नंदा खरे

रशियन लेखक एव्हगेनी झाम्याटिनच्या ‘वुई’ या कादंबरीत २६ व्या शतकात समाज कसा असेल, याचे चित्र रेखलेले आहे. त्याचा जॉर्ज ऑर्वेलने घेतलेला वेध आल्ड्स हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ची आठवण काढणारा आणि ओघाने ऑर्वेलच्याच ‘१९८४’चे स्मरण करून देणारा…

एव्हगेनी झाम्याटिनच्या ‘वुई’ या कादंबरीत २६ व्या शतकात समाज कसा असेल याचे चित्र रेखलेले आहे. सर्वच माणसांनी आपली विशिष्ट व्यक्तिमत्त्वे गमावली आहेत. प्रत्येकाची ओळख एका क्रमांकातूनच व्यक्त होते. सगळे जण काचांच्या घरांमध्ये राहतात. यामुळे ‘पालक (गार्डियन्स)’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांना सर्वांवर सहज नजर ठेवता येते. सगळ्यांचे कपडेही एकसारखे असतात, त्यामुळे माणसांचा उल्लेख ‘क्रमांक’ किंवा ‘गणवेश’ असाही केला जातो. सगळेजण कृत्रिम अन्न खातात, कारखान्यांत तयार केले गेलेले. सगळ्यांचा मुख्य विरंगुळा म्हणजे, ‘एक-राष्ट्रा’चे राष्ट्रगीत ऐकत त्या तालावर चार-चारच्या रांगांनी संचलन करणे. सगळ्या देशभर ध्वनिवर्धक हे राष्ट्रगीत सतत वाजवत असतात.

काही ठरावीक वेळाने ‘काम-प्रहर’ येतात. या काळात घरांचे पडदे ओढून क्रमांकांना खासगीपण मिळते. समाजात विवाहसंस्था नाही, पण समाज स्वैराचारीही नाही. प्रत्येकाला गुलाबी कुपनांचे संच दिले जातात; एकप्रकारे काम-व्यवहाराचे ‘रेशनकार्ड’ म्हणा. दर काम-प्रहरात एक कुपन खर्ची पडते, आणि क्रमांकांना ‘भागीदारा’च्या कुपनावर सही करावी लागते.

या ‘एक-राष्ट्रा’चा नेता ‘उपकारक (बेनेफॅक्टर)’ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी निवडणुका होतात आणि सर्व जण एकमताने नेत्याची पुनर्निवड करतात. ‘एक-राष्ट्रा’चा मुख्य आधार हा की, स्वातंत्र्य आणि आनंद एकत्र नांदू शकतच नाहीत. बायबलमधील नंदनवन कथेत माणूस आनंदात होता, पण त्याने मूर्खासारखी स्वातंत्र्याची अभिलाषा धरली आणि तो नंदनवनातून हाकलला गेला. ‘एक-राष्ट्रा’त माणूस पुन्हा स्वातंत्र्य गमावून आनंदात राहत आहे.

इथपर्यंत ‘वुई’मधला समाज हुबेहूब आल्ड्स हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मधल्यासारखा आहे. पण ‘वुई’ची रचना सुघड नाही. एक किचकट कथानक सुट्या घटनांमधून झटक्या-झटक्याने पुढे सरकते. पण ‘वुई’मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे- मनुष्यस्वभावाचा! ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ मानते की, नियंत्रित जन्म, औषधोपचार, झोपेत किंवा संमोहनातून शिक्षण देणे वगैरे तंत्रांमधून सर्व माणसांना वाट्टेल त्या रूपांमध्ये ढाळता येते. उत्कृष्ट वैज्ञानिकांपासून निर्बुद्ध कामे करणाऱ्या एप्सिलोन दर्जापर्यंतच्या वेगवेगळ्या श्रेणींची माणसे हव्या त्या प्रमाणांत घडवता येतात. मातृत्वभावना, स्वातंत्र्याची आस, सारेच सहजपणे ‘निपटता’ येते. अल्फा-एप्सिलोन श्रेणीबद्ध रचना का लागते, ते मात्र हक्सले सुचवत नाही. त्याच्या पुस्तकात ना आर्थिक पिळवणूक आहे, ना इतरांवर प्रभुत्व गाजवायचा हव्यास… तिथे सत्तापिपासा नाही. परपीडनातून ‘मजा घेणे’ नाही. सगळे लोक एका पोकळ सुखात आहेत; इतक्या पोकळ प्रकारात की, तसला समाज टिकून राहील याच्यावर विश्वास ठेवणे कठीण.

झाम्याटिनचे चित्र एकुणात आपल्या स्थितीशी जास्त जुळवता येते. शिक्षण, पालक-पोलीस यांतूनही बऱ्याच मानवी मूलप्रवृत्ती टिकून आहेत. पुस्तकाचा नायक-निवेदक ‘डी-५०३’ अभियंता म्हणून तज्ज्ञ, पण इतर बाबतींत बाळबोध-भोळसट आहे. त्याला स्वत:च्या मनात उमळणाऱ्या पुरातन इच्छा महापापी वाटतात. तो ‘आय-३३०’च्या प्रेमात पडतो. हा अर्थातच गुन्हा असतो. ती एका भूमिगत गटाला सामील असते, आणि काही काळ ‘डी-५०३’ही त्यात गोवला जातो. अशातच खरोखरीचे बंड सुरू होते, आणि उपकारकाला बरेच विरोधकही आहेत, हे स्पष्ट होते. ते विरोधक प्रस्थापित व्यवस्थेला खिजवत राहतात; उदाहरणार्थ, काम-प्रहरात सिगरेटी ओढणे आणि दारू पिणे. ‘डी-५०३’ मात्र अशा पापांपासून दूर राहतो. शासन सांगते की, काही माणसांना काही मज्जापेशींतून कल्पनाशक्ती नावाचा रोग झाला आहे. क्ष-किरण शस्त्रक्रियेने तो दुरुस्त केला गेला आहे. अशा दुरुस्त केल्या गेलेल्यांत ‘डी-५०३’ही असतो. दुरुस्त झाल्यावर तो आपल्या बंडखोर सहकाऱ्यांची नावे शासनाला सांगतो. त्याला बंडाचा शेवट असाच होणार हे जाणवलेले असते. त्यामुळे ‘आय-३३०’चा जाहीरपणे एका काचेच्या हंडीत छळ होत असतानाही तो विचलित होत नाही. झाम्याटिनच्या शब्दांत :

‘खुर्चीचे हात घट्ट धरून तिने माझ्याकडे पाहिले, डोळे थकून गच्च मिटले जाईपर्यंत. त्यांनी (छळणाऱ्या शासकीय लोकांनी) तिला बाहेर काढले आणि विजेचे झटके देऊन ताळ्यावर आणले. तिला पुन्हा काचेच्या हंडीत घातले. हे चक्र तीनदा वापरूनही तिच्या तोंडून शब्द फुटला नाही… तिच्यासोबतचे लोक जास्त इमानी होते. एकाच चक्रानंतर त्यांनी गुन्हे कबूल केले. उद्या उपकारकाच्या यंत्राकडे नेले जाईल.’

हे उपकारकाचे यंत्र म्हणजे गिलोटीनसारखे विजेवर चालणारे यंत्र. झाम्याटिनच्या युटोपियात अशा अनेक देहान्ताच्या शिक्षा दिल्या जातात. उपकारकापुढे भाटांचे ताफे विजय-गीत गात असताना या शिक्षा दिल्या जातात. क्षणार्धात जरासा धूर निघतो आणि गुन्हेगाराच्या जागी पाण्याचे एक थारोळे साचते. या शिक्षा प्राचीन काळी गुलामगिरीची प्रथा असलेल्या समाजांमधल्या नरबळीच्या प्रथेसारख्या असतात. त्या वेळचे वातावरणही बळी, क्रौर्यासाठी क्रौर्य, दैवी गुण असलेल्या नेत्यापुढे सर्वांनी नतमस्तक होणे वगैरे प्रकारांचे असते. सर्वंकषसत्तावादातली (टोटलिटरिअ‍ॅनिझम) सर्व अविवेकी अंगे झाम्याटिन रेखाटतो. यामुळे त्याचे चित्र हक्सलेच्या चित्रापेक्षा उजवे ठरते.

रशियात या पुस्तकाच्या प्रकाशनावर का बंदी आली हेही उघड आहे. हे संभाषण सेन्सॉरच्या तावडीतून सुटणे अवघडच होते…

‘‘तू क्रांती करायचे सुचवतो आहेस ना?’’

‘‘अर्थातच. का नसावी क्रांती?’’

‘‘कारण आपले राष्ट्र जन्मले ती क्रांती शेवटची होती. तिच्यानंतर काही घडू शकतच नाही.’’

‘‘तू गणिती आहेस ना? मग सांग, सर्वात मोठी शेवटची संख्या कोणती?’’

‘‘हे बोलणेच व्यर्थ आहे. संख्या अनंत आहेत. सर्वात मोठी अशी संख्या असेलच कशी?”

‘‘मग तू शेवटच्या क्रांतीबद्दल का बोलतो आहेस?’’

असे अनेक उतारे पुस्तकात आहेत. पण बहुधा झाम्याटिनचे लक्ष्य सोव्हिएत सत्ता हे नव्हते. लेनिनच्या मृत्यूच्या काळात (जानेवारी १९२४; पुस्तकाचे प्रथम प्रकाशन : १९२०) आयुष्य फारच सुखासमाधानाचे असल्याने लोक बंडखोरीचा विचार करू लागले असतील, असे नव्हे. इथे टिप्पणी एकूण औद्योगिक संस्कृतीवर असावी, कोण्या एका समाजावर नव्हे. मी झाम्याटिनचे इतर काही वाचलेले नाही; पण ग्लेब स्ट्रुव्ह सांगतो की, झाम्याटिन बराच काळ इंग्लंडात होता आणि तो लेखनातून इंग्लिश समाजाचा विखारी उपहास करत असे. ‘वुई’वरून स्पष्ट होते की, लेखकाचा कल अनघड, अनलंकृत लेखनाकडे होता. झारच्या सरकारने त्याला १९०६ साली कैदेत टाकले. बोल्शेव्हिक (यूएसएसआर) सरकारने १९२२ साली त्याला त्याच तुरुंगात, त्याच ‘विंग’मधल्या खोलीत कैदेत टाकले. अर्थातच, त्याला या भोगलेल्या राजवटी आवडत नसत. पण पुस्तक केवळ नाराजी व्यक्त करण्यासाठी लिहिलेले नाही. माणसाने अविचारीपणे बाटली उघडून मोकळे केलेल्या जिन्न-राक्षसाबद्दलचा हा अभ्यास आहे. तो राक्षस सहजपणे पुन्हा बाटलीबंद करता येत नाही. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती येईल, त्यावर लक्ष ठेवा.

***

हे मूळ परीक्षण जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेले. जॉर्ज ऑर्वेलने ‘ट्रिब्यून’ या नियतकालिकात ४ जानेवारी १९४६ रोजी हे परीक्षण लिहिले. तोपर्यंत ‘वुई’चे इंग्रजी रूप घडले नव्हते! ऑर्वेल फ्रेंच भाषांतरावरून परीक्षण करतो आहे. एकूण पुस्तक आणि भाषांतराचा त्रोटक इतिहास असा :

प्रथम रशियन प्रकाशन १९२० साली, पॅरीसमध्ये झाले. पुस्तकावर रशियात बंदी आली १९२३ साली. चेक, पोलिश वगैरे भाषांतरांचेही उल्लेख आहेत. एक इंग्रजी भाषांतर (१९२४ सालचे) अमेरिकेत झाल्याचेही ऑर्वेलने ऐकले, पण पुस्तक हाती आले नाही. अखेर ऑर्वेलला ‘Nous autres’ (‘आम्ही इतर’) या नावाचे फ्रेंच भाषांतर मिळाले. आणखी एक फ्रेंच भाषांतर २०१७ मध्ये ‘Nous’ (‘आम्ही’) नावाने प्रकाशित झाले आहे. सद्य:काळात प्रचलित असलेले इंग्रजी भाषांतर बर्नार्ड गिल्बर्ट ग्वेर्नी याने १९६० साली केले, जे ‘जोनॅथन केप’ने १९७० साली पुठ्ठ्याच्या बांधणीत प्रकाशित केले. ‘पेंग्विन’चे कागदी बांधणीचे पुस्तक १९७२ साली निघाले.

‘वुई’मधली काचेची हंडीही जॉर्ज ऑर्वेलच्या ‘१९८४’मध्ये दुभंग रूपात भेटते. एकीकडे छळ-कक्षाकडे नेणारी ‘रूम १०१’; तर दुसरीकडे विन्स्टनच्या चोर-घरातला पेपरवेट. हा (पेपरवेट अखंड असताना त्यात हिमवादळेही येतात. तो फुटल्यावर मात्र आतला छोटासा प्रवाळ फक्त दिसतो) छळ होत असताना तो टाळायचा प्रयत्न होतो की नाही, झालाच तर कशा प्रकारे होतो, हे प्रश्न ऑर्वेलला सतावत असत. हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये तो मुद्दाच येत नाही. ‘डी-५०३’ प्रेयसीचे नाव सहज सांगून टाकून तिचा छळ होताना शांतपणे पाहतो. ऑर्वेलचा विन्स्टन छळाची परिसीमा पुढ्यात येताच- ‘‘डू इट टु ज्युलिआ’’ म्हणतो. एकूणच छळ आणि तो करणाऱ्यांची-भोगणाऱ्यांची मन:स्थिती, त्यामागचा अविवेक, हे सारे ऑर्वेलला पछाडते. त्याचा स्नेही आर्थर कोस्लरचे सर्वात प्रसिद्ध पुस्तकच (‘डार्कनेस अ‍ॅट नून’) कैद आणि छळ यांवर आहे. असो!

एक व्यक्ती दिसते आणि लोकांचे प्रेम ‘खेचत’ नेता बनते, हे ‘वुई’मधले रूप हक्सलेच्या अदृश्य शासकापेक्षा समजायला सोपे आहे. ‘१९८४’मधील ‘बिग ब्रदर’ हेही ‘उपकारका’चेच रूप आहे. या निष्ठा-प्रतिमेसारखी एक द्वेष-प्रतिमाही ऑर्वेल रेखतो. हक्सलेच्या चित्रात याला थारा नाही. एकूण ‘स्खलनशील माणूस’ झाम्याटिन-ऑर्वेलना जेवढा समजला आणि रेखाटता आला, तेवढा हक्सलेला समजलाच नाही.

nandakhare46@gmail.com