25 October 2020

News Flash

कालजयी योगायोग..

‘द गॉडफादर’ प्रसिद्ध होण्यापूर्वीच मारिओ पुझोचा आयुष्यक्रम सर्वार्थाने दुर्लक्षणीय होता

(संग्रहित छायाचित्र)

भालचंद्र गुजर

अमेरिकी समाजजीवनात नीती-अनीतीमधील लक्ष्मणरेषा पुसट झालेला काळ ‘द गॉडफादर’सारख्या कादंबरीतून प्रत्ययकारकतेने रेखाटणारे विख्यात अमेरिकी लेखक मारिओ पुझो यांच्या जन्मशताब्दीची सांगता १५ ऑक्टोबरला झाली. त्यानिमित्ताने मारिओ पुझो यांच्या लेखनमग्नतेचा घेतलेला हा वेध..

कोणतीही साहित्यकृती आपल्याबरोबरच आपल्या कर्त्यांचेही बरे-वाईट नशीब घेऊन जन्माला येत असते. मारिओ पुझो या लेखकाची ‘द गॉडफादर’ ही कादंबरीही त्यास अपवाद नव्हती. १० मार्च १९६९ रोजी ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला अल्पावधीतच उदंड वाचकप्रियता लाभली. तसे पाहिले तर ती प्रसिद्ध होण्याआधीपासूनच गाजू लागली होती. पुझोने कादंबरी लिहून पूर्ण करण्यापूर्वीच तिची आरंभीची शंभर पाने वाचून एका प्रकाशन संस्थेने त्याला चार लाख १० हजार डॉलर मानधन दिले होते, तेही तिच्या पेपरबॅक आवृत्तीसाठी. त्याआधी कोणत्याही प्रकाशकाने कोणाही लेखकाला एवढी मोठी रक्कम आगाऊ मानधन म्हणून दिली नव्हती. कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या विक्रमी खप असलेल्या ग्रंथांच्या यादीत ती सलग ६७ आठवडे अग्रक्रमावर झळकत राहिली. प्रसिद्धीनंतर महिनाभरात या कादंबरीच्या २० लाख, तर दोन वर्षांत दोन कोटी ११ लाख प्रती खपल्या. कादंबरीची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ने पुझोला एक कोटी डॉलर देऊन तिच्या चित्रीकरणाचे हक्क मिळवले. या चित्रपटानेही तिकीटबारीवर चांगलाच गल्ला गोळा केला. चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिल्याबद्दल पुझोला बऱ्यापैकी रक्कम व ऑस्कर पारितोषिकही मिळाले. त्यामुळे त्याला साहित्यक्षेत्राबरोबरच हॉलीवूडमध्येही फार मोठी मान्यता मिळाली. वयाच्या पन्नाशीपर्यंत अक्षरश: कफल्लक राहिलेला मारिओ पुझो ‘द गॉडफादर’ या कादंबरीमुळे यश, संपत्ती आणि कीर्तीचा धनी झाला.

‘द गॉडफादर’ प्रसिद्ध होण्यापूर्वीच मारिओ पुझोचा आयुष्यक्रम सर्वार्थाने दुर्लक्षणीय होता. रेल्वे रुळावर काम करणाऱ्या एका मजुराचा तो मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव अँटोनिओ पुझो, तर आईचे मारिया. मूळचे इटालियन असलेले हे कुटुंब पोट भरण्यासाठी अमेरिकेत आले आणि न्यू यॉर्कच्या हेल्सस किचन या बकाल वस्तीत स्थिरावले. तेथेच १५ ऑक्टोबर १९२० रोजी मारिओ पुझोचा जन्म झाला. आपल्या मुलाने रेल्वेत कारकून व्हावे एवढीच काय ती त्याच्या आईची माफक अपेक्षा होती, पण तेही शक्य झाले नाही. वडिलांनी आईला सोडून दिल्यावर तर मुळातच दरिद्री असलेले हे कुटुंब सात मुलांसह चक्क रस्त्यावरच आले. मारिओ पुझोच्या कादंबऱ्यांत रस्त्यांवरील जे भणंग आयुष्य, इटालियन-अमेरिकन माफियांचा रक्तपाती हिंसाचार दिसतो, तो त्याने बालवयातच अनुभवला होता. त्याची आई अत्यंत करारी स्वभावाची. गरिबीचे बोट धरून येणारी गुन्हेगारी आपल्या मुलांपासून दूर राहील याची पुरेपूर काळजी तिने घेतली. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत न्यू यॉर्कच्या सिटी कॉलेजमधून पदवीधर झाल्यावर मारिओ पुझो लष्करात दाखल झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो पूर्व आशिया आणि जर्मनीत कार्यरत होता. याच सुमारास त्याने एरिका या जर्मन तरुणीशी विवाह केला. लष्करातून मुक्त झाल्यावर पुझोने काही काळ सरकारी नोकरी केली. त्या काळात त्याला आठवडय़ाला जेमतेम ७५ डॉलर पगार मिळायचा. त्यात त्याच्या कुटुंबाचे भागणे तसे कठीणच होते. नंतर सरकारी नोकरी सोडल्यावर पुझोने उपजीविकेसाठी अर्थप्राप्तीचे अनेक पर्याय शोधले, पण त्यात तो फारसा यशस्वी झाला नाही.

पुझोला लेखनाची अतिशय आवड होती. त्याच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. लेखनक्षेत्रातील दीर्घकालीन उमेदवारीनंतर १९५५ मध्ये त्याची ‘द डार्क एरिना’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोप आणि जर्मनीत पाहिलेल्या अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांच्या उद्ध्वस्त आणि वैफल्यग्रस्त जीवनाची कहाणी पुझोने त्यात सांगितली होती. त्याची ‘द फॉच्र्युनेट पिलग्रीम’ ही कादंबरी त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी प्रसिद्ध झाली. या दोन्ही कादंबऱ्या जेमतेम खपल्याने त्याला अपेक्षित अर्थप्राप्ती झाली नाही. दरम्यानच्या काळात, त्याच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. एव्हाना पुझोच्या वयाची पंचेचाळिशी उलटली होती, पण त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते. लेखनातून नाही तर निदान जुगार खेळून तरी पैसे मिळतात का, हेही त्याने पडताळून पाहिले; पण या उपद्व्यापातून तो कर्जबाजारी झाला. या वेळी पुझोला २० हजार डॉलरचे कर्ज झाले होते आणि पैसे मिळवण्यासाठी काय करायचे हे त्याला सुचत नव्हते. त्याच्या ‘फॉर्च्युनेट पिलग्रीम’मध्ये एका गँगस्टरची व्यक्तिरेखा होती. त्या गँगस्टरला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून एक नवी कादंबरी लिहिण्यास त्याला एका प्रकाशकाने सुचवले. त्यानुसार पुझोने ‘माफिया’ ही स्वतंत्र कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. ती पूर्ण झाल्यावर ‘द गॉडफादर’ या नावाने प्रसिद्ध झाली!

अमेरिकेत सामाजिक मूल्ये जेव्हा उद्ध्वस्त होऊ लागली होती, तेथील कुटुंबव्यवस्था विस्कळीत होत होती, नीती-अनीतीमधील लक्ष्मणरेषा पुसट झाली होती आणि हिंसा हा केवळ गुन्हेगारी विश्वाचाच नव्हे तर दैनंदिन व्यवहाराचाही अटळ व अपरिहार्य आविष्कार झाला होता, त्या काळाचे विलक्षण प्रत्ययकारी चित्रण मारिओ पुझोने ‘द गॉडफादर’मध्ये केलेले आहे. डॉन व्हिटो कॉर्लिऑन ही या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. सिसिलीत असताना प्रामाणिकपणे जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने नाइलाजाने व्हिटो गुन्हेगारीकडे वळतो आणि नंतर न्यू यॉर्कला आल्यावर अनेक व्यवसाय करून तो अतिशय श्रीमंत होतो. त्याच्या या सर्वच व्यवसायांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी असते. पोलीस या डॉनला पकडू शकत नाहीत, कारण या बेकायदेशीर कृत्यांत तो सहभागी असल्याचा कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसतो. त्याचे कौटुंबिक जीवन आणि त्यातील ताणतणाव तसेच प्रतिस्पर्धी गुन्हेगारी टोळ्यांशी होणारा संघर्ष पुझोने तपशीलवार नोंदविला आहे. डॉन व्हिटो कॉर्लिऑनची व्यक्तिरेखा या कादंबरीत अतिशय ताकदीने उभी केली आहे. त्याचे किंवा अन्य व्यक्तिरेखांचे चित्रण पुझोने केवळ काळ्या-पांढऱ्या रंगात न करता ‘ग्रे शेड’मध्ये केले आहे. अत्यंत धोरणी आणि कावेबाज असलेला हा डॉन आपल्या कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य देणारा आहे. मैत्रीला जागणारा, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारा आणि कधीही न संतापणारा डॉन कादंबरीतील जवळपास प्रत्येक घटनेत प्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे सहभागी आहे. कथानकाच्या मध्यावर तो नैसर्गिकरीत्या मरण पावतो; पण त्याचा प्रभाव शेवटपर्यंत जाणवत राहतो. अत्यंत गतिमान निवेदनशैली, बंदिस्त कथानक आणि त्याच्याशी एकरूप झालेली अनेक उपकथानके ही या कादंबरीची वैशिष्टय़े. दुसऱ्या महायुद्धानंतर संधीच्या शोधात अमेरिकेत आलेल्या असंख्य निर्वासितांना व्हिटोच्या संघर्षांत स्वत:चा संघर्ष अनुभवता आला म्हणून ही कादंबरी अमेरिकेत यशस्वी ठरली आणि नंतर तिची वाचकप्रियता जगभर विस्तारली. ‘द गॉडफादर’मधली हिंसक वृत्ती, संघर्ष, मत्सर, सत्ताकांक्षा सर्वाच्याच ठायी असते; ती उघडपणे व्यक्त केली जात नाही. या कादंबरीचे वेगळेपण यातच आहे की, हे सर्व अतिशय उघडपणे कथानकातून व्यक्त होते. लौकिक अर्थाने अभिजात साहित्यकृतींमध्ये ‘द गॉडफादर’चा समावेश होत नसेल; पण सर्वसामान्य वाचकांनी तिचे जे कौतुक केले आहे, ते क्वचितच एखाद्या कादंबरीच्या वाटय़ाला आलेले आहे.

मानवी मन आणि गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणाऱ्या पुझोच्या असाधारण क्षमतेमुळे ‘द गॉडफादर’चे कथानक वास्तवदर्शी वाटते. त्यामुळेच की काय, पुझो गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असावा अशी शंका वारंवार व्यक्त केली गेली. पण ही कादंबरी लिहिण्यापूर्वी तो कोणत्याही डॉनला भेटला नव्हता, तर बालपणी पाहिलेले ‘हेल्स किचन’मधील गुन्हेगारी विश्व आणि पोलीस खात्यातील कागदपत्रे अभ्यासून त्याने तिचे लेखन केले होते. ‘द गॉडफादर अ‍ॅण्ड अदर कन्फेशन्स’मध्ये (१९९२) मारिओ पुझोने म्हटले होते, ‘लेखक म्हणून मला आता एका गोष्टीची लाज वाटते की, एकाही गुन्हेगाराला- ‘डॉन’ला प्रत्यक्ष न भेटता मी ‘द गॉडफादर’ लिहिली. माझी ही प्रतारणाच आहे लेखनाशी..’

‘द गॉडफादर’ची वाचकप्रियता लक्षात घेऊन तिच्यावर ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ने चित्रपट काढला. अल रूडी निर्माता असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोपोला याने केले होते. त्यात मार्लन ब्रॅण्डो, रॉबर्ट डी निरो, जेम्स कान, अल पचिनो, रॉबर्ट डुवाल यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची पटकथा आणि संवाद कोपोलाने पुझोच्या सहकार्याने लिहिले होते. त्याबद्दल पुझोला दर आठवडय़ाला ५०० डॉलर आणि चित्रपटाच्या संभाव्य नफ्यातील दोन टक्के हिस्सा देऊ करण्यात आला. १४ मार्च १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटगृहांसमोर तिकिटासाठी दोन मैल लांबीच्या रांगा लागल्या होत्या! अमेरिकेप्रमाणेच इंग्लंड, फ्रान्स आणि इटली तसेच उर्वरित युरोपातही तो फार मोठय़ा प्रमाणावर यशस्वी ठरला. चित्रपटाचे हे यश केवळ व्यावसायिकच नव्हते, तर कलात्मकही होते. चित्रपटाच्या यशामुळे मूळ कादंबरीच्या खपातही बरीच वाढ झाली आणि जगातील जवळपास सर्वच भाषांत तिचे अनुवाद सिद्ध झाले. त्यानंतर ‘गॉडफादर’चा पुढचा भाग लिहिण्याऐवजी पुझोने कोपोलाच्या मदतीने सरळ चित्रपटकथाच लिहिली आणि पुढे याच पद्धतीने चित्रपटाचा तिसरा भाग लिहून काढला. हे सर्व चित्रपट गाजले आणि ऑस्कर पारितोषिकाचेही मानकरी ठरले.

‘द गॉडफादर’ ही कादंबरी आणि तिच्यावर आधारित चित्रपटांना लाभलेल्या यशामुळे मारिओ पुझोचा हॉलीवूडमध्ये प्रवेश सुलभ झाला. ‘सुपरमॅन’, ‘अर्थक्वेक’, ‘कॉटन क्लब’ या चित्रपटामुळे त्याला पटकथा-संवादलेखक म्हणून फार मोठा लौकिक मिळाला; पण तो चित्रपटसृष्टीत काही फार काळ रमला नाही. चित्रपटसृष्टी सोडून पुन्हा लेखनाकडे परतलेल्या पुझोच्या ‘फूल्स डाय’ (१९७८), ‘द सिसिलियन’ (१९८४), ‘द फोर्थ के’ (१९९०), ‘द लास्ट डॉन’ (१९९६) या कादंबऱ्या नंतर प्रसिद्ध झाल्या. पैकी ‘फूल्स डाय’ला हॉलीवूडच्या चित्रपट व्यवसायाची, तर ‘द फोर्थ के’ला आंतरराष्ट्रीय दहशतवादाची पार्श्वभूमी आहे. ‘द सिसिलियन’मध्ये इटलीतील माफियांची कूळकथा विस्ताराने सांगितली गेली आहे, तर ‘द लास्ट डॉन’मध्ये गुन्हेगारी विश्वाचे तपशीलवार चित्रण येते. पुझो सर्वार्थाने लेखनमग्न व्यक्तिमत्त्वाचा होता. आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत तो कादंबरीलेखन करीत राहिला. २ जुलै १९९९ रोजी पुझोचे निधन झाले. त्यानंतर चारच महिन्यांनी त्याची ‘ओमेर्ता’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्याच्या या सर्वच कादंबऱ्या गाजल्या. या लेखनव्यवहारातून आयुष्याच्या अखेरीस तो अब्जाधीश झाला होता. पण हे मात्र खरे की, मारिओ पुझो ‘द गॉडफादर’सारखी कालजयी कादंबरी पुन्हा कधीच लिहू शकला नाही. कारण ‘द गॉडफादर’ची निर्मिती हा अपवादात्मक योगायोग होता आणि योगायोग काही वारंवार घडत नसतात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:06 am

Web Title: article on engaged in the writings of mario puzo abn 97
Next Stories
1 बुकरायण : स्त्री-युद्धसंगीत!
2 बुकबातमी : दोन पुस्तके, एक पुरस्कार
3 दोन कथा, एक विधान..
Just Now!
X