कुणाल बसू हे प्रथितयश म्हणावेत असे कथा-कादंबरीकार असल्यानं त्यांच्या नव्या कादंबरीबद्दल कुतूहल असणारच होतं. पुस्तकाच्या (‘कोलकाता’चा अपभ्रंश करूनच लिहिलेल्या) नावामुळे, हे कुतूहल कादंबरी अध्र्यावर आली तरी कायम राहिलं.. एका महानगराचं नाव असलेली ही कादंबरी, एकाच नायकाची गोष्ट न ठरता ते अपभ्रंशित नाव सार्थ कसं करणार?
हा नायक मुसलमान. तोही बांगलादेशीच. नाव जमशेद आलम. टोपणनाव जामी. वयाच्या सातव्या वर्षी, तत्कालीन कोलकात्यातल्या एका कम्युनिस्ट बिहारी-बंगाली नेत्याच्या- मुश्ताकचाचा यांच्या- वशिल्यानं जामीला भारतीयत्व लाभतं. त्याचे आईबाप ढाक्यातून निर्वासित होऊन, ‘जिनिव्हा कॅम्प’मधून कोलकात्यात आले आहेत. मुश्ताकच्या चाळीत ‘कम्युनिस्ट कार्यकर्ते’ या नावाखाली त्यानं बऱ्याच स्वजातीयांची सोय केली आहे. ही चाळही त्याची नसून, १९४७ च्या फाळणीवेळी पूर्व पाकिस्तानात धाडले गेलेल्या कुणाची असावी, असा प्रवाद. नायकाच्या बालपणाचं वर्णन हे त्या चाळीचंही वर्णन आहे. पोलिओग्रस्त बहिणीला जामीचे खेळगडी ‘लंगडी’ म्हणतात, तेव्हा केलेल्या मारामारीची, याच मित्रांपायी केलेल्या चोरीची, खाल्लेल्या माराची वर्णनं लेखकानं जामीलाच घडल्या गोष्टी तटस्थपणे सांगणारा निवेदक बनवलं आहे. जामीच्या मनोव्यापारांचा पट मांडणं एवढंच लेखकाचं ध्येय नाही. कादंबरीत घटनावर्णनं आणि संभाषणं भरपूर आहेत. पानोपानी आहेत. तरीही, नायकाच्या मनात कोणत्या वेळी काय आलं, कोणत्या प्रसंगी तो कसा वागला, अशा रीतीनंच कादंबरी पुढे सरकते आहे. समाजदर्शन जामीच्या बालपणापासून जे काही घडतं ते गरीब मुस्लीम मुलगे कसे वाढतात, एवढंच. नाही म्हणायला, स्थानिक कम्युनिस्ट नेते कसे दुटप्पी असतात, याचंही. आणि पोलिओग्रस्त बहीण स्वत:च दहावीनंतर शिक्षण सोडते, बुरखा घालू लागते, हेसुद्धा.
सहा फूट उंचीच्या आणि देखण्या अशा या नायकाच्या आयुष्यात तरुणपणी अनेक वळणं येतात. तो बारावी नापास होतो. एका ट्रॅव्हल एजन्सीत, अशिक्षित-अडाण्यांचे पासपोर्ट अर्ज भरून देण्याच्या कामावर लागतो. पोराला नोकरी लागली म्हणून हे चौकोनी कुटुंब इतकं खूश की, आदल्या दिवशी त्याच्या ते एजन्सीचं बंद शटर पाहायला चौघंही जातात, बाहेरच जेवतात. अगदी खालच्या थरातला नोकर असल्यानं जामीचं नोकरीविश्व ड्रायव्हर, शिपाई यांच्यापुरतंच राहणार असतं, त्यामुळे वाचकांना सांगण्यासारखं त्याच्याकडे असतं ते, मुस्लीम तरुण आखाती देशांत जाण्यासाठी कशी खोटी कागदपत्रं बनवतात आणि आम्ही त्यांना कशी मदत करतो, हेच. मात्र, एजन्सीत वरच्या जागेवरला अनी ऊर्फ अनिर्बन हा तरुण बंगाली बाबू सहकारी त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागतो.. कदाचित, या अनीचे वडील माजी नक्षलवादी असल्यानं त्याला गरिबांशी वागणं जमत असेल.. पण अनी अट्टल बाबूच. ‘माझा जामी कोलकातावाला होणारे’ हे आईचं स्वप्न पूर्ण होण्याची वाट अनीशी संभाषणांमुळे जामीला खुणावू लागते. अर्थात, अनीसारखंच काम करणाऱ्या मंदिराबाईंएवढं शुद्ध कोलकातावालं होणं अशक्यच आहे, हेही त्याला कळत असतं. एवढय़ात त्याला मोनिका गोस्वामी ही धनिक पुरंध्री भेटते आणि तिनं यथावकाश गटवल्यामुळे त्याचं आयुष्य बदलू लागतं. अखेर तिच्या देहाचे सोहळे तो पुरवतोच. तिच्या मैत्रिणींच्या देहभुकाही भागवतो. त्या पुरवठादारीत याची नोकरी सुटते. इथं भलतीच नवी सुरुवात होते. ‘तुझे हात भक्कम आणि तरीही मऊसूत आहेत जामी.. मसाज छान करशील’ म्हणत मोनिका गोस्वामी जॅमीला एका ‘तसल्या’ मसाज पार्लरमध्ये नोकरी लावून देते. तिथल्या त्याच्या तीन महिला सहकाऱ्यांखेरीज एक तृतीयपंथी ‘रानी’देखील नोकरीस आहे. रानी ही अनीसारखीच, जिच्याकडून खूप शिकायला मिळेल अशी व्यक्ती. सल्लागार-मित्र. दोन जगांत जामी जगतो आहे. त्याच्या श्रीमंत ‘पाटर्य़ा’ (म्हणजे गिऱ्हाईक स्त्रिया) कधी कधी हिंस्रही असतात, पण हे खपवून घेत तो छान कमावतो आहे. वडिलांना टेलरच्या ज्या दुकानातली वर्षांनुवर्षांची नोकरी गमवावी लागल्यामुळे आता सट्टाबाजारात बुकी बनावं लागलं आहे, त्याच दुकानात जामी वडिलांना घेऊन जाऊन, त्यांच्यासाठी सूट शिवून घेऊ शकतो आहे. वडिलांना सट्टाबाजारात बसलेल्या आर्थिक फटक्याचा भार कमी करू शकतो आहे. बहीण एका मुस्लीम अनाथालयात शिक्षणसेविकेची नोकरी करते, तिला सहज थर्मास भेट देऊ शकतो आहे.. ‘अब्बू-अम्मी गेल्यावर आपलं काय होणार?’ किंवा ‘हिंदू मुलीशी करशील लग्न.. आणि दुरावशील आम्हाला’ हे तिचं बोलणं गांभीर्यानं घेण्यापलीकडे जामी गेलाय. मोनिका गोस्वामीनं दिलेल्या पार्टीत शहरातल्या गुप्तचर विभाग प्रमुखांसकट अनेक बडय़ा धेंडांशी ओळखीपाळखी झालेला जामी, त्याच्या हातावरलं मोनिकानंच काही महिन्यांपूर्वी दिलेलं उंची घडय़ाळ घरच्या रस्त्यावरल्या चोर-दारुडय़ांपासून सांभाळतो आहे.
एकदा त्याला मंदिरा भेटते. तिच्या घराजवळून तो एका ‘पार्टी’कडे जात असतो, तेव्हा. मंदिराचा मुलगा पाब्लो लहानपणीच रक्ताच्या कर्करोगानं ग्रासलाय, हे जामीला माहीत आहे. त्यामुळे मंदिरानं ‘घरात येऊन भेट ना त्याला’ म्हटलं तरीही जामीचा आत यायचा धीर होत नाही. जामी मंदिराच्या घरी जातो, पण नंतर कधी तरी. पाब्लोची चित्रं पाहून हरखतो. मंदिराची असहाय स्थितीही पाहतो. जे त्याची गिऱ्हाइकं देऊ शकत नाहीत, असं काही तरी त्याला मंदिराच्या घरात मिळू लागतं.. निव्र्याज प्रेमळपणातलं समाधान!
या समाधानाची किती सव्याज फेड करावी लागणार आहे, किती संकटं येणार आहेत, हे जामीला माहीत नाही. मंदिरा ऑफिसात गेल्यावर पाब्लोजवळ कुणी तरी हवं, म्हणून जामी त्याच्या ‘पाटर्य़ा’ना नकार देऊ लागतो. पार्लरमालकीण चिडते. ‘ कसली तरी डाऊनमार्केट कारणं सांगू नको’ म्हणते. अनी नीट सल्ला न देता, एका पत्रकार मैत्रिणीशी ओळख करून देतो. धंदा बुडालेला जामी स्वत:ची जाहिरात पेपरात देतो आणि पोलिसांच्या कचाटय़ात फसतो. इथून पुढे एकटय़ा जामीची नव्हे, त्याची बहीण मिरी ऊर्फ मिरियम हिचीही पूर्ण वाताहत सुरू होते.
कशी, हा कथेचा भाग जिज्ञासूंनी वाचावाच, पण कथेच्या ओघात कोलकाता शहरातले रस्ते, सांस्कृतिक भूगोलातले भेदाभेद, शहरातले धोके आणि गुपचूप चालणारे काळे धंदे, यांची वर्णनं येत राहतात. शिवाय, या कथेचा इथं न सांगितलेला जो भाग आहे, त्यात वाचकांना समाजदर्शनाचा खरा हादरा बसणार आहे. ‘मुसलमानांचं ठोकळेबाज चित्रण’ या शिक्क्यापासून हा कथाभाग अचानक विलग होऊन, तो ठोकळेबाजपणा कुठून येतो, असा प्रश्न वाचकाच्या मनात रुजवू शकणार आहे.
‘कोलकाता शहराच्या खाचाखोचा आणि तिथली माणसं, यांचं तपशीलवार दर्शन म्हणजे समाजदर्शन नाही.. खरं समाजदर्शन हे त्या अनुत्तरित, सूचकपणेच मांडलेल्या प्रश्नात आहे,’ हे ज्या वाचकांना समजेल, त्यांना कदाचित, ‘मला वरून सारे आरसेच दिसले’ यासारखं कादंबरीच्या अखेरच्या भागातलं वाक्यही उमगेल.
..नाही झालं तसं, तरीही कुणा एका मुसलमान जामीची गोष्ट प्रभावीपणे सांगून कुणाल बसूंनी स्वत:चा प्रथितयशपणा सिद्ध केलायच.

कोलकाता
लेखक : कुणाल बसू.
प्रकाशक : पॅन मॅकमिलन/ पिकॅडोर इंडिया
पृष्ठे : ३१२, किंमत : ५९९ रु. (पुठ्ठाबांधणी)
 abhijit.tamhane@expressindia.com

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…