मराठीत अशा साठ-बासष्ट कादंबऱ्या लिहिणारे- आणि तरीही वाचकांना वाट पाहायला लावणारे लेखक बरेच होते.. नारायण धारप, दिवाकर नेमाडे, शरश्चंद्र वाळिंबे.. पण या मराठी लेखकांचं आणि दैनिक वर्तमानपत्रांचं कधी काही जमलं नाही. का तर म्हणे या लेखकांचे विषय गुन्हेगारी, भुतं किंवा तत्सम असतात.. म्हणजे अभिजात नसतात. याउलट स्टीफन किंग!

१९४७ साली जन्मलेले हे स्टीफनराजे त्यांच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षांपासनं आजतागायत असे काही गाजतायत, की जणू कधी कुणी साठच्या वर कादंबऱ्या लिहिल्याच नव्हत्या.. यांचं प्रत्येक पुस्तक येतं आणि लगेच ‘न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर’ यादीत मिरवतं. बरं, या यादीसाठी काही वशिला वगैरेही चालत नाही. आकडेच पाहिले जातात, खपाचे. तो खप काही लाखांत वगैरे. शिवाय साहित्य समीक्षक नेहमीच नसतील दखल घेत; पण तरी स्टीफन किंग हे ज्यांचा अभ्यास करावा अशा लोकप्रिय लेखकांपैकी एक मानले जातात अमेरिकेत.

वाचकाला उत्कंठा लावणाऱ्या भयकथा, सूडकथा वगैरेच तर लिहितात ना ते? होय, बहुतेकदा. पण त्यांची ‘द ग्रीन माइल’सारखी कादंबरी जादूई वास्तववादाचं (ज्यासाठी उत्तर अमेरिकेतले इंग्रजी लेखक नव्हे, तर दक्षिण अमेरिकी देशांमधले आणि स्पॅनिश भाषेत लिहिणारे माख्रेजसारखे लेखकच अधिक ओळखले जातात) उदाहरण ठरते आणि मनुष्यस्वभावाचं उत्तम दर्शन घडवते. हे स्टीफन किंग नवी कादंबरी लिहिताहेत हीसुद्धा साहजिकच बातमी होते. येत्या ७ मार्चला त्यांची ‘लेटर’ ही कादंबरी येतेय. पत्र नाही, ‘नंतर’ या अर्थानं लेटर- तेही मृत्यूच्या नंतर! नुकती वयात येणारी मुलं, मृतांचं रहस्य, त्यापुढे दिङ्मूढ झालेले पोलीस, अखेरच्या पानांमधली कलाटणी वगैरे गुंतागुंत ‘लेटर’मध्येही आहेच, पण हिचं आणखी एक कौतुक म्हणजे ती जुन्या वळणाच्या- पोस्टर कलरमध्ये रंगवलेल्या मुखपृष्ठानिशी, पुठ्ठा बांधणीत ‘हार्ड केस क्राइम’ मालिकेतली कादंबरी म्हणून प्रकाशित होणार आहे. ही किंग यांची बासष्टावी कादंबरी. लगेच ऑगस्टमध्ये त्रेसष्टावी येते आहेच!