|| प्रतिभा रानडे

पाकिस्तान हे राष्ट्र काय आहे, तेथील राज्यकर्ते कसे आहेत आणि तेथील सामान्य जनता कशी जगते.. अशा प्रश्नांचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक माहितीपूर्ण, मार्गदर्शक आहेच; पण पाकिस्तान हे उदारमतवादी, लोकशाहीवादी, सर्वधर्मसमभावी राष्ट्र न होता एका ‘भयानक स्वप्ना’कडेच त्याची वाटचाल कशी झाली, ते पाकिस्तानी समाज, संस्कृती आणि साहित्य-कलांचा वेध घेत हे पुस्तक दाखवून देते..

पाकिस्तान हे राष्ट्र काय आहे, कसे आहे, तेथील राज्यकर्ते कोण, ते कसे, तेथील सामान्य जनता कशी जगते.. अशा प्रश्नांनी जगभरच्या अनेकांना भंडावून सोडले आहे. याच प्रश्नांचा शोध रझा रुमी या पाकिस्तानी लेखकाच्या ‘बीइंग पाकिस्तानी : सोसायटी, कल्चर अ‍ॅण्ड द आर्ट्स’ या लेखसंग्रहात घेतला गेला आहे. रझा रुमी हे शिक्षक-पत्रकार.  तिथल्या ‘डेली टाइम्स’ या वृत्तपत्राचे ते आता संपादक आहेत. पाकिस्तानातील राजकीय-सामाजिक-धार्मिक धोरणे, साहित्य, कलाप्रांत आणि सांस्कृतिकतेचा शोध घेणारे लेखक अशी त्यांची ओळख. त्यांच्या लेखनामुळे, भाषणांमुळे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला; पण त्या वेळी त्यांच्या गाडीचा चालक मारला गेला अन् रुमींचा जीव वाचला. मग ते अमेरिकेत स्थायिक झाले. आजवर त्यांची ‘दिल्ली बाय हार्ट : इम्प्रेशन्स ऑफ अ पाकिस्तानी ट्रॅव्हलर’, ‘द फॅ्रक्शिअस पाथ : पाकिस्तान्स डेमोक्रेटिक ट्रान्झिशन’, ‘आयडेण्टिटी, फेथ अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘बीइंग पाकिस्तानी’ या नव्या पुस्तकात त्यांनी ‘पाकिस्तानी’ असणे म्हणजे काय, याचा शोध घेतला आहे.

भक्ती पंथ, साहित्य आणि कलाप्रांत यांविषयीच्या पहिल्या तीन प्रकरणांनंतर लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांवरचे दोन लेख आहेत. मनोगतात लेखकाने म्हटले आहे :  ‘पाकिस्तानी असणे म्हणजे एका थरावरचे दुसरे थर, वैविध्य आणि विरोधी भूमिका. फाळणीनंतर पाकिस्तानला भारतापासून स्वत:ची अशी वेगळी ओळख सिद्ध करावी लागली. ती एक विचित्र धडपड होती. धर्म, संस्कृती, भाषा, इतिहास हे सारे सारखेच असताना, त्यातून स्वत:ची ओळख वेगळी काढणे हे फार गुंतागुंतीचे. पाकिस्तानची भौगोलिकता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सुरक्षिततेचा मुद्दा यांमुळे पाकिस्तान लष्करशाही, दहशतवादापर्यंत घसरलाय.’ रुमी यांनी अखेरीस म्हटलेय की, ‘या पुस्तकामुळे पाकिस्तानचे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिकतेचे वैविध्य यांची दखल वाचक घेतील.’

पहिल्या प्रकरणात कबीर, बुल्लेशाह आणि लालन या भक्तिपंथीयांची ओळख करून दिली आहे. या त्रिमूर्तीला लेखक ‘अपवित्र’ (अनहोली) म्हणतात! कारण तिघांनीही ईश्वराचा, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा, मानवतेचा शोध घेताना धर्माला नाकारलेच. तिघांच्याही काव्यामधून धर्मनिष्ठा मागे पडली. शिल्लक राहिला तो ईश्वरापेक्षा माणसांमधल्या निरपेक्ष प्रेमाचा शोध! कबीराने हिंदी आणि उर्दू भाषांत रचना केल्या. बुल्लेशाह हा उर्दू भाषिक, तर लालनच्या रचना बंगाली भाषेत. या भाषांची पाळेमुळे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील. इतिहासाने आता सरहद्दी आखल्या असल्या, तरी त्यांच्या रसरशीत भूतकाळाचा शोध घ्यायलाच हवा, असे रुमी म्हणतात.

सिंधू नदी म्हणजे पाकिस्तानची जीवनदायिनी. सिंधू नदीकाठच्या हडप्पा, मोहेंजो-दारो इथल्या उत्खननात प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा सापडल्या. त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्तीदेखील सापडल्या होत्या. सिंधू नदीच्या काठावरच हिंदूंचा ‘ऋ ग्वेद’ लिहिला गेला. रावळपिंडीपासून काही अंतरावर वसलेल्या तक्षशिला या संस्कृत भाषेच्या विद्यापीठातून ग्रीक, रोमन, चिनी लोकदेखील शिकून जायचे. याशिवाय पाकिस्तानभर विखुरलेली हिंदू देवदेवतांची मंदिरे, पाकिस्तानच्या निर्मितीआधी तिथे लिहिले गेलेले समृद्ध साहित्य या साऱ्याची दखल घेऊन लेखक लिहितात : ‘पाकिस्तानच्या इतिहासाची पाळेमुळे सिंधू संस्कृतीशीच जोडलेली आहेत. भारताचा मानबिंदू असलेल्या सिंधू संस्कृतीशी पाकिस्तानचाही संबंध आहे. या संस्कृतीशी असलेल्या संबंधांचा विसर पाकिस्तानातील अनेक लेखक, कवी, चित्रकार, संगीतकारांनी पडू दिला नाही. आपापल्या कलाकृतींमधून त्यांनी त्याची दखल घेतली.’

पाकिस्तानचे अत्यंत लोकप्रिय कवी फैज अहमद फैज यांनी तेव्हाचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो यांना याचसंदर्भात एक अहवाल सादर केला होता. पाकिस्तानच्या वैभवशाली भूतकाळाचा भुट्टोंना एवढा अभिमान वाटला, की त्यांनी गौतम बुद्धाची छोटीशी ध्यानमग्न मूर्ती आपल्या कचेरीतील टेबलावर ठेवली. पण इस्लामवाद्यांकडून त्या अहवालाला प्रचंड विरोध झाला. तो अहवाल गुलदस्त्यातच ठेवला गेला आणि भुट्टोंनी आपल्या टेबलावरची बुद्धाची मूर्तीही काढली!

कुर्रतउल-ऐन हैदर या लेखिका, सआदत हसन मंटो, इन्तजार हुसैन हे नामवंत लेखक, मुस्तफा झैदी हे कवी, फहमिदा रियाझ या कवयित्री आदींच्या लेखनातून रुमी यांनी ‘पाकिस्तानीपणा’चा शोध घेतला आहे. सरहद्दीपल्याड राहणाऱ्यांचा धर्म, इतिहास, जीवनपद्धती, श्रद्धा, संस्कृती, परंपरा यांच्यात माणूस म्हणून आपल्याशी असलेले साधम्र्य पाहणारी ही मंडळी होती.

सआदत हसन मंटो म्हणजे धर्म आणि सरहद्दीच्या रेषेपलीकडे जाऊन मानवतेसाठी आत्यंतिक आर्ततेने लेखन केलेले लेखक. फाळणीच्या काळात अनेक लोक बेघर झाले. रक्ताचे पाट वाहिले. अत्याचाराने काळीमा आणला. त्याला वाचा फोडली मंटो यांनी. बायका-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांनी तर त्यांचे मन:स्वास्थ्यच बिघडले, इतके ते संवेदनाशील होते. मंटो यांच्या लेखनाचा वेध घेऊन रुमी म्हणतात : ‘भारत- पाकिस्तानातील विविध धर्म, भाषा, संस्कृतींच्या समाजाला मुक्ती मिळेल ती मंटो यांच्या कथांमधील मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करूनच.’

इन्तजार हुसैन आणि फहमिदा रियाझ यांच्या लेखनाला तपासून रुमी लिहितात : ‘दोन्ही देशांतील समाजाचे देणेघेणे असते ते धर्मापेक्षा भूमीशी. तेच त्यांचे नातेगोते.’ फहमिदा रियाझ या तर स्त्रीवादी. कट्टरवादी मुस्लिमांचा या सगळ्याच लेखकांना कठोर विरोध होतच असतो. त्यामुळे काही जण पाकिस्तानातून परदेशी निघून गेले. इन्तजार हुसैन यांनी मात्र विरोध, धमक्या सहन करून पाकिस्तानातच राहणे स्वीकारले. फहमिदा रियाझ  भारतात निघून आल्या. दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया संस्थेने त्यांना आसरा दिला. रियाझ यांच्या कविता दक्षिण आशियात पोहोचल्या. भारतातील वाढत्या धर्मवादाबद्दल ‘नया भारत’ या कवितेत रियाझ यांनी म्हटले : ‘हा भारत तर आमच्याचसारखा!’ उत्तर भारतातून प्रवास करताना त्यांनी तिथे उद्ध्वस्त झालेल्या मशिदी पाहिल्या, मंदिरे पाहिली होती. ‘पूर्वाचल’ कवितेत त्या म्हणतात : ‘ऐका कबिराचं। तो जे सांगतोय तेच ऐका। द्वेषाची युद्धं देत नाहीत मान ईश्वराला। राम आणि रहीम जातील निघून दूर। या भूमीपासून दूरवर।’

हबीब जालिब हे पराकोटीचे संवेदनशील, हिंमतवान आणि अत्यंत लोकप्रिय कवी. पाकिस्तानची स्थापना झाली त्याच दिवशी फैजने गझल लिहिली होती- ‘ज्या पहाटेची आम्ही वाट पाहात होतो, ती ही पहाट डागाळलेली आहे.’ हबीब जालिब यांनीदेखील इस्लामवादी, लष्करशाही असलेल्या पाकिस्तानचा धिक्कारच केला. एका कवितेत ते म्हणतात : ‘तीच अवस्था राहिलीय गरिबांची। मंत्र्यांचे दिवस मात्र बदललेत। प्रत्येक बिलावल कर्जबाजारी झालाय। प्रत्येक बेनझीर अनवाणी पायांनी चालतेय।’ बिलावल हा बेनझीर भुट्टोचा एकुलता मुलगा. बेनझीरला पंतप्रधान म्हणून मान्यता मिळाली ती लष्कराच्या आशीर्वादानेच. या कवितेतून जालिब यांनी तेथील राजकीय परिस्थितीचे स्पष्ट चित्रण केले. बेनझीरचा अर्थ ‘अनुपम’, तर बिलावलचा अर्थ ‘सामान्य माणूस’. म्हणजे राज्यकर्तीची जी अवस्था, तीच अवस्था सामान्यांची. त्याला कारण लष्करशाही. जालिब यांनी अशा प्रकारे इस्लामवाद्यांना सातत्याने विरोधच केला होता.

पुढे जनरल मुशर्रफ सत्तेवर आले. जनरल झियाच्या मानाने मुशर्रफ मवाळ वृत्तीचे. त्यांना साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला यांची आवड होती. झियाने कुलूपबंद केलेल्या राष्ट्रीय कलादालनाला त्यांनी पुन्हा चालू केले. प्रदर्शने, चर्चासत्रे होऊ लागली. परंतु सत्तेवर राहण्यासाठी मुशर्रफची कारकीर्द कठोर होऊ लागली. मुशर्रफ सत्तेवर असतानाच बेनझीर भुट्टोंना मारण्यात आले. तेव्हा ‘घराघरांतून भुट्टो जन्म घेतील, किती भुट्टोंना मारणार तू?’ ही इरफान सत्तारची कविता लोकांची अत्यंत आवडती झाली.

लेखकाने एका प्रकरणात दर वर्षी कराची आणि लाहोर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनांची दखल घेतली आहे. हुकूमशाही, वाढता इस्लामवाद यांच्याविरोधात साहित्यिक, कलावंतांची भाषणे-चर्चा तिथे होतात. रुमी यांनी लिहिले आहे :  ‘फेसबुक आणि इंटरनेटवरून दूरवरचे लोकही आपापल्या मतांची देवाणघेवाण करीत असतात. त्यामुळे समाजातील जागरूकता वाढते आहे. वाढत्या इस्लामी दडपणांमुळे होणारे अन्याय, अत्याचार यांविषयी लिहिल्या गेलेल्या बलुची कविता थेट इस्लामाबादपर्यंत, सर्वसामान्य पाकिस्तानींपर्यंत पोहोचू शकल्या, त्या फेसबुक-इंटरनेट आदी माध्यमांतूनच. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय व धार्मिक सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या अत्याचारांचा जाब विचारला जाऊ लागला.’ अशा साहित्याचा वेध घेऊन रुमी म्हणतात, ‘पाकिस्तानचे भवितव्य काय असेल ते असो, पण त्यांच्या दु:खांवर फुंकर घालण्याचे प्रयत्न साहित्यातून, काव्यातून होतच राहतील. ज्यांनी ती दु:खं भोगलीत, दुसऱ्यांची दु:खं समजून घेतलीत, ते व्यक्त होत राहतीलच.’

‘पाकिस्तान’ या कल्पनेने सिंधू संस्कृतीचा धिक्कारच केला. याचा उल्लेख करून रुमी यांनी दाखवून दिले आहे की, पाकिस्तानने चित्रकारीसारख्या कला प्रकारांमधील भागीदारीही नाकारून अरब संस्कृती व कलांचा अंगीकार केला. बॅरिस्टर जिनांची भव्य मजार बांधली गेली ती अरब वास्तुकलेच्या धर्तीवरच. लाहोर शहरातला व्हिक्टोरिया राणीचा पुतळा हटवला, त्या जागी कुराणाची मोठी लाकडी प्रतिकृती ठेवली. मात्र, हे सगळे सुरू असतानाच मेहदी हसन, रूना लैला अशा गायक-गायिकांच्या गाण्यांना जगाने स्वीकारले. रामायण-महाभारतसारखे क्रमश: प्रसारीत होणारे कार्यक्रम पाकिस्तानात पाहिले जायचे. भारतीय हिंदी चित्रपट, चित्रवाणीवरचे कार्यक्रम पाकिस्तानात आवडीने पाहिले जातात.

रझा रुमी यांचा जन्म लाहोरचा. तिथेच त्यांची वाढ झाली. पाकिस्तान सोडून अमेरिकेला जावे लागले, तरी त्यांची लाहोरची ओढ संपली नाही. त्याच आठवणींत ते रमतात. ‘लाहोर’ हे शहराचे नाव कसे झाले, याबद्दल त्यांनी लिहिलेय :  ‘श्रीरामाचा मुलगा लव. तोच इथला राज्यकर्ता झाला. लववरूनच लाहोर बनले.’ लाहोर शहरातील इमारती, रस्ते, गल्ल्या, तिथल्या शाळा- कॉलेज या साऱ्यांचे ते मनापासून कौतुक करतात. क्रांतिकारी भगतसिंग हेही लाहोरचेच, याची दखल रुमी आवर्जून घेतात.

बांगलादेशला भेट देण्याचा योग रुमी यांना आला. बांगलादेशची निर्मिती झाली, तेव्हा रुमी यांचा जन्मही झालेला नव्हता. त्यामुळे त्यावेळी तिथे झालेल्या आकांताची त्यांना जाणीव नव्हती. परंतु ढाक्याला गेल्यानंतर त्यांना बांगलादेशच्या निर्मितीमागचा रक्तरंजित इतिहास संपूर्णपणे कळला आणि ते हादरूनच गेले. त्या वेळी बंगाली भाषा, संस्कृती, संगीत, कलाप्रकार या सगळ्यांचा गळा घोटला गेला होता. कित्येकांना मारले गेले, स्त्रियांवर अत्याचार झाले. धर्म एकच असूनही. हे सगळे पश्चिम पाकिस्तानी लष्कराने केले होते. पूर्व पाकिस्तानची आर्थिक लूट करून त्यांच्यावर दारिद्रय़ लादले गेले होते. इतिहासाची ही बाजू त्यांना तिथे कळाली. बांगलादेशातील मुस्लीम स्त्रिया हिंदू स्त्रियांसारख्याच साडय़ा नेसून बुरखा न घालता उघडपणे वावरताना पाहून, तिथल्या कितीतरी मुस्लीम स्त्रिया नोकऱ्या, उच्च पदांवर काम करताना पाहून इस्लामवाद्यांच्या थोबाडीत मारल्यासारखे वाटले रझा रुमींना!

रझा रुमी हे पाकिस्तानी आहेत हे माहीत असूनही ते जिथे जिथे गेले तिथले बंगाली लोक त्यांच्याशी आपलेपणानेच वागले. ढाका शहरातील विद्यापीठ, काही ठिकाणी युद्धाच्या वेळी मारून टाकलेल्या लोकांचे उभारलेले स्मृतिस्तंभ रुमींनी पाहिले. हे सगळे पाहून-अनुभवून रुमी लिहितात : ‘जिनांचे स्वप्न होते ते लोकशाही, उदारमतवादी, सर्वधर्मसमभावी पाकिस्तानचे. वास्तवात मात्र पाकिस्तान हे भयानक स्वप्नच! जिनांचे स्वप्न पूर्ण केले ते बांगलादेशानेच!’

आज पाकिस्तानचे भारताशीच नाही, तर जगाशीही बिघडतच चाललेले संबंध, पाकिस्तानातील वास्तवाचे ताणेबाणे, साहित्यिक-कलावंत आणि सर्वसामान्यांची होणारी होरपळ.. हे सारे पाहता रुमी यांचे म्हणणे पटत जाते. रुमी हे ‘डेली टाइम्स’मधून पाकिस्तानात घडणाऱ्या, त्यांना अस्वस्थ करणाऱ्या घटनांवर स्पष्टपणे लिहीत असतात. त्यांचे लेखन वाचणाऱ्यांना पाकिस्तानचे दर्शन होईलच, पण त्याचबरोबर आरशात आपण आपल्यालाच पाहत आहोत असेही वाटेल!

  • ‘बीइंग पाकिस्तानी: सोसायटी, कल्चर अ‍ॅण्ड द आर्ट्स’
  • लेखक : रझा रुमी
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे: ३१२, किंमत : ३९९ रुपये

 

ranadepratibha@gmail.com