25 October 2020

News Flash

बुकबातमी : दोन पुस्तके, एक पुरस्कार

आलेफ बुक कंपनीकडून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’!

(संग्रहित छायाचित्र)

या आठवडय़ात ‘तनिष्क’ या दागिन्या निर्मात्या कंपनीला समाजमाध्यमांवरील जल्पकांच्या रोषामुळे आपली जाहिरात मागे घ्यावी लागली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार करणारी ती जाहिरात आपल्यापैकी अनेकांनी पाहिलीही असेल. जाहिरातीतील हेतू उदात्त असला तरीही काहींना ती खटकलीच, ते का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.. किंवा याच आठवडय़ात महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांनी तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘धर्मनिरपेक्ष बनलात काय’ म्हणून चिमटा काढला. ते विधान अनेकांना रुचले नाही. पण राज्यपालांच्या त्या विधानात न रुचण्यासारखे आहेच काय, असा प्रश्न पडणारेही काही मंडळी असतीलच.. सरत्या आठवडय़ातील या दोन घटनांतून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे अनेकांकडे तयार असतील. त्यांनी ते प्रश्न विचारणाऱ्यांना ती दिलीही असतील. ज्यांच्याकडे ती नसतील किंवा आपल्या उत्तरापेक्षा वेगळे उत्तरही असू शकते यावर ज्यांचा विश्वास असेल आणि त्या निराळ्या उत्तरापर्यंत जाण्याची आस ज्यांना असेल, अशांसाठी ही बुकबातमी.. अर्थातच नव्या पुस्तकाच्या घोषणेबद्दलची! त्या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर. गुरुवारी ट्विटरवरून त्यांनी आपल्या नव्या पुस्तकाची घोषणा केली. आलेफ बुक कंपनीकडून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’! थरूर यांच्या २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘व्हाय आय अ‍ॅम अ हिंदूू’ या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जात आहे. पण त्यांचे हे नवे पुस्तक केवळ हिंदूूंबद्दल किंवा हिंदूू असण्याबद्दल नाही, याकडे त्याचे उपशीर्षक निर्देश करते आहे. ते असे आहे : ‘ऑन नॅशनालिझम, पॅट्रिऑटिझम अ‍ॅण्ड व्हाट इट मीन्स टु बी इंडियन’! म्हणजे पुस्तक ‘भारतीय असणे म्हणजे काय’ हे सांगणारआहे. त्या सांगण्याला ‘आज’चे संदर्भ किती, हे १ नोव्हेंबरला ते प्रकाशित झाले की कळेलच!

***

थरूर हे दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय राजनयात (डिप्लोमसी) कार्यरत होते, अलीकडे काँग्रेसचे खासदार, मंत्रीही राहिले. देशातील आंग्ल-अभिजन वर्गात त्यांचे अनेक चाहते आहेत. अलीकडच्या त्यांच्या काही पुस्तकांमुळे तर उदारमतवादी, अगदी डाव्या मंडळींमध्येही त्यांच्याविषयी आदराने बोलले जाते. त्यांच्यासारखा अभ्यासक विचारलंबकाच्या डाव्या बाजूस असल्याचे काहीसे अप्रूपवजा कुतूहलही त्यात डोकावते. उजव्यांमध्ये तसे अप्रूप एकेकाळी ज्या मोजक्यांच्या वाटय़ाला आले, त्यात अरुण शौरी यांचा समावेश करावा लागेल. प्रस्थापितांना अभ्यासूपणे भिडणारा पत्रकार अशी त्यांची ओळख. ऐंशी-नव्वदच्या लिहिलेल्या त्यांच्या डझनभर पुस्तकांची शीर्षके वाचली तरी त्याचा प्रत्यय येईल. आपल्या लेखनामुळे उजव्या मंडळींमध्ये प्रचंड वाचकप्रिय झालेले अरुण शौरी २०१४ नंतर मात्र त्यांना जणू अप्रिय ठरू लागले. भाजप सरकारविरुद्ध, पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध त्यांनी जाहीर टीकास्त्र सोडले, हे त्याचे कारण. परंतु एकेकाळी सत्ताधारी, प्रशासन यांवर टोकदार प्रहार करणाऱ्या शौरी यांनी नेमक्या या काळात आपले लेखनविषय बदललेले दिसतात. अध्यात्म हा अलीकडच्या काळात त्यांच्या चिंतनाचा भाग झाल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी आलेले ‘टू सेंट्स’ हे रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी यांच्या संदर्भात अध्यात्मगर्भ विवेचन करणारे पुस्तक हे त्याचे ठळक उदाहरण. या पुस्तकातील विवेचनाचा अधिक विस्तार करणारे त्यांचे नवे पुस्तक २६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होत आहे. ‘प्रीपेरिंग फॉर डेथ’ हे त्या पुस्तकाचे शीर्षक. पेन्ग्विन प्रकाशनाकडून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात शौरी यांनी रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांच्याबरोबरच गौतम बुद्ध, महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे दाखले देत अध्यात्माची चिंतनधारा मांडली आहे. विपश्यना, ध्यान यांविषयी काही व्यावहारिक धडेही त्यात दिले आहेत.

***

पुण्यानजीकच्या लवासा सिटीत वास्तव्याला असणाऱ्या अरुण शौरी यांनी ‘मृत्यू’ या गूढगर्भ संकल्पनेचा विचार करणारे पुस्तक लिहिले. त्याच्या प्रसिद्धीची बातमी या आठवडय़ात आली, त्याच सुमारास इरिट्रिया या पूर्व आफ्रिकेतील देशातले कवी एमॅन्युएल असरत यांच्याविषयीची बातमीही माध्यमांतून झळकली. एमॅन्युएल असरत हे राजकीय आशय कवितेतून ठासून मांडत होते. ते ‘झेमेन’ या नावाचे एक वाङ्मयीन पत्रही चालवत. इथवर ठीक होते. पण इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसियास अफवेर्की यांच्यावर टीका करणारे लेखन ‘झेमेन’मध्ये प्रसिद्ध होऊ लागले, तसे असरत हे सत्ताधाऱ्यांना खुपू लागले. त्यात २००१ साली असरत आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना सरकारने अटक केली आणि तुरुंगात डांबले. त्यांचे बंधू डॅनिएल मेब्राहतू हे सांगतात, ‘‘आता १९ वर्षे झाली एमॅन्युएल कुठल्याशा तुरुंगात आहे. तो जिवंत तरी आहे का, हेही कळायला काही मार्ग नाही.’’

तर.. या असरत यांच्या लढय़ाशी जमैकन कवी लिंटन जॉन्सन यांनी बांधिलकी व्यक्त केली आहे. केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतूनही. ती कशी? तर जॉन्सन यांना यंदाचा पेन पिन्टर पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी जॉन्सन यांनी आपण हा पुरस्कार एमॅन्युएल असरत यांना अर्पण करत असल्याची घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:04 am

Web Title: book batmi article shashi tharoor announces his new book abn 97
Next Stories
1 दोन कथा, एक विधान..
2 बुकरायण : पुनर्वनवास..
3 बुकबातमी : पितळी नोंदवही!
Just Now!
X