‘क्वारंटाइन कॉमिक्स’ नावाची एक चित्रकथा-माला किंवा अनेकांच्या नवनवीन चित्रकथांचे काही अंश, गेल्या वर्षभरात एका संकेतस्थळावरून अधनंमधनं प्रकाशित होतच होते. (अतिलहान कवितांना ‘कणिका’ हा शब्द अनंत काणेकरांनी सुचवला होता, त्या चालीवर यांनाही ‘चित्रकणिका’ म्हणावं का?) त्या चित्रकणिका-मालेची तर ई-पुस्तकंही आलीत गेल्या सप्टेंबरातच, ‘किंडल’वर. मग आता येत्या मे महिन्यात ‘क्वारंटाइन कॉमिक्स’ नावाचं पुस्तक प्रकाशित होणार, त्याचं काय एवढं?

नाव एकच असलं, तरी या दोन ‘क्वारंटाइन कॉमिक्स’मध्ये फरक आहे. पहिली जी माला होती, ती अलगीकरणाच्या काळात घरी बसलेल्या कॉमिक आर्टिस्ट वा चित्रकथाकलावंतांची व्यावसायिक हालचाल पुन्हा सुरू व्हावी, या दृष्टीनं सुरू झाली. ‘आइस्क्रीम मॅन’ नावाच्या १२ हून अधिक कलावंतांच्या समूहानं याकामी पुढाकार घेतला. या समूहानं स्वत:च्या नव्या चित्रकथा तर संकेस्थळावर सशुल्क उपलब्ध केल्याच, पण इतर चित्रकथा/ चित्रकादंबरीकारांनाही त्यांच्या नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कल्पना अशी होती की, नवाकोरा अंश वाचण्यासाठी संकेतस्थळावरच दीड-दोन डॉलर (दीडेकशे रुपये) वाचकांनी भरावेत, त्या मिळकतीचा किमान ५० टक्के हिस्सा कलाकारांकडे जावा! यामुळे झालं असं की, नाव ‘क्वारंटाइन कॉमिक्स’असलं तरी अनेक चित्रकथांचा विषय मात्र अलगीकरणाशी अजिबात संबंधित नव्हता. तो निराळाच काही तरी होता. या साऱ्या प्रयत्नात (आणि ‘आइस्क्रीम मॅन’ समूहातही) मूळचा महाराष्ट्रीय, जागतिक दर्जाचा गुणी अक्षरकार आदित्य बिडिकर याचाही सहभाग आहे, हे उल्लेखनीय.

पण मेमध्ये येणाऱ्या ‘क्वारंटाइन कॉमिक्स’ या पुस्तकाची गोष्ट निराळी. ते एकटीचं पुस्तक. ब्रिटनवासी लेखिका रॅचेल स्मिथ हीच या पुस्तकाची चित्रकारही. अलगीकरणामधल्या मनोवस्थांचा मागोवा घेणारे चित्रकथांश तिनंही वेळोवेळी संकेतस्थळावर ‘सोडले’ होते, पण ते मोफत! आता हे मोफत अंश कधी तरी तिथून नाहीसे होतील, आणि त्याऐवजी संग्राह््य असं पुस्तक ‘आयकॉन बुक्स’ या ब्रिटिश प्रकाशकांतर्फे येईल. स्मिथ या नावाजलेल्या चित्रकादंबरीकार आहेत. आत्मपर लिखाणातून लोकांच्या भावनांशी नातं जोडण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. म्हणजे पुस्तकाचं स्वागतबिगत बऱ्यापैकी होईलच.

पण बातमी अशी की, सध्या रॅचेल स्मिथ यांच्या या अनेक विलगीकरण- चित्रकणिकांपैकी

तब्बल ७९ भाग, मोफत वाचायला मिळताहेत! त्यासाठी संकेतस्थळाचा पत्ता : https://www.boredpanda.com/comics-quarantine-comix-rachael-smith/