साधनशुचिता, जनतेशी थेट संवाद, गरिबांच्या हिताची धोरणे, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाप्रति समर्पित भाव यातून नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अधोरेखित होते. केंद्राच्या योजनांचा लाभ लोकांना मिळतो आहे म्हणून भाजप व मित्रपक्षांना मते मिळतात.. मोदी हे विकास-विश्वासाचे दुसरे नाव ठरते!

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाने हे सिद्ध केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाने घराणेशाही, जातीयवाद आणि लांगूलचालनाच्या राजकारणावर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता देशाच्या राजकारणात विकासाचा मुद्दाच केंद्रबिंदू असेल. या यशाने हेही दाखवून दिले की, जनकल्याणासाठी जर तुम्ही समर्पित भावनेने काम करत असाल तर सत्ताविरोधी लाटही तुम्ही परतवून लावू शकता. खोटी आश्वासने, सवंग घोषणा याला जनता फसणार नाही हेच निकालातून स्पष्ट झाले. बिहारच्या जनतेने गुंडगिरीला थारा न देता विकासाचे राजकारण स्वीकारले आहे. जनतेने कंदिलाला नाकारून (राजदचे चिन्ह) आधुनिकतेला म्हणजेच एलईडी युगाला पसंती दिली आहे. जंगलराज धुडकावत कायद्याच्या राज्याच्या बाजूने कौल दिला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना नाकारून प्रामाणिक तसेच पारदर्शी कारभार करणारे सरकार निवडून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना तसेच बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गरिबांना केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणाच्या योजनांची जी प्रभावी अंमलबजावणी केली त्याचा हा विजय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने राजकीय पंडितही थक्क झाले आहेत. बिहारमध्ये भाजपची लाट होती, पण ती कोणत्याच राजकीय निरीक्षकाला  दिसली नाही. करोनाच्या साथीत जगभरात अनेक नेत्यांची लोकप्रियता घटली असतानाच भाजपला बिहारमध्ये ७४ जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढच झाली असून, जनतेत त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला असल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. देशात विकास आणि विश्वासाच्या राजकारणाचे दुसरे नाव नरेंद्र मोदी हेच आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले त्यावर जनतेने विश्वास ठेवून मते दिली. भारतीय जनता पक्ष हा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून निवडणुकीला सामोरा गेला असला तरी संपूर्ण निवडणुकीची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडेच होती. करोनाकाळात बिहारमध्ये भाजपला विजय म्हणजे मोदी सरकारच्या कामाला मिळालेली पोचपावती!

ही गोष्ट केवळ बिहार विधानसभेतील शानदार यशापुरती मर्यादित नाही, तर विविध राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकाल पाहता भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्त्वाभोवती असलेले वलय ध्यानात येते. पोटनिवडणुकीत देशभरातील ५९ पैकी ४१ जागी भाजपने विजय मिळवत इतिहास घडविला आहे. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यांतील ३१ जागा काँग्रेसकडून हिसकावल्या आहेत. मध्य प्रदेशात २८ पैकी १९, तर गुजरातमध्ये सर्व आठ जागा भाजपने पटकावल्या. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर मोठय़ा प्रमाणात आरोप झाले, मात्र सातपैकी सहा जागा भाजपने जिंकत जनतेला विकास हवा आहे, पुढे जाण्याची संधी खुणावते आहे, त्यांना गलिच्छ राजकारण नको हेच दाखवून दिले आहे. कर्नाटकातील दोन्ही जागा, तेलंगण ते अगदी मणिपूरमध्येही कमळ फुलले.

‘मोदी है तो मुमकिन है’ ही आता केवळ घोषणा राहिली नसून ते वास्तव आहे. करोना काळात ज्या प्रमाणे केंद्राच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला, त्याचा फायदा भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना मिळत आहे. नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या विकासकामांवर  विश्वास आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. विकास आणि विश्वास ही मोदींची ओळख आहे. त्याच बळावर भाजप जगातील सर्वात मोठा आणि यशस्वी पक्ष झाला आहे. त्यामुळेच भविष्यात विरोधकांची स्थिती आणखी बिकट होणार आहे. बिहारमधून निघालेला भाजपच्या विजयाचा रथ आता पश्चिम बंगालही सर करेल.

भारतीय राजकारणात साधनशुचिता, जनतेशी थेट संवाद, गरिबांच्या हिताची धोरणे, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाच्या प्रति समर्पित भाव यातून नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अधोरेखित होते. एकीकडे ते अंत्योदयाचे प्रतीक आहेत, तर दुसरीकडे गरिबांसाठी आशेचा किरण आहेत. नरेंद्र मोदींच्या या कार्यशैलीमुळे भारतीय राजकारणातून घराणेशाही, जातीयवाद तसेच वर्चस्ववादी मानसिकता समूळ नष्ट करता येईल असा विश्वास वाटतो. पंतप्रधानांमध्ये प्रधानसेवकाचा नम्र भाव असून त्यातून भारतीय राजकारणात जनता हीच सर्वश्रेष्ठ असल्याची खात्री पटते.

आज जागतिक स्तरावर चौफेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कल्याणकारी योजना, त्यांची अंमलबजावणी याचे कौतुक होत आहे. भारत आर्थिक, सांस्कृतिक, सामरिकदृष्टय़ा सक्षम आणि समृद्ध होत आहे, त्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते. व्यक्तिगत हित न पाहता सारे काही देशासाठी या सूत्रानुसार पंतप्रधानांचे आचरण आहे. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरवून देश बलशाली करणारे असे हे महान नेतृत्व आहे.

या निवडणुकीत भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे संघटन कौशल्य, तसेच त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता जनतेत असलेला जिव्हाळा दिसला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सेवा हाच संघटनेचा मूलमंत्र मानून देशातील कोटय़वधी नागरिकांपर्यंत अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याचे अतुलनीय काम केले. भाजपने करोनाकाळात ऑनलाइन प्रचारसभा घेत त्या यशस्वी करून दाखवल्या. पक्षाचे माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बसून सगळी रणनीती यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.

अनेक नेत्यांना करोना झाला, मात्र बरे होऊन ते  पुन्हा कामाला लागले. टाळेबंदीच्या काळात जीवाची पर्वा न करता ज्या पद्धतीने जनतेची सेवा केली, त्यातून जगातील या सर्वात मोठय़ा पक्षाची संवेदनशील वृत्ती दिसून आली आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, भाजप नेहमीच जनतेबरोबर आहे,  तसेच समर्पित भावनेतून काम करणारा आहे हाच संदेश यातून गेला.

अनिल बलूनी

खासदार व भाजपचे राष्ट्रीय माध्यम-प्रमुख