वसंत माधव कुळकर्णी

शहरांच्या विकासावर भर देतानाच पर्यावरण संतुलन जपणारे शाश्वत धोरण असावे, यासाठी सातत्याने लिखाण करणाऱ्या अर्थतज्ज्ञ ईशर जज-अहलुवालिया यांच्या आठवणींच्या या पुस्तकाची ही धावती ओळख..

ईशर जज-अहलुवालिया या २६ सप्टेंबर रोजी निवर्तल्या. स्वत:च्या आठवणींचा पट मांडणारे पुस्तक ‘ब्रेकिंग थ्रू : अ मेमॉयर’ त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस प्रकाशित झाले. (‘मेमॉयर’ हा स्पेलिंगच्या अगदी जवळचा, मराठी वळणाचा उच्चार आहे. युरोपीय उच्चारांप्रमाणे तो शब्द ‘मेम्वा:’ असा लिहावा लागेल.) ईशर या आघाडीच्या आर्थिक धोरणकर्त्यां अर्थतज्ज्ञांपैकी एक. फाळणीनंतर पंजाबातून कोलकात्यात आलेल्या व्यापारी कुटुंबात ११ भावंडांपैकी एक म्हणून त्यांचा जन्म झाला. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर आणि अमेरिकेतील ‘एमआयटी’त (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) संशोधन करून पीएच.डी. झाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांनी सुरुवातीचा काळ विश्लेषक म्हणून व्यतीत केला. पती माँटेकसिंग अहलुवालिया यांच्यासह भारतात परतल्या. भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषदेत (इंडियन कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स-‘इक्रिअर’) त्यांनी संशोधक म्हणून कामास सुरुवात केली. पुढे त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. अलीकडे त्यांनी शहरी पायाभूत सुविधा सेवांसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय  समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव केला. नागरी सुविधांच्या आव्हानांवर त्यांनी २००८ पासून ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये विस्तृतपणे लेखन केले होते. शाश्वत शहरीकरणाशी संबंधित पिण्यायोग्य पाणी, घनकचरा व्यवस्थापनाचा विशेष अभ्यास केला.

हे पुस्तक एखाद्या कादंबरीइतके रंजक आहे. पहिल्या दोन प्रकरणांत वाचक लेखिकेशी तादात्म्य पावतात. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली खंबीर मुलगी, अर्थशास्त्राची विद्यार्थिनी ते संशोधक आणि पुढे धोरणकर्ती असा त्यांचा प्रवास या पुस्तकात त्यांनी मांडला आहे. कोणाही सुशिक्षित भारतीय स्त्रीला जे प्रश्न पडतात ते सर्व प्रश्न लेखिकेला पडले. अगदी मुलांच्या शाळा-कॉलेजच्या प्रवेशापासून संशोधन आणि कुटुंबामध्ये त्यांनी संतुलन साधले. ‘मुलांना वाढवणं हा पूर्णवेळचा उद्योग असतो. ते करून व्यवसायही करणं, हे दोन पूर्णवेळचे उद्योग’ असे त्या गमतीने नोंदवतात. माँटेकसिंग यांची उत्तम सहचारिणी आणि दोन मुलांची (पवन आणि अमन यांच्या) आई या भूमिकेत वावरत असताना आपल्या आर्थिक संशोधक या भूमिकेशी कायम प्रामाणिक राहून, संशोधन पद्धतीबाबत ईशर यांनी कसलीही तडजोड केली नाही हे वाचताना वारंवार जाणवते.

भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर असताना त्यांनी एक अनौपचारिक, परंतु अतिशय परिपक्व सल्लागाराची भूमिका पार पाडली. अनेक वेळा दिल्लीच्या सत्तावर्तुळात ज्यांचा उल्लेख ‘सिंग दरबार’ असा होत असे, (मनमोहन सिंग,  माँटेकसिंग आणि तत्कालीन वरिष्ठ नोकरशहा एन. के. सिंग, जे आता १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषवत आहेत.) त्यांच्या निर्णयप्रक्रियेत ईशर यांनी थेट भाग घेतला नसला तरी, त्यांच्या अभ्यासू स्वभावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मुक्त करण्यासाठी बदलांचा अवलंब करणाऱ्या या नेतृत्वास अधिक सक्षम करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला. ही अनौपचारिक सल्लागाराची भूमिका त्यांनी सर्व मर्यादांचे पालन करीत निभावली. पुस्तकातील ‘द बॅटलग्राऊंड’ या प्रकरणात, जेव्हा माँटेकसिंग वित्त सचिव होते तेव्हा भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांचे वर्णन  करताना त्या लिहितात, ‘ते अर्थ सचिव होते आणि त्यांच्या कारकीर्दीतील तो सर्वात रोमहर्षक टप्पा होता. माझ्या संशोधनाच्या कामामुळे त्यांनी काही धोरणात्मक बाबींवरील निर्णय बदलला, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती. तरीही त्यांच्या कामांत ढवळाढवळ न करता, ‘मिसेस फायनान्स सेक्रेटरी’ अशी ओळख होऊ देण्याचे टाळणे हे माझ्या समोरचे खडतर आव्हान होते’. त्यांनी विचारस्वातंत्र्य अनुभवताना अनेक संशोधनात्मक बाबीसाठी योगदान दिले.

वेगवेगळ्या आर्थिक विषयांवर संशोधन करीत असताना वेगवेगळ्या विचारसरणींच्या राजकीय पक्षांकडून त्यांना टीकेचे प्रहार सोसावे लागले. समाजवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी त्यांची संभावना ‘सीआयए एजंट’ अशी केली तर विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्या राष्ट्रविरोधी वाटल्या. डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्यासुद्धा त्या टीकेच्या धनी झाल्या. बाहेरच्या टीकाकारांची कमी होती म्हणून घरातल्यांनीसुद्धा त्यांच्यावर मनसोक्त टीका केली. सासू-सासऱ्यांचेसुद्धा त्यांच्याप्रति वर्तन एका गरीब कुटुंबातील स्त्रीसारखेच होते. सासू-सासऱ्यांनी ईशर यांच्याकडे कायम दयेच्या नजरेतून पाहिले. माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘बॅकस्टेज: स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स’मध्ये असेच काही किस्से वाचायला मिळतात. एकाच पेशात असलेली अनेक दाम्पत्ये आहेत; तशी अर्थशास्त्रातसुद्धा आहेत. परंतु ईशर जज-अहलुवालिया आणि माँटेकसिंग अहलुवालिया या जोडीइतकी दुसरी कोणतीही प्रभावी जोडी नसेल. ईशर यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात जाणीवपूर्वक सरकारबाहेरच राहणे पसंत केले. माँटेकसिंग अहलुवालिया आधीपासूनच नोकरशहा झाले होते. खास करून ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’शी आणि विशेषत: डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी त्यांची जवळीक उघड होती. तरीही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या पाच वर्षांत पंतप्रधान आणि पक्षनेतृत्व यांच्यात टोकाचे मतभेद असल्याचे अलीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकांतून समजते. या सगळ्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही या गोष्टीसाठी ईशर यांनी आपली लेखणी झिजवलेली नाही. ही या पुस्तकाची कमतरता म्हणावी लागेल. अनेक घटनांचे वर्णन करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल ईशर आणि माँटेकसिंग यांना नितांत आदर असल्याची भावना त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते. भारताच्या आर्थिक संवेदना बदलण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी जी भूमिका बजावली त्याबद्दल त्यांना आदर व्यक्त करतानाच त्यांच्या सुधारणांचे श्राद्ध घालावे लागल्याबद्दल खेद व्यक्त करून निराशेची भावना व्यक्त करतानाही त्यांना संकोच वाटत नाही. ‘मला आश्चर्य वाटले की पंतप्रधानांनी फक्त राजीनामा का दिला नाही,’ असे विधान करायला त्या कचरलेल्या नाहीत.

या पुस्तकातील असाच एक प्रसंग. त्या वेळी माँटेकसिंग अहलुवालिया यांचे निवासस्थान हे आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी होते. एक वित्तीय पत्रकाराने फोन करून ‘डॉ. अहलुवालिया आहेत का?’ विचारले. महिलेच्या आवाजात उत्तर आले, ‘बोला.’ तेव्हा चकित झालेल्या पत्रकाराने विचारले : ‘मी दुसऱ्या डॉक्टर अहलुवालियाशी बोलू शकेन का?’.. त्यावर पुन्हा उत्तर ‘या घरात फक्त एकच डॉक्टर अहलुवालिया आहे!’  हा प्रसंग ८० च्या दशकात ईशर जज-अहलुवालिया यांच्यासारख्या स्त्रीला दिल्लीसारख्या शहरात पुरुषप्रधान आर्थिक जगात अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख मिळणे किती कठीण होते याची वाचकांना जाणीव देणारा आहे. अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएलसन यांच्यासह जगातील अर्थशास्त्राच्या परिषदांमध्ये वक्ता म्हणून भाग घेणाऱ्या स्त्रीची ही अवस्था होती. भारतातील त्या सर्वात हुशार विद्यार्थिनी होत्या. भारताच्या ‘परमिट-राज’मध्ये आर्थिक उत्पादकता नसल्याबद्दलच्या त्यांच्या संशोधनामुळे त्या एक विख्यात अर्थतज्ज्ञ आणि धोरण संशोधक कशा बनल्या, इथवरच्या खडतर प्रवासाचे वर्णन या पुस्तकात येते.

नवी दिल्लीतील सत्तेच्या अगदी जवळ असूनही त्या आणि माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या ५० वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा आलेख त्रयस्थ भूमिकेतून त्यांनी मांडला आहे. त्या म्हणतात, ‘दिल्लीच्या बाहेरील व्यक्ती (माँटेकसिंग) नखशिखांत दिल्लीकर बनली; पण मला मात्र दिल्ली कायम परकीच वाटते.’ साध्या शब्दांत मांडलेल्या त्यांच्या विश्वात नकळत एक अभ्यासक म्हणून डोकावताना ‘मला हे माहीत नव्हते’ किंवा ‘असे असेल हे वाटले नव्हते’ यांसारख्या प्रांजळपणापर्यंत अगदी सहज लेखिका घेऊन जाते. त्यांच्या लेखी शिकणे म्हणजे नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि संशोधनाचा ध्यास घेणे. आपल्या मूलभूत विचारांची साथ करतानाचा हा प्रवास केवळ व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही. यामध्ये लेखिकेच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर घडलेल्या गोष्टींचा समावेश आहे. तसाच, भारताच्या गेल्या तीन दशकांतील आर्थिक वाटचालीचाही आलेख ओघाने आलेला आहे.

त्यामुळेच, गेल्या सहा वर्षांत भारताची जी विनाशकारी आर्थिक घसरगुंडी होत आहे (जिचा उल्लेख अन्य अर्थतज्ज्ञांप्रमाणेच ईशर यांनीही केलेला आहे), त्यावर शेवटचे प्रकरण असायला हवे होते. परंतु शेवटच्या प्रकरणात देवाने  दिलेल्या संधी आणि प्रतिभेबद्दल त्या देवाचे आभार मानतात! त्या बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीच्या (शीख) होत्या याचे पुरेसे दाखले पुस्तकात आहेत. ‘ल्युटन्स दिल्ली’ जंगलात टिकून राहण्यासाठी एक प्रकारची निष्ठुरता अंगी असावी लागते. पुरेपूर शालीनतेने लिहिलेल्या या पुस्तकात अंतिम प्रकरणात अनेकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ईशर जज-अहलुवालिया यांच्याकडे सध्याच्या सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यांची काँग्रेसशी जवळीक एवढेच कदाचित कारण असू शकेल. त्यांच्यासारख्या धोरणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची किंमत सरकारलाच नव्हे तर सामान्य जनतेला मोजावी लागत असते. भविष्यात जेव्हा जेव्हा नागरी पायाभूत सुविधा आणि बाधितांचे स्थलांतर हे विषय येतील तेव्हा ईशर जज-अहलुवालिया आणि त्यांचे कार्य याची आठवण होईल. आर्थिक बाबींवर संशोधन करू इच्छिणाऱ्या, विशेषत: तरुण वाचकांनी हे पुस्तक वाचावेच, असे आहे.

shreeyachebaba@gmail.com