संकेत म्हात्रे

आधार-निराधाराचं रसायन घेऊन भोवतालच्या जगाकडे पाहत कवितेतून विस्कटलेल्या जगाची उत्तरं शोधू पाहणाऱ्या नव्या पिढीतील कवीच्या कवितासंग्रहाचा हा अनुसर्जनशील आस्वाद..

‘एक अकेला इस शहर में,

रात में या दोपहर में,

आब-ओ-दाना ढूँढता हैं, आशियाना ढूँढता हैं’

हा आशियाना म्हणजे केवळ घर नसून मनाच्या आतलं एक थंड सरोवर असावं असा माझा समज. हे गाणं म्हणजे प्रत्येक माणसाचं शहरी औदासीन्य. आणि त्या औदसीन्यतेमागची भावना मात्र एकटेपणाची. मुंबईच्या मरिन लाइन्सवर अंधाराला एकटक न्याहाळत बसताना किंवा उगीच आतून रितं फुटबोर्डावरून सरकत जाणाऱ्या मुंबईला बघताना या शहरी एकटेपणाचा काटा कुठेतरी खोलवर रुतत जातोच. एकटेपणा म्हणा किंवा दिशाहीन अस्तित्व म्हणा; शहरातल्या गर्दीत माणुसकीचे ठसे हरवले की सकाळच्या वाफेसारखा आपल्यातला हा एकटेपणा तरारून वर येतो, आणि त्यातून निर्माण होते एक वेगळी तगमग. मिहीर चित्रे यांच्या ‘स्कूल ऑफ एज’ या संग्रहामधल्या कविता या एकटेपणाची धगधगती, पण प्रौढ अशी जाणीव करून देतात. चांगली कविता मनाला अस्वस्थ करून सोडते आणि मिहीर चित्रे यांच्या कविता मनाला वारंवार अस्वस्थ करत राहतात. या कवितासंग्रहाचा आशय मूलत: महानगरी आहे, आपल्या जगण्यातला आहे. त्यात कुठेही भाषेचा ‘एलटीसिझम’ जाणवत नाही. मिहीर चित्रेंची कविता जितकी प्रौढ डोळ्यांनी जगाकडे पाहते, तितकीच ती माणसातल्या सामान्यतेलाही भिडत जाते. एकीकडे मुंबईची झगमगणारी स्कायलाइन दिसते, तर दुसरीकडे त्याभोवतीचा अंधारही ठळकपणे जाणवतो. जाहिरातीचं कॉस्मोपॉलिटन ग्लॅमर दिसलं, तर त्यामागच्या जगलेल्या आणि कागदावर सुकलेल्या रात्रीही आपल्या बोटांना लागतात. मिहीर चित्रेंच्या कवितांचा प्रवास एकटेपणातून सुरू होतो आणि सर्वत्र चालू राहतो. कवीनं जे काही भोगलंय आणि उपभोगलंय ते सारं या कवितेत सहजरीत्या अधोरेखित होतं. घरातल्या नातेसंबंधांविषयी कवी असं लिहितो-

‘केवळ हॉलमधली टय़ूबलाइट पेटलेली

आणि खिडक्या- ज्यांच्या काचा

किंबहुना तुटल्या असाव्यात किंवा विकून टाकल्या असाव्यात-

हवं नको ते सारं बोलून जातात

मी अभ्यास करताना एक विशेषण शोधतो- माझ्या बापासाठी

पण काही केल्या सापडत नाही

आज कोणत्या कारणांनी आईला भिंतीवर आदळतील

कुणास ठाऊक?

मी शक्यतांच्या कात्रीमधून एक अरुंदशी वाट काढत जातो

एक आतली भीती मनाला वेढत राहते.

घडय़ाळाच्या एका भागातला देव स्वत:ला विकण्यापासून वंचित

अन्यायाचा काटा फिरतो माझ्या चेहऱ्यावरून मिनिटाच्या हाताने

उषा फॅनच्या कचकचणाऱ्या आवाजाखाली

मृत्यू किती निर्धोक वाटतो अशा वेळी

इतक्यात दाराचा आवाज होतो

माझा विराम डळमळतो

आणि विशेषणानंतरचा स्वल्पविराम काही केल्या

चुकतोच.’

घरातलं हे आधार-निराधाराचं रसायन घेऊन कवी आपल्या समोरच्या जगाकडे पाहू लागतो आणि कवितेतून एका विस्कटलेल्या जगाची उत्तरं शोधत राहतो. पुन्हा स्वतंत्रपणे त्याच्या एकटेपणाची गाथा लिहू लागतो. या कवितेकडे बघितल्यावर आपल्याला हळूहळू समजू लागतं, की निरंतर चक्कीसारख्या चालणाऱ्या जगात हा कवी स्वतंत्रपणे प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नातून, त्याच्या वैचारिक उलघालीतून स्वतंत्र वाटही शोधतोय..

‘ठीक आहे

असाही विचार करणं, की कालपेक्षा आज तुम्हाला जास्त एकटं वाटेल

वाटेल खड्डय़ात गेला तो आशावाद

ओढून घ्यावं स्वत:ला ऋतुचक्रांच्या अंधारात

ठीक आहे

असं उमजणं एकदा तरी,

की परमेश्वर नावाची सर्वात मोठी

शोकांतिका आहे

या जगानं पाहिलेली.’

मिहीर चित्रे हे मुळात जाहिरात क्षेत्रातले. हे क्षेत्र हे बाहेरून जितकं लाघवी आणि वलयांकित दिसतं तेवढंच आतून ते पोकळ आणि उथळ आहे. या उथळपणाचं एक प्रात्यक्षिक या संग्रहातल्या ‘लंचटाइम अ‍ॅट अ‍ॅन अ‍ॅड एजन्सी’ या कवितेतल्या एका तुकडय़ातून कवी दाखवतो ते असं..

‘एका एंटरटेनमेंट क्लायंटसाठी

फेसबुक पोस्ट लिहिताना

अचानक सनीला दृष्टांत होतो

इतक्या वर्षांचा

जी त्याने फुकट घालवली

शब्दांवर

आणि शब्दांचा जी फुकट घालवली

इतक्या वर्षांवर

जाहिरातीत काम करताना

त्याला हवी तशी न्वार फिल्म

बनवण्याऐवजी

ज्यात एका हेराची सावली

अडकते तिच्या र्बगडी केसांच्या बटांमध्ये.’

या एकटेपणाच्या प्रवासातून जाताना कवीला बऱ्याच किनाऱ्यांचं पाणी लागत राहतं- कधी मृत्यूचं, तर कधी गोरेगावमध्ये गोरेगावसाठी सुचलेल्या गझलेचं, एक हजार एक रात्रींचं आणि त्यातल्या दडलेल्या कथांचं, दापोलीमध्ये मिठी मारणाऱ्या काळ्याकुट्ट रात्रीचं, कधी दिल्ली, कधी पुणे, कधी वाराणसी, कधी चहल, कधी अ‍ॅमस्टरडॅम, कधी जर्मनी- कवी आपल्या एकटेपणाचं गाठोडं घेऊन विश्वभर एका बैराग्यासारख्या फिरत राहतो आणि आपल्या शब्दांमधून हा विश्वविचारांचा गुंता अहोरात्र सोडवत राहतो.

..आणि तरीही तो कवितेच्या इमानाला सच्चा उतरतोच. कारण शेवटी तो जे जग पाहतोय त्यात आकंठ आशावाद आहे, धर्म-जात आणि उत्क्रांतीपल्याड एक सहज सोपं, सुंदर जग आहे, जिथे गोष्टी फार साध्या आहेत.

‘टुनाइट अ‍ॅट नून (आज रात्री माध्यान्ही)’ या कवितेत या विश्वाचं दु:ख व्यापलेल्या कवीचा अफाट आशावाद शेवटपर्यंत मनाला भिडत राहतो

‘आज रात्री, माध्यान्हेला

आपल्या मनातली हिंसा कायमची नाहीशी झाली आहे

आणि सूड या भावनेला कारगिलच्या एका संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे

जगण्यावर कुठलीच आचारसंहिता लागू नाही

विनोदबुद्धीच्या संसदेत रंगेलपणालाही फार वाव दिला जातोय

आणि विध्वंसकतेचं रूपांतर चांगुलपणात होतंय.’

shabd.sanket@gmail.com