News Flash

अनुवादाची धाव..

मराठी भाषेतलं साहित्य इंग्रजीलाही भरपूर काही देऊ शकेल, पण ‘मराठीतून इंग्रजीत’ या प्रवासातून कोणते प्रवाह दिसतात?

(संग्रहित छायाचित्र)

समीक्षा नेटके

‘मराठी भाषा दिवस’ ज्यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो, त्या वि. वा. शिरवाडकरांची एकही ललित साहित्यकृती अनुवादित स्वरूपात, इंग्रजीत पुस्तकरूपानं आलेली नाही. ‘कुसुमाग्रजां’च्या एकटय़ादुकटय़ा कवितांचे अनुवाद झालेही असतील; पण ज्याँ अनुईच्या बेकेटला ‘महंत’चं रूप देणारे, शेक्सपिअरच्या किंग लिअरचा मराठीत ‘नटसम्राट’ करणारे शिरवाडकर ‘इंग्रजीनं द्यावं- मराठीनं घ्यावं’ याच वाटेवर त्यांच्या जाण्याला २२ वर्ष होत आली तरीही राहिलेले आहेत. नाही म्हणायला ‘शेक्सपिअरच्या शोधात’ या त्यांच्या लेखसंग्रहाचा अनुवाद अरुण नाईक यांनी केला, तो ‘इन सर्च ऑफ शेक्सपिअर’ या नावानं (शब्दालय प्रकाशन, २०१२) पुस्तकरूप झाला.. आणि हो, ‘नटसम्राट’ चित्रपट म्हणून आल्यानंतर, ‘सबटायटल्स’द्वारे त्याचं इंग्रजीकरण झालं! पण मराठीची साहित्यसमृद्धी मराठीतच राहते, ती इंग्रजीला काही देत नाही, ही खंत काही केवळ कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्यापुरती मर्यादित नाही..

..कुसुमाग्रजांच्या पिढीतल्या किती तरी लेखकांची एक-दोनच पुस्तकं इंग्रजीत गेली. तीही अनेकदा, बरीच नंतर! त्यातल्या त्यात बरी स्थिती व्यंकटेश माडगूळकरांची. त्यांच्या ‘बनगरवाडी’चं ‘द व्हिलेज हॅड नो वॉल्स’ हे रूपांतर (‘अनुवादक : राम देशमुख’ अशा श्रेयासह, पण प्रकाशक मात्र या देशमुखांची ‘रा. ज. देशमुख आणि कंपनी’ नव्हे, तर ‘एशिया पब्लिशिंग हाऊस, दिल्ली’!) महाराष्ट्र राज्यस्थापनेपूर्वी – १९५८ सालीच- प्रकाशित झालं होतं. पुस्तक इंग्रजीत आल्यावर काय होतं, याची चुणूक या इंग्लिश बनगरवाडीनं दाखवली.. ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’मध्ये १९५९ साली या पुस्तकाचं परीक्षण परदेशी पत्रकार आणि भारत-अभ्यासक टाया झिन्किन यांनी केलं. माडगूळकरांनी अनेक प्रसंगांत नाटय़मयता न आणता वास्तववादी चित्रण केलंय याचं कौतुक या परीक्षणात होतंच; पण धनगरी खेडय़ाच्या या चित्रणातलं मुख्य पात्र परगावातून आलेल्या शिक्षकाचं आहे, आधुनिक शिक्षणाचं वारं लागलेला हा शिक्षक गावातले मतभेद मिटवून प्रगती साधू पाहातो आहे, याकडेही झिन्किन यांनी लक्ष वेधलं होतं. माडगूळकरांच्याच ‘वावटळ’चा अनुवाद पुढे प्रमोद काळे यांनी केला, तो ‘विण्ड्स ऑफ फायर’ या नावानं हिंद पॉकेट बुक्सनं १९७४ मध्ये प्रकाशित केला. पण ‘माणदेशी माणसे’ मात्र मराठीतच राहिली आहेत.

त्याच काळातले, सहसा प्रत्येक पांढरपेशा मराठी घरांमध्ये वाचले जाणारे अन्य लेखकही इंग्रजीत आले असते, तर? श्री. ना. पेंडसे यांचा ‘गारंबीचा बापू’च फक्त इंग्रजीत गेला (तोही १९५९ मध्ये हिंदीत आला होता, त्यानंतर बरोब्बर दहा वर्षांनी!); जयवंत दळवी यांनी मुंबई आणि कोकणातल्या मनुष्यस्वभावाचे नमुने दाखवून ज्या छोटेखानी पुस्तकाद्वारे उत्तम सामाजिक दस्तावेजीकरण केलं आहे, त्या ‘सारे प्रवासी घडीचे’ची गत माणदेशी माणसांसारखीच झाली होती, पण त्याचा अनुवाद ‘युसिस’ (आता अमेरिकन सेंटर)मधले दळवींचे एके काळचे सहकारी प्रभाकर लाड यांनी १९९८ मध्ये केला. दळवींच्या ‘चक्र’वर उत्कृष्ट हिंदी चित्रपट झाला, पण मुंबईतल्या सर्वहारांनी अस्तित्वाच्या धडपडीतही टिकवलेल्या मानवी लालसांचं दर्शन घडवणारी ती कादंबरी इंग्रजीत कधी आली नाही. मधु मंगेश कर्णिकांची ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी ‘माहीमनी’ खाडी होऊन गुजरातीत गेली, पण इंग्रजीत नाही. ही खाडी ओलांडल्यावर खेरवाडीत भाऊ पाध्यांचा ‘वासूनाका’ लागतो, तोही नाहीच गेला इंग्रजीत.

भाऊ पाध्ये किंवा कर्णिक हे शिरवाडकरांच्या पिढीतले नाहीत, पण विंदा करंदीकर तर नक्कीच त्या पिढीतले होते आणि कुसुमाग्रजांप्रमाणेच ‘ज्ञानपीठ’मानकरीही होते. विंदांनी स्वत:च्याच कवितांचे अनुवाद ‘सम पोएम्स ऑफ विंदा’ आणि ‘सम मोअर पोएम्स ऑफ विंदा’ या नावांनी केले. पण विंदांच्याच देहात राहणारे इंग्रजीचे प्राध्यापक गो. वि. करंदीकर यांनी ‘अनुवादानं मूळ संहितेशी इमान राखलंच पाहिजे’ अशी कठोर अट घातलेली दिसते.. करंदीकरांनी गटेच्या ‘फाउस्ट’चा मराठी अनुवाद केला, तोही असाच- करडी शिस्त पाळणारा! त्यामानानं विंदांच्या नंतरचे द्वैभाषिक साहित्यिक – म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग आणि किरण नगरकर- अधिक मोकळे होते. कोलटकरांचा ‘जेजुरी’ हा एकाच दीर्घकवितेचा अनुभव देणारा काव्यसंग्रह पहिल्यांदा इंग्रजीत आला, पण त्यांच्या मृत्यूनंतर ‘जेजुरी’चं मराठी रूपही पुस्तकरूपानं प्रकाशित झालं, तेव्हा ‘आधी मराठी की आधी इंग्रजी?’ असा वादही कुणाला घालावासा वाटला नाही इतके कोलटकर मराठीत दुर्लक्षित राहिले होते आणि तिकडे इंग्रजीत याच कोलटकरांवर परिसंवाद झडत होते, त्यांच्यावर पीएचडय़ा होत होत्या आणि भारतीय साहित्यातल्या बहुकेंद्री आधुनिकतेचं एक केंद्रस्थान कोलटकर आहे, असं मानणारं ‘अरुण कोलटकर अ‍ॅण्ड लिटररी मॉडर्निझम इन इंडिया’ हे पुस्तकही ‘ब्लूम्सबरी’तर्फे प्रकाशित झालं होतं. नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ किंवा ‘रावण आणि एडी’सुद्धा मराठीत आधी आली, पण ‘ककल्ड’ किंवा ‘जसोदा’ मात्र आधी इंग्रजीत आल्या. ‘ककल्ड’चं मराठी भाषांतर रेखा सबनीस यांनी केलं आणि ‘जसोदा’ (२०१७) येण्याआधीच, २०१६ मध्ये सबनीस यांचं निधन झालं. पण मराठीतली दोन्ही पुस्तकं मात्र स्वत: नगरकरांनीच अनुवादित- किंवा इंग्रजीत पुनर्लिखित- केली आहेत. विलास सारंग मात्र दोन्ही भाषांतले अनुवाद स्वत:च करत होते. उदाहरणार्थ, ‘एन्कीच्या राज्यात’ ही १९७०च्या दशकातली सारंगांची गाजलेली कादंबरी ‘इन द लॅण्ड ऑफ एन्की’ म्हणून १९९३ मध्ये इंग्रजीत आली. पुढे ‘एन्की’तल्या अस्तित्ववादापासून सारंग मॅजिकल रिअ‍ॅलिझमकडे वळले, हे दाखवून देणाऱ्या ‘तन्दूर सिंडर्स’ या छोटेखानी इंग्रजी कादंबरीचा ‘तन्दूरच्या ठिणग्या’ हा अनुवाद सारंगांनीच केला. आजारपण वगैरेत सारंगांचा ‘मॅनहोलमधला माणूस’ मात्र मराठीतच राहिला आहे. विषयांतराचा दोष पत्करून हे नमूद केलं पाहिजे की, अशी दूरदर्शी द्वैभाषिकता, ललितेतर किंवा वैचारिक मराठी साहित्यात फक्त सत्यशोधक-मार्क्‍सवादी शरद् पाटील यांनीच दाखवली. त्यांची किमान तीन पुस्तकं ‘मावळाई प्रकाशना’तर्फे इंग्रजीतही उपलब्ध आहेत.

सारंग, चित्रे आदींचे समकालीन भालचंद्र नेमाडे. त्यांच्या ‘कोसला’चा अनुवाद ‘ककून’ या नावानं सुधाकर मराठे यांनी केला. त्यानंतरच्या ‘बिढार’ (ऑन द मूव्ह), ‘जरीला’ (द कास्ट्राटो), ‘झूल’ (केपरायझन) आणि ‘हूल’ (रूमर्स) या चांगदेव-चतुष्टयातील चारही कादंबऱ्यांचे अनुवाद संतोष भूमकर यांनी २०१३ ते १६ दरम्यान केलेले आहेत. या भूमकरांनीच केलेला, हरि नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो!’चा ‘बट हू केअर्स’ हा अनुवाद प्रकाशित झाला असला, तरी शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘अक्करमाशी’च्या अनुवादासाठी (द आऊटकास्ट) भूमकर अधिक परिचित आहेत.

त्या त्या वेळच्या मराठी साहित्यिकांचे अनुवाद त्यांच्या हयातीत होण्याचं प्रमाण मराठीत (मल्याळम्, बंगाली या भाषांच्या मानानं) कमी आहे, पण गाजलेली- समाजाचा आणि संस्कृतीचा दस्तावेज ठरणारी पुस्तकं अनुवादित होण्याचं प्रमाण अलीकडल्या काळात समाधानकारक म्हणावं इतकं आहे. एकीकडे गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ची एक नव्हे तर दोन इंग्रजी पुस्तकरूपं (‘ट्राव्हेल्स ऑफ १८५७’ हा सुखमणी राय यांनी केलेला संपादित अनुवाद- २०१२; ‘अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ अ ब्राम्हीन प्रीस्ट’ हा प्रिया आडारकर व शांता गोखलेकृत अनुवाद- २०१४) उपलब्ध आहेत, ‘खरेमास्तर’ या ‘विभावरी शिरुरकर’ यांच्या पुस्तकाचा अनुवाद १९९८ मध्येच आलेला आहे, शांता गोखले यांनी केलेला ‘श्यामची आई’चा अनुवाद गेल्या महिन्यातच पेंग्विननं बाजारात आणला, तर दुसरीकडे ‘बलुतं’, ‘उपरा’ आदी  दलित आत्मचरित्रांचे अनुवाद, ‘मी जात चोरली होती’ या बाबुराव बागुलांच्या कथासंग्रहाचा आणि मल्लिका अमरशेखांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’चा अनुवादही झाला आहे. नामदेव ढसाळांच्या कवितांचे दिलीप चित्रे यांनी केलेले अनुवाद ‘नवयान’सारखी संस्था प्रकाशित करतेच, पण ढसाळ वा नारायण सुर्वे यांच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद एरवीसुद्धा अनेक जण करत असतात.

आणखीही एक प्रवाह आहे. जुन्या पिढीनं वाचलेली पुस्तकं नव्या मराठीभाषक, पण वाचक नसलेल्या पिढीसाठी उपलब्ध करून देणारा प्रवाह, असं त्याला म्हणता येईल. जेरी पिंटो किंवा शांता गोखले यांनी केलेले अनुवाद त्यात मोजता येणार नाहीत, पण बडोद्याचे प्राध्यापक विक्रान्त पांडे यांचं नाव या प्रवाहासाठी आवर्जून घ्यावं लागेल. त्यांच्या अनुवादकार्याची सुरुवातच स्वयंप्रेरणेनं झाली होती (कुणा प्रकाशकानं सांगितलं म्हणून नव्हे) आणि ती प्रेरणा ‘पुढल्या पिढीनं हे इंग्रजीत तरी वाचावं’ अशी होती. रणजित देसाई, व. पु. काळे, ना. सं. इनामदार, विश्वास पाटील यांची पुस्तकं पांडे यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली आहेत.

वर उल्लेखलेला प्रवाह ‘नॉस्टाल्जिया’चा- स्मरणरंजनाचा असेल, तर त्याच्या अगदी उलट- समकालीन आणि आजच्या विषयांवर लेखन करणारे सचिन कुंडलकर, अवधूत डोंगरे अशा लेखकांच्या इंग्रजी अनुवादांचा प्रवाहसुद्धा अलीकडे दिसू लागला आहे. कदाचित या नव्या दमाच्या प्रवाहातून पुढे प्रणव सखदेव, आसाराम लोमटे यांच्याही पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद होतील!

‘सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत’ हा मराठी वाक्प्रचार आहे.. त्या चालीवर ‘अनुवादांची धाव लोकप्रिय पुस्तकांपर्यंत’ अशी स्थिती आज इंग्रजीतून मराठीत अनुवादित होणाऱ्या पुस्तकांविषयी दिसतही असेल; पण या लेखाला त्याच चालीवरलं शीर्षक का दिलं? हे समजण्यासाठी ‘अ रन फॉर ट्रान्स्लेशन्स’ असं या शीर्षकाचं भाषांतर करून पाहा.. मराठी भाषेतलं साहित्य इंग्रजीलाही भरपूर काही देणार आहे, हा आशय त्यातून उलगडावा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:03 am

Web Title: article on translation of marathi archives abn 97
Next Stories
1 अव-काळाचे आर्त : घडू नये ते घडले!
2 परिचय : मुंबईचा दस्तावेज..
3 बुकबातमी : वाढत्या वाचकांसाठी ‘अमर चित्र कथा’चा नवअवतार!
Just Now!
X