‘फुटबॉल हा निव्वळ खेळ नाही. ते एक तत्त्वज्ञान आहे,’ असे युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील असंख्य फुटबॉलप्रेमी आणि विचारवंत मानतात. त्याप्रमाणे जगतातसुद्धा. त्यांच्या देशांमध्ये, त्यांच्या लाडक्या क्लबांकडून विशिष्ट प्रकारेच फुटबॉल खेळला जावा असा त्यांचा आग्रह. त्याप्रमाणे खेळूनही यश मिळत नसले, तरी खेळाचे तत्त्वज्ञान किंवा परंपराच मोडून-भिरकावून टाकणे हे यांच्या दृष्टीने मोठेच पातक. यासाठीच फुटबॉलच्या विश्वात सर्वाधिक महत्त्व असते प्रशिक्षकाला. त्याची जबाबदारी अर्थातच त्याच्या हाताखालील संघाला सातत्याने यश मिळवून देण्याची. हे करताना खेळाचे सौंदर्यशास्त्र पाळले जावे हीदेखील अपेक्षा असते. ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी, इटली, नेदरलँड्स या देशांची स्वत:ची अशी फुटबॉल शैली आहे. इंग्लिश फुटबॉल संस्कृती अशा कोणत्याही शैलीविषयी फार आग्रही नसते. शैलीपेक्षा व्यावसायिकतेला – म्हणजे अर्थात निकालांना झुकते माप देण्याविषयी इंग्लिश फुटबॉल लीग आग्रही असते. त्यामुळे इतर कोणत्याही प्रमुख लीगपेक्षा येथे परदेशी प्रशिक्षकांची संख्या अधिक दिसते.

जर्मनी, इटली किंवा नेदरलँड्सबाबत हे घडत नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्याकडे युर्गेन क्लॉप फारसे आढळत नाहीत. आढळले तरी त्यांचा फार गाजावाजा होत नाही.

युर्गेन क्लॉप हे इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूलचे जर्मन प्रशिक्षक. इंग्लिश फुटबॉल समुदायाला जर्मन शैलीचे सुप्त आकर्षण पूर्वीपासूनच आहे. ‘फुटबॉल हा साधा खेळ आहे. २२ जण चेंडूच्या मागे ९० मिनिटे धावतात. आणि अखेरीस जर्मन नेहमीच जिंकतात!..’ हे सुपरिचित उद्गार आहेत विख्यात इंग्लिश फुटबॉलपटू गॅरी लिनेकर याचे. अशाच प्रकारचे गारूड सध्या इंग्लिश फुटबॉल विश्लेषक आणि लेखकांवर युर्गेन क्लॉप यांनी केलेले दिसते. म्हणूनच येत्या नोव्हेंबरमध्ये क्लॉप यांच्याविषयी एक नव्हे, तर दोन-दोन पुस्तके प्रकाशित होत आहेत. ‘दि इंडिपेंडंट’च्या फुटबॉल वार्ताहर मेलिसा रेड्डी यांचे ‘बिलीव्ह अस : हाऊ युर्गेन क्लॉप ट्रान्सफॉम्र्ड लिव्हरपूल इनटू टायटल विनर्स’ हे पुस्तक हार्परनॉर्थतर्फे २० नोव्हेंबर रोजी येत आहे. तर फेबर अँड फेबर यांच्या वतीने अँथनी क्विन लिखित ‘क्लॉप : माय लिव्हरपूल रोमान्स’ हे पुस्तक जरा आधी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे.

क्लॉप यांची २०१५ मध्ये लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड हे इंग्लिश फुटबॉलमधील दोन मातब्बर क्लब आणि त्यांच्यातील परंपरागत द्वंद्वालाही मोठा इतिहास. पण क्लॉप लिव्हरपूलला आले त्या काळात या क्लबचे पोकळ वासे झाले होते. क्लॉप यांनी अत्यंत आक्रमक शैली लिव्हरपूलमध्ये रुजवली. ते लिव्हरपूलला येण्याआधी जर्मनीत बोरुसिया डॉर्टमुंड क्लबचे अनेक वर्षे प्रशिक्षक होते. तिथे ‘गेगेनप्रेसेन’ नामक पद्धती क्लॉप अंगीकारायचे. चेंडूवरील ताबा कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही, कधी ताबा गेलाच तर प्रतिस्पध्र्याकडून तो मिळवण्यासाठी जिवाचे रान करायचे ही ती पद्धती.

सरत्या दशकात जर्मनीचा आक्रमक संघ म्हणून नवोदय झाला, याला बऱ्याच अंशी क्लॉप जबाबदार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत लिव्हरपूलमध्ये अक्षरश: क्रांती घडवली. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये एकदा उपविजेतेपद आणि मग अजिंक्यपद. युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्येही एकदा उपविजेतेपद नि मग जेतेपद. गेल्या ३० वर्षांत लिव्हरपूलने असे देदीप्यमान यश पाहिले नव्हते. जर्मन समाजशैलीशी पूर्णपणे विसंगत अशी भावनोत्कटता क्लॉप सामन्यादरम्यान वारंवार प्रदर्शित करतात ही बाब त्यांच्याविषयीच्या आकर्षणात भरच घालते. सामनापूर्व किंवा सामनोत्तर मुलाखतींमध्ये क्लॉप मोजकेच पण नेमके आणि काही वेळा बोचरे बोलतात. मँचेस्टर युनायटेडचे विख्यात प्रशिक्षक सर अलेक्स फग्र्युसन यांच्यातली तुच्छतामूलकता क्लॉप यांच्यात नाही. फुटबॉलच्या प्रवाही आणि नेत्रसुखद शैलीची ठरवून माती करणारे तरीही ‘स्पेशल वन’ म्हणून मिरवणारे होजे मोरिन्यो यांची चलाखीही त्यांच्या ठायी नाही. कदाचित त्यामुळेच अवघ्या पाच वर्षांत त्यांच्याविषयी दोन-दोन पुस्तके बाजारात येत असावीत!