लुई बँक्स यांच्यावरचं चरित्रपुस्तक येतंय ही दखल घेण्याजोगी बातमी आहेच, पण आधी ‘कोण लुई बॅन्क्स?’ असा प्रश्न पडलेल्यांसाठी दोन-तीन ओळी : लुई बँक्स हे भारतातले विख्यात जाझ संगीतकार आहेत. चित्रपटांसाठी त्यांनी वादन केलं असलं तरी, अनेक जाहिरातींचं संगीत त्यांनी स्वतंत्रपणे दिलं आहे. कपिलदेव, प्रकाश पडुकोण, पी. टी. उषा  वगैरे क्रीडापटू हातात मशालीसारखी ज्योत घेऊन धावताहेत अशी ‘स्वतंत्रता की ज्योत’ ही अवघ्या साडेतीन मिनिटांची फिल्म १९८६च्या सुमारास ‘दूरदर्शन’वरून गाजली होती, त्यासाठी ‘फ्रीडम रन’ ही संगीतरचना लुई बँक्स यांची होती आणि पुढे, ‘मिले सुर मेरा तुम्हारा’मध्ये लता मंगेशकरांचं गाऊन झाल्यावर संगीत उचंबळून येतं, ‘जय हे’पर्यंत जातं, त्याचेही रचनाकार हे बँक्सच. अर्वाचीन पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा ‘ग्रॅमी अ‍ॅवार्ड’साठी त्यांनी संगीतरचना व वादन केलेल्या ‘माइल्स फ्रॉम इंडिया’ या गाण्याचं नामांकन २००८ मध्ये झालं होतं आणि आता ते ७९ वर्षांचे आहेत. पण ही झाली अतिप्राथमिक ओळख.

आता आशीष घटक लिखित पुस्तकातून निराळे बँक्स कळणार आहेत. याआधी नरेश फर्नाडिस यांच्या ‘ताजमहाल फॉक्स ट्रॉट’ या मुंबईतल्या जाझ संगीताला वाहिलेल्या पुस्तकात बँक्स यांचा उल्लेख अनेकदा होता, ते मराठीजनांना माहीत नसलेलं जितंजागतं संगीतविश्व आता बँक्स यांच्या अनुभवांतून उलगडेल. मूळचे नेपाळी, मूळ नाव दामबर पुष्करबहादुर बुदपृथी; पण ट्रम्पेटवादक वडिलांनी स्वत:चं नाव बदलून ‘जॉर्ज बँक्स’ आणि मुलाचं लुई ठेवलं. दार्जिलिंगला शालेय, कॉलेजशिक्षण झालं. वयाच्या १३ व्या वर्षांपासून स्टेजवर वादन, १९७१ पासून कोलकात्याच्या ‘हिंदुस्तान हॉटेल’ आणि ‘ब्ल्यू फॉक्स’ इथं वादक म्हणून काम, त्याच सुमारास तत्कालीन जाझ संगीत ऐकता ऐकता जाझ शैलीत पियानोवादनाची आवड/ सराव आणि मग १९७४ साली राहुलदेव बर्मन यांच्या नजरेत (की कानांवर?) आल्यामुळे मुंबईला येण्याचं निमंत्रण! तिथं फिल्म संगीताच्या स्टुडिओंत व रात्री ‘सी रॉक’ हॉटेलात वादन, मग काही पाश्चात्त्य कलावंतांनाही संगीतसाथ आणि पुढे जाहिरातींसाठी संगीतरचना, ‘जाझ इंडिया’ या संस्थेच्या स्थापनेत सहभाग, ‘जाझ यात्रा’ उपक्रमाच्या आयोजनात हात, यातूनच रविशंकर यांच्यासह हिंदुस्तानी शास्त्रीय आणि जाझ यांच्या सहवादनाचा प्रयोग, झाकीर हुसेन यांच्यासह ‘संगम’ हे चतुष्टय स्थापून युरोप- अमेरिका दौरा, शिवमणी-उषा उथप-शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रयोग आणि आता मुलगा जिनो व त्याच्या वयाच्या कलावंतांसह नव्या धर्तीचं म्हणजे काहीशा रॉक शैलीचं वादन.. अशी गती बँक्स यांच्या जगण्याला आहे. पियानोच्या ‘कळा’ जणू त्यांच्या जगण्याचा भाग आहेत. अनुभवांची ती समृद्धी या पुस्तकात नक्कीच उतरली असेल, असं मानायला जागा आहे!