News Flash

‘पानिपता’चे चित्रचरित्र

पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दलची बरीच विवेचक पुस्तके आजवर लिहिली गेली, पण हे पुस्तक विवेचनाबरोबर दृश्य-इतिहासावरही भर देणारे आहे..

‘बॅटल ऑफ पानिपत : इन लाइट ऑफ रीडिस्कव्हर्ड पेंटिंग्स’ लेखक : मनोज दाणी प्रकाशक : मंकी हिल पृष्ठे : १५२, किंमत : १,४५० रुपये

निखिल बेल्लारीकर

मराठी माणसाला पानिपताबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अफगाणांमध्ये झालेल्या या लढाईतील पराभवाने मराठी मनावर खोल परिणाम केला. या लढाईवर आधारित ‘संक्रांत कोसळणे’, ‘पानिपत होणे’ यांसारखे अनेक वाक्प्रचार मराठीत रूढ आहेत. मराठय़ांच्या उत्तरेकडील अनिर्बंध सत्ताविस्ताराला आळा घालणारी ही लढाई सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. या लढाईचे महत्त्व तत्कालीन भारतात आणि भारताबाहेरही अनेकांना उमगल्यामुळे मराठी, फारसी, फ्रेंच, इंग्रजी आदी अनेक समकालीन ऐतिहासिक साधनांत याचा तपशीलवार उल्लेख आढळतो. एकप्रकारे पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास हा लढाईनंतर लगेचच लिहून ठेवण्यास सुरुवात झाली. फारसी साधने व मराठी बखरींखेरीज, ग्रँट डफसारख्यालाही पानिपतचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या नारो भगवंत कुलकर्णी याची मुलाखत घेणे आवश्यक वाटले होते. पुढे विसाव्या शतकातही मराठय़ांच्या हरियाणातील वंशजांवर काहींनी लिहून ठेवले आहे. फक्त पानिपताला वाहिलेले असे पहिले विवेचक पुस्तक इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी लिहिले. अलीकडे डॉ. उदय कुलकर्णी व आता मनोज दाणी यांची यावर पुस्तके आली आहेत.

यातही मनोज दाणी यांच्या ‘बॅटल ऑफ पानिपत : इन लाइट ऑफ रीडिस्कव्हर्ड पेंटिंग्स’ या पुस्तकाचा बाज अगोदरच्या पुस्तकांपेक्षा पूर्णच वेगळा आहे. पानिपतच्या लढाईमागील तात्कालिक व दीर्घकालीन कारणे, सदाशिवरावभाऊचा पानिपतपर्यंतचा प्रवास, लढाई व त्यातील पराभवाची कारणे, दोषदिग्दर्शन अशा नेहमीच्या चाकोरीत अडकून न पाहता दाणी यांचा भर ‘व्हिज्युअल हिस्टरी’ अर्थात दृश्य-इतिहासावर आहे. बहुतेकदा मराठेशाहीचा इतिहास म्हटला की- काही अपवाद वगळता- चित्रांचे विश्लेषण मराठेशाहीच्या संदर्भात केले जात नाही. ही एक मोठीच उणीव दाणी यांनी या पुस्तकाद्वारे दूर केलेली आहे. पुस्तक तीन भागांत विभागले आहे. पहिल्या भागात संबंधित ऐतिहासिक साधनांचा थोडक्यात आढावा घेऊन, त्याखेरीज मराठे व अफगाण सैन्यांचे स्वरूप, साधारण रचना याचे विवेचन आहे. दुसऱ्या भागात या पूर्ण मोहिमेशी संबंधित असलेल्या वीसेक मुख्य राजे व सरदारांची बव्हंशी अप्रकाशित चित्रे व त्या त्या व्यक्तीचा पानिपतातील ‘रोल’ संक्षिप्तपणे वर्णिला आहे. तिसऱ्या व शेवटच्या भागात उपलब्ध साधनांच्या आधारे लढाईचे तपशीलवार वर्णन दिलेले आहे.

पहिल्या भागात पानिपताशी संबंधित मराठी, फारसी व युरोपीय साधनांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. मराठी साधनांच्या तुलनेत उर्दू/फारसी साधने मात्र ठरावीकच वापरली गेली, उदा. काशीराज व मुहम्मद शामलू यांचे ग्रंथ वगळता अन्य उर्दू/ फारसी साधनांचा विशेष वापर झालेला आढळत नाही. यांखेरीज पुस्तकात तब्बल पंचवीसेक साधनांची यादी दिलेली आहे. यातील काही साधने अफगाणी, तर उर्वरित भारतीय असून काही प्रत्यक्षदर्शीनी लिहिलेली आहेत. यातील बहुतांशी अपरिचित साधने असून, जिज्ञासूंना पुढील संशोधनासाठी याची खचितच मदत होईल. तीच बाब उद्धृत केलेल्या इंग्रजी व फ्रेंच साधनांची.

यानंतर एका अतिमहत्त्वाच्या दस्तावेजाचे सखोल विश्लेषण या पुस्तकात आहे. पुणे पुराभिलेखागारात पानिपत मोहिमेचा १९ मार्च १७६० ते १४ जानेवारी १७६१ पर्यंतच्या जमाखर्चाचा पूर्ण ताळेबंदच उपलब्ध आहे. नेमक्या आकडेवारीच्या तपशीलवार विवेचनापुढे अप्रत्यक्ष व तुटपुंज्या पुराव्यावर आधारित युक्तिवाद साहजिकच गळून पडतात. लढाईकरिता एकूण ९० लाख रुपये जमवले गेले, त्यातही ७७ लाख मोहिमेदरम्यान गोळा झाले. या ७७ लाखांपैकी मराठय़ांच्या अमलाखालील प्रदेशातून २५ लाख, तर कुंजपुरा, दिल्ली आदी ठिकाणांहून लुटीचे मिळून १८ लाख रुपये मिळाले. विविध सावकारांकडून १७ लाखांचे कर्ज घेण्यात आले व अन्य मार्गानी उरलेले पैसे उभे करण्यात आले. यांपैकी एकूण ७७ लाख रु. खर्च झाले. या ७७ लाखांपैकी तब्बल ४९ लाख हे लष्करी कारणांसाठी खर्च झाले, विविध प्रकारचे खर्च २६ लाख, तर राजकीय नजराणे व धार्मिक दानधर्म यांकरिता दोन लाख रु. खर्च करण्यात आले. यावरून स्पष्ट होते की, दानधर्माकरिता उत्पन्नाच्या तुलनेत अतिरिक्त खर्च झाला नव्हता. लष्करी खर्चाचे विश्लेषण केल्यास हुजुरातीची संख्या फक्त साडेतीन हजार व शिलेदार वीस-पंचवीस हजार इतके पेशव्यांचे घोडदळ येते. इब्राहिम खानाच्या सातेक हजार गारद्यांचा खर्चही यात येतो. याखेरीज शिंदे-होळकर आदींच्या सैनिकांचा उल्लेख येत नाही, कारण त्यांचा पगार पेशव्यांकडून येत नसे. परंतु पेशव्यांकडून कैक सरदारांना काही हजार ते काही लाख रुपये दिल्याचेही ताळेबंदात नमूद आहे. हे सगळे तपशील मांडून दाणी यांनी काढलेले विविध निष्कर्ष मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.

दुसऱ्या भागात येतात ती वीसेक राजे व सरदारांची चित्रे. हा या पुस्तकाचा सर्वात मोठा भाग असून तितकाच महत्त्वाचाही आहे. मराठे, अफगाण/ रोहिले, रजपूत, जाट, गारदी, मुघल आदी सत्तांमधील कैकजणांनी पानिपत मोहिमेत या ना त्या प्रकारे महत्त्वाची कामगिरी बजावली. मराठय़ांपैकी रघुनाथराव, नाना फडणवीस, दत्ताजी व महादजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, मल्हारराव होळकर, सटवोजी जाधवराव, विश्वासराव, नारोशंकर, सदाशिवराव या दहा जणांचा समावेश असून, अफगाणांपैकी अहमदशाह अब्दाली, शाहवलीखान वजीर, शाहपसंदखान, हाफिझ रहमतखान, अहमदखान बंगश, नजीबखान रोहिला यांचा समावेश आहे. याखेरीज माधोसिंग व बिजेसिंग, सूरजमल जाट, सुजाउद्दौला, इब्राहिम खान गारदी यांचीही चित्रे आहेत. प्रत्येक व्यक्तीची एक किंवा जास्त चित्रे देऊन त्याबरोबर पानिपत मोहिमेतील त्यांचे नेमके स्थान वर्णन केलेले आहे. यातील बहुतेक चित्रे मराठी वाचकांस अज्ञात आहेत. यात अनेक प्रकारच्या चित्रांचा समावेश आहे. एकल व्यक्तिचित्रांबरोबरच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींशी वाटाघाटी करत असतानाची चित्रेही अनेक आहेत; उदाहरणार्थ, विश्वासराव व नानासाहेब पेशवे नारोशंकराबरोबर वाटाघाटी करतानाचे चित्र. कधी जयपूरनरेश माधोसिंग बुद्धिबळ खेळताना दिसतो, तर कधी हुक्का ओढताना सटवोजी जाधवराव. लढायांचीही अनेक चित्रे आहेत; उदाहरणार्थ, सूरजमल जाटाच्या कुंभेरी किल्ल्याला वेढा घालताना खंडेराव होळकरांचे चित्र अतिशय तपशीलवार काढलेले आहे. सिंदखेडच्या लढाईत दत्ताजी शिंदे यांचेही चित्र तसेच आहे. शनिवारवाडय़ाच्या दिल्ली दरवाजाचेही १८२० सालचे चित्र असून, त्याआधारे आतील काही इमारतींचे अनुमान करण्यास मदत होते. नाना फडणवीसांच्या मोडी आत्मचरित्राच्या हस्तलिखिताचीही काही चित्रे आहेत. अफगाणांचीही अनेक चित्रे असून, लाहोरमधील झमझमा तोफेचे छायाचित्रही विशेष रोचक आहे, कारण ही तोफ अब्दालीचा वजीर शाहवलीखानच्या आदेशावरून ओतवली गेली असून, यासाठीचे तांबे व पितळ हे जुलमी जिझिया कराच्या माध्यमातून गोळा केले होते. नजीबाचेही एक लहानसे चित्र पुस्तकात दिलेले आहे. या साऱ्यातून तत्कालीन चित्रकलेतील संकेत, वस्त्रे, रत्ने, स्थापत्य आदी अनेक गोष्टींची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माहिती मिळते. चित्रांतून हा इतिहासाचा विस्तृत पट दाणी यांनी उत्तमरीत्या मांडला आहे.

तिसऱ्या भागात प्रत्यक्ष लढाईचे विवेचन येते. जुन्या उल्लेखांवरून व नकाशांवरून दाणी यांनी लढाईच्या जागेची निश्चिती केलेली आहे. उग्राखेडी गावानजीक मुख्य लढाई झाली असावी असे त्यावरून दिसून येते. पानिपत शहराजवळील युद्धस्मारकापासून ही जागा लांब आहे. यानंतर अफगाण सैन्य लढाईसाठी कूच करतानाचे एक सुंदर चित्र पुस्तकात येते. त्यात अब्दाली आणि शुजा यांची सैन्ये शेजारी दाखवली असून, दोहोंच्या सैन्यांतील फरक लक्षणीय आहेत. अब्दालीच्या सैन्यात एकही हत्ती दाखवलेला नसून, त्यात जंबुरके आणि बंदूकधाऱ्यांची संख्या जास्त आहे.

खुद्द लढाईचे विश्लेषण तीन उपविभागांत येते. पहिल्या भागात, मराठय़ांनी अब्दालीच्या सैन्यावर, विशेषत: बरकुरदारखान, शाहवलीखान आदींच्या सैन्यांवर यशस्वीरीत्या हल्ला चढवला याप्रसंगीचे एक मोठे तपशीलवार चित्रही दिलेले आहे. मराठय़ांवर हल्ला करताना अब्दालीसह विविध अफगाण सरदार आणि पानिपत शहरात भाऊ व सैन्य, दोन्ही बाजूंचे तोफखाने, आदी अनेक बारीकसारीक तपशील त्यात दिसतात. दुसऱ्या भागात, अफगाणांनी मराठय़ांवर निर्णायक हल्ला चढवला त्याप्रसंगीचे वर्णन येते. विवेचनाबरोबरच मराठय़ांचा तळ, त्याभोवतीच्या खंदकात प्रेतांचा पडलेला खच आणि त्याभोवती वेढणारे अफगाण सैन्य, इत्यादी विविध तपशील बारकाईने दर्शवणारे एक रोचक चित्रही येते. तिसऱ्या भागात लढाईनंतरच्या घटनांचे वर्णन येते. मराठय़ांच्या अपयशाचे तात्कालिक कारण थोडक्यात सांगताना- पुरेशा प्रमाणात हुजुरात पागा नसणे, इब्राहिम खानाचे गारदी सैन्य जवळपास पूर्णपणे नष्ट होणे, अन्य सरदारांनी शेवटपर्यंत साथ न देता पलायन करणे, वगैरे नमूद करत लढाई जिंकण्यासाठी भाऊने काय करणे आवश्यक होते याचीही चर्चा पुस्तकात केली आहे. त्यात हुजुरातीची संख्या जास्त असल्यास निकाल बदलू शकला असता, हा निष्कर्ष चिंतनीय आहे. सरतेशेवटी, मराठे पानिपत जिंकले असते तर काय झाले असते, या प्रश्नाचाही थोडक्यात समाचार घेतला असून, त्यामुळे इतिहासात विशेष फरक पडला नसता असे लेखक म्हणतात. लढाईच्या विवेचनानंतर लेखकाने २००८ साली पुण्यात सापडलेल्या एका सुवर्णनाण्यांच्या हंडय़ाचेही थोडक्यात वर्णन केले आहे. यात अब्दालीने पाडलेली नाणी असून, १७६०-६१ साली मराठय़ांनी दिल्लीत पाडलेल्या काही मोहोराही आहेत. पानिपताशी संबंधित व महाराष्ट्रात सापडलेला हा पहिलाच नाणकशास्त्रीय पुरावा असल्याने याचे महत्त्व मोठे आहे.

पानिपत मोहिमेचे विविध पैलू अशा प्रकारे या पुस्तकातून दिसतात. सर्वसामान्य वाचक व संशोधक या दोहोंसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे.

nikhil.bellarykar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:07 am

Web Title: battle of panipat in light of rediscovered paintings book review abn 97
Next Stories
1 अव-काळाचे आर्त : चालती-बोलती गर्भाशयं..
2 महिंद्राचा ‘थार’दार प्रवास!
3 बुकबातमी : बंगाली आधुनिकतेचा अर्क..
Just Now!
X