26 November 2020

News Flash

बुकबातमी : सनदशीर.. की स्वप्नाळू?

सरकार कायद्यांची मोडतोड करतंय असं लोकांना कितीही वाटलं तरी सरकार जे काही करायचं ते ‘कायदेशीरपणे’ करतं.

संग्रहित छायाचित्र

देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला सत्ता टिकवण्याच्या लालसेपुढे देशाचे कायदे कसेही वाकवायला काहीही लाजशरम वाटत नाही, या नेत्याचे अनुयायीसुद्धा त्याचीच तळी उचलून विरोधकांवर आरोप करत राहातात, नेता स्वत:च स्वत:च्या विरोधकांना देशद्रोही ठरवतो आणि कायद्याच्या राज्याची हमी देणारी व्यवस्थाही मग अशा ‘निवडक’ विरोधकांवर खटले चालवते.. यातला प्रत्येक अनुभव पीटर स्ट्रॉक यांनी घेतलेला आहे (‘स्ट्रॉक’ हे आडनाव मूळचं पोलंडमधलं असल्यामुळे त्याच्या स्पेलिंगमध्ये ‘ओ’च्या आधी उगाच ‘झेड’ हे अक्षर आहे; पण जन्मापासून अमेरिकी असलेले पीटर ‘स्ट्रॉक’च). ते एफबीआय या अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी. त्यांनी अनुभवलेला तो नेता म्हणजे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प. हे स्ट्रॉक किमान दशकभर रशियात गुप्तवार्ता अधिकारी होते. त्यामुळे, २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यावर ‘रशियाशी हातमिळवणी’, ‘हिलरींचे प्रत्येक ईमेल वाचले जात होते रशियात’, ‘नेत्या अमेरिकेच्या, ईमेल रशियात?’ अशा प्रकारचे आरोप झाल्यावर, या गंभीर आरोपांच्या पडताळणीचं काम स्ट्रॉक यांच्याकडे आलं. हे काम आधी स्वतंत्रपणे, तर नंतर रॉबर्ट म्यूलर यांच्या पथकाचा भाग म्हणून स्ट्रॉक करू लागले. पण माशी शिंकलीच.. स्ट्रॉक आणि त्यांना याकामी सहकार्य करणाऱ्या वकीलबाई यांच्यात खासगी संदेशांची (एसएमएस) जी काही देवाणघेवाण झाली होती, त्यामधून स्ट्रॉक हे ट्रम्प यांचे कट्टर विरोधकच असल्याचं स्पष्ट होतंय, अशी ओरड झाली. ‘अहो माझी मतं असतील ट्रम्पविरोधी- आहेतसुद्धा.. पण त्यांचा परिणाम मी माझ्या तपासकामावर नाही होऊ दिलेला..’ हा स्ट्रॉक यांचा दावा नामंजूर होऊन, त्यांना या कामालाच नव्हे तर नोकरीला मुकावं लागलं. वर ट्रम्प यांचे ‘ती देशद्रोही जोडी.. एकत्र कायकाय करायचे देव जाणे’ अशा अर्थाचे टोमणे झाल्यावर ट्रम्प-अनुयायांचं मोहोळच स्ट्रॉक यांच्या विरुद्ध. तरीही स्ट्रॉक हे नोकरीतला सन्मान परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढताहेत.

आणि अर्थातच, त्यांचं पुस्तक लिहून झालंय. ‘रशियानं अमेरिकेत मनसोक्त वाव मिळवलाय.. निव्वळ ट्रम्प यांच्या सत्ताकांक्षेपायी’ – हे या पुस्तकाचं प्रतिपादन. पुस्तक बरोबर महिन्याभरात, आठ सप्टेंबरला येतंय. ‘कॉम्प्रोमाइज्ड- काउंटर इंटलिजन्स अ‍ॅण्ड द थ्रेट ऑफ डोनाल्ड जे. ट्रम्प’ असं सनसनाटी नाव या पुस्तकाला असलं तरी, ते बऱ्यापैकी सनदशीर भाषा वापरणारं असणार, अशी अटकळ आहे.. कारण सनदशीर नसलेली भाषा वापरण्याचा फटका एकदा स्ट्रॉक यांना बसलाच आहे! शिवाय स्ट्रॉक यांची एकंदर वाट सनदशीरपणाचीच आहे.

सनदशीर नसलेले मार्ग आजघडीला स्वप्नाळूच ठरतात. सरकार कायद्यांची मोडतोड करतंय असं लोकांना कितीही वाटलं तरी सरकार जे काही करायचं ते ‘कायदेशीरपणे’ करतं. सनदशीर मार्गाची बूज राखणाऱ्या सामान्य माणसांहाती काही उरत नाही.. त्यांचं खासगी आयुष्यदेखील! अशा काळात स्वप्नाळू मार्गाचं आकर्षण वाढतं. अमेरिकी लेखक कॅरी डॉक्ट्रॉव यांनी लिहिलेल्या ‘द लिटिल ब्रदर’ आणि तिच्यातला १७ वर्षांचा मार्कुस यॅलो हाच नायक असलेली ‘होमलँड’ या लघुकादंबऱ्या त्यामुळेच वाचकप्रिय ठरल्या. ‘(जॉर्ज ऑर्वेलच्या) नाइन्टीन एटीफोर इतकीच गंभीर कादंबरी’ असं लिटिल ब्रदरचं स्वागत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं केलं होतं. या दोन्ही लघुकादंबऱ्या जुलै महिन्यात, एकाच जाडजूड (पानं ६८५) आवृत्तीत आल्या आहेत. आणि त्यांना प्रस्तावना आहे, एडवर्ड स्नोडेनची! स्नोडेन म्हणतो की, आपलीही स्थिती त्या मार्कुस यॅलोसारखीच झालीय. सरकार फसवतंय आपल्याला, हे माहित्येय पूर्णपणे. पण मार्कुस पुढे, त्याच्या समवयस्क (विशीच्या आतल्या) मित्रांसह मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, तसे जगातही चालू आहेत.. ते हाँगकाँगमध्ये सुरू आहेत, सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘सायफरफन्क’ चळवळीत आहेत..

हे प्रयत्न आज स्वप्नाळू वाटतात, आणि ते सनदशीर कसे नाहीत हेच आपल्याला पटवून सांगितलं जातं, इतकंच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:04 am

Web Title: book batmi article on compromised counterintelligence and the threat of donald j trumps book abn 97
Next Stories
1 गडद होत जाणाऱ्या केशरी छटा..
2 नोकरशाहीचे अंतरंग..
3 बुकबातमी : गांधी ते घांदी!
Just Now!
X