News Flash

बुकबातमी : पुस्तकांचा कौल भाजपलाच!

त्या तिघांचंही वय तिशीच्या अंतिम टप्प्यातलं. तिघांनीही २००५ सालच्या आसपास पत्रकारितेत पदार्पण केलं.

(संग्रहित छायाचित्र)

त्या तिघांचंही वय तिशीच्या अंतिम टप्प्यातलं. तिघांनीही २००५ सालच्या आसपास पत्रकारितेत पदार्पण केलं. म्हणजेच, या तिघांना पत्रकार म्हणून किमान १५ वर्षांचा अनुभव आहे. तिघेही बंगालचे आणि बंगालीभाषक असले, तरी इंग्रजीत या तिघांनीही भरपूर लेखन केलं आहे. आणखी एक साम्य म्हणजे, या तिघांनीही आगामी बंगाल विधानसभा निवडणुकीबद्दल पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे तिघांची तिन्ही पुस्तकं ताजीच आहेत.

तिघांपैकी दोघांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ‘तृणमूल काँग्रेस’च्या संस्थापक ममता बॅनर्जी यांच्यासह, पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख प्रचारक नरेंद्र मोदी यांचाच चेहरा आहे. अर्थात, दीप हालदर लिखित ‘बेंगॉल २०२१ : अ‍ॅन इलेक्शन डायरी’ (प्रकाशन दिनांक : ७ मार्च २०२१) या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बॅनर्जी आणि मोदी यांचे चेहरे पोस्टरांवर दिसतात, त्यांपैकी बॅनर्जी यांचं पोस्टर कुणी तरी फाडलंय, अशी स्थिती हे मुखपृष्ठ दाखवतं. हालदर सध्या ‘इंडिया टुडे’मध्ये आहेत आणि या वृत्तनियतकालिकाच्या ताज्या अंकात, ममता बॅनर्जी यांची ‘बंगालची कन्याच बंगालला हवी’ ही यंदाची निवडणूक-घोषणा कशी पोकळ आणि भंपक आहे, याविषयीचा मोठा लेख बाबुल सुप्रियो यांच्या खास उल्लेखासह हालदर यांनी लिहिलेला आढळेल. व्यक्तिश: हालदर हे भाजपबाबत सकारात्मक आहेत, असा निष्कर्ष गेल्या तीन महिन्यांतील त्यांच्या ट्विटर-टिप्पण्यांतून काढता येतो.

बाबुल सुप्रियो हे ममता बॅनर्जीच्या ‘बंगालकन्या’ प्रचाराला कोणतं उत्तर देतात, याविषयी ‘आऊटलुक’ वृत्तनियतकालिकात स्निग्धेन्दु भट्टाचार्य यांनी गेल्याच शनिवारी (२७ फेब्रु.) लिहिलं आहे. त्यांचं ‘मिशन बेंगॉॅल’ हे पुस्तक ३० सप्टेंबर २०२० पासूनच उपलब्ध आहे आणि या पुस्तकात, रा. स्व. संघ आणि भाजप यांनी बंगालमध्ये हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार कसा केला याचा आढावा आहे.

सम्बित पाल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘आयआयएमसी’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन) या संस्थेच्या कोलकाता शाखेत सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘द बेंगॉल कॉनुन्ड्रम’ (प्रकाशन दिनांक : १८ जानेवारी २०२१) या पुस्तकाचा भर भाजपची वाढ पश्चिम बंगालमध्ये कसकशी झाली यावर असल्याचा निर्वाळा काही परिचयवजा परीक्षणांतून मिळतो.

‘भाजपचाच जोर दिसतो’ असा कौल देणाऱ्या या तीनपैकी पहिली दोन पुस्तकं ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’मार्फत, तर पाल यांचं पुस्तक ‘ब्लूम्सबरी इंडिया’तर्फे प्रकाशित झालं आहे. यापूर्वी- २०१४ ते १८ दरम्यान ममता बॅनर्जी यांच्याविषयी तीन पुस्तकं निघाली होती, तेव्हा त्यासाठी ममतांनीच पैसा पुरवल्याचे आरोप झाले होते. तसं काही या तीन पुस्तकांबद्दल अद्याप तरी झालेलं नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:00 am

Web Title: book batmi article on bjp has a lot of books abn 97
Next Stories
1 अनुवादाची धाव..
2 अव-काळाचे आर्त : घडू नये ते घडले!
3 परिचय : मुंबईचा दस्तावेज..
Just Now!
X