06 August 2020

News Flash

बुकबातमी : गांधी ते घांदी!

नक्षलवादी चळवळीला मदत करता यावी म्हणून कोबाड यांनी त्यांची मुंबईतील संपत्तीसुद्धा विकून टाकली

समाजमाध्यमांवर पुस्तकाची घोषणा करताना ‘रोली’ने घांदी यांचे तरुणपणीचे छायाचित्र वापरले

कोबाड घांदी हे नाव अनेकांना माहीत असेल, तरुणांना कदाचित माहीतही नसेल. मुंबईतील उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या घांदींचं शिक्षण प्रसिद्ध ‘डून स्कूल’मधून झालं  होतं. मग सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम शिकायला ते थेट लंडनला गेले. पण हा अभ्यास अर्ध्यावर सोडून त्यांनी तेव्हा देशात जहाल डाव्यांनी सुरू केलेल्या चळवळीत उडी घेतली! सुरुवातीला ते सीपीआय (एमएल) या पक्षात सक्रिय होते. सशस्त्र क्रांतीनेच या देशातील गरिबांचे प्रश्न सुटू शकतात यावर या पक्षाचा गाढा विश्वास. कोबाड यांनी श्रीमंतीची झूल अंगावरून उतरवून देत गरिबांसाठी लढे सुरू केले. नंतर देशात नक्षल चळवळीचा उदय झाला आणि त्याकडे ते आकृष्ट झाले. त्यामुळे कोबाड घांदींची ओळख, ‘नक्षलवादी विचाराने भारावलेल्या देशातील पहिल्या पिढीचे प्रतिनिधी,’ अशीच आहे.. आणि त्यांच्या आठवणींचं पुस्तक ‘रोली बुक्स’तर्फे २०२१ मध्ये येतंय.

नक्षलवादी चळवळीला मदत करता यावी म्हणून कोबाड यांनी त्यांची मुंबईतील संपत्तीसुद्धा विकून टाकली. आज शहरी नक्षलवादाचा बोलबाला होत असला तरी जंगलात काम करणाऱ्या सशस्त्र नक्षलींना शहरातून मदत करणारं एक नेटवर्क (ज्याला युनायटेड फ्रंट म्हणत) आधीपासूनच देशात कार्यरत होतं. त्या संपर्कजाळ्यातले कोबाड हे प्रमुख कार्यकर्ते होते. चळवळीत असतानाच त्यांची अनुराधाशी ओळख झाली. नंतर त्यांनी लग्न केलं. प्रारंभी शहरात काम करणारी अनुराधा नंतर जंगलातल्या चळवळीत सक्रिय झाली, तिथेच २००८ मध्ये तिचा मृत्यू झाला. हे घडलं तेव्हा कोबाड तिहारच्या तुरुंगात होते. त्याआधी त्यांनी तुरुंगातून अनुराधाला लिहिलेली पत्रं अतिशय वाचनीय आहेत. यापैकी काही पत्रांचा समावेश राहुल पंडितांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे ( याच तिहार तुरुंगाचे जेलर सुनील गुप्ता यांचंही पुस्तक अलीकडेच (२०१७) ‘रोली’नं आणलं होतं आणि त्याबद्दल ‘बुकमार्क’ पानावर परीक्षणही आलं होतं). सीपीआय(एमएल)सह विविध संघटनांचं विलीनीकरण होऊन नक्षलवाद्यांचा भाकप (माओवादी) हा पक्ष २००४ मध्ये तयार झाला व हे दोघेही त्यात सक्रिय झाले. दलित, पीडित, शोषितांच्या प्रश्नांवर चर्चा करणं, त्यादृष्टीने नक्षलींच्या शहरी समर्थकांना सक्रिय करणं, जंगलात काम करणाऱ्या नक्षलवाद्यांशी संपर्क ठेवणं, शहरात राहून त्यांच्या कामाला वैचारिक दिशा देणं, अशा आरोपांवरून त्यांना अटक झाली. ते दहा वर्ष तुरुंगात होते, पण त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आता सुटकेनंतर त्यांच्याकडे सांगण्यासारखं मात्र भरपूर आहे. पण इथे या बुकबातमीत सांगण्यासारखं आहे, ते रोली बुक्सबद्दल!

कारण, रोली बुक्स हे काही डावे प्रकाशक नव्हेत. इतकंच कशाला, वैचारिक वैविध्यही ‘रोली’च्या पुस्तकांमध्ये गेल्या फारतर दहा वर्षांतच दिसू लागलं. ‘मार्क्‍सिझम इन इंडिया : फ्रॉम डिक्लाइन टु डिबॅकल’ हे किरण मैत्रा यांचं पुस्तक (प्रकाशनवर्ष २०१२) वगळता डाव्या राजकारणाशी संबंधित म्हणता येईल असं एकही पुस्तक ‘रोली’नं काढलेलं नाही. नरेंद्र मोदी कसे आणि किती चांगले आहेत हे सांगणारी जी अनेक पुस्तकं अनेक प्रकाशकांनी काढलीत, त्यांपैकी ‘रोली’ची दोन आहेत. ‘द रेड सारी’ हे जेविएर मोरो या स्पॅनिश पत्रकाराच्या पुस्तकाचं इंग्रजीकरण किंवा ‘द फरगॉटन गांधी’ म्हणून फिरोज गांधींची कहाणी सांगणारं पुस्तक ही ‘रोली’ची गांधी घराण्याविषयीची ग्रंथसंपदा, त्या घराण्याला राजकीय मदत करणारी अजिबातच नाही.

कोबाड घांदी ‘रोली’ला नकार देऊन ‘लेफ्टवर्ड बुक्स’ किंवा परिवर्तनवादी चळवळीशी ‘रोली’पेक्षा अधिक संबंधित असलेल्या कोणत्याही प्रकाशकाला हे पुस्तक देऊ शकले असते. तरीही कोबाड यांचं हे पुस्तक ‘रोली’ला मिळालं. एकप्रकारे, ‘रोली’च्या संपादकीय संचालक प्रिया कपूर यांचं महत्त्वही वाढलं. ‘रोली’चे संस्थापक प्रमोद कपूर यांच्या प्रिया या कन्या आणि वारसदार. पण वैचारिक वैविध्याच्या बाबतीत प्रिया वडिलांपेक्षा नक्कीच पुढे गेल्या, अशी खूणगाठ नरेश फर्नाडिस यांचं ‘ताजमहाल फॉक्सट्रॉट’ हे मुंबईतल्या जॅझ संगीतावरलं पुस्तक देखणंच छापण्याची त्यांनी दाखवलेली धमक पाहून अनेकांनी बांधली होती.प्रमोद कपूर यांचा लोकसंग्रह मोठा आहे आणि त्यांच्या मित्रमंडळात विचारवैविध्य दिसतं हेही खरं. उगाच पॅट्रिक फ्रेंच किंवा एम. जे. अकबर हे प्रमोद कपूर यांचे जवळचे मित्र म्हणून प्रमोद कपूरही उजवेच, असं कुणीही म्हणू नये, इतकं हे वैविध्य आहे. पण प्रकाशनांमधून हे विचारवैविध्य आजवर कमी प्रमाणात दिसलं, एवढाच मुद्दा आहे. बरं ते दिसायलाच हवं असा आग्रहसुद्धा नाही. मग एवढी चर्चा कशाला?

जी नाहीच असं गृहीत धरलं ती गोष्ट अचानक लखलखीतपणे दिसली, म्हणून एवढी चर्चा. अधिकृतपणे या पुस्तकाचे प्रकाशक असलेले प्रमोद कपूर हे एका(च) पुस्तकाचे लेखकही आहेत. त्या पुस्तकाचं शीर्षक ‘गांधी : अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ असं आहे (प्रकाशन ‘रोली बुक्स’च) आणि त्या सचित्र पुस्तकातले गांधी म्हणजे कोबाड नसून महात्माच, हे काही सांगायला नको..

..पण म्हणूनच, कोबाड घांदी यांचंही पुस्तक ‘रोली बुक्स’च काढणार, हे विशेष ठरतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 12:04 am

Web Title: book batmi article on kobad ghandy abn 97
Next Stories
1 (मुस्लीम) उदारमतवाद्यांपुढचे आव्हान..
2 कथानाविकांचा किनारा!
3 बुकबातमी : ‘पुन:प्रत्यय’ नको!
Just Now!
X