चीनमुळे जागतिक घडी बदलू किंवा विस्कटू शकते, तेवढी ताकद आणि खुमखुमीसुद्धा त्या देशाकडे आहे, याचं भान आता सर्वाना आलेलं आहे. त्यामुळे चीनविषयीच्या पुस्तकांचा सूर आता अधिक थेट होऊन- चीनला रोखायचं कसं, असाच झालेला आहे. अशा प्रकारची तीन पुस्तकं ऐन टाळेबंदी-काळात कुठे ना कुठे प्रकाशित झाली. रोरी मेडकाफ यांचं ‘द इंडो पॅसिफिक एम्पायर- चायना, अमेरिका अ‍ॅण्ड द कॉन्टेस्ट फॉर द वल्र्ड्स पायव्होटल रीजन’, सेबॅस्टियन स्ट्रँजिओ यांचं ‘इन द ड्रॅगन्स शॅडो : साऊथईस्ट एशिया इन द चायनीज सेंच्युरी’ आणि शक्ती सिन्हा यांनी संपादित केलेलं ‘वन माऊंटन टू टायगर्स’ ही ती तीन पुस्तकं. तिघांचेही आशय निरनिराळे. मेडकाफ हे ट्रम्प यांच्या सत्ताकाळात चीनला अमेरिका धडा शिकवू शकणारच नाही, असा सूर लावतात. हा धडा कसा शिकवायचाय याची योजनाही ते सांगतात.. जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत तसंच हिंद-प्रशांत सागरी क्षेत्रातले अन्य देश यांचं सामरिक आणि व्यापारी महत्त्व अमेरिकाप्रणीत प्रयत्नांनी इतकं वाढवायचं की चीनशी थेट संघर्ष न करता, चीनला नमतं घ्यावंच लागलं पाहिजे. ही योजना लोकशाहीवादी आहे- चीनसारखी विस्तारवादी नाही. या योजनेची बीजं ओबामाकाळात कशी आहेत, हे मेडकाफ सांगतात. दुसऱ्या पुस्तकाचे लेखक स्ट्रँजिओ यांचा भर याच सागरी क्षेत्रावर, पण भारत वगळता अन्य देशांवर आहे. तैवान, कोरिया आणि जपान हे देश चीनला कसकसं प्रत्युत्तर देतात, हे येत्या काळात कळीचं ठरेल असा त्यांचा सूर असला तरी या क्षेत्रातील देशांमध्ये चीनशी कसं वागायचं याबाबत एकवाक्यता नाही, हेही ते विशद करतात.

तिसऱ्या पुस्तकाबद्दल उत्कंठा अधिक असणार. पण अखेर हे संपादित, परिसंवादवजा पुस्तक आहे. शक्ती सिन्हा हे बडोदा येथील ‘अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटय़ूट’ या थिंक-टँकचे प्रमुख असले तरी पुस्तकात मोदींविषयी थेट प्रकरण एकच आहे आणि तेही मोदी व क्षी यांच्या राजकीय उदयात कसं साम्य आहे, हे दाखवणारं! अन्य प्रकरणांत तैवानशी बेधडक आर्थिक संबंधवृद्धी करावी, लष्करी संघर्ष लांबवत ठेवावा, अशा सूचना आहेत. एकमेकांचे चीनविषयक दृष्टिकोन समजण्यासाठी ही तीन ताजी पुस्तकं उपयुक्त ठरतील.