News Flash

क्रिकेटने शिकवलेले धडे…

‘बिलिव्ह’ म्हणजेच ‘विश्वास ठेव’ हाच संदेश भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सुरेश रैनाला दिला.

क्रिकेटने शिकवलेले धडे…
(संग्रहित छायाचित्र)

‘बिलिव्ह’ म्हणजेच ‘विश्वास ठेव’ हाच संदेश भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सुरेश रैनाला दिला. याच विश्वासाच्या बळावर रैनाच्या क्रिकेट कारकीर्दीला झळाळी आली. त्याने हातावर हा शब्द टॅटूरूपात गोंदूनही घेतला. २००५ साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून क्रिकेट पदार्पण करणाऱ्या रैनाने गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली, आणि आता या दीड दशकी कारकीर्दीकडे मागे वळून पाहणारे त्याचे आत्मकथनपर पुस्तक येत असल्याची बातमी सरत्या आठवड्यात आली. साहजिकच, ‘बिलिव्ह’ हा शब्द या पुस्तकाच्या शीर्षकस्थानी नसता तरच नवल! क्रीडा पत्रकार भरत सुंदरेसन यांच्या साहाय्याने लिहिलेल्या सुरेश रैनाच्या या आत्मकथनाचे शीर्षक आहे- ‘बिलिव्ह : व्हॉट लाइफ अ‍ॅण्ड क्रिकेट टॉट मी’!

रैनाचा भारतीय संघात समावेश झाला, तेव्हा सचिनसह राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सौरव गांगुली आदी अनुभवी खेळाडू संघात होते. या संघ सहकाऱ्यांशी तेव्हा नवखा असलेल्या रैनाचे मैत्रबंध जुळलेच, पण त्यांच्याकडून बरेच शिकायलाही मिळाले. मात्र, त्याआधीचा रैनाचा प्रवास आव्हानात्मक होता. शिक्षण घेताना रॅगिंगचा आणि क्रिकेट शिबिरात गुंडगिरीचा सामना त्याला करावा लागला. त्या अनुभवांबद्दल पुस्तकात वाचायला मिळेल.

एका वळणावर आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहिलेल्या या क्रिकेटपटूने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले पाय घट्ट रोवले आणि २०११ सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघातील तसेच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून तो नावारूपास आला. या सर्व प्रवासात धोनीचे नेतृत्व आणि मैत्रीला रैनाच्या कारकीर्दीत अनोखे महत्त्व आहे. गतवर्षी धोनीने ज्या दिवशी निवृत्ती पत्करली, त्याच दिवशी क्रिकेटला अलविदा करण्याचा रैनाचा निर्णय त्या मैत्रीचेच प्रतीक. त्यामुळे पुस्तकात ‘द धोनी टच’ हे स्वतंत्र प्रकरण येणे स्वाभाविकच; पण राहुल द्रविडवरील स्वतंत्र प्रकरणही या आत्मकथनात समाविष्ट आहे हे विशेष. तसेच भारतीय संघाचे वादग्रस्त ठरलेले माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल हेही पुस्तकातल्या एका प्रकरणाचे मानकरी ठरले आहेत; त्यात काही खुलासे होतील का, हा प्रश्न. अर्थात, त्याचे उत्तर येत्या १२ मे रोजी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच मिळेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:00 am

Web Title: believe what life and cricket to me book review abn 97
Next Stories
1 मुरलेला मुराकामी
2 अव-काळाचे आर्त : गॉर्डियन गाठीची गोष्ट…
3 बुकबातमी : मिथ्यकथांतला संस्कृतिशोध…
Just Now!
X