अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भाषणांची पुस्तके वा (स्वत:ची बाजू सावरणारे) आत्मपर पुस्तक निघाले, त्यावर अर्थातच लेखक म्हणून ‘बिल क्लिंटन’ हेच नाव होते. पण आता, ‘द प्रेसिडेंट इज मिसिंग’ या पुस्तकावर ‘बिल क्लिंटन आणि जेम्स पॅटरसन’ असे लेखकद्वयीचे नाव दिसणार आहे. अमेरिकेचे विद्यमान प्रेसिडेंट  डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून अंमळ ‘गहाळ’च असले, तरी ‘द प्रेसिडेंट इज मिसिंग’ हे पुस्तक ट्रम्प विषयी नाही बरे!

या पुस्तकाचे नायक आहेत प्रेसिडेंट डंकन. हे नाव काल्पनिक, कारण हे पुस्तक म्हणजे पूर्णत: काल्पनिक रहस्यकथा आहे. जेम्स पॅटरसन यांनी त्या-त्या क्षेत्रातील बडय़ा नावांसह अनेक कादंबऱ्यांचे ‘सहलेखन’केलेले आहे. त्या साऱ्याच कादंबऱ्या अमेरिकी प्रथेप्रमाणे ‘बेस्टसेलर’ ठरल्या आहेतच. त्यामुळे कितीही बालिश वाटली, तरी प्रेसिडेंट डंकनची ही कथादेखील गाजणार असे दिसते..

हा प्रेसिडेंट डंकन वेषांतर करून, भिवया जाड करणे वगैरे प्रकारांनी चेहराही बदलून कोणत्याही सुरक्षेविना फुटबॉल मॅच पाहायला जातो आणि विशिष्ट ब्रँडनावाचीच बीअर पितो (ज्यांना इथे ‘पोंबुप्र्याचा पंपू’ आठवेल, तेच खरे ‘पुलं’चे वाचक).. सारे त्याला शोधत असतात, पण हा ‘मिसिंग’! म्हणून पुस्तकाचे नाव हे असे. पण कथा एवढय़ावर थांबत नाही. या डंकनला जिवे मारू पाहणारी एक मदनिका या कादंबरीत आहे (म्हणजे चित्रपट नक्की!) शिवाय फिल्मी कथानकात शोभेलशा  ‘मानवी संहार करणाऱ्या, १९३० सालच्या महामंदीपेक्षाही अधिक आर्थिक फटका देणाऱ्या आणि मालमत्तेचे जबर नुकसान करणाऱ्या’ अशा सायबर-हल्ल्याचा धोका अमेरिकेला आहे, आणि त्या हल्ल्याची योजना आखणाऱ्या  जिहादी संघटनेच्या प्रमुखाशी खुद्द राष्ट्राध्यक्ष डंकनच दूरध्वनीवरून बोलले होते असे उघड झाले आहे. काय होणार पुढे? कथेचे नव्हे.. लेखक क्लिंटन यांचे !