शशिकांत सावंत shashibooks@gmail.com

सतत नव्याचा शोध घेत राहिलेल्या सुजन सोन्टाग या अमेरिकी लेखिकेच्या साहित्याचा आणि जीवनाचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचा हा परिचय..

सुमारे १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी भरलेला शिकागो विद्यापीठातील वर्ग. तिथे शिकवणारे प्राध्यापक केवळ आपले आडनाव लिहितात : बर्क! वर्ग संपल्यावर एक मुलगी त्यांना विचारते, ‘‘तुमचे पहिले नाव काय?’’ ते तिला विचारतात, ‘‘कशासाठी?’’ ती मुलगी सांगते, ‘‘जर ते ‘केनेथ’ असेल, तर मी तुमची ‘पर्मनन्स अ‍ॅण्ड चेंज’, ‘फिलॉसॉफी ऑफ लिटररी फॉर्म’ आणि ‘अ ग्रामर ऑफ मोटिव्हज्’ ही पुस्तके वाचली आहेत.’’ त्यावर ते म्हणतात, ‘‘खरेच?’’ ही तिन्ही पुस्तके साहित्य समीक्षा आणि तत्त्वज्ञान या विषयांवरची होती. अर्थातच, १८ वर्षांच्या मुलीच्या तोंडून हे ऐकल्यावर प्राध्यापकांना धक्काच बसला. पण जवळपास जन्मभर ती मुलगी कधी आपल्या लेखनातून, कधी कादंबऱ्यांतून, कधी सिनेमातून जगाला धक्के देत राहिली. तिचे नाव सुजन सोन्टाग!

१९३३ साली ज्यू दाम्पत्याच्या घरी जन्माला आलेली ही मुलगी वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्याने पोरकी झाली. पुढे तिच्या आईने दुसरे लग्न केल्यावर आपले ज्युईश आडनाव सोडून सोन्टाग हे आडनाव घेतले. विलक्षण प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि प्रचंड वाचन असलेल्या या मुलीने बर्कले, शिकागो, हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत शिक्षण घेतले. वयाच्या १६व्या वर्षी ती ज्या खोलीत राहायची तेथील पूर्ण भिंत पुस्तकांनी भरलेली होती. तिचे तेव्हाचे अनेक सहकारी सांगत की, तिच्याइतके वाचन केलेली दुसरी व्यक्ती त्यांनी आयुष्यात पाहिली नाही.

तिचे आठशे पानी चरित्र- ‘सोन्टाग : हर लाइफ अ‍ॅण्ड वर्क’- अलीकडेच प्रकाशित झाले आहे. लेखक बेंजामिन मोजर यांनी प्रचंड मेहनत घेऊन सोन्टागचे यथार्थ चित्रण जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सुजन सोन्टागच्या जवळपास डझनावारी डायऱ्या संपादित करण्याचे आणि त्या दोन खंडांत प्रसिद्ध करण्याचे काम तिच्या मुलाने केले. त्या डायऱ्या आणि तिच्या शेकडो मित्रांच्या मुलाखती यांवर हे पुस्तक आधारलेले आहे. अमेरिकी चरित्रकार प्रचंड मेहनत घेतात. लेखकाने लिहिलेला एक कपटादेखील ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय या चरित्रग्रंथातही येतो. सातशे पानांत मोजर गुण-दोषांसह सुजन सोन्टागला वाचकासमोर आणतात आणि पुस्तकाची उरलेली ११५ पाने ही संदर्भनोंदी आणि नामावली तसेच संदर्भाच्या स्पष्टीकरणांनी भरलेली आहेत.

डेव्हिड हा सुजन सोन्टागचा मुलगा. त्याने या प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य केल्यानेच हे चरित्र आकाराला येऊ शकले. सोन्टागचे बालपण, महाविद्यालयातले दिवस, आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठय़ा असलेल्या फिलीप रीफबरोबर तिने केलेले संशोधन.. अशा विविध टप्प्यांमध्ये लेखकाने खूप गुंतवणूक केली आहे. तिने रीफबरोबर लग्न केले. त्याच्या संशोधनात तर ती त्याला मदत करतच असे; पण अनेकदा ती त्याच्याकडे आलेल्या पुस्तकांचे परीक्षण त्याला वेळ नसल्याने स्वत:च लिहीत असे. सिग्मंड फ्रॉइडवर रीफने एक खळबळजनक पुस्तक लिहिले. याचे बरेचसे लेखन आपणच केल्याचे सोन्टाग म्हणत असे. हा दावा अलीकडेच काही अमेरिकी लेखकांनी खोडून काढला आहे. तो दावा हा या पुस्तकाचा मोठा दोष आहे.

तरीही पुस्तकात आलेल्या अनेक घटनांमध्ये एक मोठा अवकाश जाणवतो तो अमेरिकी पार्श्वभूमीचा. म्हणजे सुजनच्या आयुष्याबरोबरच पार्श्वभूमीवर असणारी व्हिएतनाम चळवळ किंवा लिंडन जॉन्सनची अध्यक्षीय कारकीर्द असो, इथपासून ते अगदी शेवटपर्यंत- म्हणजे २००४ साली तिचे निधन होईपर्यंतची सगळी राजकीय/ सामाजिक आणि मुख्य म्हणजे कलाविषयक पार्श्वभूमी तपशीलवार या पुस्तकात आली आहे. मृत्यूच्या आधी तिने लिहिलेला महत्त्वाचा लेख होता तो अबु गरीबमधील इराकी युद्धकैद्यावर अमेरिकी सैनिकांनी केलेल्या छळाच्या छायाचित्र मालिकेचा. ही मालिका ‘न्यू यॉर्कर’ने प्रसिद्ध केली होती आणि याने बरीच खळबळ माजवली.

सुजन सोन्टागने आयुष्यात कधीही दीर्घकाळ नोकरी केली नाही. तिच्या पुस्तका-कादंबऱ्यांमधून तिला फारशी आर्थिक प्राप्ती होतही नव्हती. तरीही अनेक मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी आयुष्यभर तिला केलेल्या मदतीमुळे ती तशी ऐषोरामात जगू शकली. न्यू यॉर्कसारख्या ठिकाणी ती पेन्टहाऊसमध्ये राहात असे आणि अमेरिकेसारख्या ठिकाणीच असे जगणे तिच्यासारखीला शक्य होते.

वयाच्या १६व्या वर्षीच सुजनला आपला लेस्बियनिझमकडे असलेला ओढा जाणवला आणि त्या काळातील पद्धतीनुसार आपल्यातील ही भावना दडपून टाकण्याचा तिने भरपूर प्रयत्न केला. पुरुषात आपण फार रमू शकत नाही असे तिने लिहिले; मात्र पुढच्याच वर्षी तिने (पुरुषाशीच) लग्न केले आणि एका मुलाला जन्मही दिला. वयाच्या १४ ते १७ या तीन वर्षांच्या कालावधीत जवळपास ३६ स्त्री-पुरुषांशी तिचे शारीरिक संबंध आले आणि त्याची नोंद तिने काही वेळा नावाने आणि काही वेळा टोपणनावाने केल्याचे आढळते. ती नियमित डायरी लिहीत असल्याने तिचे चरित्र लिहिणे थोडे सोपे झाले असणार. पण पन्नासच्या दशकातील तिने लिहिलेल्या अनेक डायऱ्या नष्ट झाल्या. पण अगदी शिकागो विद्यापीठातील, म्हणजे आता ऐंशीच्या घरात असलेल्या सहकाऱ्यांच्या मुलाखतींपासून ते नंतरच्या तिच्या कलाक्षेत्रातील समकालीनांपर्यंत अनेक मुलाखतींतून मोजरने हा काळ जिवंत केला आहे.

‘अगेन्स्ट इंटरप्रीटेशन’ या तिच्या निबंधामुळे सुजन सोन्टाग प्रकाशझोतात आली. १९६६ साली तिचा हा निबंध प्रसिद्ध झाला तेव्हा ती ३३ वर्षांची होती. इतक्या अल्प लेखनाने इतकी मोठी क्रांती घडून आल्याची उदाहरणे फार थोडी आहेत. ऐंशी पानांचे विटगेनस्टाइनचे ‘ट्रॅक्टॅटस’ हे पुस्तक किंवा नोम चॉम्स्कीने लिहिलेला वर्तनशास्त्राची भांडेफोड करणारा लेख अशी काही उदाहरणे आठवतील. अर्थातच, सुजनच्या ‘अगेन्स्ट इंटरप्रीटेशन’मधील मुख्य प्रतिपादन अनेकांना पटले नाही तरीही हे लिखाण तिची बौद्धिक झळाळी दाखविणारे होते. सुजनचे असे मत होते की, कला ही कशाचे तरी प्रतिनिधित्व करते- म्हणजे ती काहीतरी दाखवत असते. ग्रीक काळापासूनचे तत्त्वज्ञ हे सांगत आले आहेत. बिछान्याचे चित्र हे अर्थातच बिछान्याचे प्रतिनिधित्व करते. अर्थात, त्यात फारसा अर्थ नसतो, कारण चित्राचा उपयोग झोपण्यासाठी करता येत नाही. अशी प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटलची विचारसरणी मांडून ती म्हणते : नंतरच्या काळात कलाकृतीकडे केवळ कलाकृती म्हणून बघण्याऐवजी तिचे अर्थ काढणे सुरू झाले. विसाव्या शतकात कलाकृतीचा अर्थ काढून दाखवणे, तिचे रूपकात्मक वाचन किंवा तिच्यातील सुप्त गाभा काढून दाखवणे हे मार्क्‍सवादी आणि फ्रॉइडवादी लेखकांमुळे प्रचलित झाले. कोणत्याही कलाकृतीचा घाट आणि गाभा किंवा आशय महत्त्वाचा असतो. आशय आहे तसा पाहण्यापेक्षा सतत त्यातील गर्भित अर्थ शोधण्याच्या टीकाकारांच्या वृत्तीमुळे कलेची मोठी हानी होते आहे. शिवाय हे टीकाकार कला सोपी करून सांगतात, त्याचा अर्थ काढून दाखवतात.. ती आहे तशी ते बघूच देत नाहीत. भोवतालचे वातावरण हे अधिक आवाजी आणि संवेदनांवर अधिक मारा करणारे झाल्याने आपण कलाकृतीला आहे तसे सामोरे जात नाही.

‘हर्मेन्युटिक्स’ नावाचे टीकाशास्त्र तयार झाले आहे, त्यावर कोरडे ओढताना सुजन म्हणते की, यावर साधा उपाय म्हणजे टीकाकारांनी जे आहे ते मांडणे, केवळ वास्तव दाखवणे. त्यातून त्यांनी स्वत:चे अर्थ काढू नयेत. अर्थात, अशा टीकेची फार थोडी उदाहरणे तिने दिली आहेत. पण ती म्हणते की, हे टाळायचे असेल तर घाटाला प्राधान्य देऊन कलाकृती बघणे आवश्यक आहे. अमूर्त चित्रकलेसारख्या कलेत अर्थाला फारसा वाव नसतो याकडे तिने लक्ष वेधले होते. या तिच्या प्रतिपादनाने खळबळ उडाली. त्या काळात न्यू यॉर्कला ‘पार्टिझन रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात लिहिणाऱ्या बुद्धिमंतांचे शहर मानले जायचे. यामध्ये सुजनला मानाचे स्थान प्राप्त झाले. त्याच सुमारास ‘पार्टिझन रिव्ह्य़ू’मध्येच तिचा ‘नोट्स ऑन कॅम्प’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि तोही गाजला. या दोन-तीन लेखांमुळे आणि सुरुवातीच्या काही पुस्तकांमुळे सुजनला अमेरिकी बौद्धिक क्षेत्रात जे मानाचे स्थान प्राप्त झाले ते शेवटपर्यंत तसेच राहिले. नंतर तिने आणखीही अनेक निबंध लिहिले.

‘अगेन्स्ट इंटरप्रीटेशन’ याच निबंधाच्या पुस्तकात तिने गोदार्दसारखा दिग्दर्शक, आर्तोसारखा फ्रेंच लेखक आदी अमेरिकन्सना फारशा परिचित नसलेल्या युरोपीय बुद्धिमंतांचा परिचय करून दिला. याचप्रकारे तिने नंतर ‘अंडर द साइन ऑफ सॅटर्न’ (१९८०) या पुस्तकातही लिहिले. पण केवळ अमेरिकनांना युरोपीय प्रबोधन उपलब्ध करून देणे इतकेच काही तिचे कार्य नव्हते. साठच्या दशकातील तो काळच असा होता, जेव्हा बॉब डिलनसारखा संगीतकार उदयाला आला, ‘बीटल्स’सारखा संगीतचमू जगप्रसिद्ध झाला. याच काळात बौद्धवाद, भारतीय अध्यात्म/योग यांसारख्या गोष्टींचा पगडा जगभरातील लेखकांवर बसू लागला. निसर्गाकडे परत चला म्हणत हिप्पींची चळवळ सुरू झाली. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंत तरुण पिढी मोठय़ा प्रमाणात राजकीय चळवळी करू लागली. याच काळात स्वैर जगणे, अमली पदार्थाचे सेवन करणे, वेगवेगळ्या नशांमधून येणारे अनुभव घेणे आणि याबाबत लिहिणे किंवा मनाला स्फुरेल ते काव्य अशी धारणा असलेली बीट कवींची चळवळ सुरू झाली. याच काळात ‘न्यू वेव्ह’ म्हणजे नवा सिनेमा आधी फ्रान्समध्ये आणि नंतर जगभरात तयार होऊ लागला. याचे पडसाद भारतातही उमटले.

नवा सिनेमा, नवे जग याबाबत सुजन सातत्याने लिहीत राहिली. व्हिएतनाम युद्धाविरोधातील चळवळीत तिने भाग तर घेतलाच, शिवाय थेट व्हिएतनामला जाऊन तिथल्या स्थितीचे वर्णन टोपणनावाने लेखन करून केले. सिनेमासारखे माध्यम तिला तसे हाताळता आले नाही. तिचे सुरुवातीचे दोन्ही चित्रपट कोणत्याही अर्थाने यशस्वी ठरले नाहीत- ना प्रेक्षकसंख्या, ना टीकाकारांचे मत! पण ‘प्रॉमिस्ड् लॅण्ड्स’ हा तिसरा चित्रपट करण्यासाठी तिने इस्राएलमधील तिच्या एका मैत्रिणीला बोलावून घेतले आणि तिच्यासोबतीने तिने हा चित्रपट पूर्ण केला. तिचा ज्युईशपणा आणि इस्राएलबाबतची तिला असलेली सहानुभूती दाखविणारा हा चित्रपट होता. त्याचे बऱ्यापैकी कौतुकही झाले.

सत्तरच्या दशकाच्या शेवटाकडे सुजनने छायाचित्रकलेवरील ‘ऑन फोटोग्राफी’ हे पुस्तक लिहिले आणि नव्वदच्या दशकात कर्करोगासारख्या आजाराशी सामनाही केला. मित्रांमुळे तिचे आयुष्य सुकर आणि सुसह्य़ झाले. ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’मध्ये ती शेवटपर्यंत लिहीत राहिली.

पुस्तकात येणाऱ्या अनेक उपप्रकरणांमधून लेखकाचा अभ्यास आणि कौशल्य दोन्ही दिसून येते. शिकागो तसेच हार्वर्ड विद्यापीठातील सुजन, तसेच कादंबरीकार जोसेफ रॉथ, संगीतकार फिलीप ग्लास असे दिग्गज ज्या काळात तिचे समकालीन होते, तो काळही लेखकाने रेखाटला आहे. पूर्ण पुस्तकात एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, ती म्हणजे नवनव्या गोष्टी जाणून घ्यायची, शिकण्याची सुजनची जिद्द आणि सतत स्वत:चे पुन:रोपण करण्याची आस! पुस्तकाचा दोषच सांगायचा झाला, तर एखाद्या गोष्टीची सत्यता सांगण्यासाठी लेखक सातत्याने समकालीनांचे मत सांगत राहतो. यामुळे काही पानांवर तीन-तीन/चार-चार उद्धृते आढळतात. अर्थात, पुस्तकात लेखकाने सुजनने लिहिलेल्या पुस्तकांचा वेध घेतलाच आहे आणि तिच्या लेखनामधील त्रुटीही मोकळेपणाने दाखवून दिल्या आहेत. ‘द बेनेफॅक्टर’, ‘द व्होल्कॅनो लव्हर’सारख्या चांगल्या कादंबऱ्या सुजनने लिहिल्या, तरी तिची ओळख मात्र निबंधकार आणि समीक्षक म्हणूनच राहिली.

आयुष्यभर सुजनने मित्र आणि शत्रू जोडले. रॉबर्ट केनेडी किंवा हॉलीवूड अभिनेता वॉरेन बेट्टीसारख्या जगप्रसिद्ध व्यक्ती तिच्या प्रेमात होत्या. जास्पर जॉन्ससारखे चित्रकार केवळ तिचे मित्र नव्हते, तर त्यांच्या कलेला समुद्रापार पोहोचविण्यात तिचा हातभार होता. ‘फरार, स्ट्रॉस अ‍ॅण्ड गिरॉक्स’ या प्रकाशनाच्या मालकाची ती केवळ मैत्रीण नव्हती, तर त्यांना अनेक श्रेष्ठ युरोपीय लेखकांचे साहित्य मिळवून देण्यात तिचा वाटा होता.

काही असो, एक जिवंत, सतत अभ्यासाच्या आणि नव्याच्या शोधात असलेले जागृत मन आणि त्या मनाचे चित्रण आपल्यासमोर या पुस्तकातून उलगडते. हे पुस्तक वाचताना तिचा १२ पानांचा निबंध ‘अगेन्स्ट इंटरप्रीटेशन’ पुन्हा वाचला आणि तो आजही ताजा वाटला. तिचे कोणतेही लेखन -ज्ञानेश्वरांची उपमा वापरायची तर- स्फटिकगृहातल्या दिव्याप्रमाणे तिच्यातील ज्ञानी व्यक्तीचे दर्शन आपल्याला घडवते, तर तिचे चरित्र तिच्यातील अपुऱ्या व्यक्तीचे!

‘सोन्टाग : हर लाइफ अ‍ॅण्ड वर्क’

लेखक : बेंजामिन मोजर

प्रकाशक : इको

पृष्ठे : ८१६, किंमत : सुमारे ३,०८० रु.