‘बिहाइंड द सीन्स: कंटेम्पररी बॉलीवूड डायरेक्टर्स अ‍ॅण्ड देअर सिनेमा’ पुस्तक हातात घेतानाच पहिलं लक्ष जातं ते पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच्या दोन्ही संपादकांच्या नावाकडे. बॉलीवूड त्याच्या बहुरंगी, बहुढंगी आणि बहुधर्मीय फॅब्रिकमुळे देशातली एक ‘सेक्युलर’ इंडस्ट्री म्हणून ओळखलं जातं. ज्याप्रमाणे न्यूयॉर्क जगाचं ‘मेल्टिग पॉट’ म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे बॉलीवूडसुद्धा भारतीय ‘मेल्टिग पॉट’ म्हणून ओळखलं जायला हवं. या पुस्तकाचं संपादन करणारे आयेशा इक्बाल विश्वमोहन आणि विमल मोहन जॉन हे दोघे अशाच बहुरंगी पाश्र्वभूमीचे आहेत. त्यांची प्रकर्षांने वेगळी जाणवणारी नावं हा त्यातला फक्त एक घटक आहे .

व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असणाऱ्या आणि फेसव्हॅल्यूवरून गोष्टींबद्दल मत बनवणाऱ्या आपल्या समाजात सिनेमातल्या नायक-नायिकांना जवळपास देवाचा दर्जा मिळणं हे तसं साहजिकच. एकूण जगभरातच ‘स्टार्स’चा बोलबाला असला तरी आपल्या व्यक्तिपूजक समाजात नटांबद्दलचं प्रेम एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलं आहे. आपल्याकडे सिनेमाला नायकाच्या किंवा फारच अपवादात्मक परिस्थितीत नायिकेच्या नावाने ओळखलं जातं. पण दिग्दर्शक हा सिनेमा नावाच्या जहाजाचा कप्तान असतो हे आपल्या बहुतेक प्रेक्षकांच्या गावीही नसतं. अशा सिनेसाक्षरतेचा अभाव असणाऱ्या आपल्या देशात ‘बिहाइंड द सीन्स’सारखं देशातल्या सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांचा विस्तृत आढावा घेणारं पुस्तक येणं, हे सुखावणारं आहे.

हे पुस्तक अनेक दृष्टींनी वैशिष्टय़पूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार, संगीताचे सुवर्णयुग वगैरे स्मरणरंजनात न जाता सद्य:कालीन दिग्दर्शकांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचे अतिशय विस्तृत आणि अभ्यासू विश्लेषण करतो. यात तब्बल १९ दिग्दर्शकांचा समावेश आहे. ही दिग्दर्शकांची यादी मोठी रोचक आहे. विधू विनोद चोप्रा, मणिरत्नम आणि मन्सूर खानसारखे मोजके अपवाद वगळता या पुस्तकात नोंद घेतलेल्या बहुतेक दिग्दर्शकांचं चित्रपटसृष्टीतलं पदार्पण जागतिकीकरण भारतात आल्यानंतरच्या काळात झालं आहे. आणि बहुतेकांना आपला सूर २००१ नंतर-  भारतात वेगळ्या चित्रपटांची लाट आल्यानंतर- गवसला आहे. यात बहुतांश पुरुष दिग्दर्शक असले तरी दीपा मेहता आणि फराह खानसारख्या महिला दिग्दर्शकसुद्धा आहेत. आदित्य चोप्रा आणि फराह खान सारखं पलायनवादी (एस्केपिस्ट) सिनेमा बनवणारे दिग्दर्शक आहेत, त्याच वेळी अनुराग कश्यप आणि विशाल भारद्वाजसारखे वास्तवपूर्ण सिनेमा बनवणारे दिग्दर्शकदेखील आहेत. उत्तर भारतीय पाश्र्वभूमी असणारे असे अभिषेक चौबे आणि हबीब फैसलसारखे दिग्दर्शक आहेत आणि ज्यांची मुळं दक्षिण भारतात आहेत असे मणिरत्नम आणि श्रीराम राघवनसारखे दिग्दर्शकही आहेत. अनपोलोजेटिकपणे शहरी जाणिवा असणारे फरहान अख्म्तर आणि झोया अख्म्तर आहेत, तर ग्रामीण भागात कथानक घडवणारे अभिषेक चौबेसारखे दिग्दर्शक आहेत. संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकरसारखे इतिहासात रमणारे दिग्दर्शक आहेत तर होमी अदजानिया आणि ओनीरसारखे समकालीन भवतालाशी इमान राखून चित्रपट बनवणारे दिग्दर्शकही आहेत. मराठी वाचकाला सुखावतील अशी मधुर भांडारकर, आशुतोष गोवारीकरसारखी नावंदेखील या यादीत आहेत. आश्चर्य याचं की, रामगोपाल वर्मा आणि दिबांकर बॅनर्जीसारखी नावं या दिग्दर्शकांच्या यादीत नाहीत! ही वैयक्तिक तक्रार आहे; पण या दोघांचंही भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे. सुधीर मिश्रा, विधू विनोद चोप्रा या नावांच्या जागी हे दोघे यादीत असते तर पुस्तक अजून परिपूर्ण झालं असतं असं वाटतं (अर्थात हे वैयक्तिक मत आहे. आणखी कुणाला मिश्रा आणि चोप्राचा समावेश योग्य वाटत असेल तर तेही मान्य आहेच). यादीत काही लोकांचं नसणं मात्र एकदमच समजण्यासारखं आहे. सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर हे एक तसंच नाव. करणच्या कॅण्डी फ्लॉस सिनेमा स्कूलच प्रतिनिधित्व करणारा आदित्य चोप्रासारखा दिग्दर्शक, ज्याच्या सिनेमाचा भारतीय समाजावरचा प्रभाव (तो प्रभाव मापणे या पुस्तकाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे) हा वैयक्तिक डिटेलिंग वगळून हा करणच्या सिनेमासारखाच असल्याने इथं करणची अनुपस्थिती खटकत नाही. पण सर्व दिग्दर्शकीय शैलींचा, लिंगभावाचा, सिनेमातल्या भवतालाचा ताळमेळ साधण्याच्या प्रयत्नात पुस्तकात एक हवाहवासा विरोधाभास तयार झाला आहे हे नक्की.

या यादीतले मन्सूर खानचा अपवाद वगळता सर्वच लोक सध्या दिग्दर्शनामध्ये कार्यरत आहेत. मन्सूर मात्र शहरी अतिस्पर्धात्मक आयुष्याला कंटाळून, दिग्दर्शकीय कारकीर्दीला तिलांजली देऊन दक्षिण भारतातल्या एका रम्य ठिकाणी स्थायिक झाला आहे. मन्सूर खान सध्या जे काही करतो तो एका मोठय़ा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वोही सिकंदर’सारख्या चित्रपटांमधून तरुणाईला भुलवणारा हा दिग्दर्शक सध्या कुन्नूरमध्ये वास्तवाला असून ‘मिनिमल लिव्हिंग’ पद्धतीची जीवनशैली अंगीकारत आहे. त्याने २०१३ मध्ये लिहिलेल्या ‘द थर्ड कव्‍‌र्ह’ या पुस्तकाला आजही मोठी मागणी आहे. २००८ च्या जागतिक मंदीनंतर जगासमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न आणि त्याचा तुमच्या-आमच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर मन्सूरने ‘द थर्ड कव्‍‌र्ह’ या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत लिहिलं आहे. मन्सूर सध्या वेगवेगळ्या आयआयएम संस्था, याहूसारख्या कॉर्पोरेट संस्था, सिम्बायोसिससारख्या शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी या विषयावर भाषण देत फिरत असतो. मन्सूरच्या या दोन्ही बाजूंचा आढावा आयेशा इक्बाल विश्वमोहनने फार सुंदरपणे घेतला आहे.

पुस्तकातल्या लेखांचं वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकावरचा लेख वेगवेगळ्या लेखकाने लिहिला आहे. त्यामुळे शैलीतून येणारा एकसुरीपणा या पुस्तकात औषधालाही नाही. पुस्तकात समाविष्ट दिग्दर्शकांच्या कामाचं अतिशय मार्मिक विश्लेषण ही या पुस्तकाची जमेची बाजू. उदाहरणार्थ राजकुमार हिराणीच्या सिनेमाच्या सगळ्या चित्रपटांमधला एक समान दुवा म्हणजे प्रचलित आणि घट्ट झालेल्या व्यवस्थेमध्ये एक ‘आऊटसायडर’ शिरतो आणि त्या व्यवस्थेला वळण लावतो असं निरीक्षण हिराणीच्या चित्रपटांचं विश्लेषण करून प्रसिद्ध समीक्षक भारद्वाज रंगन इथं मांडतो, तेव्हा ते अगदी पटतं. अभिषेक चौबेच्या समीक्षकांनी नावाजलेल्या आणि एका विशिष्ट प्रेक्षकवर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘इश्किया’ चित्रपटातल्या क्रिष्णा या भारतीय पडद्यावर आलेल्या बहुतेक सर्वाधिक कणखर स्त्रीपात्राची ‘शोले’मधल्या गाजलेल्या दोन्ही हात नसणाऱ्या ठाकूरच्या पात्राशी असणारी अनेक साम्यस्थळं कृपा शांडिल्य या लेखिकेने इतकी सुंदरपणे दाखवून दिली आहेत की निव्वळ त्यासाठी आवर्जून हे पुस्तक विकत घ्यावं. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांनंतरही आपल्या सिनेमातल्या कथानकांवर नेहरूव्हियन समाजवादाचा मोठा प्रभाव होता. श्रीमंत लोकांची पात्रं बहुतेक वेळा खलनायकी स्वरूपाची, सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करणारी अशी दाखवली जायची. धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती अशा विचारसरणीचा वर्षांनुवर्ष पगडा आपल्या चित्रपटांच्या कथानकावर होता. नखशिखान्त  श्रीमंत असणारे आणि जगातल्या सगळ्या सुखसुविधा ज्यांच्यासमोर हात जोडून उभे आहेत असे निर्माते दिग्दर्शकच गरिबीचं उदात्तीकरण करणारे चित्रपट बनवायचे हे विशेष. भरपूर पसा बाळगण्याबद्दल एकूणच न्यूनगंड असणाऱ्या देशात फरहान अख्म्तर आणि झोया अख्म्तर यांनी श्रीमंत लोकांच्या गोष्टी सांगणारे सिनेमे अनपोलोजेटिकपणे बनवायला सुरुवात केली. ही एक प्रकारची छोटी क्रांतीच होती. अजूनही अनेक- आम्ही  ‘गंभीरपणे’ चित्रपट पाहतो असा दावा करणाऱ्या- लोकांमध्ये फरहान आणि झोयाच्या सिनेमाबद्दल बराच राग आहे. ‘असं कुठं असतं का? श्याम बेनेगलचे सिनेमे बघा जरा’ असं विधान माझ्या एका शिक्षकांनी केल्याचं आठवतं. फरहान आणि झोयाच्या सिनेमातली पात्रं मन मानेल तेव्हा विदेशात फिरायला जातात, दक्षिण मुंबईमधल्या उच्चभ्रू भागात राहतात, त्यांच्या समस्या या अन्न-वस्त्र-निवाऱ्याशी संबंधित नसून बहुतेक नातेसंबंधांशी निगडित असतात. हिंदी सिनेमाच्या कथानकांमध्ये अशी क्रांती आणणाऱ्या फरहान आणि झोयाच्या सिनेमांमागच्या प्रेरणांचं या पुस्तकातलं विश्लेषण जबरदस्त आहे. ओनीर या दिग्दर्शकाचा या यादीतला समावेश अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. ओनीरच्या लैंगिकतेविषयी अनेक कुजबुजगप्पा सुरू असतात. स्त्री आणि पुरुष दिग्दर्शकांचा पुस्तकात समावेश असताना ओनीरवरचा या पुस्तकातला लेख या पुस्तकाला एक सर्वसमावेशकपणा आणतो. ‘माय ब्रदर निखिल’ आणि ‘आय अ‍ॅम’सारखे ओनीरचे चित्रपट लैंगिकतेच्या वेगवेगळ्या पलूंवर आणि विशेषत: समलैंगिकतेवर भाष्य करतात. या दृष्टीने तो या यादीतल्या इतर अनेक दिग्दर्शकांपेक्षा खूप वेगळा आहे. दिग्दर्शक म्हणून आणि एक माणूस म्हणूनही. अलका कुरियनने घेतलेला दीपा मेहता या दिग्दíशकेच्या सिनेमांचा आढावा हे पुस्तक विकत घेण्याचं आणखी एक कारण ठरावं. दीपा मेहता बॉलीवूडमध्ये दोन अर्थानी आऊटसायडर आहे. एक तर पुरुषप्रधान फिल्म इंडस्ट्रीमधल्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या स्त्री दिग्दर्शकांमध्ये ती आहे. शिवाय ती कॅनडाची नागरिक आहे. तिच्या ‘फायर’ आणि ‘वॉटर’सारख्या चित्रपटांनी आपल्याकडे मोठा वादाचा धुरळा उडाला होता.  तिच्यावर टीका करणारे तिच्या या आऊटसायडरपणाचं मोठं भांडवल करतात. पण वसाहतोत्तर कालखंडात स्त्रियांच्या दृष्टिकोनातून चित्रपटातली कथानकं दाखवणारी एवढी सशक्त स्त्री दिग्दíशका आपल्याकडे दुसरी नाही. पण बाहेरच्या जगात तुम्ही आपल्या देशाचं वाईट चित्रीकरण मुद्दाम पुरस्कारांसाठी दाखवतात, असा सत्यजित रे यांच्या काळापासून लागत आलेला आरोप तिच्यावर पण हिरिरीने लावला जातो. पण दीपा मेहताचा सिनेमा या आरोपांना कसा दशांगुळे पुरून उरतो हे हा लेख स्पष्ट करतो. या पुस्तकातले अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज आणि हबीब फैसलवरचे लेखदेखील अभ्यासू आणि विशेष उल्लेखनीय.

एकूणच जागतिकीकरण भारतात आल्यावर आपल्या पूर्वीच्या सोशल फॅब्रिकला मुळापासून हादरवणारे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल होत गेले त्याचं प्रतिबिंब या सगळ्या दिग्दर्शकांच्या सिनेमामध्ये ठळकपणे पडलं आहे. त्या अर्थाने हे पुस्तक एक प्रकारे देशामध्ये होत गेलेल्या बदलाचंही डॉक्युमेंटेशन करतं. चित्रपट समीक्षक, मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी, ज्यांना चित्रपट समीक्षक बनण्याची इच्छा आहे असे होतकरू तरुण यांनी हे पुस्तक वाचणं अतिशय आवश्यक आहे. चित्रपटविषयक लिखाण म्हणजे फक्त चित्रपट समीक्षण असा जो एक समज वाढत चालला आहे, त्याला हे पुस्तक नक्की छेद देईल. हे पुस्तक वाचत असताना मराठीत असं पुस्तक का होऊ शकलं नाही याची एक खंत मनात दाटत जाते. मराठी सिनेमात ठसा उमटवणाऱ्या पण उमेश कुलकर्णी, नागराज मंजुळे, रवी जाधव, निशिकांत कामत अशा कित्येक दिग्दर्शकांवर आणि त्यांच्या कामावर एक अतिशय उत्तम पुस्तक बनू शकतं. पण त्यासाठी मराठी पुस्तक प्रकाशनविश्वाला स्मरणरंजनाच्या दुस्तर घाटातून बाहेर यायला हवं असं वाटतं. शेवटी नॉस्टॅल्जियासुद्धा महत्त्वाचा आहेच पण सद्य सिनेमावर आणि दिग्दर्शकांवर लिखाण होणं हे तितकंच किंबहुना किंचित जास्त आवश्यक आहे . ‘बिहाइंड द सीन्स : कंटेम्पररी बॉलीवूड डायरेक्टर्स अ‍ॅण्ड देअर सिनेमा’ हे पुस्तक या धर्तीवरचं लिखाण करण्यासाठी नवोदित मराठी लेखकांना प्रेरणा देईल हे नक्की.

  • ‘बिहाइंड द सीन्स: कंटेम्पररी बॉलीवूड डायरेक्टर्स अ‍ॅण्ड देअर सिनेमा’
  • संपादक : आयेशा इक्बाल विश्वमोहन, विमल मोहन जॉन
  • प्रकाशक : सेज
  • पृष्ठे : ३९२, किंमत : ९५० रुपये

अमोल उदगीरकर

amoludgirkar@gmail.com