मेरी मॉरिस यांचं ‘ऑल द वे टु टायगर्स’ हे पुस्तक जूनमध्येच पेंग्विन- रँडम हाऊसनं बाजारात आणलं. करोनाकाळात पुस्तक प्रकाशित करायला हिम्मत लागते, ती व्यवसाय जाणणाऱ्या प्रकाशनगृहानं या लेखिकेच्या, या पुस्तकाबद्दल दाखवली. वाघांच्या शोधात लेखिका भारतात २०११ पहिल्यांदा आली, तिच्या आठवणींचं हे पुस्तक. पण मग ते भारतात नको प्रकाशित व्हायला?

या प्रश्नाचं उत्तर नंतर शोधू. आधी एवढंच की, अ‍ॅमेझॉन वगैरेंवर या अवघ्या २४० पानी पुस्तकाच्या पुठ्ठाबांधणी आवृत्तीची किंमत अठराशे रुपयांच्या वरच आहे. म्हणजे अर्थातच ते अमेरिकेहून वगैरे येणार. तिथं तर त्याची ‘ऑडिबल’ आवृत्तीसुद्धा आलीय. वॉशिंग्टन पोस्ट, द न्यू यॉर्क टाइम्स यांच्या पुस्तकपानांवर कौतुकच चाललंय. साहजिकच, कारण मेरी मॉरिस यांचं ‘नथिंग टु डिक्लेअर’ हे एकटय़ा स्त्रीच्या प्रवासवर्णन/ चिंतनाचं पुस्तक आधी गाजलंच होतं, शिवाय कादंबऱ्यांसाठीदेखील दोन-पाच पुरस्कार मॉरिस यांच्याकडे आहेत.

जे कौतुक पुस्तकाबद्दल झालंय, त्याचा सुरुवातीचा भाग हा ‘स्कीइंग करताना २००८ साली झालेल्या मोठय़ा अपघातानंतर, दोन वर्ष विजनवासातच काढून मी कशी नि का भारतात गेल्ये’ याबद्दल कित्ती छान ओघवतं लिहिलंय मेरींनी, अशा स्वरूपाचाच आहे. एखाददोघांनी नेमक्या याच भागाबद्दल नाकं मुरडलीत.. समीक्षकच ते खरे! त्यांचं म्हणणं असं की, ‘आपल्यातील वाघ जागवण्या’कडे काहीसा आध्यात्मिक प्रवास करणं असं जरी पुस्तकाचं स्वरूप असलं, तरी अपघाताच्या अनुभवांची लांबण विनाकारण लागली आहे. शिवाय, ‘आत्मिक वाघाला मुक्त करण्या’चे काही नुस्खेबिस्खे मेरींना सापडलेत, असंही काही दिसत नाही. शेवटी तर सरळ- ‘लेखक जितका रटाळ, शिस्तबद्ध जगतो, तितकंच त्याचं साहित्य हिंसा आणि अन्य भावप्रस्फोटांनी उफाळतं’ अशा अर्थाचं गुस्ताव फ्लोबेरचं सुवचनच मेरींनी मान्य केलंय.

पण आपला प्रश्न बाजूला पडतोय का? बरं जरा कळ काढून आणखी वाचा- ‘वाघासाठी भारतात प्रचलित असलेला शब्द ‘व्हायग्रा’शी मिळताजुळता आहे’ किंवा ‘सिंहसुद्धा एकटा राहात नाही. वाघ मात्र राहातो. तोच खरा राजा’ – अशी जी माहिती मेरींनी गेल्या नऊ वर्षांच्या मेहनतीतून मिळवल्येय, ती ‘मौलिक’ वाटेल का कुणाला इथं?

तेव्हा, ताडोबात वाघ न दिसल्याचा ‘पुन:प्रत्यय’ भारतीय वाचकांना मिळू नये, असा सद्हेतूच भारतीय आवृत्ती नसण्यामागे असावा!