24 September 2020

News Flash

वास्तवाचा रहस्यरंजक तुकडा..

सध्या जगभर सगळीकडेच कायदेशीर आणि बेकायदा  निर्वासितांचा प्रश्न आणि त्यातून निर्वासित विरुद्ध स्थानिक हा संघर्ष प्रखर आहे.

‘अ‍ॅम्नेस्टी’ लेखक : अरविंद अडिगा प्रकाशक : पिकॅडोर इंडिया पृष्ठे : २५६, किंमत : ६९९ रुपये

डॉ. आशुतोष दिवाण

सध्या जगभर सगळीकडेच कायदेशीर आणि बेकायदा  निर्वासितांचा प्रश्न आणि त्यातून निर्वासित विरुद्ध स्थानिक हा संघर्ष प्रखर आहे. या वास्तवाचे दर्शन रहस्यरंजक शैलीतून ही कादंबरी घडवते..

अरविंद अडिगा हे भारतात चेन्नई येथे जन्मलेले आणि सिडनी, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिका व इंग्लंड येथे शिकलेले आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले कादंबरीकार आहेत. काही काळ महत्त्वाच्या माध्यमसंस्थांत पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या पहिल्या कादंबरीला (‘द व्हाइट टायगर’) मॅन बुकर पारितोषिक मिळाले. आतापर्यंत त्यांनी पाच कादंबऱ्या व चार कथासंग्रह लिहिले आहेत. चार वर्षांच्या लेखनखंडानंतर अडिगा यांची पाचवी कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली. ‘अ‍ॅम्नेस्टी’ हे तिचे शीर्षक!

कादंबरीचा नायक धनंजय (डॅनी) हा श्रीलंकेतील बट्टीकलोआ या गावचा तमिळबहुल भागातला एक तरुण मुलगा आहे. त्या वेळी तिथे श्रीलंकेतील तमिळांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारी ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम’ अर्थात एलटीटीई ही बंडखोर संघटना व श्रीलंकन सेना यांच्यात युद्धसदृश स्थिती असते. त्यामुळे तिथल्या बऱ्याच लोकांचा श्रीलंका सोडून सुरक्षित देशात राजनैतिक आसरा (असायलम) मिळवण्याचा प्रयत्न असतो. ते अर्थातच खूप अवघड असते. या प्रयत्नात कादंबरीचा नायक डॅनी, विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियात येतो आणि तेथे बेकायदेशीर निर्वासित म्हणून चार वर्षे राहण्यात यशस्वी होतो. दुर्दैवाने त्याला एका खुनाबद्दल काही माहिती होते आणि मग २४ तासांत त्याच्या आयुष्यात कशी उलथापालथ होते, हा या कादंबरीचा कथाविषय आहे. अडिगा यांची इंग्रजी भाषा भारतीय पठडीतली, सोपी असल्याने कादंबरी लवकर वाचून होते.

परदेशात आजही रंगद्वेष, आपल्याला कल्पना करता येणार नाही इतक्या प्रमाणात जिवंत आहे. असे असताना सिडनी येथील गौरेतर लोकांचे जीवन कसे त्रासदायक असते, याचे ही कादंबरी जिवंत चित्रण करते. त्यात जर तुम्ही बेकायदा (वैध व्हिसा नसताना) त्या देशात लपूनछपून राहात असाल, तर मग तुम्हाला सतत आपले ‘अ‍ॅनिमल इन्स्टिंक्ट’ जागृत ठेवून कायम भयाच्या छायेत पशूवत जीवन जगावे लागते. या अशा लोकांचा मग तेथील सर्व गोरे व आशियाई (पण कायदेशीर नागरिक असलेले लोक) कसा क्रूरपणे गैरफायदा घेतात; कारण कोठे दाद ना फिर्याद, याचे अंगावर येणारे वास्तवदर्शन या कादंबरीत होते. या अशा प्रगत, श्रीमंत देशातील प्रत्यक्ष नागरिकांचे, गोऱ्या लोकांचे जीवनदेखील किती यांत्रिक, उथळ व वासनांच्या इंधनावर सतत पुढे रेटणारे असते, याचेही चित्र कादंबरी आपल्याला दाखवते.

उत्कंठा सतत ताणून धरल्यामुळे ही कादंबरी शेवटपर्यंत वाचनीय ठरते. मध्येमध्ये काही पुनरावृत्ती होऊन रटाळ संथपणा येतो खरा; पण रहस्यभेदाच्या आशेने वाचक वाचत राहतो. मात्र काही पातळ्यांवर ही कादंबरी बरीच निराशा करते, याची चर्चा करणे गरजेचे आहे.

भारतीय लेखक इंग्रजीत कादंबऱ्या लिहितात, तेव्हा त्यांच्यावर अगदी सुरुवातीपासूनच एक आरोप केला जातो की, हे लेखक भारतातील गोष्टी परदेशी वाचकांना (एक्झॉटिक) गूढ-अद्भुत-रम्य अशा प्रकाशात दाखवतात, जे वास्तवाला धरून नसते. हे केवळ वाचनीयता वाढवण्यासाठी केलेले असते. अडिगा यांच्या ‘अ‍ॅम्नेस्टी’मध्येही असे काही ठिकाणी झाले आहे. सुरुवातीपासूनच गुरुपौर्णिमेचा सतत उल्लेख येतो व शेवटी ज्या प्रकारे ही गुरुपौर्णिमा कथानकाला जोडली जाते, ते आपल्याला गुरुपौर्णिमेचे सगळे संदर्भ आतून माहीत असल्याने, उगीचच ओढूनताणून शोकेसमध्ये ठेवल्यासारखे वाटते. असे काही आपल्या भाषेतील लिखाणात करता येत नाही.

जेम्स हॅडले चेसपासून ते सिडने शेल्डन ते अगाथा ख्रिस्ती ते ओरहान पामुक ते दस्तयेवस्कीपर्यंत अनेक लेखकांनी ‘मर्डर मिस्ट्रीज्’ लिहिल्या आहेत. मग कादंबरीच्या महत्तेत फरक कसा पडतो? दोन गोष्टींत फरक पडतो असे वाटते.

एक म्हणजे, दस्तयेवस्की वा पामुक हे थोर लेखक खून किंवा मृत्यू या घटना कादंबरीत विणताना बुद्धिमान, विचारी अशा ‘माणूस’ नावाच्या प्राण्याला जे गहन व सहजी न सोडवता येणारे अस्तित्वाच्या संदर्भातले तात्त्विक/नैतिक प्रश्नांचे वेगवेगळ्या कोनांतून सोलून काढलेले तीक्ष्ण काप वाचकासमोर ठेवतात. तसे काही या कादंबरीत होत नाही. चटपटीत सवालजवाबांची एक रंजक कादंबरी म्हणून ती उरते.

दुसरे म्हणजे, माहिती देणे हे काही कलांचे काम नाही. त्यासाठी इंटरनेट आहे. कलांमधून प्रत्यक्ष जीवनातल्या गहन अनुभवांची जिवंत अनुभूती वाचकाला मिळायला हवी. पामुकच्या ‘स्नो’ या कादंबरीत एक अतिरेकी त्या शाळेच्या प्राचार्याला मारून टाकण्यासाठी त्याला हॉटेलमध्ये गाठतो. या प्रसंगाचा जिवंत, अंगावर काटा आणणारा विचारप्रवण अनुभव पामुक वाचकाला देतो. प्रत्येक महान कादंबरीत हे होत असते. मराठीतले उदाहरण द्यायचे, तर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’तील मनीचा मृत्यू किंवा विष्णुभट गोडसे वरसईकर यांच्या ‘माझा प्रवास’मधील झाशीच्या लढाईचा दाखला देता येईल. ‘अ‍ॅम्नेस्टी’मध्ये तशी एकही अनुभूती वाचकाला मिळत नाही. अगदी एकदा श्रीलंकेच्या विमानतळावरील अधिकारी डॅनीला एलटीटीईचा समर्थक म्हणून पकडतात व त्याला छळाला सामोरे जावे लागते; या अनुभवाचेदेखील फारसे काहीही वर्णन न करता लेखक वाचकाला काही तरी रोचक तपशील, असंबद्ध रंजक गोष्ट, भावना यांच्या जाळ्यात गुंगवून शिताफीने पुढे सरकतो. असे अनुभव कलेत जिवंतपणे येण्यासाठी कलावंताने ती धग जवळून अनुभवलेली असणे जरुरीचे असावे असे वाटते. संदीप जगदाळे हे मराठीतील नवोदित कवी धरणग्रस्तांची व्यथा मांडणाऱ्या जिवंत कविता लिहितात, कारण त्यांची जमीन धरणात गेली आहे. मी धरणग्रस्तांवरचा माहितीपट पाहून तशी कविता लिहू शकणार नाही. अरुंधती रॉय यांनीदेखील ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’मध्ये ही क्लृप्ती मुबलक प्रमाणात वापरली आहे.

कलेमध्ये उत्स्फूर्त प्रगटीकरणाचा व प्रयत्नपूर्वक जाणूनबुजून रचण्याचा, बेतण्याचा भाग किती असावा, हा साहित्यविषयक सतत चर्चिला जाणारा मुद्दा आहे. अडिगा यांनी अगदी आजचा ज्वलंत, योग्य विषय निवडला आहे. पण बाकी सर्व (अगदी सर्व) गोष्टी जरुरीनुसार उभ्या केल्या आहेत. प्रत्येक पात्राचे, बारीकसारीक गोष्टींचे मागेपुढे सतत प्रयोजन दिसत असते. ते मग अगदीच कृत्रिम वाटत राहते. साँजा नावाची कादंबरीचा नायक डॅनीची प्रेयसी असते. ती ऑस्ट्रेलियाची अधिकृत नागरिक असते व एका रुग्णालयामध्ये परिचारिका असते. बराच काळ सहवास, शरीरसंबंध, तिच्या आईला डॅनी भेटायला जातो वगैरे सगळे असताना हा तिला आपली काहीच माहिती सांगत नाही, तीदेखील विचारत नाही. लागेल तेथे गरज म्हणून एक टेकू एवढेच या पात्राचे या कादंबरीत स्थान आहे असे सतत वाटत राहते. प्रचंड संशोधन करून, प्रश्न समजून घेऊन, कौशल्याने कथावस्तू रचून, पाच वगैरे वर्षे त्यावर काम करून रंजक कादंबरी लिहिण्याची मराठीत प्रथा नाही. इंग्रजीत आर्थर हेली, फ्रेडरिक फोर्सीथ वगैरे अनेक लोक अशा चांगल्या कादंबऱ्या लिहितात. अशा कादंबऱ्या तडाखेबंद खपतात. पण मराठीत तसे होत नाही; आणि ती मराठीतली कमतरता आहे असेही अनेकांना वाटते. असो. पण या तंत्राच्या कसोटीवरही ‘अ‍ॅम्नेस्टी’ फारशी टिकत नाही.

कादंबरी ऑस्ट्रेलियात घडते, पण यात एकही ऑस्ट्रेलियन पात्र नाही. मुख्य पात्रे राधा,प्रकाश, डॅनी हे जवळजवळ आठ महिने अनेक गोष्टी एकत्र करतात. पण यांच्यातील संबंधांमध्ये या आठ महिन्यांत काडीमात्र फरक पडत नाही. राधा व प्रकाश प्रेमिक असतात, ते डॅनीला नुसत्या मनोरंजनासाठी बाळगतात. डॅनी हासुद्धा एक तरुण पुरुष आहे; वास्तव जीवनात जिवंत हाडामांसाच्या व्यक्ती या काही प्लास्टिकच्या रोबो नसतात. पण संपूर्ण कादंबरीत कोणत्याच पात्राची कधीच, कोठेच मानसिक वाढ/बदल होताना दिसत नाही. अशा प्रकारच्या बहुतांश कादंबऱ्यांत नायकाला काही तरी किरकोळ व्याधी असते. या कादंबरीतही नायक डॅनीला सायनसचा त्रास असतो. गरजेनुसार तो मधूनमधून उद्भवत राहतो. का? असाच! शेवटची रहस्याची सगळी उकलदेखील अशीच कोणतेही कारण न देता एका पानात होते. खून का होतो? कसा होतो? तर असाच! सगळ्यामागील कार्यकारणभाव फार अशक्त वाटतो.

आपल्याकडे कथा, कादंबरी, कविता लेखन हे मुख्यत्वे लेखकाला काही तरी प्रकर्षांने जीवनाबद्दल सांगायचे आहे या ऊर्मीतून केले जाते. यातून काही मान मिळावा, नाव व्हावे, पारितोषिक मिळावे असे हेतू असतात फार तर. अगदी किरकोळ प्रमाणात पैसे मिळाले तर मिळतात काही जणांना; पण पैसे मिळवणे हा काही मुख्य हेतू नसतो. याउलट इंग्रजी लेखकांना खूप जास्त प्रमाणात पैसे मिळतात असे दिसते. सातशे रुपये किंमत असलेल्या या कादंबरीच्या दोन लाख प्रती फक्त भारतात खपल्या, अशी माहिती इंटरनेटवर मिळाली. बक्षिसांची रक्कमही भरघोस असते. इंग्रजी वाचकवर्गाकडे सहज खर्च करता येऊ शकतील इतके पैसे आहेत; अगदी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मनोरंजनक्षमता गृहीत धरूनही. तसे आज मराठीच्या वाचन पर्यावरणात नाही. असे व्यापारीकरण झालेले नसल्याने सुदैवाने आपल्याकडे ‘क्रिएटिव्ह रायटिंग’चे ‘कोर्सेस्’ करून लिहिणारे लोक फार नाहीत, ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे की काय असे वाटते. साहित्य ही जीवन जगताना होणाऱ्या, सतावणाऱ्या दुर्घट प्रश्नांची, त्रासाची प्रतिक्रिया असणे जास्त योग्य आहे. ती काही सार्वजनिक उपभोगासाठी चाणाक्षपणे उत्पादित करण्याची वस्तू असणे बरे नव्हे. असो.

जगात आज सगळीकडेच कायदेशीर आणि बेकायदेशीर निर्वासितांचा प्रश्न आ वासून उभा आहे. देशोदेशींच्या अर्थव्यवस्था हे ताण सोसू शकत नसल्याने मूळ नागरिकांच्या या अशा लोकांबद्दलच्या भावना तीव्र झाल्या आहेत आणि याबद्दल देशोदेशी संघर्षही सुरू आहेत. सीरिया किंवा इतर स्फोटक ठिकाणची गोष्ट वेगळी; पण आपल्यासारख्या विकसनशील देशांतले जवळजवळ सर्व वर्गातले तरुण विकसित राष्ट्रांत स्थिरस्थावर होण्याच्या स्वप्नामागे धावत असतात. काही काळापूर्वी हे जितके सोपे होते, तितके ते आता राहिलेले नाही. तसेच ते स्वप्न आता तितके स्वप्नवतही राहिलेले नाही. केवळ आहे तेथे टिकण्यासाठी ऊर फुटेपर्यंत धावणे हे तिकडे स्थलांतरित झालेल्या लोकांना आता दिवसेंदिवस अवघड होऊ लागले आहे, हे वास्तव आपल्याला इकडे लक्षात येत नाही. याला वर्णद्वेषाचाही एक कोन आहे. करोना महामारीमुळे आलेल्या प्रगाढ मंदीमुळे या सगळ्या गोष्टी आता जास्तच कडवट आणि असहिष्णू झाल्या आहेत. अनेक त्रुटी असल्या, तरी या वास्तवाचे चित्रण करण्यात ही कादंबरी यशस्वी होते.

ashutoshcdiwan@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:08 am

Web Title: article on amnesty by aravind adiga review abn 97
Next Stories
1 श्रद्धेच्या पडद्याआड दडलेल्या ‘सीता’..
2 बुकबातमी : दडपशाहीचे वार पुस्तकांवर..
3 बुकबातमी : थकलेल्या कर्जाची कहाणी..
Just Now!
X