माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांच्या प्रशासकीय जीवनाचा हा प्रवास. सुमारे चार दशकांच्या वाटचालीचा आलेख जसा यात येतो, तसेच देशाच्या इतिहासातील अस्वस्थ काळाचे दर्शनही होते.

जीनिव्हात असताना मुंबईतून फोन येतो..

‘मी बाबासाहेब भोसले, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बोलत आहे. आपण यापूर्वी कधी भेटलो नाही, पण मला तुमच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून आपली नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.’ त्यावर, आपण कधी भेटलेलो नाही वा कधी आपले नावही ऐकलेले नाही. यामुळे ‘महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी’ बोलत आहे यावर विश्वास कसा ठेवणार’, हा प्रतिप्रश्न..

हा किस्सा सांगितला आहे, निवृत्त सनदी अधिकारी राम प्रधान यांनी. १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) प्रवेश केल्यापासून ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद अशी विविध पदे भूषविताना आलेले अनुभव ‘बियॉण्ड एक्स्पेक्टेशन्स’ या पुस्तकात मांडले आहेत.

प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरचे प्रशिक्षण, मुंबई राज्यात काम करताना आलेले अनुभव, यशवंतराव चव्हाण यांच्याशी प्रस्थापित झालेले उत्तम संबंध, संरक्षण मंत्रालय, व्यापार मंत्रालय, राज्याचे गृहसचिव, जहाजबांधणी विभागाचे महासंचालक, जिनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव व तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर काम करण्याची मिळालेली संधी, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल अशी पदे भूषविताना आलेले अनुभव या साऱ्यांचा पट प्रधान यांनी या पुस्तकात उभा केला आहे. सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव, राजकारण्यांशी संबंध यावरही प्रकाश टाकला आहे. प्रधान हे महाराष्ट्रातील असले तरी त्यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. १९७७ मध्ये जवळपास १५ वर्षांनंतर राज्याच्या सेवेत परतल्यावर गृह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली होती. वसंतदादा पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होते. दादांचे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा प्रधान यांना लागला होता. तसे त्यांनी वसंतदादांच्या कानावर घातले असता, ‘शरद पवार हा आपला माणूस आहे व त्यांच्या हालचाली किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी फार गांभीर्याने घेऊ नका’, असे वसंतदादांनी सांगितले होते. पण आठवडाभरातच दादांचे सरकार गडगडले. त्याआधी वसंतदादा मुख्यमंत्री तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री या दोन सत्ताकेंद्रांबरोबर काम करताना कशी तारेवरची कसरत करावी लागत होती, याचेही अनुभव प्रधान यांनी दिले आहेत.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राजीव गांधी मुंबईत आले असता विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या प्रधान यांच्याकडे गांधी यांनी आपण दिल्लीत काम करण्यास तयार आहात का, अशी विचारणा केली होती. थोडय़ाच दिवसांत त्यांनी नवी दिल्लीत गृहसचिवपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा पंजाब, आसाम आणि मिझोराम या तीन राज्यांमध्ये िहसाचार किंवा संघर्ष सुरू होता. पंजाब-प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी दिली असता, प्रथम राज्यपाल बदलण्याची व तेथे राजकीय व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली व राजीव गांधी यांनी ती मान्य केली. अर्जुनसिंग यांची राज्यपालपदी निवड झाली. पुढे पंजाबमध्ये शांततेसाठी करारही झाला. आसामचा तिढा सोडविण्यातही यश आले.

शेवटचा दिन गोड झाला!

मिझोरामचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. बंडखोरांचे नेते लालडेंगा यांचे तळ्यातमळ्यात सुरू होते. याबाबत प्रधानांनी लिहिले आहे, ‘वाटाघाटींच्या अनेक फेऱ्या झाल्या. ३० जून १९८६ हा निवृत्तीचा दिवस होता. साडेचार वाजता उत्तराधिकाऱ्याकडे पदभार सोपविणे आणि नंतर निरोप समारंभ, असा कार्यक्रम ठरला होता. दुपारी २.३० च्या सुमारास लालडेंगा हे नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात आले. गप्पांमध्ये कराराबाबत चर्चा झाली. माझ्या कार्यकाळातच शांतता करार व्हावा, अशी इच्छा लालडेंगा यांनी प्रदíशत केली. बघा तुमची तयारी असल्यास एवढेच पुटपुटलो. सहकाऱ्यांशी चर्चा करून साडेचापर्यंत परत येतो, असे सांगून लालडेंगा कार्यालयातून बाहेर गेले. ही बाब पंतप्रधान राजीव गांधी व गृहमंत्र्यांच्या कानावर घातली. जर करार दृष्टिक्षेपात येत असल्यास पदभार सोडू नका, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात निरोप समारंभ दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. साडेचार वाजता लालडेंगा त्यांच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. काही मुद्दय़ांवर अडले होते, त्यावर तोडगा काढण्यात आला. काही वेळातच लालडेंगा यांच्यासह ७, रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेलो. तेथे बठक झाली. थोडय़ाच वेळात सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बठक होऊन त्यात शांतता कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. एव्हाना रात्रीचे साडेआठ वाजल्याने आपली सेवा केव्हाच संपुष्टात आली, हे लक्षात आले. निवृत्त होण्यापूर्वी करार व्हावा, अशी इच्छा राजीव गांधी यांनी व्यक्त केली. विधी सचिवांना नियम विचारला. पदभार सोपविला नसल्यास मध्यरात्रीपर्यंत पदावर राहता येते, असे स्पष्ट केले. रात्री नऊच्या सुमारास भारत सरकार आणि मिझो बंडखोरांमध्ये झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि नंतरच निवृत्त झालो.’ पुस्तकात पुढे अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषवितानाचे अनुभवही कथन केले आहेत.

बियॉण्ड एक्स्पेक्टेशन्स

  • लेखक – राम प्रधान
  • प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • पृष्ठे – ५२२, किंमत – ६२५ रुपये

santosh.pradhan@expressindia.com