पुस्तक सपकच आहे. वाचनीय नाही. मग बुकबातमी याच पुस्तकाबद्दल कशाला? कारण असं की, आजची बातमी पुस्तकाबद्दल नसून त्याच्या गाजवणुकीबद्दल आहे. जीनी कमिन्स या लेखिकेचं ‘अमेरिकन डर्ट’ नामक हे पुस्तक येण्यापूर्वीच फार गाजवलं गेलं. ‘मेक्सिकनांची परवड आणि त्यांची अमेरिकेत जगण्याची धडपड या कादंबरीनं नेमकी टिपलीय’, ‘मूक समाजाला आवाज दिलाय’, ‘लेखिका गौरवर्णीय अमेरिकी असली तरी तिचा पती बेकायदा निर्वासितच होता’ वगैरे बातम्या पेरल्या गेल्या, तुफान पूर्वनोंदणी झाली. मग २१ जानेवारीस हे पुस्तक बाजारात येताच ते ‘ओप्रा (विनफ्रे) बुक क्लब’चं मानकरी ठरलं.. तिथंही असलंच हुळहुळं कौतुक झालं. पण पुस्तक लोकांहाती आल्यावर असं लक्षात आलं की दक्षिण अमेरिका, तिथला अमली पदार्थ व्यापार, खूनबाजी, मेक्सिको स्त्रियांना असुरक्षित असणं, हे जे एरवीही गौरवर्णी अमेरिकनांच्या दिवाणखान्यांतल्या चर्चेचे विषय असतात ते तितक्याच वरवर या कादंबरीत आहेत. ‘अमेरिकी चांगले, दक्षिण अमेरिकी वाईट’ असं ठसवण्यासाठीच जणू ही कादंबरी लिहिली की काय, असंही अनेक वाचकांना वाटलं. ही चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली.. आणि (अर्थातच) तिची पातळी सुटली.. पुस्तकाची चर्चा हाताबाहेर गेली आणि ‘हिस्पॅनिकांचा अपमान’ करणाऱ्या या कादंबरीच्या लेखिकेचं फिरणं बंद करून टाकू, अशा अस्मितावादी सुरापर्यंत ही चर्चा ढासळत गेली. अर्थात, गंभीर आक्षेपही गांभीर्यानं घेतले गेलेच. लेखिकेचा तो ‘स्वत: बेकायदा निर्वासित’ पती मूळचा आयरिश- म्हणजे अमेरिकेतल्या युरोपी वंशवाद्यांसाठी ‘उच्चआंतरजातीय चालेलसा’च आहे, हेही उघड झालं. प्रकाशकांना अखेर ‘आम्ही जरा अधिकच वाहावत गेलो पूर्वप्रसिद्धीत’ अशी कबुली द्यावी लागली. तरीही अगदी शुक्रवारीच जी बातमी आली, तीही प्रसिद्धीच्या तंत्राचाच विकृत भाग मानावी काय, अशी शंका अनेकांना येऊ शकते. अमेरिकी पद्धतीप्रमाणे या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी प्रतींवर स्वाक्षरी, चर्चा वगैरे कार्यक्रमांनिशी होणारा दौरा (बुक टूर) म्हणे ‘ठार मारण्याच्या धमकी’मुळे रद्द करावा लागला आहे!