|| वीरेंद्र तळेगावकर

बँक, विमा, म्युच्युअल फंड, वित्त अशा चार क्षेत्रांत जवळपास चार दशके मुशाफिरी करणाऱ्या नीलेश साठे यांचा जीवनप्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो…

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

एखादी गोष्ट धरून ठेवली की त्याचा मुळात संवेदनशील असलेल्या मानवप्राण्याला अधिक त्रास होतो. विपणनसारख्या सतत अस्वस्थ असलेल्या आणि विम्यासारख्या क्षणाक्षणाला जीवनमृत्यूची आठवण करून देणाऱ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नीलेश साठे यांचा मात्र नेमका उलटा मार्केटमंत्र आहे. आयुष्यातील संकटातून बाहेर पडा आणि मग बघा यश तुमचेच आहे, हा तो कानमंत्र. बँकेतील कारकून ते सरकारी कंपनीचा संचालक-मुख्याधिकारी या प्रवासादरम्यान आलेल्या स्वानुभवातून साठे हे समस्तांना ‘नेव्हर गिव्ह अप’ सांगतात. व्यक्तिगत आयुष्यात कर्करोगावर तीन वेळा मात करून उतारवयातही तोच चुणचुणीतपणा ते आपल्या त्याच शीर्षकाच्या आत्मचरित्रवजा पुस्तकातून दाखवतात. वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू झालेल्या आव्हानांची मालिका अगदी निवृत्तीपर्यंत साथसंगत करत असताना साठे यांनी- ‘हरायचे नाही, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कायम प्रयत्नरत राहायचे’ हे बिंबवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.

बँक, विमा, म्युच्युअल फंड, वित्त अशा चार क्षेत्रांत जवळपास चार दशके मुशाफिरी करणाऱ्या नीलेश साठे यांचा जीवनप्रवास या पुस्तकातून समोर येतो. विमा, म्युच्युअल फंडसारख्या वित्त (गुंतवणूक) उत्पादनांचे विपणन करताना आलेले अनुभवच नव्हे, तर काही सल्लेही या पुस्तकातून साठे यांनी दिले आहेत, ते विशेषत: तरुण पिढीला, कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यात निश्चितच मार्गदर्शक आहेत. साठे यांची विमा वा म्युच्युअल फंड क्षेत्रातील कारकीर्द जवळून पाहणारे त्यांचे आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील ज्येष्ठ सहकारी एस. बी. माथूर, एलआयसीचे विद्यमान अध्यक्ष एम. आर. कुमार, आयसीआयसीआय बँकेचे मुख्याधिकारी संदीप बक्षी यांची पुस्तकातील स्तुतिसुमने साठे यांचे कर्तृत्व अधोरेखित करतात.

नीलेश साठे हे या पुस्तकाचे नायक असले, तरी त्यांच्या घडण्यामागे प्रेरणा आहे ती त्यांच्या आईची. वयाच्या २६व्या वर्षी आलेले वैधव्य, दोन लहानग्यांची जबाबदारी, अट्टहासाने ग्रामीण भागात आणि तेही शिक्षकी पेशा निवडणाऱ्या आईबाबत वाचकांना काही तरी सांगावे, हा ‘नेव्हर गिव्ह अप’चा खरा उद्देश, असे साठे सांगतात. शालेय जीवनातील संघर्ष, आई-बहिणीकडून मिळणारे पाठबळ यांचा साठे यांनी वेळोवेळी पुस्तकात उल्लेख केला आहे. एखादी घटना, त्या अनुषंगाने होणारे स्थित्यंतर, बदलणारी माणसे, आलेली संकटे यांचा क्रम देताना तो सविस्तर, अगदी स्थलकालाच्या मोजपट्टीवर पुस्तकात आहे. सहकार्य करणाऱ्या वा अडथळे आणणाऱ्या व्यक्तींबाबतचे प्रसंग रेखाटताना त्यात कुठेही मत्सर जाणवत नाही. उलट परिस्थितीला हाताळण्याची सचोटीच दिसून येते. जनसंपर्काच्या आधारावर विपणनासारख्या क्षेत्रात झालेला लेखकाचा प्रवासही अधूनमधून काही तरी शिकवण देऊन जातोच.

आईच्या शिकवणीचे वर्णन करताना ती कठोर स्वभावाच्या माध्यमातून वडिलांचीच भूमिका वठवत होती, याची पूर्ण जाणीव लेखक करून देतो. यासाठी शिक्षिका असलेली आई आपल्या मुलाची परीक्षेतील उत्तरपत्रिकाही घरी तपासायला आणत नाही, संध्याकाळी घरी वेळेत आला नाही म्हणून रात्रभर मुलाला घराबाहेर ठेवते, असे प्रसंग वाचताना ‘श्यामची आई’ डोळ्यांपुढे तरळते. ही सारी शिस्त आपल्याला पुढे उपयोगी पडली, हे लेखक मान्य करतो.

लेखकाचा बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँकेसारख्या राष्ट्रीयीकृत बँकांतून सुरुवात करून एलआयसी, एलआयसी म्युच्युअल फंडमध्ये अनुक्रमे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकात वाचायला मिळतो. लेखकास ‘इर्डा’ या विमा नियामक प्राधिकरणावर प्रतिनिधित्व करण्याची संधीही कारकीर्दीच्या शेवटाकडे मिळाली. या साऱ्या प्रवासातले लेखकाने वेचलेले अनुभव शहाणीव देणारे आहेत. नोकरीच्या निमित्ताने वर्ष-दोन वर्षांच्या आत होणारी बदली, जुन्या-नव्या ठिकाणचे भौगोलिक अंतर, सुटणारी-नव्याने मिळणारी माणसे या साऱ्यांचा लेखकाने उत्सुकतेतून स्वीकार केल्याचे पुस्तकाच्या जवळपास प्रत्येक प्रकरणातून जाणवते.

काही बाबतींत लेखकाने नामोल्लेख टाळला असला, तरी अनेक बाबतींत किरकोळ घटना, प्रसंग नमूद केले आहेत. मात्र ते पाल्हाळ वाटत नाही. सोपी इंग्रजी, आयुष्याचे प्रकरणागणिक टप्पे, प्रत्येक प्रकरणाअंती खास सल्ले आदी या छोटेखानी पुस्तकाचा लज्जतदार मेनू आहे. पहिल्या पानापासून दिसून येणारे सविस्तर विश्लेषण या लेखकाच्या जीवनप्रवासाबाबतची उत्कंठा वाढवत नेते. आव्हानांचा सामना करण्यासाठीचे बळ वाचकाला हे पुस्तक नक्कीच देईल.

veerendra.talegaonkar@expressindia.com