‘काय हुकूमशाही? एकाधिकारशाही कसली? एकाधिकारशाहीचा अर्थ तरी कळतो का ?’ असे काहीबाही सवाल समोरून होणार, अशा भीतीपायी जगभरचे बरेच जण ‘सध्या आपला प्रवास एकाधिकारशाहीकडे सुरू आहे’ यासारखी निरीक्षणं आपापसातच नोंदवतात. पण अ‍ॅनी अ‍ॅपलबॉम यांना असा प्रश्न  कुणी विचारू धजणार नाही.  हुकूमशाही हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय. स्टालिनकाळातल्या ‘गुलाग’ छळछावण्या, १९४४ ते १९५६ या काळात ‘एकीकरणा’च्या नावाखाली पूर्व युरोपीय देशांत फिरलेला साम्यवादी वरवंटा, या भूतपूर्व साम्यवादी देशांची १९८९ नंतर झालेली दैना आणि तिथल्या नेतृत्वात (इलियन चॉसेस्क्यू ते विक्टर ओब्रान) भिनलेली प्रवृत्ती, या साऱ्यांचा अभ्यास करणारी चार पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. खूप तपशिलांनी भरलेलं तरीही वाचनीय लिखाण करणाऱ्यांपैकी अ‍ॅनी अ‍ॅपलबॉम या एक, त्यामुळेच त्या पुलित्झर पारितोषिक विजेत्याही ठरल्या होत्या वगैरे. आपल्या जयपूर लिटफेस्टला त्या येऊन-जाऊन असत, तेव्हा ज्या भारतीयांनी अ‍ॅनी यांचं नाव अनोळखी असूनही त्यांचं सत्र ऐकलं, त्यांनी पुढे अ‍ॅनींची पुस्तकं नाही तरी नैमित्तिक लिखाण नक्की वाचलं असेल. ‘द अ‍ॅटलांटिक’मध्ये त्या स्तंभलेखन करतात. या अ‍ॅनी अ‍ॅपलबॉम यांचं नवं पुस्तक ‘ट्वायलाइट ऑफ डेमोक्रसी- द सिडक्टिव्ह ल्युअर ऑफ ऑथोरिटेरियनिझम’ या नावाचं आहे.. एकाधिकारशाही ‘लुभावते’ म्हणजे काय करते? कुणाला लुभावते? नेतेच की लोकांनाही? याचा हा धांडोळा. तो फक्त रशियापुरता किंवा अ‍ॅनी आता अमेरिकन आहेत म्हणून अमेरिकेपुरता नव्हे. ब्रिटन, स्पेन, पोलंड  आदी एकमेकांपेक्षा भिन्न इतिहास असलेल्या देशांमध्येही एकाधिकारशाहीची भुरळ कशी आणि का आहे, याचा ताळेबंद मांडणारं हे पुस्तक आहे. ‘अ‍ॅटलांटिक’च्या स्तंभात, ताज्या अंकातही ‘गप्प राहणारे एकाधिकारशाहीलाच सामील होतात’ अशा शीर्षकाचा लेख त्यांनी लिहिला आहे. केवळ राजकीय धुसफूस व्यक्त करणाऱ्यांपैकी अ‍ॅनी नव्हेत. एकाधिकारशाही म्हणजे नेमक्या कोणकोणत्या प्रवृत्ती, याचा तगडा अभ्यास त्यांनी केला आहे आणि त्या बळावर आता वर्तमानाकडे त्या पाहात आहेत.  केवळ राजकारणी मंडळीच नव्हे तर पत्रकार आणि बुद्धिजीवी हेदेखील लोकशाहीला अंतर देऊ लागले आहेत, आणि एकाधिकारशाहीला या लोकांमुळे देखील वाट मिळते आहे, हे प्रतिपादन त्यांच्या या आगामी पुस्तकातही आहे.

लोकशाहीवादच धोक्यात आल्याचं सांगू पाहणाऱ्या अ‍ॅनी अ‍ॅपलबॉम एकटय़ा नाहीत.  हा धोका ‘इथे आणि आत्ता’ असल्याचं सांगणाऱ्या  अ‍ॅनी यांचं पुस्तक जुलैच्या मध्यावर बाजारात येणार आहे (प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस) तेव्हाच त्यांचा सूर निराळा कसा, हे कळेल!