दरवर्षी जवळपास दीड ते दोन हजार चित्रपटांची निर्मिती करणारी भारतीय चित्रपटसृष्टी. या चित्रपटसृष्टीच्या पोटातील असंख्य तारे-तारका, सेल्यूलॉइडवर स्वप्न रंगवणारे अनेक सर्जनशील दिग्दर्शक-निर्माते यांच्या गोष्टी कधीही न संपणाऱ्या अशाच आहेत. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवलेले, अजूनही कार्यरत असलेले, आता कारकिर्दीच्या शिखरावर असलेले.. अशा प्रत्येक कलाकार-दिग्दर्शकाच्या आयुष्यात प्रत्येक चित्रपट घडवताना काहीतरी घडून गेले आहे आणि काही अजूनही घडते आहे. अशीच न संपलेली पहिली गोष्ट येत्या काही दिवसांत वाचकांच्या हातात असणार आहे, ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासची. ‘अनफिनिश्ड्’ या शीर्षकाने प्रियांका तिची आत्मकथा मांडणार आहे. ‘देसी गर्ल’ ते ‘अमेरिकी सून’ हा प्रियांकाचा प्रवास त्यात वाचायला मिळणार आहे. ‘मिस वल्र्ड’चा किताब जिंकल्यानंतर २००३ साली झालेला तिचा बॉलीवूड प्रवेश आणि मग ‘ऐतराज’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या मसालापटांपासून ते ‘फॅशन’, ‘बर्फी’, ‘मेरी कोम’ यांसारख्या नायिकाप्रधान चित्रपटापर्यंत मुख्य प्रवाहात अभिनेत्री म्हणून तिने उमटवलेले ठसा निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. बॉलीवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अमेरिकेत ‘क्वाँटिको’सारख्या दूरचित्रवाणी मालिकेत काम करण्याचा तिचा निर्णय धाडसीच म्हणायला हवा. सतत आव्हानात्मक परिस्थिती निवडायची, सतत स्वत:ला आजमावत, बदलत प्रगती करता येते हा विश्वास आईवडिलांनी रुजवला, असे प्रियांकाने याआधी मुलाखतींतून सांगितले आहेच. परंतु तुमचे अपूर्णत्व हेच पूर्णत्व आहे, हे लक्षात आल्यानंतर आपण हा पुस्तकप्रपंच केला, असे तिने स्पष्ट केले आहे. हे पुस्तक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात बाजारात येईल.

आणखी एका ‘चोप्रां’ची गोष्ट वाचकांपर्यंत पेंग्विन प्रकाशनानेच आणली आहे. ‘अनस्क्रिप्टेड : कन्व्हर्सेशन्स ऑन लाइफ अ‍ॅण्ड सिनेमा’ हे पुस्तक म्हणजे निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्याशी त्यांच्याबरोबर लेखक म्हणून गेली कित्येक वर्षे एकत्रित काम केलेल्या अभिजात जोशी यांनी साधलेला संवाद आहे. काश्मीरमधील कोण्या एका वझीरबाग नामक गल्लीत राहून हिंदी चित्रपटांची स्वप्ने पाहणारा काश्मिरी पंडिताचा मुलगा ते मुंबईत ‘विधू विनोद चोप्रा प्रॉडक्शन’ ही निर्मितीसंस्था उभारणारा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हा प्रवास प्रेरक ठरावा असाच आहे. पण विधू विनोद चोप्रांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘‘काश्मीरमधल्या कुठल्याशा मुलाने मुंबईत येऊन आपला आत्मा न विकता चित्रपट बनवण्याचे अशक्य स्वप्न शक्य केले, तर मी का नाही?’’ ही प्रेरणा आपल्या कहाणीतून वाचकाला मिळेल. पुढील आठवडय़ात हे पुस्तक बाजारात उपलब्ध होईल.

याशिवाय, अभिनेत्री करीना कपूरने गर्भधारणेवरील तिच्या अनुभवांवर आधारित लिहिलेले ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ हे पुस्तकही लवकरच प्रकाशित होणार आहे. तर सिनेअभ्यासक दीप्तकीर्ती चौधरी लिखित बॉलीवूडच्या ‘आतल्या गोटातील’ गोष्टींचा खुसखुशीत समाचार घेणारी चार पुस्तकांची मालिका प्रकाशित होते आहे. त्या मालिकेतील ‘बॉलि-डेट्स’, ‘बॉलि-प्लेसेस’, ‘बॉलि-कॅरेक्टर्स’ आणि ‘बॉलि-थिंग्ज’ या पुस्तकांबरोबरच ‘बॉलिगीक : द क्रेझी गाइड टु बॉलीवूड ट्रिव्हिया’ हे आणखी एक त्यांचे पुस्तकही वाचकांच्या भेटीला येणार आहे.