पुरस्कार काय देतात? तर बरेच काही. कोणासाठी त्याद्वारे मिळणारी कौतुकाची थाप महत्त्वाची, कोणासाठी त्यातली रक्कम महत्त्वाची, कोणास त्यातून मिळणारा मान, तर कोणास पुरस्कारातून मिळणारी अधिमान्यता अधिक महत्त्वाची. काही पुरस्कार हे सारे मिळवून देणारे असतात. ‘बुकर’ हा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार त्यापैकी एक. ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यांचा अनुभव तरी तसा आहे. २०१९ साली त्यांना हा पुरस्कार मिळाला. ‘गर्ल, वुमन, अदर’ या त्यांच्या दीर्घकथासंग्रहासाठी. त्यानंतर त्यांचे लेखकीय आयुष्यच बदलून गेले, असे खुद्द एव्हरिस्टो यांचेच म्हणणे. खरेच म्हणायचे ते. याचे कारण २०१९ साली एव्हरिस्टो यांना ‘बुकर’ मिळाले असले, तरी त्या लिहित्या झाल्यात नव्वदच्या दशकापासूनच. ‘लारा’, ‘द एम्पेरर्स बेब’, ‘सोल टुरिस्ट्स’ आदी प्रयोगशील कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या, नाटके आणि लघुकथाही लिहिल्या होत्या; परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली ती ‘बुकर’नंतरच. आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या पिढीची स्थिरावण्याची धडपड मांडणारे ‘गर्ल, वुमन, अदर’ हे त्यांचे ‘बुकर’प्राप्त पुस्तक म्हणजे बारा दीर्घकथा/ लघुकादंबऱ्यांचा संग्रहच. दुसऱ्या महायुद्धानंतरचे ब्रिटनमधील आफ्रिकी स्थलांतरितांचे जगणे, संघर्ष आणि स्थिरावणे याचा वेध घेणाऱ्या या संग्रहाचा परिचय ‘बुकमार्क’मधील ‘बुकरायण’ या सदरात ‘स्थिरावण्याच्या धडपडीचा इतिहास’ या लेखातून (२१ सप्टेंबर २०१९) करून देण्यात आला होता.

या संग्रहाने आफ्रो-ब्रिटिश साहित्यात मोलाची भर घातलीच, पण बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना जागतिक ओळखही मिळवून दिली. तोवर साहित्यिक परिघाबाहेरच राहिलेल्या बर्नार्डिन एव्हरिस्टो आता साहित्य-वर्तुळाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. तब्बल तीन दशकांहून अधिक काळच्या साहित्यिक मुशाफिरीनंतर मिळालेली ही मान्यता एव्हरिस्टो यांना मागे वळून पाहण्यास प्रवृत्त करणारी ठरली आहे. त्यांची आजवरची वाटचाल कशी झाली, याची कहाणी एव्हरिस्टो सांगणार आहेत. त्याचे ‘मॅनिफेस्टो’ या शीर्षकाचे पुस्तक येत्या ऑक्टोबरात हॅमिश हॅमिल्टन या त्यांच्या इतर पुस्तकेही प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेकडून प्रसिद्ध होईल.