौर्य? धर्माच्या गाभ्याला त्यानं हातच घातलेला नाही’, असं अ‍ॅलिस्टर मॅकग्रॅथचं मत. भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्स हा तर डॉकिन्सला धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या पंगतीलाच बसवतो.. ‘त्यांच्याइतकीच याचीही मतं टोकाची आहेत’-  असं म्हणतो. कुणी त्याला ‘धर्मविरोधी मिशनरी’ म्हटलंय, तर कुणी ‘अतिरेकी विज्ञानवादी’.

पण असली टीका डॉकिन्स मनाला लावून घेत नाही. तो म्हणतो, ‘विश्वाचं यथातथ्य ज्ञान मिळवण्यात धर्माची कामगिरी यथातथा म्हणावी इतपतही नाही आणि ‘अतिरेकी विज्ञानवादी’ हा वदतोव्याघात आहे. कोणताही अतिरेकी आपली घट्ट मतं बदलायला तयार नसतो. पुरेसा पुरावा असेल तर मी माझी मतं बदलायला केव्हाही तयार आहे.’ विज्ञान आणि विज्ञानवाद्यांनी आजवर अनेकदा आपली मतं बदलली आहेत. याउलट ‘अंतिम सत्या’ची वल्गना करत साचलेला राहतो, तो धर्म. धर्मकल्पनेतले बदल हे काळाबरोबर फरफटत जात जात होतात. विज्ञान काळाचं बोट धरून चालतं.

असा हा डॉकिन्स. इथे आहे थोडक्यात परिचय. तोही माझ्या दृष्टीतून. त्याचं लिखाण वगैरे अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. शिकण्यासारखं खूप आहे त्यात.

(लेखकाने रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या पुस्तकाचा मराठी भावानुवाद केला असून तो ‘जादूई वास्तव’ या नावाने, पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. हा लेखदेखील, त्या पुस्तकातील परिचय लेखावर आधारित आहे)

shantanusabhyankar@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:04 am

Web Title: article modern originator of atheismrichard dawkins abn 97
Next Stories
1 बुकबातमी : एकाधिकारशाही.. ‘इथे आणि आत्ता’! 
2 चंद्राच्या स्त्रिया!
3 महाराष्ट्रातील जैववैविध्याचा तपशीलवार माध्यमबोध
Just Now!
X