कूमी कपूर यांचं ‘द इमर्जन्सी : अ पर्सनल हिस्ट्री’ हे पुस्तक तर २०१५ सालचं.. म्हणजे इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या आणीबाणीला ४० वर्ष झाली होती, तेव्हाचं! परवाच त्या घोषित आणीबाणीला ४५ वर्ष झाली असताना पुन्हा बुकबातमी कशासाठी? – कूमी कपूर या ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सल्लागार संपादक आहेत म्हणून? पण तसंच असेल तर.. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला अनेक सल्लागार संपादक आहेत, त्या अनेकांच्या नावावर विविध पुस्तकं आहेत, पण त्यांच्या कधी अशा पाच वर्षांनी बुकबातम्या का नाही झाल्या?

नाही झाल्या, कदाचित होणारही नाहीत.. कारण पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत उपसंहार म्हणून शोभेल असा वृत्तपत्रीय लेख कुणी लिहिणं, हे अगदी क्वचितच होत असतं. कूमी कपूर यांच्याकडून ते काम गेल्याच आठवडय़ात झालं आहे. राजकीय वार्ताहर म्हणून कपूर यांची कारकीर्द अर्धशतकाची होत असताना, त्यांच्या नावावरल्या त्या एकमेव पुस्तकातही व्यक्तिगत टिपणांचा भाग अधिक होता. ‘जे मी पाहिले ते मी सांगणार आणि तेही वस्तुनिष्ठपणेच सांगणार’ असा पत्रकाराचा बाणा त्या पुस्तकातही होता. या पत्रकारीय वस्तुनिष्ठतेच्या पलीकडे एक निरीक्षकही असतो आणि हा निरीक्षक स्वत:चा विचार-विवेक जागृत ठेवणारा आहे की नाही, हे कळण्यासाठी काहीएक सैद्धान्तिक पाया आवश्यक असतो. पत्रकार तो पाया स्पष्टपणे दाखवत नाहीत, म्हणून त्यांच्या लिखाणाला बिनमहत्त्वाचं मानण्याची चूकही होत असते. पुस्तकानंतर पाच वर्षांनी आणीबाणीविषयी लिहिताना, हा सैद्धान्तिक पाया कूमी कपूर यांनी ‘१९७५ लेसन फॉर २०२०’ या लेखातून (इंडियन एक्स्प्रेस, २५ जून) स्पष्ट केला! ‘(एकाधिकारशाही-सदृश राजवटीत) दोष एकटय़ा राज्यकर्त्यांचा नसतो, तर त्यांच्या दडपणाखाली येणारेही तितकेच दोषी असतात’, हे सूत्र मांडून; तसंच ‘न्यायालयांची कामगिरी त्या वेळी इतकी निरुत्साहजनक नव्हती. नऊ उच्च न्यायालयांनी ‘मिसा’ (तत्कालीन अंतर्गत सुरक्षा कायदा) हा राज्यघटनेशी विसंगत, म्हणून अवैध ठरवण्याची हिंमत दाखवली होती’ याची आठवण देऊन कपूर यांनी सद्य:स्थितीतली काही उदाहरणं दिली आहेत. ती सांगणं, हा या बुकबातमीचा हेतू नाही. पण कपूर यांनी न्यायसंस्था आणि वृत्तपत्रं (विशेषत: छापील दैनिकं) यांच्याबाबत कपूर यांनी साधार व्यक्त केलेल्या चिंतेतूनही हा सैद्धान्तिक पाया स्पष्ट होतो. हा पाया लोकशाही आणि ती टिकवण्यासाठी सर्वाच्या अंगी असावी लागणारी हिंमत, कर्तेपण या मूल्यांना मानणाराच आहे, हे निराळं सांगायला हवं का?