31 October 2020

News Flash

बुकबातमी : थरूरत्नाकर..

ट्विटर खात्यावरून, त्यांच्या जाहीर भाषणांतून अशा एखाद्दुसऱ्या शब्दांची पखरण अगदी २०१० पासूनच झालेली अनेकांना माहीत असेल.

संग्रहित छायाचित्र

मराठी, संस्कृत आणि हिंदीत ‘शब्दरत्नाकर’ हा शब्द आहे. यातल्या ‘रत्नाकर’चा अर्थ समुद्र असा होतो. शब्दांचा समुद्र, म्हणजे इंग्रजीतल्या ‘थिसॉरस’ या अर्थाने ‘शब्दरत्नाकर’ हा शब्द वापरला जातो. ‘मराठी शब्दरत्नाकर’ या पुस्तकात मराठी शब्दांचे निरनिराळय़ा अर्थछटांचे प्रतिशब्द सापडतात. मग ही अचाट शब्दसंपदा पाहून आपण नामोहरम झालो नाही, गर्भगळितही झालो नाही, हतबुद्ध तर अजिबातच झालो नाही.. निव्वळ चकित झालो आहोत, हे वाचकाला आपसूक ठरवता येते! आश्चर्यचकित व्हावे, इतक्या शब्दांची नवलाई वाचकाला भिडते. हे मराठीतल्याच नव्हे, तर कुठल्याही भाषेतल्या शब्दरत्नाकराबद्दल खरे ठरते. अगदी इंग्रजीतल्या थिसॉरसबद्दलही. पण शशी थरूर यांनी इंग्रजीत आणू घातलेल्या ‘थरूरॉसॉरस’ या पुस्तकाचे स्वरूप थिसॉरसपेक्षा निराळे आणि काहीसे डिक्शनरीसारखे आहे. हे पुस्तक ‘पेंग्विन’तर्फे येत्या १ सप्टेंबरला येईल, त्याआधीच थरूरॉसॉरस हा शब्द कधीकाळी नामशेष झालेल्या अजस्र ‘डायनॉसॉरस’शी निव्वळ उच्चाराने मिळताजुळता आहे, हे ‘बुकबातमी’चे वाचक नक्कीच ओळखतील. पण त्या गतकालीन प्राण्यासारखेच, आज कल्पनेतून वा उत्खननातूनच जे साकार होतात, असे शब्द थरूर यांनी वापरलेले आहेत, हे या पुस्तकाच्या वाचकांना जाणवेल. थरूर यांच्या ट्विटर खात्यावरून, त्यांच्या जाहीर भाषणांतून अशा एखाद्दुसऱ्या शब्दांची पखरण अगदी २०१० पासूनच झालेली अनेकांना माहीत असेल. त्या साऱ्या शब्दांची एकत्रित ओळख करून देणारे हे पुस्तक. या शब्दांची काही उदाहरणे पाहू. ‘स्क्रिप्टुरियंट’ म्हणजे लिहिण्याची ऊर्मी प्रबळ असणारी व्यक्ती. ‘लालोचेझिया’ म्हणजे अश्लील किंवा वाह्यात बोलून भावनाशमन करण्याचा वृत्तिविकार. ‘फ्लॉसिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ म्हणजे प्रत्येक गोष्टीला कमअस्सल ठरवण्याची कृती किंवा सवय. ‘रोडोमॉन्टेड’ म्हणजे अवाच्या सवा बढाया किंवा रोडोमाँट म्हणजे बढाईखोर व्यक्ती. ‘स्नॉलिगॉस्टर’ म्हणजे ध्येयहीन आणि स्वत:च्या लाभापुरते राजकारण करणारी व्यक्ती. ‘प्युएराइल’ म्हणजे बालिश किंवा अपरिपक्व..

..यांपैकी अनेक शब्द राजकीय क्षेत्राविषयी बोलताना थरूर यांनी वापरले आहेत. ते त्यांनी प्रथमच तयार केले, असे नाही. उदाहरणार्थ ‘स्नॉलिगॉस्टर’ हा १८४५ साली, तर ‘रोडोमॉन्टेड’ १५९२ मध्ये प्रथम वापरला गेला, अशी माहितीदेखील थरूर देतात. ‘वेबकूफ’सारखा हिंग्लिश शब्दही त्यांनी प्रचलित केला. असे अवघे ५३ शब्द ‘थरूरॉसॉरस’मध्ये असले, तरी शब्दप्रेमाची खूण म्हणून या पुस्तकाला वाचकप्रियता मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:04 am

Web Title: book batmi article on thesaurus book shashi tharoor abn 97
Next Stories
1 प्रलयानंतरचा प्रश्न..
2 बुकबातमी : सनदशीर.. की स्वप्नाळू?
3 गडद होत जाणाऱ्या केशरी छटा..
Just Now!
X