झोरा नील हर्स्टन या लेखिकेबद्दल आपल्याकडे माहिती असण्याची शक्यता तशी कमीच आहे. याचे कारण झोरा ज्या देशाची नागरिक होती, त्या अमेरिकेतही तिच्याबद्दल फारशी कुणाला माहिती नव्हती. १९७५ मध्ये अमेरिकन कादंबरीकार अ‍ॅलिस वॉकरने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील या लेखिकेविषयी व तिच्या साहित्याविषयी लिहिल्यानंतर ‘वाचणाऱ्यां’च्या जगात झोराचे नाव माहीत झाले. मग तिच्या कादंबऱ्यांच्या अभ्यासाची, तिच्या इतर लेखनावरील चर्चाची एक लाटच येऊन गेली, आणि लवकरच ओसरलीही. मात्र या आठवडय़ात आलेल्या एका बातमीमुळे झोराचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बातमी झोराच्या एका प्रकाशित होऊ न शकलेल्या पुस्तकाची आहे. हे अप्रकाशित पुस्तक आता, तब्बल आठ दशकांनंतर, प्रकाशित होते आहे. हार्पर कॉलिन्स ही नामांकित प्रकाशनसंस्था झोराचे हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

विविध साहित्य प्रकारांत मुशाफिरी केलेली झोरा ही खरे तर मानववंशशास्त्राची अभ्यासक. तिच्या या अभ्यासविषयाशी निगडित, पण तरीही अपार करुणेने भरलेले आणि तितकेच संवेदनशील निबंधलेखनही तिने केले आहे. झोराच्या आफ्रिकन-अमेरिकन असण्याचा प्रभावही तिच्या लेखनविषयांवर दिसून येतो. तिचे आता प्रकाशित होऊ घातलेले पुस्तकही या साऱ्याच्या जवळ जाणारे आहे. हे पुस्तक आहे अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या शेवटच्या आफ्रिकी माणसाविषयी. त्याचे नाव कुजो लेविस.. हे त्याचे अमेरिकेत नोंदले गेलेले नाव. मात्र त्याचे मूळ नाव होते- कोझोला. पश्चिम आफ्रिकेतील बेनिन प्रांताचा रहिवासी असलेल्या कोझोलाला १८६० साली ‘क्लॉटिल्ड’ या गुलाम वाहतुकीच्या जहाजातून अमेरिकेत आणले गेले. कोझोलाबरोबर असे आणखी ११५ जण होते, जे गुलामीच्या खाईत लोटले जाणार होते. अमेरिकेच्या अल्बामा प्रांतात या साऱ्यांना उतरवले गेले. तिथे जहाजाचा कप्तान जेम्स मीहर व त्याच्या नातेवाईकांकडे ते गुलाम म्हणून राबू लागले. मात्र त्याच वर्षी अब्राहम लिंकन अध्यक्षपदी निवडून आले आणि लवकरच, म्हणजे १८६५ साली गुलामपद्धतीला मूठमाती देण्यात आली. कोझोला व त्याचे साथी मुक्त झाले. त्यातल्या अनेकांना पुन्हा आपल्या मायदेशी जायचे होते, मात्र ते शक्य झाले नाही. मग या साऱ्यांनी तिथल्या मोबाइल या शहरात वसती केली. (त्यांच्या वस्तीला अलीकडेच, २०१२ साली ‘आफ्रिका टाउन’ अशी ओळख मिळाली आहेच, शिवाय अमेरिकेतील ऐतिहासिक ठिकाणांमध्येही त्याची नोंद झाली आहे.) पुढे १८६८ मध्ये कोझोला व त्याच्या साथीदारांना रीतसर अमेरिकन नागरिकत्वही मिळाले.. गुलाम म्हणून अमेरिकेत आलेल्या कोझोलाला तब्बल ९५ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. गुलामगिरीचा इतिहास अभ्यासणाऱ्या अनेकांसाठी तो संदर्भव्यक्ती ठरला. अनेकांना त्याने माहिती पुरवली. विशेष म्हणजे, आपल्या बालपणी आफ्रिकेत ऐकलेल्या अनेक लोककथा त्याला आयुष्याच्या शेवटातही लख्खपणे आठवत होत्या. त्या कथाही त्याने अनेकांना सांगितल्या. इम्मा रोश आणि आर्थर हफ फॉसेट ही त्यातील ठळक नावे, ज्यांनी त्या छापूनही आणल्या.. तर असा हा कोझोला आणि त्याची कहाणी.

कोझोला ज्या अल्बामा प्रांतात राहात होता, त्याच प्रांतात झोरा हर्स्टनचाही जन्म झालेला. तिने आधी १९२७ मध्ये त्याची भेट घेतली, त्या वेळी झालेल्या चर्चेवर आधारित एक लेखही तिने त्या वेळी लिहिला होता. मात्र त्यात रोश किंवा फॉसेट यांच्याकडील माहितीपेक्षा फारसे निराळे काही नव्हते. त्यामुळे नंतर १९३१ मध्ये जवळपास तीन महिने तिने कोझोलाच्या सहवासात घालवली. त्याला बोलते केले. त्या वेळी वयाच्या नव्वदीत असलेल्या कोझोलानेही झोराला काही निराळी माहिती पुरवली. गुलाम म्हणून अमेरिकेत येतानाचे जहाजप्रवासातील ४५ दिवस, त्याचे साथीदार, मग गुलामीचे दिवस, पुढे त्यांनी केलेली वस्ती, आफ्रिकी लोककथा अशी माहिती त्याने झोराला दिलीच. मात्र यात हेलावून टाकणारी एक बाब त्याने झोराला सांगितली. तो ज्या आफ्रिकी प्रांतातून (आताच्या नायजेरियातून) वयाच्या विसाव्या वर्षी गुलाम म्हणून अमेरिकेत आला, तिथल्या त्याच्या लोकांची आठवण त्याला कायम येते, असे त्याने झोराला सांगितले. ताटातुटीच्या ७० वर्षांनंतरही आणि वयाच्या नव्वदीतही कोझोलाला घरच्या- ‘त्याच्या’ माणसांची- आठवण येणे, त्यांच्याकडे पुन्हा जावेसे वाटणे.. हे सारे नात्याचे आणि संस्कृतीचे बंध किती घट्ट असतात, हेच सांगणारे आहे. हे सारे झोराने लिहायला घेतले. ‘बॅराकून’ या शीर्षकाने ते हस्तलिखित झोराने लिहूनही ठेवले होते. मात्र काही कारणाने ते प्रकाशित होऊ शकले नाही.

..आणि आता तब्बल आठ दशकांहूनही अधिक काळानंतर ते हस्तलिखित पुस्तकरूपात प्रकाशित होते आहे. त्यातून गुलामगिरीच्या क्रूरपणाचे चित्र समोर येईलच, शिवाय कोझोलाच्या मनाचा कोशही उघडेलेला असेल. मात्र ते सारे वाचण्यासाठी पुढील वर्षीच्या मेपर्यंत वाट पाहावी लागेल.