|| राहुल सरवटे

महाराष्ट्रीय जीवनाचा अभ्यास मांडणाऱ्या पुस्तकांविषयीच्या मासिक सदरातील हा नववा लेख – ‘साठोत्तरी’ वाङ्मयविश्वाचा अवकाश आणि तळ तपासणाऱ्या पुस्तकाची ओळख करून देणारा..

मराठी साहित्याच्या इतिहासात ‘साठोत्तरी पिढी’ हे एक खास थोर प्रकरण आहे. अशोक शहाणे, अरुण कोलटकर, दि. पु. चित्रे, भालचंद्र नेमाडे, तुलसी परब, गंगाधर पानतावणे, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर, मनोहर ओक, भाऊ  पाध्ये, नामदेव ढसाळ, राजा ढाले, वृंदावन दंडवते, विलास सारंग, दुर्गा भागवत ही निव्वळ सहज आठवलेली नावं. या पिढीची व्यापक बंडखोरी, अनियतकालिकांच्या माध्यमातून उभं केलेलं पर्यायी वाङ्मयविश्व यांचा प्रभाव मराठी साहित्यावर दीर्घकाळ रेंगाळत राहिला. ‘यांचं काय करायचं’ अशी नव्वदोत्तरी पिढीची जी गोची झाली, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या साठोत्तरी पिढीची भक्कम वैचारिक बैठक, भरपूर आणि उत्तम दर्जाचं साहित्यिक काम आणि स्वत:ला पुन:पुन्हा नवनिर्मित करण्याची क्षमता.

अमेरिकेतल्या रटगर्स विद्यापीठात दक्षिण आशियाई साहित्याचं अध्यापन करणाऱ्या अंजली नेर्लेकरांचं ‘बॉम्बे मॉडर्न : अरुण कोलटकर अ‍ॅण्ड बायलिंग्युअल लिटररी कल्चर’ हे पुस्तक अरुण कोलटकरांच्या द्वैभाषिक कवितेचा आणि एकूणच या ‘साठोत्तरी’ वाङ्मयविश्वाचा अवकाश आणि तळ तपासणारा एक अत्यंत उत्तम प्रकल्प आहे. हे पुस्तक एकीकडे साहित्य-इतिहासाची नवी मांडणी करतं आणि दुसरीकडे आशयकेंद्री साहित्य समीक्षेच्या चौकटी रुंदावत कवितेला एका व्यापक अशा आशय, फॉर्म, वाचक, समीक्षक, शहर, कागद, मुद्रण व्यवहार आदी अनेकानेक अंगांचा एक भाग म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतं. कोलटकरांच्या कवितेचं आकलन करण्यासाठी नेर्लेकर कवी आणि कवितेची सामाजिक-राजकीय पाश्र्वभूमी, कवितेचं शरीर म्हणजे तिचा आशय, रूपबंध आणि कागदावरची मांडणी, कवींचा कट्टा, कवितेतल्या प्रतिमा आणि अर्थनिर्देश अशा बहुविध बाजूंचा विचार करतात.

अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी कविता हा नेर्लेकरांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. परंतु या अनुषंगाने काही सैद्धांतिक प्रश्नांची चर्चाही त्या करतात. कोलटकरांच्या द्वैभाषिक कवितेच्या आकलनाची सर्वोत्तम पद्धत कुठली, हा नेर्लेकरांच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी असणारा प्रश्न आहे. कवितेच्या बहुभाषिकतेचं, भौतिकतेचं आणि शारीरतेचं परिशीलन करणारी पद्धतच बहुभाषिक कवितेच्या आकलनाला अधिक टोकदार करू शकेल, अशी नेर्लेकरांची मांडणी आहे.

‘बॉम्बे मॉडर्न’ एकूण दोन भागांत आणि सहा प्रकरणांत विभागलेलं आहे. पहिला भाग- ‘कॉन्टेक्स्ट’ – मुख्यत: साठोत्तरी वाङ्मयविश्वाचा धांडोळा घेतो. यात ‘साठोत्तरी’ या संज्ञेची व्यापक चर्चा आहे. नेर्लेकर ‘साठोत्तरी’चा कालखंड १९५५ पासून १९८० पर्यंत, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर पकडू लागली आणि पहिलीवहिली मराठी अनियतकालिकं प्रकाशित होऊ  लागली तेव्हापासून ते ऐंशीनंतरची पिढी लिहू लागेपर्यंतचा काळ मानतात. अर्थात, या काळाला निव्वळ मराठी अथवा भारतीय परिप्रेक्ष्यात मर्यादित न करता, त्या ‘साठोत्तरी’ला अ‍ॅलन गिन्सबर्गच्या इंग्रजी कविता, बीट जनरेशनचा जागतिक प्रभाव, इंग्रजी पेपरबॅक पुस्तकं स्वस्तात मुंबईच्या पदपथांवर मिळू लागणं, मे १९६८ या फ्रेंच उत्थानाच्या प्रेरणा.. अशा व्यापक जागतिक संदर्भात पाहतात.

‘साठोत्तरी’ ही संज्ञा मराठी साहित्यव्यवहारात मुख्यत: कालिक अर्थानं वापरली जाते. एकीकडे ‘देशीवादी’ आणि दुसरीकडे इंग्रजीत ज्याला ‘आवांगार्द’ म्हटलं जातं त्या साहित्यिक जाणिवांकडे निर्देश करते. परंतु इथं नेर्लेकर मांडणी करतात की, ‘साठोत्तरी’ म्हणजे ‘बॉम्बे’च्या आधुनिकतेतून साकारलेलं सर्जक विद्रोह आणि साहित्यिक प्रयोगशीलता यांचं एक ‘नेटवर्क’ होतं. त्यातून ‘साठोत्तरी’ ही एका साहित्यिक आणि कलात्मक नवनिर्मितीच्या जागतिक प्रकल्पाचा घटक बनली. ‘बॉम्बे’ या संज्ञेचाही त्या खुलासा करतात. ‘बॉम्बे’चा परीघ इथे सांस्कृतिक आहे. ‘एशियाटिक सोसायटी’तले मराठी कवींचे कट्टे, इराणी कॅफे किंवा काळाघोडा जसे त्याचा भाग आहेत, तसंच मुंबई सोडून औरंगाबादेतून अनियतकालिकं काढणारे भालचंद्र नेमाडे आणि चंद्रकांत पाटलांचासुद्धा त्यात समावेश होतो. या मराठी आणि इंग्रजी साहित्य व्यवहाराचा सांस्कृतिक भूगोल या अर्थानं ‘बॉम्बे’ असा शब्दप्रयोग त्या करतात. नेर्लेकरांच्या विवेचनात ‘साठोत्तरी’ (१९५५-१९८०) ही एक बहुविध देशी-मार्गी जाळ्यांनी विणलेली, जागतिक व स्थानिक आणि आंतरविद्याशाखीय जोडण्या करणारी रचना दिसते.

अर्थात, साठोत्तरी ही काही एकजिनसी गोष्ट नव्हे. त्यात जसा चित्रे-कोलटकरांचा बहुभाषिक कॉस्मोपॉलिटन अवकाश येतो, तसा नेमाडेंचा देशीवादी जाणिवेचा नायक आणि ढसाळांचं कामाठीपुऱ्यातलं व दलित भाषेचं ‘अंडरवर्ल्ड’सुद्धा येतं. नेर्लेकरांच्या मते, साठोत्तरी साहित्यात एकमेकांना समकक्ष असे विविध वास्तववाद वावरतात : समाजवास्तवाची चिकित्सा करणारा सामाजिक वास्तववाद, निरंकुश आणि नागडय़ा भाषेतून व्यक्त होणारा दलित वास्तववाद, अराजकीय स्वरूपाचा दैनंदिन जगण्याच्या रेघोटय़ा ओढत कविता साकारणारा वास्तववाद. मात्र दैनंदिन जगण्याच्या चक्राची तीव्र जाणीव असणं, पूर्वीच्या रविकिरणीय रोमँटिक हुरहुरीच्या भाषेपासून दूर येत सामान्य, रोजच्या जगण्याचं बोट पकडून चालणं हे या सगळ्याच वास्तववादांचं सामाईक लक्षण होतं.

साठोत्तरीतला दलित वास्तववाद गंगाधर पानतावणेंच्या ‘अस्मितादर्श’सारख्या नियतकालिकातून आणि नामदेव ढसाळांच्या मराठी कवितेसाठी एक नवं जग खुलं करणाऱ्या कवितेतून अवतरला. विजय तेंडुलकरांसारख्या विचक्षण लेखकालाही ढसाळांची भाषा आणि त्यांचं जग अनोळखी होतं. चंद्रबिंदी, रांडकी पुनव, सादळलेली झाडे, खैरबांडे पांजरपोळ डग्गा, पाणचट गवशी, छपन्न टिकली बहुचकपणा, धेडघाय पोटले, मगरमच पलिते, रायरंदी हाडूक, खोडाबेडा हात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय.. ही भाषा मराठी साहित्याच्या मध्यमवर्गीय सोवळेपणाला पूर्णपणे अपरिचित होती. पण अनियतकालिकांच्या द्वारे काही नव्या जोडण्याही होऊ  लागल्या होत्या. राजा ढालेंचं अनियतकालिक ‘आत्ता’ शहाण्यांच्या ‘असो’सोबत वाटलं गेलं होतं. देशीवादी, आंतरराष्ट्रीयवादी, मार्क्‍सवादी, आंबेडकरवादी अशा अनेक प्रवाहांना अनियतकालिकांतून ‘वाचा’ फुटली होती.

कवितेच्या भौतिक आणि शारीर वाचनपद्धतीचा उल्लेख वर केलाय. तर १९२०-५० या काळातली मराठी कवितेतली सुखद शारीरता – प्रेम, हुरहुर, झुरणं, हुंदके, बांगडय़ांची किणकिण, वगैरे – मागे पडून साठोत्तरी कवितेतून काहीशा बंडखोर शारीर प्रतिमा उगवू लागल्या होत्या. कवितेत आता शारीरिक श्रम, वेदना, भूक, संभोगाची आदिम आणि काहीशी पाशवी प्रेरणा, गुद्द्वार आणि जंत असं आजवर टाळलेलं शरीर डोकावू लागलं होतं. ढसाळांची ‘माण्साने’ नावाची ‘गोलपिठा’तली एक कविता या दृष्टीनं पाहण्यासारखी आहे. दि. पु. चित्रेंच्या ‘चाव्या’ या लेखसंग्रहात या नव्या शारीरतेचं सौंदर्यशास्त्रही आलेलं आहे. असं एक नवंच शरीरशास्त्र मराठी कवितेत साठोत्तरी काळात आलं. परंतु कवितेचं भौतिक वाचन करण्याचा नेर्लेकरांचा प्रयत्न केवळ या नव्या शारीरिक आशयापुरता मर्यादित नाही. कवितेचं प्रकाशन, तिचा वाचकवर्ग, कवितासंग्रहाचं वास्तुशास्त्र.. अशा बहुविध बाजूंचा त्या विचार करतात. जेरोम मॅक्गन यांच्या विवेचनाच्या आधारे, साठोत्तरी कवितेच्या परिपूर्ण आकलनासाठी कवितेला एक भौतिक, शारीरिक गोष्ट म्हणून पाहायला हवं आणि सूचीकार, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, किरकोळ वस्तूंचे विक्रेते अशा बहुविध भूमिकांतून ती वाचली जावी, असं नेर्लेकरांचं प्रतिपादन आहे. शिवाय कवितावाचनातली लैंगिकतासुद्धा नेर्लेकर दाखवून देतात. साठोत्तरी कवितेतल्या अशा अनेक छुप्या जागा आणि आडवाटा नेर्लेकरांनी धुंडाळल्यात.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात- ‘टेक्स्ट’ – त्या कोलटकरांच्या ‘भिजकी वही’ (मराठी) आणि ‘जेजुरी’, ‘काला घोडा पोएम्स’ आणि ‘सर्पसत्र’ (सर्व इंग्रजी) या संग्रहांचं बारकाईनं वाचन करतात. शिवाय, खूप उशिरानं प्रसिद्ध झालेल्या ‘जेजुरी’च्या मराठी आवृत्तीचा त्यांनी इंग्रजी संग्रहाशी ताळमेळ घालण्याचा प्रयत्नही केलेला आहे.

मुख्य म्हणजे, नेर्लेकरांचं पुस्तक एकभाषिक साहित्याच्या आणि त्यातून दिसणाऱ्या भारतीय आधुनिकतेच्या अभ्यासाच्या मर्यादा दाखवून देतं. एका व्यापक बहुभाषिक सांस्कृतिक अवकाशाला व त्यातल्या भौतिक शारीरिक प्रक्रियांना अभ्यासकांनी भिडावं आणि त्यातून खोलवरच्या आकलनाचा रस्ता मोकळा व्हावा असं त्यांचं आवाहन आहे. वाङ्मयाच्या इतिहासाला नेर्लेकरांचं पुस्तक अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. विशेषत: साठोत्तरी पिढीनं ‘सत्यकथा’विरुद्ध केलेलं बंड, देशीवादी साहित्याचा जोरकस प्रवाह किंवा नव्वदोत्तरी पिढीचा नव्या नवतेचा शोध यांचा कुठलाही तपशीलवार इतिहास मराठीत उपलब्ध नाही. मराठी वाङ्मय इतिहासाची ही भीषण अवस्था लक्षात घेता, नेर्लेकरांचं अनुकरण करणं आवश्यक ठरेल. (महाराष्ट्र साहित्य परिषदेनं प्रसिद्ध केलेले सात खंडी ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’चे १९५० ते २००० या काळातील इतिहास मांडणारे सातव्या खंडाचे चारही भाग निव्वळ चाळून जरी पाहिले तरी त्याला वाङ्मय इतिहास न म्हणता एक सुमार संकलन असं का म्हणू नये, असा प्रश्न पडावा. आधीच्या सहा खंडांच्या तुलनेत सातव्या खंडाचं वैचारिक दारिद्रय़ विशेष नजरेत भरण्यासारखं आहे. वि. भि. कोलते, शं. गो. तुळपुळे, कुसुमावती देशपांडे, वि. सी. सरवटे, अ. ना. देशपांडे, गो. म. कुलकर्णी, दु. का. संत यांच्यासारख्या खंद्या वाङ्मय इतिहासकारांचं काम पाहिल्यावर तर ही खंत आणखी तीव्र होते. असो.)

आज बहुभाषिक ‘बॉम्बे’चा साठोत्तरी काळ उलटून इतकी वर्षे झाल्यावर भारतीय भाषा आणि इंग्रजी यांचे संबंध आणखीच विपरीत झालेले दिसतात. अशा काळात कोलटकरांच्याच भाषेत सांगायचं, तर त्यांच्या कवितांचा अंश आपल्या पुढच्या पिढय़ांच्या दुधात सापडो!

  • ‘बॉम्बे मॉडर्न: अरुण कोलटकर अ‍ॅण्ड बायलिंग्युअल लिटररी कल्चर’
  • लेखिका : अंजली नेर्लेकर
  • प्रकाशक : नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी प्रेस (भारतीय आवृत्ती : स्पीकिंग टायगर पब्लिशर्स, नवी दिल्ली)
  • पृष्ठे : ३१२, किंमत : ४९५ रुपये

rahul.sarwate@gmail.com