‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील सुप्रतिष्ठ प्राध्यापक श्री. म. दीक्षित’ म्हणजे कोण हे चटकन कळणार नाही, कारण ‘राजा दीक्षित’ म्हणूनच त्यांनी लिखाण केलं. विवेकानंद, केशवसुत, इतकंच काय मराठीतलं सुरुवातीच्या काळातलं विज्ञानविषयक लेखन यांविषयी ते अधिकारवाणीनं बोलू शकले, याचं कारण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा केवळ राजकीय नव्हे तर समाज आणि संस्कृतीचा इतिहास त्यांनी अभ्यासला. दीक्षित यांच्या विविधांगी अभ्यासूपणाला जणू दाद म्हणून विद्यापीठाच्या आंतरप्रणाली (इंटरडिसिप्लिनरी) विभागाचं प्रमुखपद त्यांना मिळालं. निवृत्तीनंतर सुप्रतिष्ठ प्राध्यापक होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. या राजा दीक्षित यांच्या गौरवग्रंथाचं काम आता पूर्ण झालंय आणि ३० ऑक्टोबरनंतर तो अभ्यासकांच्या हातांत, टेबलांवर, किमान बुकशेल्फांवर दिसू लागेल.

‘इंडियन मॉडर्निटी : चॅलेंजेस् अँड रिस्पॉन्सेस्’ या नावाच्या या ग्रंथात भारतीय आधुनिकतेचा, विशेषत: महाराष्ट्रीय प्रबोधनकाळ ते विसावं शतक यांचा वेध आहे. भारतात वसाहतवादाबरोबर आलेली आधुनिकता अनेकांनी डोळसपणे स्वीकारली, तर समाजाच्या स्थितीगतीप्रमाणे तिला विरोधही होत राहिला. नवता आणि परंपराप्रियता यांचं हे द्वंद्व कुठे-कुठे दिसलं आणि कुठे घेऊन गेलं, याचा वेध इरिना ग्लुश्कोवा, अरविंद गणाचारी, यशवंत सुमंत, वर्षां शिरगावकर, उमेश बगाडे, मीना वैशंपायन, चंद्रकांत अभंग, चैत्रा रेडकर, अभिधा धुमटकर, श्रद्धा कुंभोजकर, मधुमिता बंदोपाध्याय, चंद्राणी चटर्जी, जास्वंदी वांबूरकर, रश्मी कोंड्रा यांनी या ग्रंथासाठी घेतला आहे. पुण्याच्या ‘युनिक फाउंडेशन’तर्फे हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित होतोय आणि डॉ. जास्वंदी वांबूरकर यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली आहे. शिक्षणपद्धती, विज्ञान व इतिहासलेखन यांचा प्रारंभ; रेल्वे, छपाई संस्कृती, साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट यांसारख्या दळणवळण व संप्रेषण-माध्यमांचे आगमन; सामाजिक आणि राजकीय सुधारणा चळवळी या विषयांवर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. अनेक अभ्यासकांच्या या लिखाणातून आजवर जोडले न गेलेले ‘भारतीय आधुनिकते’च्या अभ्यासाचे बिंदू जोडता येतील आणि आणखी अभ्यासाला चालना देणारा हा संदर्भग्रंथ ठरेल, अशी अपेक्षा आहे.