शशिकांत सावंत

‘द कॅचर इन द राय’ या कादंबरीमुळे प्रचंड वाचकप्रिय ठरलेला अमेरिकी लेखक जे. डी. सालिंजरने जवळपास पाच दशके जणू एकांतवास पत्करला. मात्र, या काळात तो लिहिताच राहिला. ते अप्रकाशित लेखन आता प्रसिद्धीच्या मार्गावर आहे..

‘द कॅचर इन द राय’ या कादंबरीमुळे आपल्याला अधिक परिचित असणारा अमेरिकी लेखक जे. डी. सालिंजर अज्ञातवासात गेल्यानंतर, म्हणजे त्याच्या चार पुस्तकांच्या प्रकाशनानंतरही निरंतर लिहीत राहिला. पण त्यातले त्याने काही प्रसिद्धीला दिले नाही. अपवाद एकच, १९६६ साली प्रसिद्ध झालेली त्याची ‘हेपवर्थ’ ही दीर्घकथा. ती वाचून अनेकांनी नाके मुरडली. सालिंजर संपला आहे किंवा त्याच्यातली धुगधुगी कमी झाली, अशा जगभरच्या लेखकांच्या आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया होत्या.

त्यानंतर मरेपर्यंत, म्हणजे जवळपास ५० वर्षे सालिंजरने काहीही लेखन प्रसिद्धीसाठी दिले नाही; पण एखादी नोकरी करावी त्या पद्धतीने आपल्या मठीत जाऊन नियमितपणे तो लिहीत असे. या लेखनात काय काय होते, हे त्याच्या मुला-मुलीशिवाय कोणालाही माहीत नाही. पण आता मात्र त्याच्या मुलाने मुलाखत देऊन सांगितले आहे की, सालिंजरचे अप्रकाशित साहित्य लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आपल्याकडे भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू’ची जवळपास चार दशकेवाचकांनी वाट पाहिली, तशीच सालिंजरच्या साहित्याचीही जगभरचे लेखक आणि चाहते वाट पाहत आहेत. लवकरच त्याचे साहित्य वाचकभेटीला येईल, तोवर तरी त्याची प्रकाशित पुस्तके वाचणे आणि त्याच्या वैचित्र्यपूर्णपणाची चर्चा करणे एवढेच आपल्या हाती आहे.

सालिंजरचा जन्म १९१९ सालचा. साधारणपणे वयाच्या विशीनंतर त्याने सैन्यात भरती व्हायचा प्रयत्न केला. तिथे त्याला नाकारण्यात आले. पुन्हा १९४२ साली प्रयत्न केल्यावर त्याला सैन्यात घेण्यात आले. तिथे तो थेट युद्धावर नव्हता, तर आसपासच्या परिसरात जिथे जिथे सैन्य शिरेल तिथे स्थानिक लोकांशी बोलणे, माहिती घेणे या प्रकारचे काम त्याच्यावर सोपविले होते. १९४५ साली दुसर महायुद्ध संपले तेव्हा तो जर्मनीत होता. आपण हरतो आहोत याची खात्री झाल्यावर जर्मनांनी अनेक ज्यूंना एकत्र कोंडून स्फोटाने उडवून दिले होते. सालिंजरने अशा प्रेतांचा खच तेव्हा पाहिला. त्याबद्दल त्याने लिहिलेले आहे की, ‘जळलेल्या प्रेताचा वास नाकातून कधीच जात नाही.’ त्याला हे सगळे पाहून प्रचंड धक्का बसला. तो अमेरिकेतर्फे युद्धात होता. फ्रान्समध्ये जेव्हा अमेरिकी सैन्य शिरले आणि फ्रान्स नाझींकडून ताब्यात घेतला, तेव्हा रस्तोरस्ती फ्रेंच स्त्री-पुरुष येऊन गुच्छ देत सैनिकांचे स्वागत करत. असेच एका छायाचित्रात सालिंजर फ्रेंच तरुणीकडून गुच्छ स्वीकारताना दिसतो.

मात्र, जर्मनीतील धक्क्यानंतर तो सावरला नाही आणि अनेक दिवस त्याने रुग्णालयात घालवले. याच काळात तो प्रेमात पडला होता, तेही चक्क जर्मन नाझी सैन्यात काम करणाऱ्या अधिकारी स्त्रिच्या. तिला घेऊन तो अमेरिकेत आला. खरे तर अमेरिकनांना जर्मन स्त्रीशी लग्न करण्याची परवानगी नव्हती. कदाचित त्याच्यावर कारवाई होऊ शकली असती, पण हे लग्न वर्षभरच टिकले. त्यातून त्याला मुलबाळ वगैरे झाले नाही आणि वर्षभरात त्याने तिच्याशी घटस्फोट घेतला. या काळात छोटय़ा-मोठय़ा नियतकालिकांतून त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले होते. प्रामुख्याने तो कथा लिहीत असे. त्याही तिशीच्या  उंबरठय़ावरील आणि युद्धातील अनुभवांवर. मात्र त्याला ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात आपली कथा छापून यावी असे वाटत होते. वारंवार ‘न्यू यॉर्कर’ने त्याच्या कथा साभार परत केल्या आणि अखेर एक दिवस त्याची कथा स्वीकारली. तेव्हा त्याला खूपच आनंद झाला. त्याच्या कथा नाकारत असल्यामुळे आधी तो चक्क ‘न्यू यॉर्कर’च्या संपादकालाही भेटला होता. विल्यम मॅक्सवेल हा त्या काळातला दिग्गज संपादक होता. सालिंजरने ‘न्यू यॉर्कर’मध्ये काही निवडक कथा लिहिल्या. ‘अ परफेक्ट डे फॉर बनानाफिश’ ही कथा पहिल्यांदा प्रसिद्ध झाली तेव्हा त्यातील ‘सेमॉर आत्महत्या करतो’ या शेवटच्या वाक्याने वाचकांना प्रचंड धक्का बसला होता. अशा त्याच्या काही कथा ‘न्यू यॉर्कर’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील एका कथेचा नायक होता होल्डन कॉलफिल्ड. पुढे कॉलफिल्डचे पात्र त्याच्या मनात आकार घेत गेले आणि त्याने ‘द कॅचर इन द राय’ लिहिली. ही कादंबरी त्याने ‘न्यू यॉर्कर’मधील मंडळींना दाखवली. त्यातील काही भाग त्यात प्रसिद्ध व्हावा अशी त्याची इच्छा होती. पण ‘न्यू यॉर्कर’च्या संपादकाने ते हस्तलिखित नाकारले. मग इतर काही प्रकाशकांना तो भेटला. एका प्रकाशकाने तर म्हटले की, हा जो कोणी होल्डन कॉलफिल्ड आहे त्याला मानसशास्त्रीय उपचारांची गरज आहे. प्रकाशकाच्या शेऱ्याने सालिंजर दुखावला. तो म्हणायचा की, कॉलफिल्ड हा तरुणपणाचा सालिंजरच होता. सालिंजरचे एक प्रकारचे आत्मचरित्रच होते ते. जेव्हा ‘द कॅचर इन द राय’ प्रसिद्ध झाली तेव्हा तिच्यावर स्तुतीचा वर्षांव झाला. टिकाकारांनी ती डोक्यावर घेतलीच, पण प्रचंड वाचकवर्गही तिला लाभला. प्रसिद्ध बीटल गायक जॉन लेनन याचा १९८० साली एका तरुणाने खून केला, गोळ्या घालून. तेव्हा त्याने तुरुंगात आपला जवाब म्हणून ‘द कॅचर इन द राय’ सादर केली आणि म्हटले, ‘‘मला जे म्हणायचे ते यात आहे.’’ याच प्रकारे आणखी एक खून झाला आणि ‘गॉडफादर’ सिनेमाच्या स्क्रीन टेस्टसाठी जाऊ पाहणाऱ्या एका तरुण अभिनेत्रीचाही खून झाला. त्याही वेळी ‘द कॅचर इन द राय’चाच हवाला दिला गेला. जवळपास तीन खून करणारी वेगवेगळी माणसे जर एका कादंबरीचा हवाला देत असतील तर ती कादंबरी काय असेल?

‘द कॅचर इन द राय’बद्दल बरेच लिहून आलेले आहे. ही एका कोवळ्या, वयात येणाऱ्या तरुणाची कहाणी आहे. या तरुणाला जगाबद्दल तुच्छता आहे. त्याला आयुष्यातील सगळे अनुभव घ्यायचे आहेत. सिगरेट ओढणे, मद्यपान, सेक्स याबद्दल त्याच्या मनात एक प्रकारचे नैराश्य आहे. त्यामुळे जीवनातील नातेसंबंध, मैत्री या सगळ्याबद्दल त्याला अकालीच कडवटपण आलेले आहे. सगळे जग त्याला लबाड वाटत असते. त्याला साहित्य खोटे वाटते.

तर.. असा हा होल्डन कॉलफिल्ड प्रचंड लोकप्रिय झाला आणि सालिंजरला अनेक लोक भेटायला येऊ लागले, त्याला पत्र लिहू लागले. आधुनिक काळाच्या अस्वस्थेचा, निराशेचा अंश त्यांना कॉलफिल्डच्या चरित्रात दिसू लागला. असाच एक वाचक जेव्हा सालिंजरला शेकडो किलोमीटरचा प्रवास करून भेटला. सालिंजरने त्याला म्हटले की, ‘‘हे बघ, तुझ्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे नाहीत. माझ्या कथानकात काही प्रश्न असतात हे बरोबर आहे, परंतु त्यांची उत्तरे माझ्याकडे असतातच असे नाही.’’ हे बोलून सालिंजर निघून गेला. थोडय़ा वेळाने तो परत आला, तेव्हा तो तरुण पत्र लिहीत होता. इतक्या दूरवरून येऊनही तुम्ही मला निराश केलेत, असे तो म्हणाला. तेव्हा कुठे सालिंजर त्याच्याशी नीट बोलला.

पण या प्रकारच्या वाचकांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याने दूर घर घेतले आणि तो एकांतवासात राहू लागला. तासन्तास तो लिहीत असे. त्याच्या मठीत कोणालाही प्रवेश नसायचा. अगदी त्याच्या मुलांनाही नाही. कधी कधी तो आपला मुलगा मॅट आणि मुलगी मार्गारेट यांना वाचून दाखवायचा. त्याने १९५५ साली लग्न केले आणि त्याला ही दोन मुले पाच वर्षांच्या अंतराने झाली. मॅट अभिनेता आहे; तर मार्गारेट आपले करिअर करू शकली नाही, पण २००० साली तिने आपल्या आईबद्दल, वडलांबद्दल आणि त्यांच्याबरोबर वाढण्याबद्दल अत्यंत कडवट पुस्तक लिहिले. त्याबद्दल तिचा भाऊ एवढेच म्हणाला की, ‘‘त्या काल्पनिक कथा आहेत.’’ सालिंजर त्या वेळी हयात होता. दुसऱ्या पत्नीशी सालिंजरनेच काडीमोड घेतला आणि मग एका तरुणीशी त्याने लग्न केले. हे त्याचे तिसरे लग्न. दरम्यानच्या काळात तो अनेक तरुणींच्या प्रेमात पडला. अशांपैकी एक असलेली जॉयस मेनार्ड पुढे चांगली कादंबरीकार झाली आणि तिने आत्मचरित्रपर लेखनात सालिंजरवर बरेच उघडपणे लिहिले आहे. सालिंजरच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा, त्याचा एकांतवास उलगडायचा प्रयत्न अनेकांनी केला. पण सर्वानाच त्यात यश आले नाही. आता त्याचे अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध झाल्यानंतर सालिंजर पुन्हा नव्याने उलगडतो का, हे पाहायचे.

shashibooks@gmail.com